लुप्त का मांगल्य झाले?
पुस्तकातिल माणसांचे लुप्त का मांगल्य झाले
अन् लुटेरे, देशबुडवे का असे बहुमुल्य झाले?
गाव होता हा तसाही भ्याड सत्कर्मी सशांचा
चार कोल्हे दहशतीने राहिले, ऋषितुल्य झाले
धर्म बुडतो रोज येथे, ना कुणी अवतार घेई
तेहतिस कोटींतले का मंद ते जाज्वल्य झाले?
हस्तक्षेपांनीच खाकी यंत्रणा दुर्बल बनवली
प्रश्न पडतो, चोरट्यांना प्राप्त का प्राबल्य झाले?
स्वार्थ बघुनी राजकारण, अर्थकारण खेळल्याने
काल जे साफल्य होते, आज ते वैफल्य झाले
मी चरावे, तू चरावे रीत आपण पाळली पण
चार वेडे सत्यवादी तेच मोठे शल्य झाले
माय मेली त्या क्षणाला पोरका झालो मला मी
हरवले, नाही मिळाले, शोधुनी वात्सल्य झाले
लावला जगण्यास मी जो अर्थ होता, व्यर्थ होता
जन्मण्याचे फक्त मरणाने खरे साफल्य झाले
छंद का "निशिकांत" नाही कोणता जोपासला तू?
फक्त शिकणे पोट भरण्याचे, कला कौशल्य झाले
निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३