२७ सप्टेंबर २००८ रोजी जनरल मोटर्स या कंपनीला शंभर वर्षे पूर्ण झाली. याच वर्षी वित्तीय आणीबाणी आणि परिणामी आलेल्या मंदीमुळे कंपनी सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. त्यानिमित्ताने जनरल मोटर्सच्या गेल्या शंभर वर्षांतील वाटचालीचा घेतलेला वेध...
------------------
१८८५ साली जर्मन इंजिनिअर कार्ल बेंझ (Karl Benz) यांनी अंतर्गत प्रज्वलन इंजिनाचा (Internal Combustion Engine) यशस्वी वापर करुन स्वयंचलित वाहनाची निर्मिती केली, आणि इथून मोटारयुगास सुरुवात झाली. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेतही मोटारगाड्या बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले. १९०३ पर्यंत अशा प्रकारचे प्रयत्न करणार्या सुमारे पन्नास कंपन्या अस्तित्वात आल्या. यांमध्येच एक होती ब्युईक मोटर कंपनी (Buick Motor Company). कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यावर संस्थापक डेव्हिड ब्युईक (David Buick) यांनी १९०३ साली तत्कालीन उद्योगपती जेम्स व्हायटींग (James Whiting) यांना ती विकून टाकली. परंतु वर्षभर प्रयत्न करुनही कंपनीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये विशेष फरक न पडल्याने व्हायटींग यांनी आपला जुना मित्र विल्यम ड्युरांट (William Durant) याला मदतीसाठी पाचारण केले. कंपनीचे महत्तम समभाग आपल्याकडे राहतील आणि कंपनी आपल्या निर्णयाप्रमाणे चालेल या दोन अटींवर ड्युरांट यांनी १९०४ साली कंपनीची धुरा आपल्या शिरावर घेतली आणि इथून एका इतिहासाला सुरुवात झाली.
ड्युरांट यांचा तेव्हा घोडागाडी बनविण्याचा मोठा उद्योग होता. आपली स्वत:ची ऑटोमोबाईल कंपनी असावी अशी त्यांची बरीच इच्छा होती. ब्युईकच्या रुपाने एक सुवर्णसंधी त्यांच्याकडे चालून आली. ब्युईक हातात येताच ड्युरांट यांनी कंपनीचे नवीन समभाग बाजारात फ्लोट करुन भांडवल उभे केले. १९०५ सालच्या न्यूयॉर्क ऑटो शो मध्ये ब्युईक प्रदर्शित केली आणि आपल्या विक्रीकौशल्याच्या बळावर तब्बल ११०८ गाड्यांची ऑर्डर मिळविली. १९०४ साली ४० गाड्या विकणार्या ब्युईकने १९०५ साली १२०० गाड्या विकल्या. वर्षागणिक गाड्यांची विक्री वाढत गेली. १९०८ साली ब्युईकने सुमारे ८००० गाड्या विकल्या. ब्युईक व्हाईट स्ट्रीक हे मॉडेल प्रचंड प्रसिध्द झाले.
कंपनी जितकी मोठी तितकी ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक ह्यावर ड्युरांट यांचा प्रचंड विश्वास होता. त्याच सुमारास फोर्ड (Ford), कॅडिलॅक (Cadillac) आणि ओल्ड्समोबिल (Oldsmobile) या कंपन्यानीही वाहन उद्योगात बर्यापैकी आपले बस्तान बसवले होते. ब्युईकला थोडेफार आर्थिक स्थैर्य लाभताच ड्युरांटनी इतर कंपन्या विकत घेण्याची खटपट सुरू केली. १९०७ साली त्यांनी ओल्ड्समोबिल ही कंपनी विकत घेतली. ब्युईक आणि ओल्ड्समोबिल या कंपन्यांवर एकत्रित नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने २७ सप्टेंबर १९०८ रोजी जनरल मोटर्स (General Motors, GM) ही कंपनी स्थापन केली. पुढील दोन वर्षे ड्युरांट यांनी कंपन्या विकत घेण्याचा अक्षरश: सपाटा लावला. १९०९ साली कॅडिलॅक विकत घेऊन जनरल मोटर्सच्या मॉडेलांमध्ये लक्झरी ब्रॅन्डची भर घातली. रिलायन्स मोटर कंपनी विकत घेतली आणि ‘जनरल मोटर्स ट्रक कंपनी (GMC)’ असे तिचे नामकरण केले. १९१० पर्यंत जनरल मोटर्सने सुमारे २५ लहानमोठ्या कंपन्या विकत घेतल्या.
ह्याच सुमारास फोर्ड कंपनी विकत घेण्याची सुवर्णसंधीही ड्युरांटकडे चालून आली होती. ८० लाख डॉलर रोख रकमेच्या बदल्यात हेन्री फोर्ड यांनी कंपनी विकण्यास तयारी दर्शवली. ड्युरांट यांनी तत्कालीन बॅंकर जे पी मॉर्गन यांच्याकडे वित्तपुरवठ्याची मागणीही केली. परंतु, ओल्ड्समोबिल विकत घेताना ड्युरांट यांनी मॉर्गन यांच्या पाठीशी गुप्त व्यवहार केला होता. तेव्हा मॉर्गन यांनी भांडवल पुरविण्यास स्पष्ट नकार दिला आणि फोर्ड खरेदीव्यवहार संपुष्टात आला. तेव्हापासून विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत फोर्ड ही जनरल मोटर्सची प्रथम क्रमांकाची प्रतिस्पर्धी राहिली.
१९१० साली अमेरिकेत वाहन उद्योगात मंदी आली. गाड्यांची विक्री कमी झाल्याने नफा खालावला आणि ड्युरांट यांनी केलेल्या अनियंत्रित खरेदीमुळे जनरल मोटर्स कर्जबाजारी झाली. त्यावेळच्या प्रमुख बँकांनी ड्युरांट हे अध्यक्षपदावरुन पायउतार होतील या अटीवर ५ वर्षांसाठी १५० लाख डॉलर कर्ज देऊन जनरल मोटर्सला ‘बेल आऊट’ केले.
१९११ मध्ये जीएम सोडल्यानंतर ड्युरांट यांनी आपला मित्र लुईस शेव्रोले (Louis Chevrolet) याच्या सहाय्याने शेव्रोले मोटर कंपनी (Chevrolet Motor Company, Chevy) स्थापन केली. पुढे १९१५ साली जीएमने बँकांशी केलेला ५ वर्षांचा करार संपुष्टात आला. तेव्हा ड्युरांट यांनी इतर बँकाना हाताशी धरुन व सर्व प्रकारचे आर्थिक खेळ खेळून जीएमचे समभाग विकत घेतले आणि ते पुन्हा अध्यक्ष झाले. शेव्रोले ही कंपनी जनरल मोटर्समध्ये विलीन करून टाकण्यात आली. ह्या दशकाच्या शेवटी पहिल्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर जीएमने अमेरिकन सरकारकडून पुष्कळ कंत्राटे मिळविली. १९१२ ते १९२० या काळात जीएमचा आकार आठ पटीने वाढला. १९२० साली जीएमच्या ब्युईक मोटर कंपनीचे अध्यक्ष वॉल्टर क्रायस्लर (Walter Chrysler) यांनी जीएम सोडली आणि क्रायस्लर कॉर्पोरेशन (Chrysler Corporation) ही नवीन कार कंपनी थाटली. फोर्डनंतर क्रायस्लर ही जनरल मोटर्सची दुसर्या क्रमांकाची प्रतिस्पर्धी. पुढे १९२३ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीच्या काळात ड्युरांट यांनी स्टॉक मार्केटमध्ये आपली जवळजवळ सर्व संपत्ती गमावली आणि त्यांना जीएमला कायमचा रामराम ठोकावा लागला.
फोर्डच्या अत्यंत कमी किंमतीच्या गाड्यांशी स्पर्धा करणारा पॉन्टिआक (Pontiac) हा नवा ब्रॅन्ड जीएमने १९२५ साली बाजारात आणला. या गाड्यांसाठी कंपनीने Equal Monthly Installment (EMI) ही नवीन संकल्पना सर्वप्रथम राबवली. आता गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण रोख रक्कम हाताशी असणे आवश्यक नव्हते. त्यामुळे शेवी आणि पॉन्टीआक यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. गाड्यांचा खप इतका वाढला की १९३० पर्यंत जनरल मोटर्स ही जगातील सर्वाधिक गाड्या विकणारी ऑटोमोबाईल कंपनी झाली. २००७ पर्यंत, म्हणजे तब्बल ७७ वर्षे हा मान जीएमकडेच राहिला. अमेरिकेत यश मिळताच जीएमने जगात इतरत्र आपले हात-पाय पसरले. कॅनडातील मॅकलॉफ्लिन कार्स (Mclaughlin Cars), ऑस्ट्रेलियातील होल्डन मोटर बिल्डर्स (Holden Motor Builders), इंग्लंडमधील वॉक्सहॉल मोटर कंपनी (Vauxhall Motor Company) आणि जर्मनीतील ओपेल (Opel AG) या कंपन्या विकत घेतल्या.
२४ ऑक्टोबर १९२९ या दिवशी अमेरिकेच्या शेअर बाजारात अभूतपूर्व अशी ९० टक्क्यांनी घसरण झाली, आणि आर्थिक महामंदीची (Great Depression) लाट आली. या काळात जनरल मोटर्स केवळ आणि केवळ तिच्या प्रचंड आकारामुळे तग धरु शकली. मंदीच्या या महापुरात सर्व छोट्या आणि स्वतंत्र ऑटोमोबाईल कंपन्या अक्षरश: वाहून गेल्या आणि अमेरिकेत फोर्ड, जनरल मोटर्स आणि क्रायस्लर या “बिग थ्री” कंपन्या फक्त उरल्या. या काळात कंपनीने वाहन उद्योगातील गुंतवणूक कमी केली आणि डिझेल इंजिन, रेल्वे इंजिन, रेडिओ, प्रवासी आणि लढाऊ विमाने, बॅंका अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. काही कंपन्या विकतही घेतल्या.
मंदीवर उपाययोजना म्हणून अमेरिकन सरकारने कामगारांचे आठवड्यागणिक कामाचे दिवस कमी केले जेणेकरुन कंपन्यांना जास्त कामगारभरती करावी लागेल. तसेच कामगारांना स्वतंत्र संघटना निर्माण करता येईल अशी कायद्यामध्ये तरतूद केली. यातूनच युनायटेड ऑटो वर्कर्स (United Auto Workers, UAW) ही कामगार संघटना उदयास आली. १९३६ मध्ये युएडब्ल्यूने पगारवाढीसाठी संप पुकारला. जनरल मोटर्सच्या इतिहासातील हा पहिला संप. दोन्ही बाजूचे पक्षकार आपापल्या मतांवर अडून राहिले. प्रश्न इतका चिघळला की शेवटी अमेरिकेचे तत्कालीन पंतप्रधान फ्रँकलिन रुजवेल्ट यांना मध्यस्थी करुन संप मिटवावा लागला. २००० कामगारांनी मिळून केलेल्या संपाच्या ४४ दिवसांच्या काळात जीएमचे एक लाख चोपन्न हजार कामगार कामापासून वंचित राहिले. कंपनीचेही १७० मिलिअन (१७ करोड) डॉलर्सचे नुकसान झाले.
१९३९ मध्ये दुसरे महायुध्द सुरू झाले. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बर या अमेरिकन सैनिकी तळावर हल्ला केला, आणि अमेरिका महायुध्दात ओढली गेली. युध्दकाळात अमेरिकन सरकारकडून जीएमला अभूतपूर्व रकमांची कंत्राटं मिळाली. कंपनीने सुमारे सात लाख नवीन कामगार भरती केले, कारखान्यांची उत्पादकता दुप्पट केली. महामंदीच्या काळात विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीमुळे कंपनीची उत्पादनक्षमता वाढली होती. याचा पुरेपूर वापर कंपनीने करून घेतला. जनरल मोटर्सने या काळात साध्या बॉल बेअरिंगपासून ते रणगाडे, युध्दनौका, लढाऊ विमाने, बंदूका, दारुगोळयापर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन केले. जवळजवळ १२ बिलियन (१२०० कोटी) डॉलर्सची उलाढाल झाली. १९४५ मध्ये युध्द संपले आणि सामान्य गाड्यांचे उत्पादन पुन्हा नियमितपणे सुरू झाले.
युध्दानंतर पन्नासच्या दशकात अमेरिकेतील ऑटोमोबाईल कंपन्या आणि रस्ते बांधकाम कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी सरकारकडे महामार्ग (highways) बांधण्यासाठी लॉबींग (lobbying) करण्यास सुरूवात केली. शीतयुध्दाला तोंड देण्यासाठी अमेरिकेला महामार्गांची नितांत गरज आहे असा आग्रह धरला. तत्कालीन पंतप्रधान आयसेनहॉवर यांनी मग महामार्गांच्या गरजेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष होते लुसियस क्ले (Lucius Clay). गंमत अशी होती की क्ले हे त्यावेळी जनरल मोटर्सच्या संचालक बोर्डावर होते. त्यामुळे समिती महामार्गांची जोरदार शिफारस करणार हे जवळजवळ निश्चित होते. आणि तसेच झाले. समितीच्या शिफारशीवरुन पुढील चार वर्षांत देशभरात सुमारे ४१००० मैल लांबीचे महामार्ग बांधले गेले. समितीने लोहमार्गांचा (railroads) विकास तर सोडाच, परंतु अस्तित्वात असलेल्या लोहमार्गांच्या जाळ्याला पूरक असे महामार्ग बांधले जावेत अशी साधी सूचनाही केली नाही. परिणामी चार-एक वर्षांत लोहमार्गावरुन होणारे दळणवळण जवळजवळ ७७ टक्क्यांनी कमी झाले. महामार्गांचा वापर वाढल्यामुळे वाहन उद्योगाला प्रचंड चालना मिळाली.
ह्याच सुमारास जनरल मोटर्सने प्रसिध्द स्पोर्टस कार शेवी कॉर्वेट (Chevy Corvette) बाजारात आणली. ती अतिशय लोकप्रिय झाली. या काळात गाड्यांची रचना आणि सुविधा यामध्ये पुष्कळ बदल झाले. पॉवर स्टीअरींग (power steering), वातानुकुलन (air conditioning), सीट बेल्ट, ऑटोमॅटीक गिअरबॉक्स अशा अनेक सुधारणांनी युक्त अशा गाड्या विक्रीस आल्या. जीएमचे प्रसिध्द स्टायलिस्ट हार्ली अर्ल (Harley Earl) यांनी डिझाईन केलेल्या गाड्यांनी कंपनीला अमाप पैसा मिळवून दिला. दुसर्या महायुध्दापासून ते १९५६ पर्यंतचा काळ हा जनरल मोटर्सचा सुवर्णकाळ मानला जातो.
साठच्या दशकात शेव्रोले कॉर्वेअर (Chevy Corvair) ह्या गाड्यांना अपघात होत असल्याच्या बर्याच तक्रारी आल्या. प्रकरण कोर्टात गेले आणि निकाल जीएमच्या विरुध्द बाजूने लागला. कॉर्वेअर ही गाडी चालवण्यास असुरक्षित आहे अशी कबुली जीएमने दिली आणि जाहीर माफी मागितली. नंतर एक-दोन वर्षात ते मॉडेल बंद करुन टाकले. १९७७ साली ओल्ड्समोबिल डेल्टा ८८ ही गाडी विकत घेतलेल्या एका ग्राहकाला असे आढळून आले की त्याच्या गाडीमध्ये Rocket V8 इंजिनाऐवजी शेव्रोलेच्या गाड्यांमध्ये बसवतात ते सामान्य इंजिन बसवले आहे. प्रकरण पुन्हा कोर्टात गेले आणि निकाल पुन्हा जीएमच्या विरुध्द बाजूने लागला. 'जीएमच्या गाड्या ह्या काही समान डिझाईन्सवर आधारित आहेत आणि त्यांमध्ये कधीकधी पार्टसची अदलाबदली केली जाते' अशी धक्कादायक कबुली जीएमचे तत्कालीन अध्यक्ष पीट इस्ट्स यांना द्यावी लागली. तत्पूर्वी ७३ साली OPEC कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आणि ग्राहक देशांना पेट्रोल पुरविणे थांबविले (OPEC Oil Embargo). परिणामी अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती प्रचंड वाढल्या. जनरल मोटर्सला ह्याचा जोरदार फटका बसणार होता कारण त्यावेळी जीएमच्या गाड्यांचे सरासरी माईलेज सर्वात कमी म्हणजे १२ mpg (५ किमी प्रति लिटर) होते. १९७४ साली युएडब्ल्यूने पुन्हा पगारवाढीसाठी संप केला. यावेळी मात्र जीएमने पगारवाढीऐवजी पेन्शन आणि आरोग्यसुविधा देऊ केल्या(pension and healthcare benefits). नंतरच्या काळात ह्याच सुविधा जीएमची डोकेदुखी होऊन बसल्या.
सत्तरच्या दशकातील ह्या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे जनरल मोटर्सची लोकप्रियता कमी झाली. याउलट ८० च्या दशकात वोक्सवॅगन (Volkswagen), होंडा (Honda), टोयोटा (Toyota) या (आयात करामुळे) थोड्याशा महाग परंतु जास्त माईलेज व विश्वासार्हता असलेल्या गाड्यांची मागणी हळूहळू वाढली. जपानी गाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जीएमने १९८९ साली सॅटर्न (Saturn Corporation) नावाची नवी कंपनी उभी केली. या कंपनीच्या गाड्यांनी चांगली विक्रीही केली, पण जपानी गाड्यांचे मार्केट शेअर (market share) विशेष कमी करु शकली नाही. १९८२ ते १९९२ या काळात जीएमचे अमेरिकेतले मार्केट शेअर कमी होत गेले. ९१-९२ मध्ये जनरल मोटर्सला चांगलाच तोटा झाला. फोर्ड आणि क्रायस्लर या जीएमच्या तुलनेत आकाराने पुष्कळ लहान असणार्या कंपन्यांनी सुमारे साठ वर्षांनंतर पहिल्यांदा जीएम पेक्षा जास्त नफा नोंदवला. त्यानंतर उर्वरित नव्वदीत जरी जीएम नफ्यात राहिली तरी अमेरिकेतील तिच्या ढिसाळ कारभारावर आणि अकार्यक्षमतेवर होणारी टिका वाढत गेली. १९५० च्या सुमारास ५० टक्के असलेले जीएमचे मार्केट शेअर २००० साली ३० टक्क्यांच्याही खाली आले.
२१ व्या शतकाच्या सुरूवातीला आशिया खंडातील अर्थव्यवस्थांच्या विकासाचा वेग वाढला आणि जीएमने आशिया खंडात आपला विस्तार करण्यास सुरूवात केली. जपानमधील इसुझु, सुझुकी, सुबरु या कंपन्यांचे १० ते २०% समभाग विकत घेतले. त्यांच्या सहाय्याने युरोपियन मार्केट्साठी छोट्या आणि सुटसुटीत गाड्या बनविण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरियातील देवू मोटर्स (Daewoo Motors) विकत घेतली. २००३ साली शेव्रोले भारतात विकण्यास सुरूवात केली. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया या देशांमध्येसुध्दा विस्तार केला.
जनरल मोटर्सने अमेरिकेबाहेर जरी चांगली प्रगती केली तरी अमेरिकेतील अधोगती तिला रोखता आली नाही. २००४-०५ मध्ये प्रवासी गाड्यांऐवजी (passenger cars) कंपनीने SUV आणि pick-up truck सुधारण्यासाठी बराच पैसा खर्च केला. दुर्दैवाने त्या वर्षांपासून पेट्रोलच्या किंमती वाढत गेल्यामुळे या गाड्यांची अपेक्षित विक्री झाली नाही. १९५० च्या दशकात तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असणारी जनरल मोटर्स एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला जपानी कंपन्यांच्या तुलनेत मागे पडू लागली. ह्याचे चांगले उदाहरण म्हणजे पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालणारी hybrid गाडी. टोयोटाने पहिली hybrid गाडी १९९७ मध्ये बाजारात आणली, तर जीएमने hybrid गाडी बाजारात आणली २००७ मध्ये, म्हणजे तब्बल एका दशकानंतर! खरेतर ८० आणि ९० च्या दशकात कंपनीने संशोधन आणि विकासामध्ये चांगली गुंतवणूक केली होती. १९९६ साली संपूर्णपणे वीजेवर चालणारी EV1 (Electric Vehicle 1) ही गाडी जीएमने प्रदर्शित केली. कॅलिफोर्निया, अरिझोना या भागात भाडेतत्वावर ती वितरितसुध्दा करण्यात येऊ लागली. परंतु २००१ नंतर अचानक जीएमने या गाड्या भाड्याने देणे बंद करुन टाकले, आणि २००३ मध्ये EV1 हा प्रकल्पच कायमचा बंद करुन टाकला. प्रचंड लॉबींग करून अमेरिकेतील तेल कंपन्यांनी हा प्रकल्प बंद पाडला असे म्हटले जाते. (वादग्रस्त)
१९७० नंतर कंपनीने खालावणार्या आर्थिक परिस्थितीवर उपाय म्हणून बरेचदा कामगारकपात केली, परंतु असे करताना युएडब्ल्यूशी कधी पगारवाढ, बेकारभत्ता तर कधी आरोग्यसुविधा अशा प्रकारचे करार करावे लागले. पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा कामावरुन काढण्यात आलेल्या आणि त्यामुळे जनरल मोटर्सच्या विविध सुविधांचा लाभ घेणार्यांची संख्या २००५ मध्ये जवळजवळ १० लाख झाली. कंपनीने उत्पादिलेल्या प्रत्येक गाडीमागे सुमारे १२०० डॉलर ह्या सुविधांवर खर्च होऊ लागले. ह्याबरोबरच अमेरिकेत गाड्यांची खालावलेली विक्री, व्यवस्थापनाने महत्त्वाचे निर्णय घेताना केलेल्या चुका, कंपनीच्या प्रचंड आकारामुळे कोणत्याही निर्णयप्रक्रीयेस लागणारा विलंब ह्या सर्व गोष्टी कंपनीला तोट्यात ढकलण्यास कारणीभूत झाल्या.
२००५ मध्ये कंपनीला सुमारे १० बिलियन (१००० करोड) डॉलर्सचा तोटा झाला. त्यानंतर २००८ पर्यंतची पाचही वर्षे तोटाच झाला आहे. २००८ मध्ये जगात सर्वाधिक गाड्या विकणारी कंपनी हा मान टोयोटाने जीएमकडून हिरावून घेतला.
Hybrid गाड्यांना येऊ घातलेले मार्केट लक्षात घेऊन जीएमने शेव्रोले वोल्ट (Chevy Volt) ही वेगळ्या धाटणीची संकल्पित गाडी (concept car) २००७ मध्ये प्रदर्शित केली. गाडीचे माईलेज कमीत कमी ५० mpg इतके असेल आणि २०१०-११ च्या सुमारास ही गाडी विक्रीस उपलब्ध होईल असे कंपनीने घोषित केले आहे. आर्थिक परिस्थिती व जनमानसातील कंपनीची प्रतिमा वोल्टमुळे सुधारेल अशी कंपनीला आशा आहे.
या तोट्याच्या काळात जीएमने सामान्य गाड्यांमध्येही बर्यापैकी सुधारणा केल्या. परंतु त्याचा फायदा होतो आहे असे म्हणेपर्यंत २००८ मध्ये वित्तीय आणीबाणीमुळे मंदी आली. गाड्यांची विक्रीही होईना आणि तग धरून राहण्यासाठी कुठुन भांडवलही उपलब्ध होईना अशा अवस्थेत जनरल मोटर्स दिवाळखोरी जाहीर करणार अशी चिन्हे दिसू लागली. मात्र बुश सरकारने नोव्हेंबर २००८ मध्ये १३ बिलियन (१३०० करोड) डॉलर्सचे कर्ज देऊन परिस्थिती तात्पुरती सावरली. परंतु फेब्रुवारीअखेरीस कंपनीने पुन्हा मदत मागितली. सध्याच्या ओबामा सरकारने मात्र भूमिका थोडी कडक केली आहे. तेव्हा कंपनी आता सरकारच्या मदतीने नियंत्रित दिवाळखोरी (controlled bankruptcy) जाहीर करेल असे तर्क केले जात आहेत. त्याअंतर्गत चांगली जीएम - वाईट जीएम (good GM - bad GM) असे कंपनीचे दोन भाग करण्यात येतील. चांगल्या जीएमला सरकारतर्फे मदत करण्यात येईल आणि वाईट जीएम liquidate करण्यात येईल असा कयास आहे. जनरल मोटर्स कदाचित पूर्णपणे बुडणार नाही, परंतु ३५ देशांत गाड्यांचे उत्पादन करणार्या, २०० देशांत गाड्या विकणार्या आणि सुमारे दोन लाख पन्नास हजार कर्मचारीसंख्या असणार्या या अवाढव्य कंपनीचा आकार भविष्यात कमी होणार हे निश्चित.
--समाप्त.
अत्यंत
अत्यंत माहितिपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद इएमाआयची सुरुवात अशी झाली हे नवीन कळले. ली आयकोकाच्या आत्मचरित्रात कार उद्योगाची माहिति प्रथम मिळाली होती,ती आठवण ताजी झाली.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
मस्तच
मस्तच लिहीलायस रे लेख... अगदी सर्व बारकावे पुराव्या सकट. अभिनंदन!
पाच सहा वर्ष gm च्या manufacturing planst वर कंसल्टंट म्हणून काम करताना अशाच कहाण्या ऐकायला मिळाल्या आहेत अन बर्याच गोष्टी थेट अगदी जवळून बारकाईने पाहिल्या मिळाल्या.. आता जे bail out package वगैरे मागितलं gm ने त्यापेक्षा त्यांन्ना थेट कर्जबाजारी होवून बुडू द्यायला हवं होतं अमेरिकन सरकारने.. गेल्या दशकातील gm चे वरिष्ट व्यवस्थापनाची स्वार्थी वृत्ती अन एकंदर अमेरिकन ग्राहकाला quality च्या बाबतीत चक्क मूर्ख बनवणार्या या कंपनीचे असे दिवाळे आज ना उद्या निघणारच होते. तेलाच्या किमती वाढल्या नसत्या अन एकंदरीत जागतिक मंदीची लाट आली नसती, अन त्यात पुन्हा uaw ने राडे केले नसते तर या वरिष्टांची उधळपट्टी, दिवाळी अशीच चालू राहिली असती एव्हडच.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***
सचिन
सचिन अभ्यासपूर्ण माहिती देणारा लेख. खूप नव्या गोष्टी कळल्या. धन्यवाद. आणखी लिहित रहा.
अगदी
अगदी अभ्यासपूर्ण लेखन! आवडलं. सर्व छायाचित्र मस्त आहेत
छान छान..
छान छान.. सचिनभौ... छान माहिती मिळाली!...बाकी आज जे काही चाललं आहे ते वाचून असं वाटतंय की खरंच 'या' वाहनउद्योगाची शंभरी भरलीय...
लेख आवडला.
लेख आवडला.
सचिन, छान
सचिन, छान माहितीपूर्ण लेख. आवडला.
वेगळ्या विषयावर लिखाण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन!
सचीन, एक
सचीन,
एक छान माहितीपूर्ण लेख..
आज GM ने Bankruptcy Protection साठी अर्ज दाखल केला आहे. त्याबद्दल आणि त्याच्या एकंदर वाहन उद्योगावर्/अर्थव्यवस्थेवर होणार्या परिणामांविषयी तुझे विचार वाचायला आवडतील.
समीर शी
समीर शी सहमत. सचिन, अजून वाचायला आवडेल.
चॅप्टर ११ आहे म्हणजे परत बाहेर येउ शकतात ना?
समीर, अर्थव
समीर,
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल वगैरे विचार मांडण्याइतका जाणकार मी नक्कीच नाही. तुम्ही ज्या बातम्या वाचता, त्याच मी पण वाचतो. पण तरीही इकडे-तिकडे जे काही वाचलं आहे ते एकत्रित इथे लिहितो. म्हणजे लेखाच्या अनुषंगाने माहिती इथे राहील.
दिवाळखोरीचे दोन तीन प्रकार आहेत अमेरिकेत. चॅप्टर ७ नुसार दिवाळखोरी जाहीर केली तर कंपनीची सगळी मालमत्ता विकून कर्जदारांचे पैसे वाटून टाकण्यात येतात. कंपनीला जर कर्जबाजारी परिस्थितीतून बाहेर येण्याची आशा असेल तर चॅप्टर ११ नुसार दिवाळखोरी जाहीर करतात. कंपनीला मग स्थावर जंगम मालमत्ता आणि कंपनीवर असणारी कर्जे हे कोर्टात जाहीर करावे लागते. तसेच १२० दिवसांच्या आत पुनर्रचनेचा आणि कर्जातून मुक्त होण्याचा प्लॅन सादर करावा लागतो. दिवाळखोरीच्या काळात कंपनीचे कामकाज सामान्य कामकाजासारखे चालू राहते. तसेच या काळात कंपनीला झालेल्या फायद्याचा अंतर्भाव मालमत्ता हिशोबात केला जात नाही. कदाचित तारण नसलेली कर्जे माफ होतात. १२० दिवसांचा नियम पूर्वी नव्हता. पण दिवाळखोरीच्या नियमांचा गैरवापर होऊ लागल्याने २००५ मध्ये हा नियम केला गेला. दिवाळखोरीमध्ये स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड करता येत नाही. कंपनीचे क्रेडिट रेटिंगही घसरते. जनरल मोटर्सचे रेटिंग आता 'डी' झालेले आहे. तसेच डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (DOW) मधून कंपनीला आता वगळले आहे. (त्याऐवजी Cisco ला स्थान मिळाले आहे). कंपनीला पुन्हा ट्रेड करण्यास सुरुवात होण्यास कमीत कमी एक सहा महिने लागतील असे म्हटले जाते.
जनरल मोटर्सने ८२ बिलियन डॉलर इतकी मालमत्ता आणि १६२ बिलियन डॉलर कर्ज कोर्टात जाहीर केले आहे. कंपनी जीएमसी, शेव्रले, आणि कॅडिलॅक हे ब्रॅन्ड आता "नवीन जीएम" ला विकेल. नवीन जीएममध्ये अमेरिकन सरकार, कॅनेडिअन सरकार, युनायटेड ऑटो वर्कर्स (UAW) आणि सध्याचे बॉन्ड्धारक यांची अनुक्रमे ६१%, १२% , १७% आणि १०% भागीदारी असेल.
कंपनीने पुनर्रचनेच्या अंतर्गत ११ फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हमर, पॉन्टिआक, सॅटर्न, साब हे ब्रॅन्ड विकायला काढले आहेत. आजच्याच बातमीनुसार हमर कोणत्यातरी चायनीज कंपनीने विकत घेतले आहे. जर्मनीतील 'ओपेल' डिव्हिजन ही कॅनडाच्या 'मॅग्ना' या वाहनांचे पार्टस् बनवणार्या कंपनीला विकली आहे. जर्मन सरकारने जर्मनीतील नोकर्यांमध्ये विशेष कपात होणार नाही या हमीवर मॅग्नाला विकायला परवानगी दिली. युरोपात जनरल मोटर्सचे ५०००० कामगार आहेत, त्यापैकी २५००० जर्मनीत आहेत. आता उरलेल्या देशांमध्ये नोकरकपात होईल आणि त्याचा परिणाम तिकडे जाणवेल.
ओबामा सरकारने जनरल मोटर्सला पुष्कळ मदत केली आहे. पूर्वीच १५ बिलियन डॉलरची मदत दिली होती. आता परत नवीन ३०-४० बिलियन डॉलरची मदत देत आहेत. जनरल मोटर्स अॅक्सेप्टन्स कॉर्पोरेशन (GMAC) ह्या जीएमच्या फायनान्स डिव्हिजनला बँकांच्या बेल-आऊट (TARP) फंडांमधूनही पैसे मिळाले आहेत. हे सगळे पैसे इतक्यात परत मिळणे दुरापास्त आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. ओबामांच्या मदतीला राजनैतिक कारणे देखील आहेत असे म्हटले जाते. २००८ च्या निवडणुकीत मिशिगनमधल्या UAW च्या कामगारांनी ओबामांसाठी पैसे उभे केले होते. तसेच वाहन उद्योग हा मिशिगन, ओहायो, विस्कॉन्सिन, मिनेसोटा या राज्यांमध्ये पसरलेला आहे. यातील काही राज्ये 'स्विंग स्टेटस्' म्हणून गणली जातात. जीएम भविष्यात प्रगती करु शकली तर तिथे फायदा होईल. जीएम जर बुडू दिली असती तर एकदमच ७०००० नोकर्या कमी झाल्या असत्या, आणि सध्याच्या परिस्थितीवर वाईट परिणाम झाला असता असा युक्तिवाद ओबामा सरकार करत आहे. तसेच १९७९ मध्ये क्रायस्लर कंपनीला असेच बेल-आऊट केले होते आणि त्यानी ३ वर्षांत व्याजासकट सगळे पैसे परत करुन सरकारला फायदा झाला होता हे ही नमूद केले आहे.
२०१० पासून गाड्यांच्या मागणीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल आणि २०१३-१४ पर्यंत मागणी प्रचंड वाढेल असे सध्या म्हटले जाते. त्यामुळे जनरल मोटर्स नक्कीच प्रगती करेल असे मला वाटते. पूर्वीचे CEO रिचर्ड वॅग्नर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अमेरिकेबाहेर त्यांची प्रतिमा आणि गाड्यांची विक्री चांगली आहे. क्रायस्लर सारखा तंत्रज्ञानाचा अभाव अशी परिस्थिती जीएमची नाही. शेव्रले एविओ (chevy aveo) ही छोटी गाडी पूर्वीपासूनच बाजारात आहे. होंडा सिव्हिक, टोयोटा करोला यासारख्या इकॉनॉमी क्लासच्या गाड्यांशी स्पर्धा करणार्या शेवी मॅलिबू, कोबाल्ट ह्या गाड्यांमध्ये जीएमने बर्याच सुधारणा केल्या आहेत. 'Buy American' अशी जाहिरात करुन या गाड्या नक्की विकता येतील असे मला वाटते. मात्र हायब्रिड गाड्यांमध्ये प्रगती करणे आवश्यक आहे. टोयोटा प्रियस आणि होंडाने नवीन बाजारात आणलेली होंडा इनसाईट या गाड्यांच्या किंमतीशी आणि परफॉर्मन्सशी स्पर्धा करणारा एकही ब्रॅन्ड जीएमकडे नाही. वोल्ट या गाडीकडून खूप अपेक्षा आहेत. तो प्रोजेक्ट यशस्वी झाला तर जीएम नक्की सुस्थितीत येईल.
अर्थव्यवस्थेवर आता काही परिणाम होईल असे वाटत नाही. ज्या दिवशी दिवाळखोरी जाहीर केली त्यादिवशीही स्टॉक मार्केटवर काहीही परिणाम झाला नाही. उलट तो वाढून या वर्षातील उच्चांकावर गेला. खरेतर वाहन उद्योग हा आता सर्वाधिक नोकर्या देणारा उद्योग राहिलेला नाही. रिटेल सेक्टर आता सर्वाधिक नोकर्या देते. केवळ आर्थिक मंदी आल्यामुळे सरकारकडून त्यांना मदत मिळाली. इतरवेळी कंपनी बुडाली असती तरी इतका परिणाम जाणवला नसता असे वाटते. कारण त्याच कामगारांना इतर कार कंपन्यांमध्ये नोकर्या मिळाल्या असत्या. पण सध्या त्या 'इतर' कार कंपन्यांचीही विक्री कमी झाली असल्याने परिस्थिती वाईट झाली असती.
मला एक शंका आहे. कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्याच्या आदल्या दिवशीसुध्दा त्यांचा समभाग १.४० डॉलर इतका होता. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी यांनीसुध्दा कंपनीचे समभाग अजूनही इतक्या वर कसे आहेत असे आश्चर्य व्यक्त केले होते. असे कसे काय होते? जाणकारांनी माहिती असल्यास सांगावे. विशेषतः दिवाळखोरीनंतर या समभागांची काहीही किंमत नाही.
वरील सर्व मुद्यांचे संदर्भ देणे शक्य नाही. त्यामुळे चुका आढळल्यास दुरूस्त कराव्यात.
चान्गली
चान्गली माहिती!
खूपच छान
खूपच छान माहिती आहे सचिन धन्यवाद
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
इतका सुंदर
इतका सुंदर लेख वाचायचा राहून गेला होता.
सचिन, मुळ लेख, शिवाय आजचे पोस्टही अतिशय माहितीपूर्ण.
'ओपेल' आता भारतातून जवळपास नामशेष झाली असावी. मात्र 'शेव्रोले' चांगले काम करते आहे. भारतीय बाजारातील त्यांच्या गाड्यांना सध्या बरा प्रतिसाद मिळतो आहे. पण होंडा, ह्युंडाई, टोयोटा, सुझूकी, फोर्ड या चांगल्याच स्थिरावलेल्या कंपन्यांची त्यांना जबरदस्त स्पर्धा हे, हेही खरे.
अमेरिकेतील घटनांचा 'जीएम इंडिया' वर काहीही परिणाम होणार नाही, असे काल कंपनीच्या उच्चपदस्थांनी म्हटल्याचे वाचले. यासंदर्भात आणि 'जी॑एमची भारतातील वाटचाल' यावर माहिती वाचायला आवडेल.
मस्तच लेख. वाचायचा राहीला.
मस्तच लेख. वाचायचा राहीला.
झक्की, पोस्ट आवडली
केदार लिहिणार होतास ना? लिंक दे.
मला एक शंका आहे. कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्याच्या आदल्या दिवशीसुध्दा त्यांचा समभाग १.४० डॉलर इतका होता. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी यांनीसुध्दा कंपनीचे समभाग अजूनही इतक्या वर कसे >>> स्वतःच्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन किंमत वर ठेवता येत नाही का?
Pages