धरणांसाठी समांतर पर्याय - भाग दोन पाणी पारेषण केंद्र (water transmission centers)

Submitted by सुनिल प्रसादे on 24 October, 2019 - 22:41

धरणांसाठी समांतर पर्याय - भाग दोन
पाणी पारेषण केंद्र
(water transmission centers)
---------------------------------

( For special attention of Govt. Of Maharashtra/Govt. Of India )

भाग - दोन
-------------

लेखाच्या पहिल्या भागात आपण ह्या विषयाची पार्श्वभूमी पहिली. "पर्यावरण बिघडलं आहे म्हणून पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणून पर्यावरण नाही" हे दुष्ट चक्र जर यशस्वीपणे भेदायचं असेल तर आपल्याला चाकोरी बाहेरचा विचार करावा लागेल आणि रुळलेले मार्ग सोडून नवीन आणि अभिनव अशा मार्गांवर चालण्याचे धाडस दाखवावे लागेल.

"पागोळी वाचवा अभियान" अंतर्गत "पाणी पारेषण केंद्र" ही संकल्पना हा अशांपैकीच एक अभिनव मार्ग आहे.

"पाणी पारेषण केंद्र" ही संकल्पना समजून घेण्यासाठी अगोदर आपण आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी थोडेसे जाणून घेऊया.

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
-----------------------------------

गोविंदाग्रजांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचं "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा" असं सार्थ वर्णन केलं आहे. दगडांचा देश म्हणजेच डोंगरांचा देश.

महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 कि. मी असून तो पश्चिमेकडे रुंद आणि पूर्वेकडे अरुंद होत गेला आहे. राज्याची उत्तर दक्षिण रुंदी 700 की. मी असली तरी पूर्वेकडे ती कमी कमी होत गेली आहे. राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत. ही संकल्पना समजण्यास सोयीचं व्हावं म्हणून आपण राज्याचे पाच विभाग करूया.

ह्या पाचही विभागातील डोंगर, पर्वत, टेकड्या आणि त्यांच्यामधील पठारी (सपाटीचा) प्रदेश ह्यांच्या समुद्र सपाटी पासूनच्या उंचीचं आणि तेथील पर्जन्यमानाचं गणित आपण मांडणार आहोत.

1. पश्चिम विभाग -
------------------
ह्या विभागामध्ये मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक मिळून अकरा जिल्ह्यांचा समावेश करूया. राज्याच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण पसरलेल्या 650 की. मी लांबीच्या सह्याद्री पर्वतामुळे ह्या पश्चिम विभागाचे सरळ दोन भाग पडले आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे कोकणपट्टीतील सात जिल्हे समुद्र सपाटीच्याच पातळीवर केवळ काही मीटर उंचीवर पसरले असून तेथील पावसाचं सरासरी प्रमाण 2500 ते 3500 मिमी एव्हढं प्रचंड आहे. उर्वरित चार जिल्हे सह्याद्रीच्या पूर्वेकडे नाशिक ते कोल्हापूरपर्यंत पसरले असून त्यांतील पठारी प्रदेशाची समुद्र सपाटी पासूनची उंची 550 ते 650 मीटर अशी असून तेथील पावसाचं प्रमाण 1000 ते 2000 मिमी असं आहे.

2. उत्तर विभाग -
---------------
ह्या विभागात आपण अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला,वर्धा, अमरावती आणि नागपूर अशा नऊ जिल्ह्यांचा समावेश करूया. अहमदनगर जिल्ह्याची 650 मीटर उंची सोडल्यास उर्वरित आठ जिल्ह्यांतील पठारी प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची केवळ 200 ते 300 मीटर एव्हढी असून अहमदनगर (550 मिमी), नंदुरबार (650 मीमी) आणि धुळे (680 मीमी) हे तीन कमी पावसाचे जिल्हे सोडल्यास तेथील पर्जन्यमान 750 ते 1150 मी.मी असं मध्यम स्वरूपाचं आहे.

3. मध्य विभाग -
----------------
ह्या विभागामध्ये आपण औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली आणि वाशीम अशा सहा जिल्ह्यांचा समावेश करूया. ह्या सहा जिल्ह्यांतील पठारी प्रदेशाची समुद्र सपाटी पासूनची उंची 400 ते 550 मीटर एव्हढी आहे. तेथील पर्जन्यमान 650 ते 850 मी.मी एव्हढं असून ते अनियमित स्वरूपाचं आहे.

4. दक्षिण विभाग -
-----------------
ह्या विभागामध्ये आपण सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि यवतमाळ ह्या सहा जिल्ह्यांचा समावेश करूया. ह्या जिल्ह्यांतील पठारी प्रदेशाची समुद्र सपाटी पासूनची उंची 383 ते 676 मीटर एव्हढीआहे. सोलापूर (580 मिमी)आणि सांगली (620 मिमी) हे दोन जिल्हे वगळता तेथील पर्जन्यमान 800 मी.मी ते 1030 मी.मी एव्हढं आहे.

5. पूर्व विभाग -
-------------
ह्या विभागामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा चार जिल्ह्यांचा समावेश करूया. ह्या जिल्ह्यांतील पठारी प्रदेशाची समुद्र सपाटी पासूनची उंची 194 मीटर ते 318 मीटर एव्हढी असून पर्जन्यमान 1400 मी.मी ते 1500 मी.मी असं समाधानकारक आहे.

आता आपण आपल्या राज्यातील पर्वत, डोंगर, टेकड्या इत्यादींची माहिती घेऊया.

राज्यामध्ये सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, सातमाळा/अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, महादेवाचे डोंगर, बालाघाटचे डोंगर, भामरागड असे प्रमुख पर्वत आणि डोंगररांगा आहेत. त्याशिवाय राज्यामध्ये अनेक लहान डोंगर किंवा टेकड्या आहेत.

राज्याचे पाणी आणि जमीनविषयक प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ह्या डोंगर आणि पर्वतांची आपल्याला खूप मदत होऊ शकते. परंतु आजपर्यंत आपण त्यांना दुर्लक्षित ठेवलं आहे. आपण राज्यातील ह्या पर्वत आणि डोंगररांगांची ओळख करून घेऊया.

1. सह्याद्री पर्वत -
राज्यातील सर्वात उंच आणि लांब पर्वत म्हणजे सह्याद्री. राज्याच्या पश्चिमेला समुद्रसीमेपासून केवळ पन्नास ते ऐंशी किमी अंतरावर संपूर्ण राज्य पाठीवर घेऊन उत्तर दक्षिण असा पसरला असून त्याने राज्याची पश्चिम सीमा पूर्णपणे व्यापली आहे. सह्याद्रीची एकूण लांबी 1600 किमी असली तरी महाराष्ट्रातील त्याची लांबी 650 किमी आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1200 ते 1400 मीटर असली तरी त्यातील काही शिखरांची उंची 1650 मीटर पर्यंत पोहोचली आहे. राज्यामध्ये पसरलेल्या सह्याद्रीचे एकूण क्षेत्रफळ 60000 चौ. किमी असून त्याच्या माथ्याचं अंदाजित क्षेत्रफळ 12000 ते 15000 चौ. किमी किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकेल. राज्यातील पावसाचं सर्वात जास्त प्रमाण म्हणजे 2500 ते 3500 मिमी सह्याद्री पर्वतातील असून वेळप्रसंगी ते 4000 मिमी ते 5000 मिमी एव्हढ्या पातळीपर्यंत जातं. ह्या वर्षीच्या पावसाळ्यात तर बऱ्याच ठिकाणी पावसाने 7000 मिमीचा टप्पादेखील ओलांडला आहे. सह्याद्रीची प्रचंड उंची आणि तेथील प्रचंड प्रमाणातील पाऊस हे खरं तर आपल्या राज्याला लाभलेलं वरदान आहे. परंतु आजपर्यंत आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलं आहे. त्याचा कल्पकतेने वापर करण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत. सह्याद्रीच्या रुपाने महाराष्ट्राला एक प्रचंड मोठे छप्परच लाभले आहे आणि उंच कड्यावरून कोसळणारे प्रचंड धबधबे हे त्या छपरावरून पडणाऱ्या पागोळ्याच आहेत. ह्या पागोळ्यांमध्ये संपूर्ण राज्याला भिजवून टाकण्याची क्षमता आहे.

2. सातपुडा पर्वत -
पश्चिम सीमेवर जसा सह्याद्री तसंच राज्याच्या उत्तर सीमेवर सह्याद्री पर्वताला साधारण काटकोनामध्ये पूर्व पश्चिम अशा सातपुडा पर्वताच्या रांगा पसरल्या आहेत. सातपुडा पर्वताची समुद्र सपाटी पासूनची सरासरी उंची 1000 मीटर असून पर्जन्यमान 850 ते 900 मिमी एव्हढं आहे. तोरणमाळ (उंची 1150 मीटर) आणि चिखलदरा (उंची 1115 मीटर) ही उंच ठिकाणं ह्याच पर्वतरांगेत येतात.

3. सातमाळ किंवा अजिंठा डोंगररांगा -
नाशिक, जळगाव,औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्हा करत करत अकोल्यापर्यंत पूर्व पश्चिम अशा ह्या डोंगररांगा पसरल्या असून त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची 1100 ते 1350 मीटर आहे. ह्या रांगांमध्ये सप्तशृंगी (उंची 1416 मीटर), तौला (उंची 1231 मीटर) अशी उंच ठिकाणे आहेत. तेथील पर्जन्यमान 750 ते 1000 मिमी एव्हढं आहे.

4. हरिश्चंद्र डोंगर -
सह्याद्री पर्वताचीच उपरांग असलेल्या ह्या डोंगराची समुद्र सपाटी पासूनची उंची 1424 मीटर असून तेथील पर्जन्यमान सुमारे 800 ते 900 मिमी एव्हढं आहे.

5. शंभूमहादेवाचे डोंगर -
सह्याद्री पर्वताचीच ही सताऱ्यातून निघून सांगली, सोलापूरकडे वळणारी उपरांग असून तिची पश्चिम दिशेकडील समुद्र सपाटी पासून उंची सुमारे 1100 मीटर आहे. पुढे कर्नाटक सीमेवर ती 275 मीटरपर्यंत कमी होत जाते. तेथील पर्जन्यमान साधारण 600 ते 800 मिमी एव्हढं आहे.

6.बालाघाटचे डोंगर -
हरिश्चंद्र डोंगररांगेमधून सुरवात होऊन पूर्व पश्चिम पसरलेली ही डोंगररांग 320 किमी पुढे बीड जिल्ह्यातून खाली दक्षिणेला लातूर जिल्ह्यात वळते. ह्या डोंगररांगेची पश्चिम दिशेकडील समुद्र सपाटी पासूनची उंची 825 ते 600 मीटर असून पूर्वेकडे ती कमी होत जाते. सपाट डोंगरमाथा हे ह्या डोंगररांगांचं वैशिष्ट्य आहे. ह्या डोंगर रांगेच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो, पूर्वेला ते प्रमाण कमी कमी होत जातं.

7. राज्याच्या पूर्व विभागात भामरागड, टिपागड, पालसगड,सुराजगड, चिरोळी, गायखुरी, दरकेसा, नवेगाव, चिमूर, चांदुरगड, पेरजागड हे डोंगर आणि टेकड्या असून तेथील पर्जन्यमान 1400 ते 1500 मिमी एव्हढं मुबलक आहे.

वर सांगितलेल्या आपल्या राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचं अवलोकन करता आपल्या डोळ्यासमोर दोन गोष्टी स्पष्टपणे समोर येतात.पहिली म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेला असलेल्या राज्यातील बहुतांश पठारी प्रदेशाची समुद्र सपाटी पासूनची उंची 200 मीटर ते 550 मीटर एव्हढी आहे. क्वचितच काही ठिकाणी ती 600 ते 650 मीटर एव्हढी आहे. ह्या पठारी प्रदेशाची पश्चिमेकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली 550 ते 600 मीटरची उंची राज्याच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे 200 ते 300 मीटरपर्यंत कमी होत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात मुबलक पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील पर्वतांची समुद्र सपाटी पासूनची उंची 1000 मीटर ते 1600 मीटर अशी आहे. राज्यातील पठारी प्रदेशांची उंची आणि राज्यातील पर्वत, डोंगरांची उंची ह्यामधला फरक हेच आपल्या समस्येचं समाधान आहे.

पाणी पारेषण केंद्र -
राज्यातील पाणी आणि जमीन विषयीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी खरं तर राज्यातील एकटा सह्याद्री पर्वतच समर्थ आहे.

'पाणी पारेषण केंद्र' ही संकल्पना खरं पाहता केवळ एका वाक्यात मावेल एव्हढीच आहे.

"उंच पर्वतांच्या माथ्यावर प्रचंड प्रमाणात पडणारं पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या आणि गरज लागेल तिथे कृत्रिमरीत्यादेखील, वरच्यावरच आपल्याला सोयीचं होईल अशा ठिकाणी, म्हणजेच 'पाणी पारेषण केंद्रा'च्या ठिकाणी, प्रयत्नपूर्वक गोळा करून तत्क्षणी एव्हढ्या प्रचंड उंचीवरून कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय पाईपमधून नैसर्गिक प्रभावाने (gravity force) उंचीने खूपच कमी असलेल्या राज्याच्या सर्व पठारी भागामध्ये, विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागांमध्ये प्राधान्याने, पोहोचवणे".

सगळ्याच डोंगरांच्या माथ्यांवर मोठ्या प्रमाणावर पडणारं पावसाचं पाणी हे धबधब्यांच्या रूपाने डोंगर पायथ्याशी येऊन वाहून जात असतं. अतिवृष्टीच्या वेळी ते काहीवेळा विनाशकारी आणि जीवघेणंदेखील ठरतं. वरून खाली वाहणारं हेच पाणी जर आपण वरच्यावरच ठिकठिकाणी योग्य जागा हेरून त्या त्या ठिकाणी एकत्रित केलं तर वाढत्या पाण्याच्या दबावाने आणि मिळालेल्या उतारामुळे पाईपच्या माध्यमातून नैसर्गिकपणे ते खूप लांबवर पाण्याचा तुटवडा असलेल्या प्रदेशात आपण नेऊ शकू.

आपण केलेल्या राज्याच्या पाच विभागांपैकी पश्चिम विभाग आणि पूर्व विभाग हे पावसाच्या बाबतीत समृद्ध आहेत. त्याठिकाणी केवळ प्रभावी जलसंवर्धनाची आवश्यकता आहे. परंतु उत्तर विभाग, मध्य विभाग आणि दक्षिण विभाग हे तिथपर्यंत पाऊस अनियमितपणे पोहोचणारे आणि पावसाचा अत्यंत तुरळक प्रमाणात लाभ होणारे विभाग आहेत. त्यांच्यासाठीही जलसंवर्धन ही अत्यावश्यक गोष्ट ठरत असली तरी त्यासाठी मुळात तेथे कोणत्याही मार्गाने पाणी पोहोचणे महत्वाचं आहे.

"पागोळी वाचवा अभियान" आणि त्या अंतर्गत सुचवलेली 'पाणी पारेषण केंद्र' (water transmission centers) ही संकल्पना ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य करण्याची उपाययोजना सांगते.

'पाणी पारेषण केंद्र' ह्या संकल्पनेची अंमलबजावणी कशी करायची ते आपण पुढच्या लेखात पाहू.

(क्रमशः)

सुनिल प्रसादे.
दापोली.
8554883272 (WA)

दि. 08 ऑक्टोबर 2019.

(इतर माहिती आणि संदर्भांसाठी कृपया आमच्या फेसबुक पेजवरील लेख वाचावेत)

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#प्रभावीजलसंवर्धन
#पागोळीवाचवाअभियान
#rainwaterharvesting

Group content visibility: 
Use group defaults

राज्याचा भूगोल आज नीट समजला तुमच्यामुळे. पाणी साठवणे आणि त्याचे वहन ह्याबद्दल काही प्रश्न आहेत. पुढचा भाग वाचून घेते.