जब I met मी

Submitted by Cuty on 25 November, 2019 - 07:25

लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे.
माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या. मलाही बरे वाटायचे.लागेल ती वस्तू कुणीतरी आणून द्यायचे. मात्र घराबाहेर पडण्याचा प्रसंग कधी आलाच नाही.असं करता करता एक महिना झाला. आपले शेजारी कोण आहेत हेदेखील मला माहित नव्हते. बर्याचदा ओळखीच्या बायका घरी यायच्या आणि हाॅलमध्ये बसून गप्पा मारून जायच्या.मला अशावेळी चहा करण्याच्या निमित्ताने किचनमध्ये पाठविले जाई. अगदीच कोणी बाई माझ्याशी ओळख करून घ्यायला आत आली, तर मला तिच्याशी बोलता येई, अन्यथा मी केलेला चहा दुसरेच कुणी बाहेर घेऊन जाई. हळूहळू माझ्या मनाचा कोंडमारा होऊ लागला,मात्र काहीच बोलता येईना. वरकरणी सर्व ठीक होते.
कधी एखादी वस्तू हवी असेल तर 'अग तू कशाला जातेस?अमका(अमकी) आणेल ना.! अशी नव्या नवरीसाठी काळजी दाखविली जाई.
पुढे मी नवर्याबरोबर राहण्यासाठी पुण्याला निघाले. घरातून बाहेर पडताना जाणवले , मी चक्क दोन महिन्यांनी घराबाहेर पडत होते.
बरे , आता नवर्याबरोबर पुण्याला आले, स्वतंत्र संसार थाटला, तरी हे 'काळजी प्रकरण' काही थांबेना. आता नवर्याला माझी ' काळजी' वाटत होती.
मी जवळच्या एका शाळेत अर्ज केला आणि माझी तिथे लगेच शिक्षिका म्हणून नेमणूक झाली.मात्र अगदी भाजी पासून ते माझे कपडे,चप्पल,पर्स इ. सर्व खरेदी नवर्याच्या सोबतीने पर्यायाने त्याच्या पसंतीने होऊ लागली. कधीतरी एखादी वस्तू मी घेतलीच ,तर ती कशी महाग पडली किंवा खराब आहे, हे ऐकवले जाऊ लागले. अजून काही दिवसांनी अशी वेळ आली कि एकटीने अगदी दहा रूपयांची वस्तू खरेदी करायची सुद्धा
माझी प्राज्ञा नव्हती. मला नवरा बरोबर असल्याशिवाय कोणतेच बाहेरचे व्यवहार करता येईनात! सतत 'घरचे काय म्हणतील किंवा मी चूक तर करीत नाही ना' हीच भिती!

दोन वर्षानी मला मुलगा झाला. आई आजारी असल्याने येऊ शकली नाही. सासूबाई आल्या. त्यांच्याच पद्धतीने बाळाचे सर्व काही करत होते. पटत नसले तरी. उदा. बाळाच्या कानात रोज तेल घालणे, रडत असल्यास नजर काढणे इ.
बाळ पंधरा दिवसांचे होते. अचानक त्याला ताप आला.
यावर त्याला दवाखान्यात न नेता त्या दोन दिवस फक्त नजर काढत होत्या. अजून दोन दिवस गेले. ताप वाढला. बाळाची अवस्था नाजूक झाली होती.माझी घालमेल होऊ लागली. संध्याकाळी बाळ दूध देखील घेइना. तरी सासूबाई ढिम्म .
'काहितरी नजरच लागली असेल , एवढ्याशा बाळाला काय दवाखान्यात न्यायचे. डाॅ. विनाकारण अॅडमीट करून पैसे ऊकळेल' . याला नवर्याचीही सम्मती. रात्रभर मी विचार करीत जागले. शेवटी युक्ती सुचली.!
सकाळी उठून नवरोबा आणि सासूला म्हटले, तुम्ही दोघे देवाला जाऊन या, बाळासाठी साकडे घाला. याला मात्र दोघे तयार झाले. ते दोघे घराबाहेर पडताच बॅग घेतली, बाळाला उचलले आणि तरातरा चालत गेटजवळ पोहोचले, तोच वाॅचमनकाका मागून हाका मारत आले. अहो ताई, तान्ह्या बाळाला घेऊन एकट्याच कुठे निघालात? मग त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. बाळाला डाॅ. कडे नेते हे कळल्यावर
त्यांनाही पटले.त्यांनी आश्वासन दिले, ताई तुम्ही निर्धास्त रहा.
कुणाला कळणार नाही. बाळाला जपून न्या अन जपून आणा!
पायरया चढून दवाखान्यात गेले. बाळाला टेबलवर ठेवले. डाॅक्टर चकित!! वीस दिवसांच्या बाळाला घेऊन एकटीच बाई भर दुपारी कशी आली? मग मीच सर्वकाही सांगितले. त्यांनी बाळाला तपासून सांगितले, ताबडतोब काही अॅन्टिबायोटिक्स सुरू करावी लागतील अन्यथा न्यूमोनियाच होण्याच्या मार्गावर आहे. मग जवळच्या मेडिकलमधून औषधे आणून एक डोस डाॅ. समोरच बाळाला दिला.
घरी आल्याबरोबर सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. रोज ठराविक वेळी सर्वांची नजर चुकवून बाळाला औषध देत राहिले. तीन दिवसात बाळ खडखडीत बरे झाले!
नवरोबांना म्हटले, 'देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला!'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं खरं आहे का?अगदी काल्पनिक असले तरी खूप डेंजर वाटत आहे,
बाकी सगळं तर जाऊच द्या पण 20 दिवसाच्या बाळाला dr कडे नेणे नाही याचा विचार सुद्धा करवत नाहीये

आदु +११,
खरंच असे काही घडले असेल तर सासुबाई आणि साथ देणार्या मुलाची धन्य आहे..

कथा असेल तर नो कमेन्ट्स, पण खरे असेल तर आई बापांनी इतकी वर्षे जे मुलीला स्वावलंबी, स्मार्ट होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले ते फुकटच घालवले की या मुलीने!!

खरे असो.. काल्पनिक असो.. वाचायला भिती वाटली..
आणि काही कशीही असेना.. युक्ती सुचली हे बरं झालं

जर काल्पनिक गोष्ट असेल तर सोडून द्या. परंतु जर हे वास्तवात असेल तर भीषण आहे, मुलीचे असे पांघरून घालणे बरोबर नाही कारण उद्या यापेक्षा भयानक परिस्थिती उध्दभवू शकते.

असं घडतं खरं आजही समाजात, म्हणून संभ्रम पडतो ही खरी गोष्ट आहे का?
खरं असेल तर - शाबास आहे! अशा परिस्थितीत मार्ग काढणे सोपे नाही. बाकी नवर्‍याच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालेल असे बोलणे टाळता येईल का ( शेवट "देव पावला") ? आई, बायको, व्यक्ति ही नाती सांभाळता सांभाळता अशी कसरत करावी लागते पण नवर्‍याच्या वागण्याला 'रिएनफोर्समेंट' देवू नये…. उलट जरा विचार करेल असे प्रश्न करावे - "जरी उकळले पैसे डॉक्टरने तरी डॉक्टरकडे गेल्याने आपल्या मुलाचा त्रास कमी होतो असे वाटते का?"

प्रत्येक व्यक्तीचा एक उपजत स्वभावधर्म असतो.काही चांगली कमावलेली गुणवैशिष्टे असतात. आवडनिवड ,स्वतंत्र विचार असतात. कधीकधी जगाच्या रहाटगाडग्यात ,दुनियादारीत किंवा व्यवहारी जगात जगताना आपण आपल्या स्वभावाच्या अगदी वेगळे वागू लागतो.( उदा. सासरी जाताना मुलीला सांगितले जाते, ' भांडण करू नको, वारा येईल तशी पाठ दे.' इ.) मात्र कधीकधी अशी एखादी आणिबाणीची वेळ येते कि आपला मूळ स्वभावगुण वर येतो आणि त्याजोरावर आपण कितीही मोठ्या संकटावर धडाडीने पण अक्कलहुशारीने मात करतो. अशा प्रकारे आपण स्वतःलाच नव्याने भेटतो. आपल्याला स्वतःच्याच सामर्थ्याची जाणीव होते.शिर्षक समजून घेतल्यास लक्षात येईल.
वरील कथेत वीस दिवसांचे बाळ असताना अतिशय नाजूक शारिरीक ,मानसिक परिस्थितीत अतिशय संयमाने ,अक्कलहुशारीने पण धडाडीने संकटावर केलेली मात(एका आईने बाळासाठी केलेली धडपड) हे फक्त एक उदाहरण आहे. मात्र आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात जे आपली परिक्षा पाहून आपल्याच सामर्थ्याची पुन्हा जाणीव करून देतात.

हम्म! या ना त्या निमित्ताने एकदा का कह्यात ठेवणे सुरु झाले की आत्मविश्वास ढळायला वेळ लागत नाही. बाळासाठी म्हणून ही स्त्री बाहेर पडली खरी , पण ते धैर्यही काही काळापुरतेच टिकले. बाळाला लपवून औषध देणे आणि एकीकडे 'देव पावला' म्हणत नवर्‍याची मर्जी संभाळणे यातून हे अधोरेखीत होते.

वीस दिवसाची ओली बाळंतिण अजून किती धैर्य दाखवायला हवं /टिकवायला हवं ? ६ आठवडे- ३ महिने नंतर स्वतः चे शरीर पुढचे झेलायला सक्षम झाले की मग काय ते बाकीचे विचार ... ही मुलगी आवडलीच- Mindfulness वाटला...

वीस दिवसाची ओली बाळंतिण अजून किती धैर्य दाखवायला हवं /टिकवायला हवं ?>>
सीमंतिनी,
इतके दिवस दबावाखाली जगलेल्या स्त्री कडून त्या वेळेपुरते धैर्य दाखवणे हेच सुसंगत वाटते. एकदम उभे रहाणे नाही होत. हळू हळू प्रसंगा-प्रसंगाने बाळासाठीम्हणून धैर्य वाढत जाईल .

एक्झॅक्टली माय थॉटस, पण आपल्या आधीच्या पोस्टीत "पण ते धैर्यही काही काळापुरतेच टिकले" वाचले आणि विचारात पडले. Happy

अगदीच रिअलिस्टिक (म्हणून विश्वासनीय) गोष्ट आहे.

> घरी आल्याबरोबर सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. रोज ठराविक वेळी सर्वांची नजर चुकवून बाळाला औषध देत राहिले. तीन दिवसात बाळ खडखडीत बरे झाले!
नवरोबांना म्हटले, देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला! > याच्याऐवजी तिथे दवाखान्यातच फोन करून नवरा-सासूला बोलावून घेऊन डॉक्टरकडून झापायला लावलं असतं तर जास्त योग्य झालं असतं का?

अगदीच रिअलिस्टिक म्हणत आहेत बरेचजण हे वाचून भीतीयुक्त आश्चर्य वाटलं.
नजर काढणारे खूप लोक पाहिलेत, गोड बातमी कुणी सांगितली की अभिनंदन करतानाच बाळाचा फोटो लगेच टाकू नको (नजर लागू शकते) असे बजावणारे व्हाट्सएप / फेबुवर पाहिलेत पण असे जे नात्यातले / परीचयातले / पहाण्यातले लोक आहेत ते बाळाला काही झाले तर नजर काढण्या सोबत डॉक्टरकडे लगेच धाव घेणारे लोक आहेत. (मोलकरीण / watchman सुद्धा).

पण असं घडणं सहज शक्यतेत मोडत असेल तर भयानक आहे.

कथेत ही वेळ निभावून गेली म्हणुन नायिका परत नरम झालेली दिसतेय, पण वर आलेल्या प्रतिसादांप्रमाणे तिने कणखर बनून नवरा / सासूला फैलावर घ्यायला पाहिजे.

वेळ निभावली म्हणून नायिका परत नरम नाही झालेली. सद्ध्याची तिची आणि बाळाची नाजूक अवस्था पाहता तिने हुशारीने संयम ठेवला आहे. तिने मनाशी खूणगाठ बांधली आहे कि इथून पुढे असा प्रसंग आलाच तर इतरांवर अवलंबून रहायचे नाही. आपल्या बाळाच्या भल्यासाठी जे काही करायचे ते आपणच करायचे आहे. हे शहाणपण आणि आत्मविश्वास आता तिला आला आहे.

पल्या बाळाच्या भल्यासाठी जे काही करायचे ते आपणच करायचे आहे>>>मला हे इतके सहज सोपे नाही वाटत,मुळात दोघे एकत्र रहात असताना संसार आणि बाळ ही एकट्या आईची जबाबदारी नाही,मग प्रत्येक वेळी असा मधला खुष्कीचा मार्ग काढण्यापेक्षा नवरा आणि सासूला हळूहळू का होईना मार्गावर आणणे जास्त उपयुक्त ठरेल

बाकी ठीक आहे, पण नवरा आणि सासूने पंधरा दिवसांच्या बाळाला ताप आल्यावर डॉ कडे न्यायचं नाही म्हणणं रिअलिस्टिक नाही वाटलं. विशेषतः नवरा तरी सुशिक्षित असताना.
बाकी डॉमिनेशन असू शकतं हे मान्य.
की बायको म्हणत्ये डॉ कडे नेऊ म्हणून मुद्दाम विरोध करायचा असं आहे? तरी बाळाच्या बाबतीत अशी रिस्क घेणं कठीण वाटलं.

असतात अशी मूर्ख माणसे!
तिने परीस्थिती नीट जोखावी हे बरे! सासरच्यांच्या अशा वागण्याचा त्रास बाळाला पुढे पण होऊ शकतो. शेवटी हे किती दिवस सहन करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा.

सद्ध्याची तिची आणि बाळाची नाजूक अवस्था पाहता तिने हुशारीने संयम ठेवला आहे. >>
ओके हा मुद्दा नव्हता आला डोक्यात.

पोस्ट च्या सुरवातीला ज्या स्थिती चे वर्णन केले आहे ते नॉर्मल वर्तन आहे सर्वच घरात घडते.
नवीन नवरी असते .
जागा नवीन असते,नातेवाईक ,शेजारी हे सर्व नवीन असतात त्या मुळे पूर्ण माहिती होई पर्यंत घरातील लोक सर्व जबाबदाऱ्या घेतात.
ह्या मध्ये काही गैर नाही उलट असेच घडणे अपेक्षित आहे.
त्या नंतर पुण्याला गेले जिथे दोघांचा च संसार आहे बाकी तिसरी व्यक्ती कोणी ही नाही.
तिथे नवरा बायको मिळून च बाहेर जाणार मग शॉपिंग असेल किंवा आणि काही .
शॉपिंग हा पुरुषांचा प्रांत नाही आणि त्यातील त्याला काही समजत सुद्धा नाही इथे फक्त आणि फक्त स्त्री च राज्य चालत.
लेखिका नी जे वर्णन केले आहे ती दुर्मिळ घटना आहे.
मुल झाल्यानंतर ते आजारी पडले तेव्हा काहीच उपचार न करता मुलाचे वडील आणि आज्जी ही फक्त देव देव करत होते आणि डॉक्टर कडे घेवून जाण्यास तयार नव्हते हे तर पटतच नाही .
बाप आहे तो मुलाचा.
बाप,आणि सासू( 50 पर्यंत वय असेल) नवीन पिढीचे च प्रतिनिधित्व करतात.
ते असे वागतील हे पण पटत नाही
अत्यंत नावाजलेल्या डॉक्टर शी माझा संबंध आला होता.
ते नवीन मुल झालेल्यांना पाहिले 30
Min लेक्चर द्यायचे त्यांना वेळ नसेल तर रेकॉर्डेड ऐकवलं जायचं.
त्यात त्यांचं स्पष्ट मत होत.
ताप आला,सर्दी झाली,खोकला आला की लगेच मुलांना औषध देवू नका.
शरीर स्वतः प्रतिकार करेल.
1 दिवस जावू ध्या नंतर बर नाही वाटलं तर औषध ध्या

असतात मूर्ख माणसे, मीही पाहिलीत अगदी हल्लीच. शिक्षणाचा व शहाणपणाचा काहीही संबंध नाही.

कथा आवडली, नायिकेने पहिले पाऊल तर उचललेले आहे, यथावकाश ती करेल सगळे व्यवस्थित.

Pages