ती, मी आणि बरंच काही : 3 . . .
एव्हाना मी तीची खूप काळजी घ्यायला लागलो. तू जेवलीस का?? केव्हा झोपशील? वैगेरे वैगेरे.
जेव्हा घरात काही व्हायचं ती उपाशी राहायची, मग मी खूप मनवायचो तिला, तिची समजूत काढायचो, मी तिच्या आई वडिलांच्या बाजूने बोलून तिला समजावण्याचा प्रयत्न करायचो. अतिशय समजूतदार होती ती पण ह्या बाबतीत मनाने इतकी कोलमडली होती कि तिला समजावणं अतिशय कठीण जायचं.
झोपायची तर रात्री दोन तीनला. घरातील कामं उरकून मग अभ्यास वैगेरे करून, अर्धा तास आवर्जून गाणं ऐकूनच झोपायची.
गाणं ऐकल्याशिवाय तिला झोप लागत नसायची. हल्ली मी हि तिच्या सोबतीने रात्री अभ्यास करायला लागलो होतो.
त्या दिवशी ती दोन लेक्चर बुडवून स्टेशनवर बसली होती, एकटीच. मी कॉलेज सुटल्यावर आलो तर ती नेहमीच्या जागी मारवा ऐकत बसली होती. चेहरा पूर्ण मावळलेला होता, डोळे किंचित सुजलेले होते, अतिशय उदास दिसत होती. काहीतरी गंभीर झालं असणार, विचारलं तर कळलं घरच्यांनी एका स्थळाला होकार दिला होता आणि आज कुंडली जुळवायला जायचं होतं.
मी पूर्णपणे हादरलो होतो. कोणत्याही क्षणी तिथे रडलो असतो पण १.३२पर्यंत दोघेही उदास तसेच बसलो.
आज तिचा पाऊस वेगळा होता आणि माझाही पण भिजत मात्र दोघेही होतो.
घरी आल्यावर अचानक रडायला आलं, खूप रडलो, डोळे सुजले इतका, तिला मनातलं सांगावसं वाटत होतं पण ती नकार देणार हे देखील शंभर टक्के खरं होतं, आणि त्या बाबतीत तिला समजावणं अशक्य होतं . .
प्रथमच मनात काहीतरी तुटत असल्याचा भास होतं राहिला, धाप लागत होती, छातीत मधून मधून कळ उठत होती, राहून राहून तिचाच विचार घोंघावत राहिला आणि मन विरहाच्या विचाराने कासावीस झाला होता.
मला तिला होणाऱ्या सगळ्या त्रासापासून खूप दूर ठेवायचं होतं, तिला खूप खूप प्रेम द्यायचं होतं, माझ्या घरचे अगदी तिला हव्या असलेल्या कुटुंबासारखे आहेत, तिला कधीच एएकटं वाटू दिलं नसतं, खूप प्रेम दिलं असतं सगळ्यांनी तिला, ह्या फुलासारख्या चेहऱ्यावर नेहमी हसू पाहायचं होतं मला. मी तिच्यासोबत लग्नदेखील करायला तयार होतो पण तिने स्पष्ट नकार दिला असता हेही तितकच खरं होतं. आम्ही दोघेही वेगळ्या जातीत होतो.
मला हरकत नव्हती पण तिला प्रेम विवाह करायचाच नव्हता, तिच्या मम्माचं मन आणि विश्वास जपायचं होतं तिला.
अचानक आजारी पडलो, खूप अशक्त वाटत होतं आतून म्हणून चार पाच दिवस कॉलेजला गेलोच नाही, ना तिला भेटलो ना मेसेज पहिले.
तिनेच फोन केला, मी थातुर मातुर कारणं देत तिला टाळत असताना तिनेच विचारलं मला " तुला मी आवडते? प्रेम करतो माझ्यावर? लग्नासाठी विचारणार आहेस मला?"
दोन मिनिट फक्त दोघांचे श्वास बोलत होते, मला हो म्हणायची हिम्मत होतं नव्हती.
"तसं काही करू नकोस, मी नकार देईल, मला मैत्री तोडायची नाहीये, म्हणून ते एकतर्फी प्रेम ह्या मैत्रीत आणू नकोस. बघ जमलं तर मी स्टेशनवर असतेच १.३२पर्यंत."
मी पुन्हा रडलो, तिचे साठवलेले असंख्य मेसेज एका क्षणात डिलिट केले, थोडेसे फोटो होते सगळे डिलिट केले पण मनात साठवलेली ती, तिला बाहेर काढता नाही आली.
आज ती उशिरा आली स्टेशनवर मी कॉलेजला गेलोच नाही तिथेच बसलो होतो, तिच्या विचारांत हरवून. बसल्याबसल्या कितीवेळा डोळे ओलावले देव जाणो, अश्या स्थितीत स्वतःला सावरणं मला अतिशय कठीण जात होतं, ती कशी सांभाळते स्वतःला तेहि देव जाणो.
ती येऊन माझ्या बाजूला शांत बसली होती, आजची शांतता आणि तिची नेहमीची शांतता खूप वेगळी होती.
चोरून चोरून ती माझ्या लाल झालेल्या डोळ्याकडे पाहत होती आणि मी डोळ्यात येणारा ओल कसोशीने लपवत होतो.
कदाचित माझ्या ह्या अवस्थेवर दया येऊन तिने एक सुखद बातमी दिली.
"कुंडली जुळली नाही, आणि भटजी म्हणाले दिड वर्षे हिच्या लग्नाचा योग नाही, केलात तर काहीतरी अघटित घडेल"
नकळत दोन थेम्ब गालावर ओघळले, आनंदाचे कि दुःखाचे माहित नाही आणि ते पाहून ती फक्त पाहत राहिली. कदाचित माझ्या डोळ्यातही तितकं दुःख नव्हतं जेव्हढं तिच्या डोळ्यांत मी पाहिलं, तिला खूप काही बोलायचं असूनदेखील ती निशब्द राहिली.
खाडखाड करत १.३२ ची ट्रेन आली आणि ती सॉरी बोलून निघून गेली. खूप काही होतं त्या सॉरी मध्ये,
माझ्यावर प्रेम असून देखील ती नाही बोलतेय असं काहीच नव्हतं पण कुणीतरी आपल्यावर प्रेम करत आहे, कुणासाठी तरी आपण महत्वाचे आहोत, आपलं असणं आपलं अस्तित्व कोणालातरी इतकं महत्वाचं आहे, आणि आपल्यासाठी कुणीतरी रडत आहे ह्या जाणिवेने भरलेला तो सॉरी.
ती सहसा रात्री कोणाचा कॉल उचलतचं नाही, तरीही कॉल केला मी. एक दोन तीन आणि चौथ्या वेळेस एक जड श्वासाने भरलेला 'बोल' असा शब्द कानात शिरला.
नाक पूर्णपणे पॅक झाल्यासारखा आवाज बसल्यासारखा तो शब्द बरंच काही सांगून गेला.
दार लॉक केल्याचा आवाज आला, कदाचित तिने रूम आतून बंद केली असावी, काही क्षण तिच्या नाक ओढण्याच्या सु सु असाच आवाज येत राहिला.
मग मीच हिम्मत करून बोललो " खरंच काही होऊ शकत नाही का ग आपल्यात?? मी तुझ्या मम्मा सोबत बोलेन, सगळ्यांना मनवेल. खरंच खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर, तू माझ्या सोबत असशील तर आयुष्यभर आनंदी राहीन ग मी, सुखाने जगेन. तुझी साथ असेल तर मी कोणतंही आव्हान हसत पार करेन. पण तू हवी आहेस मला, कोणत्याही किंमतीवर तू हवी आहेस, फक्त तू . . .ऐकत आहेस ना??? "
एक दबलेल्या अर्धवट हुंदक्याच्या आवाजात कॉल कट झाला आणि नंतर बंद झाला.
छान.
छान.
पुढील भागाची उत्सुकता !
पुढील भागाची उत्सुकता !
छान सुरू आहे
छान सुरू आहे