पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

Submitted by निमिष_सोनार on 8 December, 2019 - 10:03

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:
मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ऐतिहासिक, पौराणिक, बायोपिक, फँटसी आणि सत्य घटनांवर आधारित, तसेच सत्य-असत्य मिश्रण (फॅक्ट-फिक्शन) असेलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे चित्रपट/सिरीयल मी जरूर बघतो (असोका, 300, टायटॅनिक, सिरीयाना, पद्मावत्त, फर्जंद, फत्तेशिकस्त, बाजीराव मस्तानी, पोरस, बाहुबली, अलेक्झांडर, सूर्यपुत्र कर्ण वगैरे) आणि महत्वाचा मराठी इतिहास पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने अर्थातच हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). तोपर्यंत बऱ्याच वाचकांनी मला विचारणा केली की माझ्याकडून परीक्षण कधी येईल, शेवटी लिहायला घेतले. आणि हो, अजून पर्यंत मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली नाही, पण वाचणार आहे! चित्रपट बघतांना पेशवे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडा तरी होमवर्क केलेला असला पाहिजे नाहीतर काही गोष्टी समजणार नाहीत!

आधी पानिपत चित्रपटाभोवती असलेले काही वादग्रस्त मुद्दे बघूया:
ट्रेलर रिलीज झाल्यापासून विविध विवादांत अडकलेला पानिपत चित्रपट अखेर 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अर्जुन कपूरला सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचेवर टीका झाली, तसेच पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला, पानिपत नेमका कोणत्या ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे हे माहिती नसतांना काहींनी तो पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचा मिक्स चित्रपट आहे अशा प्रकारच्या टीका केल्या. तसेच कुठेतरी मी बातमीत वाचले की अहमदशाह अब्दाली भारतात आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि त्याच्या भूमिकेत संजय दत्त खूप थोराड वाटतो त्यामुळे या गोष्टीसाठी पात्रनिवड करणाऱ्यावर टीका झाली पण याबद्दलचे नेमके सत्य असत्य काय हे मला माहिती नाही.

पानिपतबद्दल इतरांनी केलेल्या परीक्षणाबद्दल थोडेसे सांगून परीक्षणाला सुरुवात करतो:
चित्रपट बघण्याआधी मी अनेक परीक्षण वाचले आणि युट्यूबवर बघितले. काही परीक्षण हे मुद्दाम आकस बुद्धीने विरोधासाठी विरोध म्हणून केलेले दिसले जसे की तीन तास खूप बोअर होतात, एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग नाही, गाणे आणि संगीत चांगले नाही असे बोलले जाऊ लागले पण मला चित्रपट पाहिल्यावर या तिन्ही गोष्टी खोट्या असल्याच्या आढळून आल्या. संगीत (गाणे आणि पार्श्वसंगीत) अतिशय छान आहे, चित्रपट मुळीच बोअर होत नाही (उलट मला वाटत होते की एवढ्यात चित्रपट कसा संपला?) आणि लक्षात राहण्यासारखे अनेक डायलॉग आहेत. चित्रपटगृहात हर हर महादेव, सदाशिवराव पेशवा की जय अशा घोषणा ऐकू येतात तसेच एकदा नव्हे तर अनेकदा प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि टाळ्या येतात. एका गाण्यात सर्वजण शिवाजी महाराजांची आठवण तबकात त्यांची पगडी ठेऊन करतात तेव्हा चित्रपटगृह शिवाजी महाराज की ज्जय या घोषणांनी दुमदुमून जाते.

काही डायलॉग सांगतो:
गोपिकाबाई पार्वतीबाईला भर लग्नात टोमणा मारतात:
"बिल्ली भी इतनी फुर्ती से सीढी नही चढती!" म्हणजे पार्वती ही एका सामान्य वैद्यांची मुलगी असून तिने सदाशिव सारख्या पेशव्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले अशा (गैर)समाजातून केलेली ही टीका असते.

तसेच -
"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!"

दत्ताजी: "बचेंगे तो और भी लढेंगे!"

दिल्ली जिंकल्यानंतर जेव्हा दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते तेव्हा ते म्हणतात:
"मै राजनीती के लिये नही, युद्ध के लिये बना हूं!"

आणि खालील काही डायलॉग:
मल्हारराव होळकर: "यहां सब है, मराठा, पंजाबी, मुसलमान वगैरा है, लेकीन हिंदुस्तानी कोई नहीं है!"
आणि
सदाशिवराव: "अपनी संख्या बढा नही सकते पर दुश्मन की संख्या तो कम कर सकते है!"

मराठ्यांचा जोश पाहून घाबरून अब्दाली सैन्य माघारी येते तेव्हा त्या सैन्याला स्वत: अब्दाली कापतो तेव्हा तो टिपिकल संजय दत्त टाईप डायलॉग मारतो:
"अगर भाग कर वापस आओगे तो एक एक का पीछा करके मै सबको मार दूंगा, वापस जाओ और लढो!"

आणखी एक:
अर्जुन कपूर: "युद्ध से किसीका भला नही हुवा!"
संजय दत्त: "सिर्फ ये बात समझने के लिये तुम पुणे से पानिपत तक आये!"

कलाकार आणि अभिनय:
अर्जुन कपूर अभिनयात बराच कमी पडत असला तरी एकूण चित्रपटात, त्यातील कलाकारात आणि कथेत तो सहज सामावून जातो. चित्रपटात ७० टक्के मराठी कलाकार आहेत. संजय दत्त ने भूमिका चांगली वठवली आहे. या चित्रपटात अभिनयाच्या बाबतील आश्चर्याचा सुखद धक्का जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे कृती सेनॉन हिने! अपेक्षा नसतांना अभिनयाची तिने कमाल केली आहे. सहज सुंदर अभिनयाने तिने मने जिंकली आहेत. शेवटी सदाशिवराव युद्धात धारातीर्थी पडत असतात तेव्हा केवळ आणि केवळ तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव आणि अश्रू हे बघून आपल्याला भावनिक वाटायला लागते. असाच दमदार अभिनय ठाकरे चित्रपटात जेव्हा तुरुंगातून बाळासाहेब ठाकरे मीनाताई (अमृता राव) यांना पत्र पाठवतात आणि ते पत्र वाचतांना अमृता राव ने चेहऱ्यावर बदलत जाणारे जे भाव दाखवलेत त्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. मोहनीश बहल नानासाहेब पेशवे आणि अभिषेक निगम विश्वास राव यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसतात. रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे दोघेही (पिता पुत्र) यात आहेत. मिलिंद गुणाजी आहे पण खूप छोटी भूमिका आहे. झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका छान. मस्तानीचा मुलगा समशेर, तोफ प्रमुख गारदी आणि नजीब हे पण लक्षात राहतात. शुजा-उद-दौला पण त्याच्या घोगऱ्या आवाजामुळे लक्षात राहतो.

कथेतील बेट्रायल किवा विश्वासघाताबाद्द्ल:
चित्रपटाच्या शिर्षाकाबाबत सांगायचे झाले तर: पानिपतच्या पुढे एक लाईन आहे - "द ग्रेट बेट्रायल" म्हणजे "प्रचंड विश्वासघात" हे कथेत योग्य पद्धतीने मांडले आहे. मराठ्यांना पुण्याहून दिल्लीकडे अब्दालीच्या सेन्याशी लढायला जातांना रस्त्यात त्यांच्या मांडलिक राजांकडून सैन्य, आर्थिक आणि अन्नधान्य मदत मिळत जाते पण त्यापैकी तीन राजांकडून त्यांना धोका मिळतो. दोन वेळेस मराठा सैन्याला त्याचा सुगावा लागून जातो पण तिसऱ्यांदा ऐन युद्ध सुरु असतांना विश्वासघात होतो. तिन्ही विश्वासघातांची कारणे वेगवेगळी असतात. म्हणून प्रचंड मोठा विश्वासघात असेलेली कथा! तसेच या कथेत आणखी दिल्लीतील राजकारणाचा अंतर्गत विश्वासघात पण आहे आणि अब्दालीसोबत त्याच्यात देशात होत असलेला विश्वासघात पण दाखवलेला आहे. पानिपतची कथेची पार्श्वभूमी आणि घडामोडी खूप किचकट, गुंतागुंतीच्या असूनही कथा साधी सोपी आणि सरळ करून पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! एकूण या सिनेमात चार ते पाच वेळा आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग आहेत!

कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो:
चित्रपटाच्या सुरुवातीला सदाशिवराव आणि राघोबादादा हे दक्षिणेतील उरल्यासुरल्या निजामशाहीचा पाडाव करून येतात. नंतर पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव यांची निवड सेनापती ऐवजी धन मंत्री म्हणून होते. दिल्लीतील नजीब जंगच्या सांगण्यावरून एक लाख सैन्यासह अफगाणीस्तानहून येणाऱ्या अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल जेव्हा मराठ्यांना लागते तेव्हा पुण्याहून फक्त चाळीस हजाराचे सैन्य घेऊन राघोबादादा यांना नानासाहेब जायला सांगतात तेव्हा राघोबादादा नाही म्हणतात, पण सदाशिवराव एवढ्या कमी सैन्यासह तयार होतात कारण उत्तरेतील मांडलिक राजे सैन्य-मदत देतीलच हा त्यांना विश्वास असतो. सोबत विश्वास राव तसेच पार्वतीबाई आणि इतर बायकापण जातात. इतर अनेक कुटुंब पण सोबत जातात. प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे सैन्यासह आणि लवाजम्यासह यमुना पार करणे अशक्य असल्याने त्यांच्या सैन्याला चकवून मराठा सैन्य नदीपात्राच्या कडेने दिल्लीकडे कूच करून एका घटनेमुळे अस्थिर झालेली दिल्ली जिंकतात आणि आणखी पुढे कुंजपुराकडे जाण्याआधीच अब्दाली सैन्य हत्तीवरून यमुना पार करून मागोमाग आलेलं असतं. तिथे पानिपतचं मैदान असतं आणि युद्ध सुरु होण्याआधी अब्दालीचा मुलगा तैमुर अफगाणीस्तानहून बातमी आणतो की तिथे अब्दालीच्या सिंहासन बळकावण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणून अब्दाली युद्ध न करता परत जायचे ठरवतो आणि सदाशिवराव यांचेशी तह करण्यासाठी काही अटी समोर ठेवतो. मग पुढे काय होते ते पडद्यावर बघा.

शेवटच्या अर्ध्या तासाच्या पानिपत युद्धाबद्दल थोडे सांगतो:
आशुतोषने स्पेशल इफेक्टचा भरपूर वापर करण्याचे टाळले आहे आणि त्यामुळे युद्ध प्रसंग अगदी जिवंत झालेत. स्लो मोशन प्रसंग खूप वेळ दाखवण्याचा मोह त्याने टाळला आहे, हे खूप चांगले झाले. 300 या हॉलिवूड युद्धपट मध्ये तसेच बाहुबली युद्धामध्ये खूप स्लो मोशन प्रसंग आहेत. युद्धातील अनेक बारकावे आशुतोषने दाखवलेत. युद्धनीती पण यात दाखवली गेली आहे. युद्ध प्रसंग खूप थरारक आहेत, अंगावर काटा येतो. युद्धात भाग न घेतलेली कुटुंबे आणि बायका पानिपतच्या किल्ल्यावर सुरक्षित असतात तेव्हा तिथे अब्दालीचे सैन्य हल्ला करते तेव्हा पार्वतीबाई सुद्धा लढते. एकूणच शेवटचा अर्धा तास थरारक आहे!

माझे रेटिंग:
चित्रपटाची लांबी जास्त आहे म्हणून कदाचित माझे परीक्षण पण लांबले असे वाटते. चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!

(लेखन दिनांक: 8 डिसेंबर 2019, रविवार)
- निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या चित्रपटाच्या परिक्षणाची वाट पाहत होते. Happy

हा सिनेमा पाहण्याचे ठरवते आहे. मराठीत बनला असता तर सोन्याहून पिवळं!

Chhan

बालिश किंवा प्रभाव न पाडू शकणारे संवाद, संवाद म्हणजे डायलॉगबाजी नाही पण मागचा सीन पुढच्या सीनमध्ये लक्षात राहण्यासाठी प्रेक्षकाच्या मेंदूत संवादातून काहीतरी ठसावे लागते तीच गोष्ट मिसिंग होती.
(माझ्या मते हा सर्वात मोठा निगेटिव पॉईंट आहे ह्या सिनेमाचा)

गरज नसतांना पार्वतीबाईंना नॅरेटर बनवणे... थेट लगानमधल्या बच्चनच्या आवाजाची आठवण झाली. अरे युद्धाला नाजूक आवाजाचे नॅरेशन का?
'दया ईसका मतलब है' टाईप्स ऑबविअस गोष्टी बोलून दाखवत प्रेक्षकांना स्पून फिडिंग करणे
विश्वासघात नेमके कसे झाले हे ऊठावदार पद्धतीने न दाखवणे
भाऊंचे व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न असे दाखवणे
दुसर्‍या फळीतील कलाकारांचे कवायती अभिनय
हरियाणाचा राजा जर हरियाणवी हिंदी बोलतो तर अब्दालीने अफगाणी हिंदी न बोलता बंबईय्या हिंदी बोलणे
पार्वतीबाईंच्या फिक्शनल रोलला नको तितके फुटेज देणे
आणि सगळ्यात महत्वाचे फिल्मची बांधणी कोहेसिव, गोळीबंद नसणे

एवढे सगळे असूनही सिनेमा तीन तास बोअर होत नाही हे खरे. अर्जून कपूर, क्रिती, संजय दत्त, मंत्रा ह्यांनी बरे काम केले आहे.

सातवीला स्कॉलरशिप (लगान) मिळवलेला, दहावीला बोर्डात आलेला (स्वदेस, जोधा अकबर) मुलगा अकरावीला नापास (राशी, मोहंजोदारो) आणि बारावीला साठ पासष्ट ट्क्क्यांनी ऊत्तीर्ण होतो असे झाले आहे गोवारीकरांचे.

मीही आज पानिपत बघितला.
सर्वप्रथम अर्जुन कपूरनी इतकंही वाईट काम केलेलं नाहीय.
अर्जुन कपूर ऐवजी रणवीर सिंग किंवा अजून दुसरा कुणी जास्ती सूट झाला असता. पण त्यानेही अगदीच वाईट काम केलेलं नाहीय.
पण climax एवढा effective झाला नाही जो होऊ शकला असता.
क्रिती, संजय ह्यांची कामे ठीक झालीयेत.
मला विश्वासराव, समशेर, नजीब ह्यांची कामेही आवडली.
सगळे सरदार, पेशव्यांच्या स्त्रिया ह्यांनी नृत्य करणं , अर्जुन कपूर कित्येक सीन मध्ये बोडक्या डोक्याचा असणे ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर सिनेमा ठीक आहे.

आणि हो इकडे सिटी प्राईड कोथरूड ला आशुतोष गोवारीकर आले होते सिनेमा संपल्यावर. छान बोलत होते.
विचारतं होते कसा वाटला? एक दोघांनी काही त्रुटी दाखवल्या तर त्यांनी काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं. त्यांना जास्ती स्तुती अपेक्षित आहे असं वाटलं.
.

परकीय आक्रमापासून
देशाला वाचवण्यासाठी
मराठी फौजा मुघल साम्राज्य च्या(भारतीय मुस्लिम राज्य करते)
रक्षणासाठी हजारो किलोमीटर अंतर पार करून धर्म भेद विसरून पानिपत ला गेल्या .
पण मराठी द्वेष रक्तात भिनलेले ल्या उत्तरेतील हिंदू राज्य कर्त्याणी मराठी फौजा ना मदत केलीच नाही उलट abdhali ल जावून मिळाले.
ह्या वरून आपण हा बोध घेणे गरजेचे आहे की आपण देश,देशप्रेम
असल्या भावना सोडून देवून फक्त राज्याचा विचार करावा.
अजुन सुधा उत्तरेच्या राज्यातील हिंदू महारष्ट्र चा तेवढंच द्वेष करतात जेवढा इतिहासात करत होते

हो ... गोवारीकर आले होते सिटी pride कोथरूड ला.. माहिती न्हवतं ते येणार आहेत.. ,सिनेमा संपल्यावर निघायला लागलो तेव्हा ते पडद्याच्या इथे उभे दिसले.. चांगले बोलले.. खूप डाऊन टू अर्थ वाटले.. साधे आले होते एकदम.. जेन्यूअन वाटले. .. खरंच त्यांना फीडबॅक हवा होता त्यांना असं वाटलं.... अर्जुन आणि क्रिति आहेत म्हणूब न्हवता बघायचा पण सगळा सिनेमा डिरेक्टरचाच आहे असं वाटलं..अर्जुन आणि क्रिती ऐवजी कुणीही असतं तरी पण एवढाच इम्पॅक्ट पडला असता अस वाटलं.. जिथे जिथे अर्जुन मधला पंजाबी रांगडेपणा बाहेर येणार अस वाटत असतानाच तिथे कथा जलद गतीने पुढे सरकते आणि प्रेक्षकाला हुश्श वाटतं... क्रिती पण सेम.. आता उठून आयटम song किंवा अजून काही फालतुपणा करते का काय अस वाटत असतानाच प्रसंग जलद गतीने बदलवतो डिरेक्टर.. एडिटिंग पण मस्त.. स्पेशल इफेक्ट आणि स्लो मोशन कमी आहे हे बरं ,आणि तिथे च डायरेक्टर ची मेहनत जाणवते.. गोपिका बाई पात्राला वावच नाहीये.. संजय दत्त आवडला चक्क.. त्याची धिप्पाड शरीरयष्टी या वयात पण दाद देण्यासारखी.. अर्जुनवर भारीच पडतो तो जसा हृतिक वर होता अग्निपथ मध्ये..

न टुककी, तुम्ही गोवारीकारांबरोबर सेल्फी घेतला का?

माझ्या मुलाला सेल्फी घ्यायचा होता पण खूप गर्दी होती सो नाही गेलो. सिनेमा ची तारीफ केली की गोवारीकर हसून थँक यू म्हणत होते पण थोडे अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की एवढे मनातून उत्तर देत नव्हते असं वाटलं.

सातवीला स्कॉलरशिप (लगान) मिळवलेला, दहावीला बोर्डात आलेला (स्वदेस, जोधा अकबर) मुलगा अकरावीला नापास (राशी, मोहंजोदारो) आणि बारावीला साठ पासष्ट ट्क्क्यांनी ऊत्तीर्ण होतो असे झाले आहे गोवारीकरांचे.>>सहमत मलाही लगान, स्वदेस आवडले होते. जो. अ. टीव्ही वर बघितला खूप कंटाळवाणा वाटला होता.

शिकस्त पुस्तक वर बेस्ड आहे का ?>> नाही. त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पानिपत ह्या पुस्तकावर आधारित आहे आणि इतिहासकार पांडुरंग बलकवडे ह्यांचे इनपुट्स घेतले आहेत पटकथा लिहिण्यासाठी.
खरंतर विश्वास पाटलांची पानिपत ह्या सुप्रसिद्ध कादंबरीला डावलून
शेजवलकरांच्या पानिपतवर हा सिनेमा बनवण्याचे कारण कळले नाही..

खरंतर विश्वास पाटलांची पानिपत ह्या सुप्रसिद्ध कादंबरीला डावलून
शेजवलकरांच्या पानिपतवर हा सिनेमा बनवण्याचे कारण कळले नाही..>>>>

कादंबरीच इतिहास म्हणून धरायची असेल तर अ किंवा ब मध्ये काय फरक पडतोय.

काल गोवारीकरची मुलाखत पाहीली. त्याचे म्हणने आहे की लोकांना पानिपत काय आहे हे माहित नाही म्हणून चित्रपट काढला. दोन बुद्धीमान व शुर माणसांची झंगड पक्कड आहे पानिपत म्हणजे. पात्रे तरी धड घ्यायची. अगदीच पात्रं घेतली आहेत.

आपल्याच नतद्रष्ट माणसांमुळे आपली जीवाभावाची माणसे तेथे गाडली गेली मातीत. मराठ्यांचा इतीहास फार लाजीरवाणा आहे.

कादंबरीच इतिहास म्हणून धरायची असेल तर अ किंवा ब मध्ये काय फरक पडतोय.>> पण विश्वास पाटलांनी बरंच संशोधन करून पानिपत लिहिली आहे ती इतिहासाच्या जास्त जवळ जाणारी कादंबरी आहे. असं मला वाटत.

चित्रपट परिक्षण छान आहे. ते वाचुन गुडीगुडी फील आला.

खरेतर पानिपत चा इतिहास हा महाभयंकर आहे. बेमुर्वतखोरपणे राबवलेल्या धोरणांची मोठी झळ मराठी सैन्याला आणि त्यांच्या घरादाराला बसली पर्यायाने स्वराज्याला बसली. ज्यांच्या हेक्यामुळे हे सर्व घडले ते नामानिराळे राहिले आणि नाव मात्र मराठ्यांचे खराब झाले.

मुलगा अकरावीला नापास (राशी, मोहंजोदारो) >>>>>>>> खेले हम जी जान से सुद्दा. अभिषेक बच्चन आणि दिपिका पदुकोण होते त्यात.

आजकाल डायरेक्टर कोण आहे त्याने काही फरक पडत नाही. ऍक्टर महत्वाचा.
उगाच का कार्तिक आर्यन चा पती पत्नी और वो , पानिपत च्या डबल बिझिनेस करतोय ?
अर्जुन कपूर ला बघायला पैसे देऊन कोण मुलगी जाईल ?

उगाच का कार्तिक आर्यन चा पती पत्नी और वो , पानिपत च्या डबल बिझिनेस करतोय ?>> म्हणजे इथेही चित्रपटाचं पानिपत झालं की काय..!! Sad Sad Sad

कार्तिक आर्यन आहे का इतका पॉप्युलर?
पती पत्नी और वोह हिट होण्यामागे त्याची थीम हे कारण असावं. ही थीम इंडियन ऑडियन्सची खूप आवडती आहे. दे दे प्यार दे, बाजीराम मस्तानी, माझ्या नवर्‍याची बायको, महाराष्ट्र विधानसभा Wink

पानिपत बजेट जेमतेम रिकव्हर करेल. तेसुध्दा थिएटरमधून नाहीच. हल्ली स्ट्रिमिंग व वर्ल्ड टीव्ही प्रिमियर मध्येच जास्त पैसे कमावतात म्हणे.

पती पत्नी और वोह हिट होण्यामागे त्याची थीम हे कारण असावं. >>>>>>>> हा सन्जीव कुमारच्या ' पती, पत्नी और वो' चा रिमेक आहे. मला ही थीमच आवडत नाही. त्या चित्रपटाचा शेवट आवडला नाही. विद्या सिन्हा शेवटी सेक्रेटरी बनून त्याच्या ऑफिसात येते असा शेवट असायला हवा होता.

अर्जुन कपूरने एका दृश्यात अभिनय केला म्हणून राजस्थान की कुठंशी बंदी आलीय म्हणे चित्रपटावर..

ते सुरजमल जाट ला निगेटिव्ह दाखवलं म्हणून

अर्जुन कपूर ने अभिनय केला असता तर चेतन भगत चे सिनेमे कशाला करावे लागले असते

संजय दत्त अब्दालीच्या भूमिकेत अनेकवेळा कॉमेडी करतोय असे मला वाटले.
पहिल्याच सिनमध्ये कुणाला तरी, "मेरे पे वार करेगा" अशा बंबैय्या हिंदीत तो दम देतो. तेव्हा थेटरमधले सगळे हसतात.
आणि अनेक ठिकाणी मुन्नाभाई युद्ध करतो आहे असेच वाटते. त्याच्या गेटअपवर जितकी मेहनत घेतली ती सगळी डायलॉग आणि त्याच्या डिलिव्हरीने पाण्यात जाते.
अर्जुन कपूरला लोक न बघताच जितक्या शिव्या घालताहेत त्या तुलनेत त्याने चांगले काम केले आहे. अर्थात, पेशवा पेशवीण मध्ये कोळीनृत्य करतात ते भन्साळीमुळे अंगवळणी पडले आहे.

Pages