आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. (अवांतर: त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.) राजकारण, राजकारणी तसेच त्यांच्या आतल्या गोटातल्या खबरा, कला, कलावती, हेरोइन, हिरोइन, त्यांची प्रेमप्रकरणे, खेळाडू, क्रिकेट, म्याचेस, भविष्य, रोग आणि उपचार, वाद, दहशतवाद, दहशत इ इ असं सगळे त्याला ठाऊक असतं. कुठली मुलगी कशी आहे, कुणाचं काय अफेअर चालू आहे, कोण किती चालू आहे, कुठला अभ्यासक्रम निवडावा? ते दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशाचा पुढचा प्रमुख कोण होणार या सगळ्यावर त्याची मते आहेत. सगळ्या समस्यांवर त्याच्याकडे जालीम उपाय आहे. अमित शहा यांच्या मनात काय आहे, अण्णांचे पुढचे उपोषण कधी आणि कुठे आहे, शरद पवारांच्या हसण्याचा अर्थ, धोनीच्या निवृत्तीची तारीख इ इ सगळं त्याला माहित आहे नव्हे त्याच्याच सल्ल्याने या सगळ्या गोष्टी होतात ही त्याची ठाम समजूत.
न्हावी हातात इतके सगळे शस्त्र आणि इतक्या माना हातात असूनही हा किती अहिंसक राहू शकतो. एखाद्या योग्यालाच हे शक्य आहे. हे म्हणजे पंचपक्वानांचे ताट समोर असून सुद्धा उपास करण्यासारखे आहे. हे काय येड्या गबाळ्याचे काम नव्हे. मात्र माझी मान न्हाव्याच्या हातात गेली की मात्र तो कधी कानाचा तुकडा पाडतो तर कधी मानेला ब्लेड मारतो. अशी लोकं माझ्याच नशिबात कसे येतात काय माहित. केस वाढवायचे असतात तेव्हा नेमके बारीक कापतो आणि केस बारीक ठेव म्हटला तर थोडफार कटिंग केल्यासारखं करतो. असो, असते एखाद्याचे नशीब!
असं म्हणतात व्यासांनी लिहिले नाही असे काहीही नाही. मला असं वाटतं न्हाव्याने टिपण्णी केली नाही असे जगात काहीही नाही. बरं ह्याला कुठल्याच विषयाचे वावडे नाही. परवा प्रोडक्शन इंसिडेन्ट चा कॉल आला तर मला म्हणाला सर्वर रिस्टार्ट करून बघा. असा सर्वगुणसंपन्न, हरहुन्नरी, आधुनिक ओरॅकल गाईड मला मिळाला हे माझे परमभाग्यच.
क्रमशहा
(याचा अमित शहा यांच्याशी काहीही संबंध नाही)
खूप छोटा भाग ....पुढचे लवकर
खूप छोटा भाग ....पुढचे लवकर टाईपा.