जनरल मोटर्स - एका वाहनउद्योगाची शंभरी

Submitted by Sachin_B on 19 April, 2009 - 10:29

२७ सप्टेंबर २००८ रोजी जनरल मोटर्स या कंपनीला शंभर वर्षे पूर्ण झाली. याच वर्षी वित्तीय आणीबाणी आणि परिणामी आलेल्या मंदीमुळे कंपनी सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. त्यानिमित्ताने जनरल मोटर्सच्या गेल्या शंभर वर्षांतील वाटचालीचा घेतलेला वेध...

------------------

१८८५ साली जर्मन इंजिनिअर कार्ल बेंझ (Karl Benz) यांनी अंतर्गत प्रज्वलन इंजिनाचा (Internal Combustion Engine) यशस्वी वापर करुन स्वयंचलित वाहनाची निर्मिती केली, आणि इथून मोटारयुगास सुरुवात झाली. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेतही मोटारगाड्या बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले. १९०३ पर्यंत अशा प्रकारचे प्रयत्न करणार्‍या सुमारे पन्नास कंपन्या अस्तित्वात आल्या. यांमध्येच एक होती ब्युईक मोटर कंपनी (Buick Motor Company). कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यावर संस्थापक डेव्हिड ब्युईक (David Buick) यांनी १९०३ साली तत्कालीन उद्योगपती जेम्स व्हायटींग (James Whiting) यांना ती विकून टाकली. परंतु वर्षभर प्रयत्न करुनही कंपनीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये विशेष फरक न पडल्याने व्हायटींग यांनी आपला जुना मित्र विल्यम ड्युरांट (William Durant) याला मदतीसाठी पाचारण केले. कंपनीचे महत्तम समभाग आपल्याकडे राहतील आणि कंपनी आपल्या निर्णयाप्रमाणे चालेल या दोन अटींवर ड्युरांट यांनी १९०४ साली कंपनीची धुरा आपल्या शिरावर घेतली आणि इथून एका इतिहासाला सुरुवात झाली.
buick_white_streak_2.jpg

ड्युरांट यांचा तेव्हा घोडागाडी बनविण्याचा मोठा उद्योग होता. आपली स्वत:ची ऑटोमोबाईल कंपनी असावी अशी त्यांची बरीच इच्छा होती. ब्युईकच्या रुपाने एक सुवर्णसंधी त्यांच्याकडे चालून आली. ब्युईक हातात येताच ड्युरांट यांनी कंपनीचे नवीन समभाग बाजारात फ्लोट करुन भांडवल उभे केले. १९०५ सालच्या न्यूयॉर्क ऑटो शो मध्ये ब्युईक प्रदर्शित केली आणि आपल्या विक्रीकौशल्याच्या बळावर तब्बल ११०८ गाड्यांची ऑर्डर मिळविली. १९०४ साली ४० गाड्या विकणार्‍या ब्युईकने १९०५ साली १२०० गाड्या विकल्या. वर्षागणिक गाड्यांची विक्री वाढत गेली. १९०८ साली ब्युईकने सुमारे ८००० गाड्या विकल्या. ब्युईक व्हाईट स्ट्रीक हे मॉडेल प्रचंड प्रसिध्द झाले.

gm-logo_1.jpg

कंपनी जितकी मोठी तितकी ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक ह्यावर ड्युरांट यांचा प्रचंड विश्वास होता. त्याच सुमारास फोर्ड (Ford), कॅडिलॅक (Cadillac) आणि ओल्ड्समोबिल (Oldsmobile) या कंपन्यानीही वाहन उद्योगात बर्यापैकी आपले बस्तान बसवले होते. ब्युईकला थोडेफार आर्थिक स्थैर्य लाभताच ड्युरांटनी इतर कंपन्या विकत घेण्याची खटपट सुरू केली. १९०७ साली त्यांनी ओल्ड्समोबिल ही कंपनी विकत घेतली. ब्युईक आणि ओल्ड्समोबिल या कंपन्यांवर एकत्रित नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने २७ सप्टेंबर १९०८ रोजी जनरल मोटर्स (General Motors, GM) ही कंपनी स्थापन केली. पुढील दोन वर्षे ड्युरांट यांनी कंपन्या विकत घेण्याचा अक्षरश: सपाटा लावला. १९०९ साली कॅडिलॅक विकत घेऊन जनरल मोटर्सच्या मॉडेलांमध्ये लक्झरी ब्रॅन्डची भर घातली. रिलायन्स मोटर कंपनी विकत घेतली आणि ‘जनरल मोटर्स ट्रक कंपनी (GMC)’ असे तिचे नामकरण केले. १९१० पर्यंत जनरल मोटर्सने सुमारे २५ लहानमोठ्या कंपन्या विकत घेतल्या.

ह्याच सुमारास फोर्ड कंपनी विकत घेण्याची सुवर्णसंधीही ड्युरांटकडे चालून आली होती. ८० लाख डॉलर रोख रकमेच्या बदल्यात हेन्री फोर्ड यांनी कंपनी विकण्यास तयारी दर्शवली. ड्युरांट यांनी तत्कालीन बॅंकर जे पी मॉर्गन यांच्याकडे वित्तपुरवठ्याची मागणीही केली. परंतु, ओल्ड्समोबिल विकत घेताना ड्युरांट यांनी मॉर्गन यांच्या पाठीशी गुप्त व्यवहार केला होता. तेव्हा मॉर्गन यांनी भांडवल पुरविण्यास स्पष्ट नकार दिला आणि फोर्ड खरेदीव्यवहार संपुष्टात आला. तेव्हापासून विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत फोर्ड ही जनरल मोटर्सची प्रथम क्रमांकाची प्रतिस्पर्धी राहिली.

१९१० साली अमेरिकेत वाहन उद्योगात मंदी आली. गाड्यांची विक्री कमी झाल्याने नफा खालावला आणि ड्युरांट यांनी केलेल्या अनियंत्रित खरेदीमुळे जनरल मोटर्स कर्जबाजारी झाली. त्यावेळच्या प्रमुख बँकांनी ड्युरांट हे अध्यक्षपदावरुन पायउतार होतील या अटीवर ५ वर्षांसाठी १५० लाख डॉलर कर्ज देऊन जनरल मोटर्सला ‘बेल आऊट’ केले.

१९११ मध्ये जीएम सोडल्यानंतर ड्युरांट यांनी आपला मित्र लुईस शेव्रोले (Louis Chevrolet) याच्या सहाय्याने शेव्रोले मोटर कंपनी (Chevrolet Motor Company, Chevy) स्थापन केली. पुढे १९१५ साली जीएमने बँकांशी केलेला ५ वर्षांचा करार संपुष्टात आला. तेव्हा ड्युरांट यांनी इतर बँकाना हाताशी धरुन व सर्व प्रकारचे आर्थिक खेळ खेळून जीएमचे समभाग विकत घेतले आणि ते पुन्हा अध्यक्ष झाले. chevy_logo.jpgशेव्रोले ही कंपनी जनरल मोटर्समध्ये विलीन करून टाकण्यात आली. ह्या दशकाच्या शेवटी पहिल्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर जीएमने अमेरिकन सरकारकडून पुष्कळ कंत्राटे मिळविली. १९१२ ते १९२० या काळात जीएमचा आकार आठ पटीने वाढला. १९२० साली जीएमच्या ब्युईक मोटर कंपनीचे अध्यक्ष वॉल्टर क्रायस्लर (Walter Chrysler) यांनी जीएम सोडली आणि क्रायस्लर कॉर्पोरेशन (Chrysler Corporation) ही नवीन कार कंपनी थाटली. फोर्डनंतर क्रायस्लर ही जनरल मोटर्सची दुसर्‍या क्रमांकाची प्रतिस्पर्धी. पुढे १९२३ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीच्या काळात ड्युरांट यांनी स्टॉक मार्केटमध्ये आपली जवळजवळ सर्व संपत्ती गमावली आणि त्यांना जीएमला कायमचा रामराम ठोकावा लागला.

फोर्डच्या अत्यंत कमी किंमतीच्या गाड्यांशी स्पर्धा करणारा पॉन्टिआक (Pontiac) हा नवा ब्रॅन्ड जीएमने १९२५ साली बाजारात आणला. pontiac_1926.jpgया गाड्यांसाठी कंपनीने Equal Monthly Installment (EMI) ही नवीन संकल्पना सर्वप्रथम राबवली. आता गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण रोख रक्कम हाताशी असणे आवश्यक नव्हते. त्यामुळे शेवी आणि पॉन्टीआक यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. गाड्यांचा खप इतका वाढला की १९३० पर्यंत जनरल मोटर्स ही जगातील सर्वाधिक गाड्या विकणारी ऑटोमोबाईल कंपनी झाली. २००७ पर्यंत, म्हणजे तब्बल ७७ वर्षे हा मान जीएमकडेच राहिला. अमेरिकेत यश मिळताच जीएमने जगात इतरत्र आपले हात-पाय पसरले. कॅनडातील मॅकलॉफ्लिन कार्स (Mclaughlin Cars), ऑस्ट्रेलियातील होल्डन मोटर बिल्डर्स (Holden Motor Builders), इंग्लंडमधील वॉक्सहॉल मोटर कंपनी (Vauxhall Motor Company) आणि जर्मनीतील ओपेल (Opel AG) या कंपन्या विकत घेतल्या.

GM_locomotive_3.jpg२४ ऑक्टोबर १९२९ या दिवशी अमेरिकेच्या शेअर बाजारात अभूतपूर्व अशी ९० टक्क्यांनी घसरण झाली, आणि आर्थिक महामंदीची (Great Depression) लाट आली. या काळात जनरल मोटर्स केवळ आणि केवळ तिच्या प्रचंड आकारामुळे तग धरु शकली. मंदीच्या या महापुरात सर्व छोट्या आणि स्वतंत्र ऑटोमोबाईल कंपन्या अक्षरश: वाहून गेल्या आणि अमेरिकेत फोर्ड, जनरल मोटर्स आणि क्रायस्लर या “बिग थ्री” कंपन्या फक्त उरल्या. या काळात कंपनीने वाहन उद्योगातील गुंतवणूक कमी केली आणि डिझेल इंजिन, रेल्वे इंजिन, रेडिओ, प्रवासी आणि लढाऊ विमाने, बॅंका अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. काही कंपन्या विकतही घेतल्या.

मंदीवर उपाययोजना म्हणून अमेरिकन सरकारने कामगारांचे आठवड्यागणिक कामाचे दिवस कमी केले जेणेकरुन कंपन्यांना जास्त कामगारभरती करावी लागेल. तसेच कामगारांना स्वतंत्र संघटना निर्माण करता येईल अशी कायद्यामध्ये तरतूद केली. यातूनच युनायटेड ऑटो वर्कर्स (United Auto Workers, UAW) ही कामगार संघटना उदयास आली. १९३६ मध्ये युएडब्ल्यूने पगारवाढीसाठी संप पुकारला. जनरल मोटर्सच्या इतिहासातील हा पहिला संप. दोन्ही बाजूचे पक्षकार आपापल्या मतांवर अडून राहिले. प्रश्न इतका चिघळला की शेवटी अमेरिकेचे तत्कालीन पंतप्रधान फ्रँकलिन रुजवेल्ट यांना मध्यस्थी करुन संप मिटवावा लागला. २००० कामगारांनी मिळून केलेल्या संपाच्या ४४ दिवसांच्या काळात जीएमचे एक लाख चोपन्न हजार कामगार कामापासून वंचित राहिले. कंपनीचेही १७० मिलिअन (१७ करोड) डॉलर्सचे नुकसान झाले.

GM_FM2_wildcat_fighter_WWII.jpg१९३९ मध्ये दुसरे महायुध्द सुरू झाले. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बर या अमेरिकन सैनिकी तळावर हल्ला केला, आणि अमेरिका महायुध्दात ओढली गेली. युध्दकाळात अमेरिकन सरकारकडून जीएमला अभूतपूर्व रकमांची कंत्राटं मिळाली. कंपनीने सुमारे सात लाख नवीन कामगार भरती केले, कारखान्यांची उत्पादकता दुप्पट केली. महामंदीच्या काळात विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीमुळे कंपनीची उत्पादनक्षमता वाढली होती. याचा पुरेपूर वापर कंपनीने करून घेतला. जनरल मोटर्सने या काळात साध्या बॉल बेअरिंगपासून ते रणगाडे, युध्दनौका, लढाऊ विमाने, बंदूका, दारुगोळयापर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन केले. जवळजवळ १२ बिलियन (१२०० कोटी) डॉलर्सची उलाढाल झाली. १९४५ मध्ये युध्द संपले आणि सामान्य गाड्यांचे उत्पादन पुन्हा नियमितपणे सुरू झाले.

युध्दानंतर पन्नासच्या दशकात अमेरिकेतील ऑटोमोबाईल कंपन्या आणि रस्ते बांधकाम कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी सरकारकडे महामार्ग (highways) बांधण्यासाठी लॉबींग (lobbying) करण्यास सुरूवात केली. शीतयुध्दाला तोंड देण्यासाठी अमेरिकेला महामार्गांची नितांत गरज आहे असा आग्रह धरला. तत्कालीन पंतप्रधान आयसेनहॉवर यांनी मग महामार्गांच्या गरजेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष होते लुसियस क्ले (Lucius Clay). गंमत अशी होती की क्ले हे त्यावेळी जनरल मोटर्सच्या संचालक बोर्डावर होते. त्यामुळे समिती महामार्गांची जोरदार शिफारस करणार हे जवळजवळ निश्चित होते. आणि तसेच झाले. समितीच्या शिफारशीवरुन पुढील चार वर्षांत देशभरात सुमारे ४१००० मैल लांबीचे महामार्ग बांधले गेले. समितीने लोहमार्गांचा (railroads) विकास तर सोडाच, परंतु अस्तित्वात असलेल्या लोहमार्गांच्या जाळ्याला पूरक असे महामार्ग बांधले जावेत अशी साधी सूचनाही केली नाही. 1953_chevy_corvette_1.jpgपरिणामी चार-एक वर्षांत लोहमार्गावरुन होणारे दळणवळण जवळजवळ ७७ टक्क्यांनी कमी झाले. महामार्गांचा वापर वाढल्यामुळे वाहन उद्योगाला प्रचंड चालना मिळाली.

ह्याच सुमारास जनरल मोटर्सने प्रसिध्द स्पोर्टस कार शेवी कॉर्वेट (Chevy Corvette) बाजारात आणली. ती अतिशय लोकप्रिय झाली. या काळात गाड्यांची रचना आणि सुविधा यामध्ये पुष्कळ बदल झाले. पॉवर स्टीअरींग (power steering), वातानुकुलन (air conditioning), सीट बेल्ट, ऑटोमॅटीक गिअरबॉक्स अशा अनेक सुधारणांनी युक्त अशा गाड्या विक्रीस आल्या. जीएमचे प्रसिध्द स्टायलिस्ट हार्ली अर्ल (Harley Earl) यांनी डिझाईन केलेल्या गाड्यांनी कंपनीला अमाप पैसा मिळवून दिला. दुसर्‍या महायुध्दापासून ते १९५६ पर्यंतचा काळ हा जनरल मोटर्सचा सुवर्णकाळ मानला जातो.

साठच्या दशकात शेव्रोले कॉर्वेअर (Chevy Corvair) ह्या गाड्यांना अपघात होत असल्याच्या बर्‍याच तक्रारी आल्या. प्रकरण कोर्टात गेले आणि निकाल जीएमच्या विरुध्द बाजूने लागला. कॉर्वेअर ही गाडी चालवण्यास असुरक्षित आहे अशी कबुली जीएमने दिली आणि जाहीर माफी मागितली. नंतर एक-दोन वर्षात ते मॉडेल बंद करुन टाकले. १९७७ साली ओल्ड्समोबिल डेल्टा ८८ ही गाडी विकत घेतलेल्या एका ग्राहकाला असे आढळून आले की त्याच्या गाडीमध्ये Rocket V8 इंजिनाऐवजी शेव्रोलेच्या गाड्यांमध्ये बसवतात ते सामान्य इंजिन बसवले आहे. प्रकरण पुन्हा कोर्टात गेले आणि निकाल पुन्हा जीएमच्या विरुध्द बाजूने लागला. 'जीएमच्या गाड्या ह्या काही समान डिझाईन्सवर आधारित आहेत आणि त्यांमध्ये कधीकधी पार्टसची अदलाबदली केली जाते' अशी धक्कादायक कबुली जीएमचे तत्कालीन अध्यक्ष पीट इस्ट्स यांना द्यावी लागली. chevy_corvair_1964.jpgतत्पूर्वी ७३ साली OPEC कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आणि ग्राहक देशांना पेट्रोल पुरविणे थांबविले (OPEC Oil Embargo). परिणामी अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती प्रचंड वाढल्या. जनरल मोटर्सला ह्याचा जोरदार फटका बसणार होता कारण त्यावेळी जीएमच्या गाड्यांचे सरासरी माईलेज सर्वात कमी म्हणजे १२ mpg (५ किमी प्रति लिटर) होते. १९७४ साली युएडब्ल्यूने पुन्हा पगारवाढीसाठी संप केला. यावेळी मात्र जीएमने पगारवाढीऐवजी पेन्शन आणि आरोग्यसुविधा देऊ केल्या(pension and healthcare benefits). नंतरच्या काळात ह्याच सुविधा जीएमची डोकेदुखी होऊन बसल्या.

सत्तरच्या दशकातील ह्या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे जनरल मोटर्सची लोकप्रियता कमी झाली. 1991_saturn_3.jpgयाउलट ८० च्या दशकात वोक्सवॅगन (Volkswagen), होंडा (Honda), टोयोटा (Toyota) या (आयात करामुळे) थोड्याशा महाग परंतु जास्त माईलेज व विश्वासार्हता असलेल्या गाड्यांची मागणी हळूहळू वाढली. जपानी गाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जीएमने १९८९ साली सॅटर्न (Saturn Corporation) नावाची नवी कंपनी उभी केली. या कंपनीच्या गाड्यांनी चांगली विक्रीही केली, पण जपानी गाड्यांचे मार्केट शेअर (market share) विशेष कमी करु शकली नाही. १९८२ ते १९९२ या काळात जीएमचे अमेरिकेतले मार्केट शेअर कमी होत गेले. ९१-९२ मध्ये जनरल मोटर्सला चांगलाच तोटा झाला. फोर्ड आणि क्रायस्लर या जीएमच्या तुलनेत आकाराने पुष्कळ लहान असणार्‍या कंपन्यांनी सुमारे साठ वर्षांनंतर पहिल्यांदा जीएम पेक्षा जास्त नफा नोंदवला. त्यानंतर उर्वरित नव्वदीत जरी जीएम नफ्यात राहिली तरी अमेरिकेतील तिच्या ढिसाळ कारभारावर आणि अकार्यक्षमतेवर होणारी टिका वाढत गेली. १९५० च्या सुमारास ५० टक्के असलेले जीएमचे मार्केट शेअर २००० साली ३० टक्क्यांच्याही खाली आले.

२१ व्या शतकाच्या सुरूवातीला आशिया खंडातील अर्थव्यवस्थांच्या विकासाचा वेग वाढला आणि जीएमने आशिया खंडात आपला विस्तार करण्यास सुरूवात केली. जपानमधील इसुझु, सुझुकी, सुबरु या कंपन्यांचे १० ते २०% समभाग विकत घेतले. त्यांच्या सहाय्याने युरोपियन मार्केट्साठी छोट्या आणि सुटसुटीत गाड्या बनविण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरियातील देवू मोटर्स (Daewoo Motors) विकत घेतली. २००३ साली शेव्रोले भारतात विकण्यास सुरूवात केली. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया या देशांमध्येसुध्दा विस्तार केला.

जनरल मोटर्सने अमेरिकेबाहेर जरी चांगली प्रगती केली तरी अमेरिकेतील अधोगती तिला रोखता आली नाही. २००४-०५ मध्ये प्रवासी गाड्यांऐवजी (passenger cars) कंपनीने SUV आणि pick-up truck सुधारण्यासाठी बराच पैसा खर्च केला. दुर्दैवाने त्या वर्षांपासून पेट्रोलच्या किंमती वाढत गेल्यामुळे या गाड्यांची अपेक्षित विक्री झाली नाही. १९५० च्या दशकात तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असणारी जनरल मोटर्स एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला जपानी कंपन्यांच्या तुलनेत मागे पडू लागली. GM-ev1_2.jpgह्याचे चांगले उदाहरण म्हणजे पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालणारी hybrid गाडी. टोयोटाने पहिली hybrid गाडी १९९७ मध्ये बाजारात आणली, तर जीएमने hybrid गाडी बाजारात आणली २००७ मध्ये, म्हणजे तब्बल एका दशकानंतर! खरेतर ८० आणि ९० च्या दशकात कंपनीने संशोधन आणि विकासामध्ये चांगली गुंतवणूक केली होती. १९९६ साली संपूर्णपणे वीजेवर चालणारी EV1 (Electric Vehicle 1) ही गाडी जीएमने प्रदर्शित केली. कॅलिफोर्निया, अरिझोना या भागात भाडेतत्वावर ती वितरितसुध्दा करण्यात येऊ लागली. परंतु २००१ नंतर अचानक जीएमने या गाड्या भाड्याने देणे बंद करुन टाकले, आणि २००३ मध्ये EV1 हा प्रकल्पच कायमचा बंद करुन टाकला. प्रचंड लॉबींग करून अमेरिकेतील तेल कंपन्यांनी हा प्रकल्प बंद पाडला असे म्हटले जाते. (वादग्रस्त)

१९७० नंतर कंपनीने खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीवर उपाय म्हणून बरेचदा कामगारकपात केली, परंतु असे करताना युएडब्ल्यूशी कधी पगारवाढ, बेकारभत्ता तर कधी आरोग्यसुविधा अशा प्रकारचे करार करावे लागले. पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा कामावरुन काढण्यात आलेल्या आणि त्यामुळे जनरल मोटर्सच्या विविध सुविधांचा लाभ घेणार्‍यांची संख्या २००५ मध्ये जवळजवळ १० लाख झाली. कंपनीने उत्पादिलेल्या प्रत्येक गाडीमागे सुमारे १२०० डॉलर ह्या सुविधांवर खर्च होऊ लागले. ह्याबरोबरच अमेरिकेत गाड्यांची खालावलेली विक्री, व्यवस्थापनाने महत्त्वाचे निर्णय घेताना केलेल्या चुका, कंपनीच्या प्रचंड आकारामुळे कोणत्याही निर्णयप्रक्रीयेस लागणारा विलंब ह्या सर्व गोष्टी कंपनीला तोट्यात ढकलण्यास कारणीभूत झाल्या.

chevy-volt.jpg२००५ मध्ये कंपनीला सुमारे १० बिलियन (१००० करोड) डॉलर्सचा तोटा झाला. त्यानंतर २००८ पर्यंतची पाचही वर्षे तोटाच झाला आहे. २००८ मध्ये जगात सर्वाधिक गाड्या विकणारी कंपनी हा मान टोयोटाने जीएमकडून हिरावून घेतला.

Hybrid गाड्यांना येऊ घातलेले मार्केट लक्षात घेऊन जीएमने शेव्रोले वोल्ट (Chevy Volt) ही वेगळ्या धाटणीची संकल्पित गाडी (concept car) २००७ मध्ये प्रदर्शित केली. गाडीचे माईलेज कमीत कमी ५० mpg इतके असेल आणि २०१०-११ च्या सुमारास ही गाडी विक्रीस उपलब्ध होईल असे कंपनीने घोषित केले आहे. आर्थिक परिस्थिती व जनमानसातील कंपनीची प्रतिमा वोल्टमुळे सुधारेल अशी कंपनीला आशा आहे.

या तोट्याच्या काळात जीएमने सामान्य गाड्यांमध्येही बर्‍यापैकी सुधारणा केल्या. परंतु त्याचा फायदा होतो आहे असे म्हणेपर्यंत २००८ मध्ये वित्तीय आणीबाणीमुळे मंदी आली. गाड्यांची विक्रीही होईना आणि तग धरून राहण्यासाठी कुठुन भांडवलही उपलब्ध होईना अशा अवस्थेत जनरल मोटर्स दिवाळखोरी जाहीर करणार अशी चिन्हे दिसू लागली. मात्र बुश सरकारने नोव्हेंबर २००८ मध्ये १३ बिलियन (१३०० करोड) डॉलर्सचे कर्ज देऊन परिस्थिती तात्पुरती सावरली. परंतु फेब्रुवारीअखेरीस कंपनीने पुन्हा मदत मागितली. सध्याच्या ओबामा सरकारने मात्र भूमिका थोडी कडक केली आहे. तेव्हा कंपनी आता सरकारच्या मदतीने नियंत्रित दिवाळखोरी (controlled bankruptcy) जाहीर करेल असे तर्क केले जात आहेत. त्याअंतर्गत चांगली जीएम - वाईट जीएम (good GM - bad GM) असे कंपनीचे दोन भाग करण्यात येतील. चांगल्या जीएमला सरकारतर्फे मदत करण्यात येईल आणि वाईट जीएम liquidate करण्यात येईल असा कयास आहे. जनरल मोटर्स कदाचित पूर्णपणे बुडणार नाही, परंतु ३५ देशांत गाड्यांचे उत्पादन करणार्‍या, २०० देशांत गाड्या विकणार्‍या आणि सुमारे दोन लाख पन्नास हजार कर्मचारीसंख्या असणार्‍या या अवाढव्य कंपनीचा आकार भविष्यात कमी होणार हे निश्चित.

--समाप्त.

गुलमोहर: 

फारच छान आणि माहीतीपूर्ण लेख. कुठून गोळा केलेस इतके सारे संदर्भ?

chevrolet चा उच्चार 'शेवरले' होतो असं काही तज्ञ मंडळींकडून ऐकलंय. खखोमाना.

जनरल मोटर्स चा इतिहास म्हणजे अमेरिकेच्या उत्पादन, नि व्यवसाय यांचा इतिहासच आहे.
यावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे. सतत सुधारणा करीत रहाणे, नवनवीन कल्पना, गाड्या विकण्याचे कौशल्य, (marketing ला मराठीत काय म्हणतात?) या सर्व गोष्टींमुळे नि पैशाच्या जोरावर एखादा धंदा किती मोठा होऊ शकतो याचे हे उदाहरण. असे म्हणत की जनरल मोटर्स च्या सर्वोच्च अधिकार्‍याचे एकच सांगणे होते त्याच्या कंपनीतल्या लोकांना - बाबांनो, बाजारात ५० टक्क्यापेक्षा जास्त होतील इतक्या आपल्या गाड्या विकू नका, कारण monopoly ची टांगती तरवार सरकारने सदैव माझ्या डोक्यावर रोखली आहे.

त्यानंतर मात्र संशोधन नि सुधारणा या ऐवजी खुशालचेंडू पणा वाढला. कामगार संघटनांनी पण त्यात हात धुवून घेतले. जेमतेम शिकलेले लोक ज. मो. चे नोकर झाले की अक्षरशः प्राध्यापकांपेक्षा जास्त श्रीमंत झाले. काम कमी नि पैसा खूप अशी त्या कामगारांची ख्याति होती. म्हणून पुढे 'शुक्रवार दुपारची गाडी' हा प्रकार अस्तित्वात आला, म्हणजे कामगारांनी अतिशय कंटाळून नीट न बनवलेली गाडी. तक्रार केली की अहो ती शुक्रवार दुपारची गाडी, असे होणारच. आम्ही करतो ना दुरुस्त, पण तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील.
मालकांना गाड्या ठेवायला गॅरेजमधे हिवाळ्यात हीट, उन्हाळ्यात वातनुकूलित. त्यांच्या लंचला दररोज डोव्हर, इंग्लंड येथून जगप्रसिद्ध सोल मासा दररोज विमानाने आणण्यात येत असे. वरचे अधिकारी खुशाल कंपनीच्या खर्चाने खाजगी विमानाने कुटुंबासहित यूरोप, आशिया येथे प्रवास करीत. पण १९७० च्या पेट्रोल च्या गंभीर प्रश्नाची दखल घेण्यात आली नाही. पेट्रोलवरील भार कमी करण्यासंबंधी काहीहि नवीन संशोधन नाही!

हे सर्व प्रकार उघडकीला आणले रॉस पेरो ने. १९८० नंतर त्याची इ डी एस कं ज. मो. ने विकत घेतली. बदल्यात त्याला डिरेक्टर्स बोर्ड वर जागा दिली. त्याने ज.मो. च्या व्यवहारावर, विशेषतः त्यांच्या पैसे उधळण्यावर इतकी सतत टीका केली की त्याला सांगितले हे ७ लाख शेअर्स, अर्ध्या किंमतीत घे पण बोर्डाचा राजिनामा दे, नि वर्षभर ज. मो. बद्दल एक अक्षर बोलू नकोस. त्याने जनतेनेकडे धाव घेतली. तो म्हणाला पहा, हे अर्ध्या किमतीत शेअर्स यांनी मला दिले, त्याचे पैसे कुठून आले? ते तुमच्यासारख्या सामान्य भागधारकांकडून, या वरच्या लोकांकडून नाही. पैशाचा अपव्यय होतो या माझ्या विधानाला पुष्टीच दिली आहे त्यांनी!!

पेरो गेला. पेट्रोल कं नि मोटर कं यांनी गळ्यात गळे घालून पेट्रोल जास्तीत जास्त कसे खपेल अश्याच गाड्या काढल्या! वास्तविक इतकी उधळपट्टी करणारी कंपनी. जगातला कुठलाहि विद्वान संशोधक त्यांना अक्षरशः विकत घेता आला असता. त्यांच्याकडून जास्त काळ चार्ज ठेवणारी बॅटरी, त्याच्यावर चालणारी गाडी, हे सगळे संशोधन करता आले असते. पण त्या ऐवजी त्यांना डोवरचे सोल, नि वातानुकुलीत गराज जास्त महत्वाचे वाटले.

हीच अमेरिकन उद्योग व्यवसायाची शोकांतिका. पूर्वीची संशोधक वृत्ति, इमानदारि सगळी लयाला गेली, ख्याली खुशाली वाढली. दारिद्र्य आले! आळशी, खुशालचेंडू कामगारांची कामे आशियात उडून गेली. कामगार गरीब, कंपनी दिवाळखोरीत! ज्या अमेरिकेत,
"पुढील चार वर्षांत देशभरात सुमारे ४१००० मैल लांबीचे महामार्ग बांधले गेले. "
अशी उत्पादनक्षमता होती, तिथे आता काय आहे? पॅरिस हिल्टन, बॅरी बाँड्स नि gay लोक!

भारताला सध्या सुवर्णकाळ आला आहे. त्यांना पण पुढील चार वर्षांत देशभरात सुमारे ४१००० मैल लांबीचे महामार्ग बांधता येतील. नॅनो केली तर, सिएन्जी वर चालणार्‍या गाड्या पण करता येतील. पण जरा बॉलीवूड, क्रिकेट नि राजकारण कमी होईल तर.

सचिन, माहितीपूर्ण लेख. आवडला.

थोडा बदल सुचवावा वाटतो, तो म्हणजे तू 'मसल कार इरा' लक्षात घेतला नाहीस. शेव्ही कमेरो, कॉर्व्हे ह्या जी एम च्या कार फोटोसहित यायला पाहिजेत. ह्या कार्स म्हणजे येथील संस्कृती. :

बेटर यट सगळ्याच मसल कार्स वर एक नविन लेख. तू आता डोक्यात किडा टाकलास Happy लिही नाहीतर लिहीतो.

धन्यवाद.

मृण्मयी, अगं तो Chevrolet हा मूळ फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा उच्चार ते लोक शेव्रोSले असा करतात असं मी कुठेतरी वाचलं /ऐकलं होतं. म्हणून ते तसं लिहिलं. पण विचारुन खात्री करेन आणि लागल्यास योग्य ते बदल करेन.

बरेचसे संदर्भ History of General Motors आणि The automobile in American History and Culture ह्या दोन पुस्तकांतील आहेत. काही गोष्टी Time या साप्ताहिकातून आणि Automobile Engineering या मासिकातून घेतल्या आहेत. Reuters news वरील व्हिडिओ आणि आंतरजालावरील बर्‍याच blogs आणि opinions वरील माहिती मी संकलित करुन ठेवली होती, त्याचाही उपयोग झाला. सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन घेतली आहेत.

केदार, अरे मी गाड्यांबद्दल थोडंफार लिहिणार होतो. पण मग तो लेख खूप मोठा होऊ लागला. त्यामुळे ते लिहिणं रद्द केलं आणि ज्या गाड्यांचा उल्लेख आला आहे तेच फोटो तिथे टाकले. अजूनही पुष्कळ interesting गोष्टी होत्या लिहिण्यासारख्या. पण काटछाट करुन एवढं ठेवलं. मसल कार्स वर लिही तू.. Happy

छान माहितीपूर्ण लेख.. आवडला.

छान लिहिलय.. माझ्यासारख्यांसाठी ही सोप्पी माहिती छानच आहे! Happy

नेहमीच असे होते का? एकाद्या उद्योगाची सुरुवात फार नेटाने, कष्टाने केली जाते. भरभराट झाल्यानंतरच्या पीढ्या(बॅच ह्या अर्थी) मात्र आईतखाऊ किंवा दूरदृष्टी नसलेल्या निघतात!

माहितीपूर्ण उत्तम लेख. अनेक धन्यवाद !

सचिन.. एकदम माहितीपूर्ण लेख.. मस्त आहे...
असे म्हणतात की दुसर्‍या महायुद्धात GMने अमेरिकेला वाचवले. आता त्याच GMला वाचवायची वेळ आली आहे.

सही लिहीलं आहेस !

त्याचा फायदा होतो आहे असे म्हणेपर्यंत २००८ मध्ये वित्तीय आणीबाणीमुळे मंदी आली>>> या मंदी आणन्यामधे(ऑटो इंडस्ट्रीमधे तर)जी.एम. चाच हत्तीचा वाटा आहे ! २००६ पासुन चालू आहे हे!
प्रॉब्लेम जी एम च्या बिझीनेस मॉडेलमधे आहे. चांगले ब्रँड कमवत आहेत आणि बाकीचे ब्रँड(आणि पेन्शनर लोक) कंपनीला डुबवत आहेत..... आंधळे दळते आणि कुत्रे पिठ खाते अन काय !

यापेक्षा आपल्या टाटाचे बिझीनेस मॉडेल कधीही बरे ....जी.एम.टॉप मॅनेजमेंटला ते अभ्यास करायला दिले पाहीजे.
(जाउदे जास्त लिहीत नाही आता....जी.एम. ने आम्हालाही कधीकाळी ब्रेड आणि बटर दिले होते..आजकाल ते थांबले असल्याने हा कोरडा राग्..बाकी काही नाही! )

लेख सही झालाय..माहितीपूर्ण !
झक्की तुम्ही दिलेली माहीती पण छान आणि तुमचे मतही पटले! Happy

मस्तच. बर्‍याच माहीती नसलेल्या गोष्टी कळल्या जिएम बद्दल. छान लिहिला आहेस लेख. तुझे या विषयावरील किंवा इतर अजुन लिखाण वाचायला नक्की आवडेल.

मस्तच लेख.

जनरल मोटर्स चा इतिहास म्हणजे अमेरिकेच्या उत्पादन, नि व्यवसाय यांचा इतिहासच आहे. >> हे बाकी एकदम बरोबर. Oil Industry चा इतिहास पण त्यात धरला कि चित्र पूर्ण होईल.

सँटीनो, खुप छान लेख आहे. बरीच नवीन माहिती मिळाली.

तू मनावर घेतलेसच तर... Happy
मस्त माहिती रे... एवढे सगळे संदर्भ गोळा करून लिहितांना घेतलेली मेहनत दिसतेय.
Billy Duarant वर पण एक वेगळा लेख लिहायला हवास तू... तो Henry Ford चा कट्टर प्रतिस्पर्धी होता..Ford.आणि Durant च्या स्पर्धेची कहाणी पण मोठी रंजक आहे.

एकेकाळी Wall Street वरचा Major Palyer आणि GM President असणार्‍या Durant वर त्याच्या शेवटच्या दिवसांत एका Bowling Alley वर दिवस काढायची वेळ आली. त्याच्यावर लिहिलेलं 'The Deal Maker' पण एक Must Read पुस्तक आहे.

१९२३ मध्ये ड्युरांट यांनी सर्व संपत्ती गमावली असं वर लिहिलं पण विशेष काही सांगितलं नाही..
तर झालं असं की १९२३ मध्ये मंदीमुळे जनरल मोटर्सच्या शेयर्सच्या किंमती रपारप घसरु लागल्या. त्याकाळी जीएम ही एक मोठी आणि विश्वासू कंपनी होती. किंमती फार घसरल्या तर जीएम बुडेल असं ड्युरांटना वाटलं. म्हणून मग त्यांनी stock buying syndicates उभ्या केल्या. एकहाती स्टॉक्सच्या किंमती फिरविण्याचे प्रयत्न केले. प्रचंड पैसा खर्च केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या काळात ड्युरांटनी १०० मिलियन डॉलर वैयक्तिक संपत्ती गमावली.

आयुष्याच्या शेवटच्या काळात जनरल मोटर्सकडून मिळणार्‍या पेन्शन वर ते जगले. १९४६ मध्ये स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

आणि बहूधा दोनच आठवड्यात Henry Ford ही गेला..... मोटार युगाचा एक era जन्माला घालणारे दोन युगप्रवर्तक एकदम काळाच्या पडद्याआड गेले.
पण साल १९४७ असावं. चू.भू.दे.घे.

कालच वाचला पण आज प्रतिक्रीया देते आहे Happy छान माहितीपुर्ण लेख आहे. सगळे संदर्भ गोळा करण्यास बरीच मेहनत घेतलेली दिसतेय. आपली परवानगी असल्यास प्रिंट काढून ठेवावी म्हणते.

सचिन, छान लिहिलयस. आवडला.

सुंदर लेख. गाड्यांची मॉडेल्स चित्र बघून नुसत्या नावाने माहीत असतात. पण त्यामागची कूळकथा किती रोचक असू शकते, नाही?
सचीन खरच अतिशय सुरेख जमलाय लेख.

सचिन मस्त लिहीलास हां.... दुपारी काही जमलं नाही वाचायला.... आता मुद्दाम अर्धा तास बाजुला काढून वाचला....
या क्षेत्रातली काही फारशी माहिती नव्हती मला... नवोदितांकरता मस्त इंट्रो आहे...... Happy

आणी हो थोडा बदल सुचवावा म्हणतो.... अरे घोडा गाड्यांविषयी थोडं विस्तारात लिहायला हवं होतस... घोडागाडी ही अमेरिकेच्या मोटार गाड्यांकडच्या वाटचालीला फारच महत्वपुर्ण ठरल्या आहेत.... असो, तो लेख एकदा वेळ काढुन मीच लिहीतो.... Wink

सचिन,
लेख वाचला. चांगला जमला आहे, एकदम अभ्यासपूर्ण. या उद्योगाबद्दल काहीच माहित नसलेल्या आमच्या सारख्यांना बरीच माहिती मिळाली.
अश्याच वेगवेगळ्या लेखाच्या प्रतिक्षेत.

सचिन, मस्त माहिती दिली आहेस. GMC चे ट्रक्/टेम्पो भारतात ही असायचे ना पूर्वी?

टोयोटा, जीएम च्या पुढे जाउन जगातील क्र. १ ची कंपनी २००८ मधे बनली. येथे पाहा.. पूर्वी Business Week वगैरे मधे याला अजून २-३ वर्षे जातील असा अंदाज सांगत होते, पण बहुधा जीएम चे उत्पादन कमी झाल्याने लौकर झाले.

तुझ्या त्या इलेक्ट्रिक कार संदर्भात Who killed the electric car ही डॉक्युमेंटरी बघ. खूप इंटरेस्टिंग आहे.

या तीन्ही कंपन्यांच्या प्रॉब्लेम्स वर असलेले End of Detroit हे पुस्तक ही वाचण्यासारखे आहे.

सचिन, माहितीपूर्ण उत्तम लेख. सुलभ मासिक हप्त्यांची संकल्पना जीएमने आणली हे माहिती नव्हते. शिवाय त्यांनी रस्तेबांधकाम व्यावसायिकांशी हातमिळवणी करून गोष्टी घडवून आणल्या हेही रोचक. नंतरची मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल. फारेंडाने सुचवलेला माहितीपट अवश्य बघ.
झक्की, तुमची माहितीसुद्धा छान.

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    चांगला लिहीला आहेस लेख.

    शेवरले च म्हणताना मी पण ऐकलं आहे

    सर्वांना धन्यवाद.

    विशाल, बरोबर आहे, ड्युरांट यांचा मृत्यु १९४७ साली झाला आहे. वरच्या पोस्टमध्ये माझी चूक झाली.

    फारेंड, २००८ साल बरोबर आहे. चूक दुरूस्त केली आहे. Who killed the electric car हा व्हिडिओ मी पाहिला आहे.

    पण जीएम अजूनही तो प्रकल्प बंद पाडल्याचे समर्थन करते. २००८ मध्ये रिचर्ड वॅगनर हे जीएमचे अध्यक्ष जेव्हा अमेरिकन संसदेसमोर बोलले तेव्हा ते म्हणाले, 'EV1 बंद केली ही माझी फार मोठी चूक झाली. त्या गाडीने जनरल मोटर्सची लोकांमध्ये प्रतिमा उजळवली असती, पण त्या गाडीने नफा नसता मिळवला.' (संदर्भः विकिपिडिया).

    www.gm-volt.com ही जनरल मोटर्सच्या वोल्ट या हायब्रिड गाडीबद्दल माहिती देणारी वेबसाईट आहे.जीएमची ही ऑफिशिअल वेबसाईट आहे की नाही माहीत नाही. त्यावरची ही अलीकडची बातमी पहा. त्यात ते असं म्हणतात की इलेक्ट्रिक कार साठी लागणारी वीज निर्माण करताना पर्यावरणाचे नुकसान पेट्रोल वापरुन होणार्‍या नुकसानापेक्षा जास्त होते.

    http://gm-volt.com/2009/04/19/study-calls-environmental-benefits-of-elec...

    Pages