सि- २ लोकल डायरी -४

Submitted by मिलिंद महांगडे on 22 November, 2019 - 02:17

अवंतीला मेसेज पाठवून मी चूक करून बसलो असं आधी मला वाटत होतं . पण नंतर शांतपणे विचार केला , आणि लक्षात आलं की हे कधी ना कधी तिच्या घरच्यांना कळणारच होतं ते आता कळालं . जाऊद्या जे होईल ते बघून घेऊ असा विचार करून मी सकाळी आठ वाजता स्टेशनला जायला निघालो . स्टेशनवर पोहोचलो तेव्हा भरत आलेला होता . तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर थाप मारली तसा तो एकदम दचकला आणि बाजूला जाऊन बोलू लागला . त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते . थोड्या वेळात शरद सुद्धा आला . आमचे एक एक मेम्बर येत होते . तेवढ्यात गाडी येण्याची सूचना माईक वरून देण्यात आली . तसा शरद पुढे जायला निघाला त्याने फोनवर बोलत असलेल्या भरतला हटकले . त्यावर त्याने पुढे जा अशी खूण केली आणि फोनवर तावातावाने बोलू लागला . शरद काहीही न बोलता पुढे गेला . आम्ही गाडी पकडली पण आज शरद फक्त दोन जणांची जागा पकडू शकला . भरत त्याच्या मदतीला नव्हता आणि जिग्नेसही डाऊन करून आला नाही . नायर अंकल आज ट्रेनला नव्हते. अवंतीचाही मेसेज आला होता , ती आज येणार नव्हती , मला त्या गर्दीत असूनही एकटं वाटू लागलं . का कुणास ठाऊक शरद महाराज आज एकदम उदार झाले आणि त्यांनी पकडलेली खिडकी मला दिली. सावंत माझ्या बाजूला बसले. आज कधी नव्हे ते भडकमकर उभे राहिले . त्यांचीही जागा गेली . मी त्यांना माझी खिडकीची जागा देऊ लागलो तर त्यांनी बळेच मला खाली बसवलं. आणि आज त्यांचा उभं राहायचा मूड आहे असं सांगून टाकलं . खरं तर भरत आज जागा पकडण्यासाठी पुढे गेला नाही त्यामुळे भडकमकरांना उभं रहावं लागत होतं . आताही त्याचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं, कारण नेहमी दिलखुलास गप्पा मारणारा भरत आज शांत शांत होता . मी शरदकडे बघून ' भरतला काय झालंय ?' असं नजरेनेच विचारलं त्यानेही ' माहीत नाही ' असं खुणावलं .
मी बाहेर बघितलं तर पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर कर्जतला जाणारी ट्रेन नुकतीच आली होती आणि त्यातुन जिग्नेस बाहेर पडला . डाऊन करायला अंबरनाथ गाडी मिळाली नाही किंवा चुकली की त्या मागची गाडी पकडून बरेच जण डाऊन करून येतात तसा आज जिग्नेस आला होता . चालती गाडी सोडली आणि तो एक नंबर प्लॅटफॉर्मवरून धावत आमच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला . त्याच्या कानाला मोबाईल लागलेला होता आणि तो कुणाशी तरी बोलत ,धावत आमच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला . त्याचं बहुतेक लक्ष नव्हतं अचानक गाडीचा हॉर्न वाजला आणि तो धावत येत असताना दुसऱ्या दिशेने येत असलेल्या एका तरुणीवर धाडकन आदळला . तीही कुणाशी तरी फोन वर बोलत होती . त्या टकरीत दोघांचे मोबाईल हातातून पडले आणि तेव्हढ्यात गाडी हॉर्न देऊन निघालीही . जिग्नेसने गडबडीत खाली पडलेला मोबाईल उचलला , आणि धावती ट्रेन पकडली . ती तरुणीची लेडीज डब्याकडे पळाली. डोअरवरच्या रवीने त्याला आत चढायला लगेच जागा करून दिली आणि वर " जिग्नेसभाय , संभालके जरा ' असा टोमणाही मारला .
" क्या रे जिग्नेस , किधर देख के चलता है रे ? " आत आल्या आल्या सावंत चेष्टेने म्हणाले .
" अरे क्या यार , वो पागल लडकी बीच में आ गयी ना " तो वैतागून म्हणाला .
" लेकिन तूने जान बुझके धक्का मारा ना उस लडकी को ?" भडकमकर गमतीत म्हणाले .
" नै भडकमकरजी , मैं क्यू मारुंगा धक्का ? वो लडकी फोन पे बात करते करते मेरेसे टकराई "
" जाने दे , इतना भागा दौडी करके आया है तो बैठ जरा ", म्हणत मी त्याला माझी जागा दिली . गाडीने स्टेशन सोडलं आणि ती पुढे निघाली . इतक्यात जिग्नेसच ओरडला .
" अरे ये तो मेरा फोन नही है .... ओ पागल लडकी मेरेसे टकरा गयी ना उसिमें मेरा मोबाईल गिर गया ...। शीट , मेरा फोन गुम गया । " असं म्हणून तो डोक्याला हात लावून बसला .
" फिर ये फोन किसका है ? " सावंतांनी विचारलं .
" क्या मालूम , लेकींन मेरा नहीं है । पिछले हफ्तेही लिया था । " तो अजूनही डोकं धरून बसला होता .
" अरे , ये तेरा फोन नहीं तो उस लडकी का फोन होगा ना । " शरद म्हणाला .
" अरे हां यार । तो फिर मेरा फोन गया मतलब ! "
" अबे दिमाग से पैदल है क्या तू ? अब उसका फोन तेरे पास है तो तेरा फोन उसके पासही होगा ना ? " शरद वैतागला .
" जिग्नेस , तू पहिला फोन कर त्या मुलीला .... आणि सांग फोन एक्सचेंज झाले आहेत . पुढे कुठल्या तरी स्टेशनवर भेटा आणि आपापले फोन घ्या " मी उपाय सुचवला.
" लेकीन मुझे नहीं मालूम उस लडकी का फोन नंबर और ये फोनका स्क्रीन भी लॉक है । " जिग्नेस एकदम गोंधळून गेला होता .
" काय करावं ह्याचं ? तुझे तेरा फोन नंबर तो मालूम है ना ? उसपे लगा फोन । ये ले मेरे मोबाईल से लगा । " म्हणत मी माझा फोन त्याला दिला. त्यावर कठीण कोडं सुटल्यासारखा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .
" आईला , मधू यार तुम तो जिनियस हो " जिग्नेस हरखून म्हणाला .
" अबे इस्को कॉमन सेन्स बोलते है । जो तेरे पास कम है ।" शरद नेहमीसारखाच त्याची खेचत म्हणाला . जिग्नेसने माझ्या फोन वरून त्याच्या मोबाईलवर फोन लावला . पहिल्यांदा एकदम तावातावाने सुरुवात केली , पण हळूहळू त्याचा जोर कमी झाला , आणि शेवटी एकदम मऊ मांजर होऊन त्याने दादरला उतरून मोबाईलची आदला बदली करायचं मान्य केलं. मला एकदम गंमतच वाटली आणि त्याच्यावर हसूही येत होतं .
" तू दादर उतरेगा ? अबे , उस्को बोल सी एस एम टी तक आने को । " शरद उगाचच त्याला चढवून देऊ लागला . त्यावर सावंत आणि भडकमकरांनी पण री ओढली . त्यावर तो एकदम गोंधळात पडला . मलाच त्याची दया आली
" नै रे , दादर उतर और मोबाईल लेले .... " मी असं म्हणल्यावर शरद आणि सावंत त्याच्यावर हसू लागले . तेवढ्यात त्या फोन वर फोन आला . तो फोन घ्यावा की न घ्यावा ह्या संभ्रमात असतानाच कोणीतरी म्हणलं , " अरे उठा ना फोन " त्याने फोन घेतला तर पलीकडुन कोणीतरी मुलगी बोलू लागली . जिग्नेसच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव दिसू लागले.
" अरे मॅडम , पेहेले सून तो लो , ये फोन बदली हो गया है । और मेरा फोन आपकी फ्रेंड के पास गया है । " जिग्नेस अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात पलीकडून ती मुलगी आणखी काहीतरी बोलू लागली . मधेच तिला थांबवत म्हणाला , " मॅडम , मेरेको गलत मत समझो । में उनको ये फोन लौटाने वाला हूँ । " त्याने फोन ठेवला आणि निश्वास सोडला .
" क्या हुआ रे ? " सावंतांनी विचारलं .
" ये फोन पे तो वो लडकीसे भी ज्यादा पागल लडकी थी । मेरेको बोल रही थी की बिना का मोबाईल वापस करो नहीं तो पुलीस में कंप्लेन्ट करुंगी ... "
" अरे तो तू बोलने का ना , की मई क्या चोर लगता हूँ क्या ? गलतीसे आया मोबाईल ... झापनेका ना उस्को " भडकमकर त्यांच्या स्पेशल हिंदीत म्हणाले .
" साला आजका दिन ही खराब है । जाने दो , ओ पागल लडकी को दादर उतरतेही उसका फोन लौटाता हूँ । जिग्नेस वैतागला . बाकीचे सगळे त्याला ' क्या यार डर गया क्या ? ' , टेन्शन मत ले , वगैरे सल्ले देत होते . बराच वेळ झाला भरत काहीच बोलत नव्हता . आज काहीतरी बिनसलं होतं एवढं मात्र नक्की ! मी शरद ला खूण केली .
" काय भरत भाय ! आज एकदम शांत शांत ? " त्याने भरतला विचारलंच . त्यावर त्याने काही नाही अशी मानेनेच खुण केली . याचा अर्थ नक्कीच काहीतरी भानगड आहे . इतका शांत मी त्याला आजपर्यंत बघितला नव्हता . शरद आणि भरत दोघे कुर्ल्याला उतरतात .
" उतरल्यावर त्याला विचार " असं मी शरदच्या कानात सांगितलं . दोघे उतरून गेले . ते गेल्यावर जिग्नेसची उतरायची घाई सुरू झाली .
" अरे जिग्नेस , बैठ आरामसे जा .... दादर मे सब उतरते है । " सावंत त्याला म्हणत होते पण त्याचा पाय काही ठरेना , सायन यायच्या आधीच तो बाहेर जायला उठला सुद्धा ! दादरला बऱ्यापैकी गाडी रिकामी झाली . जिग्नेस उतरून त्या मुलीला फोन करू लागला आणि वेंधळ्यासारखा इकडे तिकडे बघत राहिला . मी खिडकीतून पाहत होतो , इतक्यात एक मुलगी त्याच्या जवळ आली आणि मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. ही तीच मुलगी होती जिच्या कानाला नेहमीच मोबाईल चिकटलेला असायचा आणि त्याचवेळी मला आठवलं की जिच्याबद्दल प्रेमदूताने मला सांगितलं होतं की हिचं आणि जिग्नेसचं पुढे जुळणार आहे . मला तो सुखद धक्का होता . आता खरी गंमत येणार होती . आपल्याला काही गोष्टी आधीच माहीत असतील तर त्यातली मजा निघून जाते असं म्हणतात ,पण का कुणास ठाऊक मला एकदम भारी वाटत होतं .
" अरे , ही तर तीच आहे .... " मी बोलून गेलो .
" कोण ? तू ओळ्खतोस काय तिला ? " सावंतांनी विचारलंच .
" असंच चेहऱ्याने ओळखतो , ही तीच मुलगी आहे , जी सारखी मोबाईल वर बोलत असते . जसं काय मोबाईल हिच्या कानाला चिकटलेलाच आहे . "
" मग चूक तर तिचीच आहे .... आपला जिग्नेस उगाच वाईट वाटून घेतोय ... ही पोरगी तर भयानक आहे ... बघ कशी तावातावाने बोलतेय जिग्नेस शी ... " सावंत मला सांगू लागले.
" हो ना , आणि जिग्नेस तर काहीच बोलत नाही .... पण मला वाटतं त्याला आवडली आहे ती " मी सावधपणे म्हणालो . इतक्यात हॉर्न देऊन लोकल पुढे निघाली .
" छे ! जिग्नेसची तंतरलीय ... गप उभा आहे " सावंत बोलत होते ते काही अंशी खरं होतं .
" जिग्नेस .... चल बाय ... " मी ओरडून त्याला हाक दिली . त्यानेही प्रतिसाद दिला . मी विषय पुढे वाढवला नाही . कारण ह्या दोघांचं पुढे काय होणार हे इतर कुणालाच काय , त्यांनाही माहीत नव्हतं पण मला पक्कं माहीत होतं . फक्त आता ह्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम कसं फुलत जातं हेच बघायचं ! . जिग्नेसच्या " प्यारची " सुरुवात " नफरतने " होईल असं मात्र मला वाटलं नव्हतं .

क्रमशः ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users