समूहाचा बुद्ध्यंक

Submitted by सामो on 21 October, 2019 - 14:18

The Wisdom of Crowds: James Surowiecki नावाचे रोचक पुस्तक वाचते वेळी काढलेली टिपणे -

एका पानझडीच्या ऋतूमध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस Galton याने एका गावच्या जत्रेला जायचे ठरविले. कुतूहल हा फ्रान्सीसचा मोठ्ठा गुण किंवा स्वभावविशेष म्हणता येईल. त्याचा संख्याशास्त्र हा विषय होता. आज का कोण जाणे त्याला पशुधन/गाई-गुरे-बकऱ्या-मेंढ्या आदींमध्ये कुतूहल वाटतं होते. तर त्या जत्रेत कोण कोण आले होते बरे - शेतकरी, मेंढपाळ, खाटीक,सामान्य लोक,सुतार, लोहार वगैरे गावकरी तेथे जत्रेची मजा लुटण्यास आलेले होते. खरे पहाता, एका वयस्क शास्त्रज्ञाकरता ती जत्रा फारशी गंमतीशीर किंवा आकर्षक वाटावी असे तिच्यात काही नव्हते. पण नाही. Galton ला २ विषयांत रस होता ते म्हणजे - भौतिक आणि बौद्धिक क्षमतेचे मापन आणि प्रजनन (ब्रीडिंग). आता प्रजनन या विषयात या शास्त्रज्ञास का रस होता तर त्याचा हा दावा होता कि, संपूर्ण समाजस्वास्थ्य निरोगी ठेवण्याकरता, फारच थोड्या लोकांची मदत होते. आणि Galton याने त्याचे संपूर्ण आयुष्य एका निरोगी समाजस्वास्थ्याकरता आवश्यक ते गुणधर्म तपासण्यात व्यतीत केले होते. आणि त्याच्या लक्षात आले होते कि बहुसंख्य लोकांमध्ये ते गुणधर्म नसतात. आणि त्याच्या प्रयोगाअंती त्याने हा निष्कर्ष काढलेला होता कि सरासरी व्यक्तीचा बुद्ध्यंक म्हणा किंवा समाज स्वास्थ्याकरता लागणारा कोशंट फार कमी असतो, नगण्य असतो. Galton याचे म्हणणे होते की जर सत्ता फार कमी संख्येने असणाऱ्या हुशार, बुद्धिमान आणि सर्वगुणसंपन्न, श्रेष्ठ अशा काही लोकांतच एकवटली तर अधिक उत्तम समाजनिर्मिती होईल. अर्थात बाकी सारे फडतूस, काही मूठभर लोकच निरोगी समाजाचे जनक.
.
त्या जत्रेमध्ये फिरता फिरता, Galton एका स्पर्धेपाशी आला. एका प्रचंड बैल स्टेजवर ठेवलेला होता. आणि स्पर्धा अशी होती कि खाटकाने, त्या बैलाला, कापून, वगैरे खाण्यास योग्य असे केले, तर त्या बैलाचे वजन किती होईल? ६ पैसे देऊन एक तिकीट खरेदी करायचे, त्यावरती स्वतः:चे नाव, पत्ता आणि वजनाचा आकडा घालायचा. जी व्यक्ती जिंकेल तिला बक्षीस. या स्पर्धेत ८०० लोकांनी त्यांचे नशीब आजमावले. हे लोक विविध क्षेत्रातून आलेले होते, आर्थिक, बौद्धिक, व्यावसायिक अतोनात विविधता होती. काहीजणांना घोडे-गाई-गुरे पशूंचे प्रजनन, पालन आदींची पूर्ण माहिती होती तर अनेकांना अजिबातच नव्हती. काही खाटीक होते तर काही फक्त खाणारे. सांगायचा मुद्दा हा की वैविध्य खूप होते. काही पशुतज्ज्ञ होते, शेतकरी होते तर काही अगदी अडाणी आणि सर्वसामान्य लोक होते. यासंदर्भात पुढे Galton या सिनॅरिओ ची लोकशाहीशी तुलना करतो कि जसे लोक आपल्या नातलगाना , मित्रमैत्रिणींना विचारून किंवा स्वेच्छेने एक मत देतात आणि पुढारी निवडून आणतात अगदी तोच सिनॅरिओ होता. कोणी क्लार्क होते कोणी खाटीक, व्यापारी, चांभार, बलुतेदार वगैरे वगैरे आणि हे लोक , बैलाच्या वजनाचे एक मत देत होते.
.
Galton चा मुद्दा हा होता कि सरासरी मतदार हा फार ढ असतो, बुद्ध्यंक कमी असलेला असल्याने त्याचे मत नगण्य महत्वाचे असते. आणि आपले हेच मत सिद्ध करण्याकरता, Galton ने त्या स्पर्धेचा उपयोग करून घेण्याचे ठरविले. त्याने स्पर्धा आयोजकांकडून सर्व तिकिटे घेतली आणि त्यावर संख्याशास्त्राचे काही प्रयोग केले. त्याच्या प्रयोगात Galton ला एकूण ७८७ तिकिटे वापरता आली. १३ तिकिटे काही कारणांनी बाद ठरली.त्याने त्या तिकिटात दिलेल्या वजनाची सरासरी काढली. म्हणजे जरा आपण सगळे स्पर्धक म्हणजे जणू एका व्यक्ती किंवा एक समाज (collective wisom ) धरले तर त्याचे उत्तर आले - १,१९७ पौंड. आणि खरे बैलाचे वजन भरले १,१९८ पौंड. पहा किती तंतोतंत जुळणारे उत्तर मिळाले.Galton ला वाटले होते कि सरासरी, उत्तर अतिशय चुकीचे येईल कारण त्याचा गर्दीवर, गर्दीच्या बुद्ध्यंकावरती विश्वास नव्हता. परंतु त्याचा हा अविश्वास फोल ठरला. त्या दिवशी जत्रेतील प्रयोगातून जे उत्तर मिळाले ते एका शाश्वत, स्वयंसिद्ध सत्य आहे. आणि या पुस्तकाचे सार तेच आहे. त्याची उदाहरणे पुढे पाहूच.
.
अगदी सामान्य माणूस घेतला तर त्याला तुटपुंजी माहिती असते, त्याची निर्णयक्षमता तल्लख अजिबात नसते, दूरदृष्टीचाही त्याच्यात अभाव असतो. कॉस्ट-बेनेफिट मोजण्यातही सामान्य माणूस कच्चाच असतो. पण आश्चर्य म्हणजे decision making मध्ये मात्र संपूर्ण समाज समूह, ग्रुप, गट हा अगदी चपखल बरोब्बर उत्तर देतो असे लक्षात येते.
.
'कौन बनेगा करोडपती' आपण सर्वानी पाहिलेला कार्यक्रम, यामध्ये १५ प्रश्नांना सलग बरोबर उत्तर देता आले तर एक करोड घेऊन तुम्ही जाऊ शकता. पण मेख हि कि प्रश्न उत्तरोत्तर अधिकाधिक किचकट, अवघड होता जाणार. यामध्ये ३ बचावाचे पर्याय आहेत. (१) चारपैकी २ चुकीची उत्तरे खोडली जातील व अशा रीतीने तुम्हाला ५०% बरोबर उत्तराची संधी मिळेल. (२) तुम्ही तुमच्या मैत्र अथवा नातलगाला प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकता आणि (३) कार्यक्रम पहाणारा जनसमुदाय त्यांचे फोन, संगणक वापरून तुम्हाला बरोबर उत्तर देऊ शकतात. यामध्ये आपल्याला लक्षात येईल कि तिसरा पर्याय हा 'Collective wisdom " आहे. जिथे सरासरी दुसरा पर्याय ६५% उपयोगी ठरतो, तिथे तिसरा म्हणजे समाजाच्या समूहाच्या बुद्ध्यंकाचा पर्याय ९१% उपयोगी पडतो- हा योगायोग नाही.
समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांनी अनेक प्रयोगाअंती हे सिद्ध केले कि समाज समूह किंवा गट हि एक वेगळी entity आहे. आणि कसा माहीत नाही पण या समाजसमूहमनाचा (collective concious ) चा बुद्ध्यंक हा अतिशय उत्तम असतो.
.
उदाहरणच घ्यायचे तर एका बरणीत जेली बीन्स म्हणजे बारीक गोळ्या भरा आणि एका गटास त्या अंदाजे किती ते वर्तविण्यास सांगा. एखादा दुसरी व्यक्ती अगदी बरोबर सांगते परंतु परत तशाच प्रकारचा प्रयोग अन्य बरणी ठेऊन केला किंवा गोळ्या बदलल्या तर अन्य दुसरीच कोणी व्यक्ती बरोब्बर संख्या सांगते म्हणजे दर वेळेस तीच व्यक्ती विजेती ठरत नाही. याउलट गटाची सरासरी मात्र नेहमी बरोबर किंवा जवळजवळ बरोब्बर येत. हा योगायोग नाही. पण काही लक्षात घेण्यासारखे मुद्दे हे कि - हा गट एकमेकांत चर्चा करून अंदाज वर्तवत नाही. ते स्वतंत्र रीतीने आपला आपला अंदाज वर्तवतात.
.
अजून एक प्रयोग नॉर्मन ल जॉन्सन यांनी केला. त्यांनी एक भुलभुलैय्या बांधला, त्यात काही लोकांना सोडले. या लोकांना पहिल्या प्रथम बावचळल्यासारखे झाले आणि वेडेवाकडे मार्ग काढत काढत, अंदाजपंचे हे लोक एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत पोचले. दुसऱ्या वेळेस त्यांना परत त्याच भुलभुलैय्यात पाठविले आता मात्र हे लोक चटकन पोचले किंवा कमीत कमी वळणांनी , लहानात लहान मार्गानी पोचले. म्हणजे पाहिल्यावेळेस जर एका माणसाला सरासरी ३४.३ पावले लागली असतील तर दुसऱ्या वेळेस त्याच माणसाला १२.८ च पावले लागली. पण गंमत हि कि जॉन्सन यांनी प्रत्येक माणसाची पावले मोजून, त्या गटाचे सरासरीसम सोल्युशन् काढली ज्याला आपण collective Solution म्हणू, म्हणजे 'क्ष' वळणापाशी २७ लोक डावीकडे वळले, आणि १९ लोक उजवीकडे वळले तर जॉन्सन यांनी 'डावीकडे' असे धरले.अशा रीतीने त्यांना हे सापडले कि collective solution फक्त ९ पावले आले. आणि हेच उत्तर खरंच कमीत कमी अंतराचे होते. याहून कमी पावलात एका दारापासून , दुसऱ्या दारापर्यन्त जाणे शक्यच नव्हते.
.
समाजाच्यासमूहाच्या बुद्ध्यंकाचे तिसरे उदाहरण - २८ जानेवारी १९८६ मध्ये 'चॅलेंजर' यान लाँच झाले. काही मैल वरती आकाशात जाऊन या यानाचा स्फोट झाला. अर्थात मोहीम अपयशी ठरली. ताबडतोब स्टॉक मार्केटवरती परिणाम दिसून आला. ४ कंत्राटदारांनी या 'यान मोहिमेत' भाग घेतलेला होता -

रॉकवेल इंटरनॅशनल याने ते यान व त्याचे मुख्य इंजिन बनविले होते.
लॉकहीड कंत्राटदाराकडे जमिनीवरील सुववस्थेची जबाबदारी दिलेली होती.
मार्टिन मेरीयेटा यांनी फ्युएल टॅंक बनविलेला होता.
आणि थिओकोल या कंपनीने सॉलिड-फ्युएल बुस्टर रॉकेट बनविलेले होते.
तात्काळ म्हणजे केवळ २१ मिनिटात, लॉकहीड चे स्टोक ५% ने कोसळले, मार्टिन मॅरिएटाचे ३ % ने, आणि रॉकवेल चे ६% ने कोसळले. पण गंमत म्हणजे थिओकोल ला सर्वाधिक फटका बसला. त्यांचे स्टॉक ६% ने तर कोसळलेच पण त्या दिवसाअखेरीस म्हणजे मार्केट close होताना त्यांना १२% नि फटका बसला. याचाच एका अर्थ हा कि स्टॉक मार्केट ने थिओकोल कंत्राट कंपनीस अपयशाकरता, पूर्ण जबाबदार धरले होते. आणि गंमत म्हणजे त्या दिवशी कोणत्याही चॅनेल ने कि थिओकोल जबाबदार आहे अथवा नाही अशी काहीच हिंट दिलेली नव्हती तरीही colelctive रीतीने परोक्ष या कंपनीवरती ठपका ठेवला गेला होता. थिओकोल was हेल्ड responsible & इट was unmistakable. पुढे ६ महिन्यांनी हे सिद्ध झाले कि थिओकोल कंपनीने जे सीलस बसविले होते ते थंड हवेत गारठून, काम करेनासे झाले आणि त्यामुळे जे गॅसेस leak आऊट व्हायला नको होते ते leak आऊट झाले. पण हे ६ महिन्याआधी स्टॉक मार्केट च्या माध्यमातून 'Collective wisdom' कसे काय हिंट केले, त्याचा उलगडा शास्त्रज्ञाना झालाच नाही.
.
कदाचित याचे उत्तर मॅथेमॅटिकल truism मध्ये सापडते. कोणत्याही वैविध्यपूर्ण गटाचे गुणधर्म पाहिले तर पुढील ४ मुद्दे महत्वाचे ठरतात -
(१) प्रत्येक व्यक्तीस काहीतरी माहिती असणे मग भलेही ती माहिती गट फीलींगवर आधारित असो, essentric असो पण ती काही एका वास्तवावरती आधारित असते.
(२) स्वतंत्रता म्हणजे प्रत्येकाचे मत हे स्वतंत्र असते कोणाचा पगडा नसावा.
(३) de -centralization म्हणजे प्रत्येकाला त्याच्या भवतालातून म्हणजे locally मिळालेली माहितीवर आधारित त्याचा अंदाज असावा
(४) aggregation म्हणजे प्रत्येकाने त्याला मिळालेल्या माहितीवरून काही एक सरासरी अंदाज बांधावा.
जरा एखादा गट वरील गुणधर्मयुक्त असेल तर त्याचे उत्तर परफेक्ट येते का? तर प्रत्येक अंदाजाला २ पैलू असतात - (१) माहिती (२) error (चूक), गट जरा स्वतंत्र असेल, बऱ्यापैकी मोठा असेल तर error एकमेकांना कॅन्सल आऊट करतात. आणि उरते फक्त माहिती.पण फक्त error कॅन्सल आऊट झाल्याने काही तंतोतंत उत्तर येणार नाही कारण उरलेल्या माहितीच्या दर्ज्यावर उत्तर अवलंबून असेल. उदाहरणार्थ - जरा लहान मुलांना स्टॉक मार्केट मध्ये खेळायला सोडला असता तर काही थिओकोल कंपनी चे stocks बुडाले नसते. तेव्हा गटाची तदनुषंगिक माहिती ही महत्वाची आहेच. पण आश्चर्य हे आहे की ही Collective concious / wisdom मध्ये ही तदनुषंगिक माहिती सापडते.
आणि परत एकदा, कदाचित हे तितकेसे आश्चर्यजनक नाहीच कारण आपण सारेजण उत्क्रान्त होत गेलेलो आहोत. आपण इतके लागलो याचे कारणच हे आहे कि आसपासच्या परिस्थितीचा आपण योग्य आणि अनुकूल असा अंदाज बांधू शकतो.
उदा - १०० लोकांना तुम्ही पाळण्याच्या स्पर्धेत पाठवलं. आणि त्यांच्या वेळेच्या आकड्यांची सरासरी घेतली तर ती नक्कीच कोण्या धावपटूंच्या वेळेशी बरोबरी करू शकणार नाही परंतु निर्णयक्षमतेच्या स्पर्धेत मात्र Collective wisdom तज्ञालाही मागे सारू शकेल.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, अमेरिकन पर्यावरणशास्त्रज्ञ विल्यम बीबे यांना एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. काय होती ती घटना तर, बीबे यांना दिसले कि गुयाना च्या जंगलामध्ये एका सैनिक मुंग्यांचा गट एका वर्तुळात एकामागे एका फिरत होता. या वर्तुळाचा परीघ होता १,२०० फूट. प्रत्येक मुंगीला ते वर्तुळ पूर्ण करण्याकरता अडीच तास लागत होते. या मुंग्या कमीत कमी २ दिवस वर्तुळाकार फिरत राहिल्या व अतिश्रमाने त्यातील बहुसंख्य मुंग्या या मृत्युमुखी पडल्या होत्या. बीबे यांनी जे पाहिले त्याला जीवशास्त्रज्ञांनी एका संज्ञा दिलेली आहे - 'circular mill ' जेव्हा कधी मुंग्या आपल्या वारुळाची वाट चुकतात, तेव्हा तेव्हा ही 'circular mill ' घटना घटते. जेव्हा एखादी मुंगी हरवते तेव्हा ती एका साधा नियम पाळते आणि तो म्हणजे - समोर दिसणार्या मुंगीच्या पाठोपाठ जाणे. आणि त्या वागणुकीतून हे 'circular mill ' तयार होते. पण हे वर्तुळ तुटूही शकते केव्हा तर काही मुंग्या जेव्हा स्वतंत्र बुद्धीने त्या वर्तुळापासून फारकत घेऊन, नवीन मार्ग चोखंदळत, नवीन वाटा शोधात परत वारुळापर्यंत पोचतात,तेव्हा हे 'circular mill ' वर्तुळ तुटते.
'Emergence ' या पुस्तकात स्टीवन जॉन्सन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, सहसा मुंग्याची वसाहत अत्यंत कार्यक्षम आणि पुरेशी स्वयंसिद्ध असते. कोणीही एका मुंगी ही वसाहत चालवता नसते कि कोणी एका मुंगी हुकूम देत नसते. आणि तरीही आपापल्या बुद्धीने अन्नप्राप्ती करता झगडत ही वसाहत अगदी निर्धोक, उत्तम रीतीने चालते. पण हेच जे कौशल्य वसाहत चालवण्याकरता वापरले जाते तेच कधीकधी 'circular mill ' निर्माण करते आणि असंख्य मुंग्या बळी पडतात.
आतापर्यंत लेखकाने कुठेही माणसाची तुलना मुंगीशी केलेली नाही. उलट माणूस हा स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेऊ शकतो हेच नेहमी प्रतिपादले आहे.अर्थात परंतु स्वातंत्र्य म्हणजे एकलकोंडेपणा नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे अन्य लोकांच्या प्रभावापासून स्वतः:चा पुरेसा बचाव करून घेऊन, ओरिजिनल विचार करण्याची क्षमता. एकदा आपण मेंढीकळप विचारधारेतून मुक्त असलो कि मुंग्यान्सारखे 'circular mill ' मध्ये आपण अडकून मारण्याची शक्यता अगदी नगण्य होते.
बैलाच्या किश्श्याचेच उदाहरण घेऊ. प्रत्येक स्पर्धकाने त्याला माहीत असलेल्या चुकीच्या अथवा बरोबर माहितीचा उपयोग करून घेऊन, स्वतंत्र मत दिलेले होते. ही जी त्याची स्वतः:ची अशी विश्लेषणात्मक म्हणा, intuitive म्हणा अथवा essentric माहिती होती ती अगदी त्याचा वैयक्तिक ठेवा माहिती होती जिला, economist म्हणतात 'Private इन्फॉर्मशन' जी त्याने त्याच्या परीने, प्रकृतीने, बुद्धीने जमवली होती, interprete केलेली माहिती होती.
निर्णय क्षमतेच्या , निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत, ही स्वतंत्रबुद्धी फार महत्वाची ठरवली गेलेली आहे. पहिले कारण म्हणजे प्रत्येक जण एकाच चूक करत राहात नाही. त्यामुळे संपूर्ण गटच एका चुकीमुळे पराभूत होण्याचे टळते. गटाचे विचारस्वातंत्र्य खच्ची करण्याचा पद्धतशीर राजमार्ग म्हणजे गटास एकमेकांच्या माहितीवरती अवलंबून राहावयास भाग पाडणे.
अर्थातच स्वातंत्र्य म्हणजे तार्किकता आणि अचूकता नव्हे. तुम्ही अतार्किक आणि चुकीचे विचारही स्वतंत्रबुद्धीने करू शकता, परंतु जोवर तुम्ही स्वतंत्र विचार करता तोवर गटाला तुमचा फायदाच होतो हे लक्षात घ्या.
अगदी हाच मुद्दा 'वेस्टर्न Liberalism ' चा पाया आहे. इकॉनॉमिस्ट यांचे हेच गृहीतक आहे कीं प्रत्येक व्यक्ती ही स्वतः:चा स्वार्थ साधू पहाटे आणि प्रत्येक व्यक्ती या स्वार्थाला पायाभूत असा स्वतंत्र विचार करू शकते. याला 'Methodical Individualism ' असेही दुसरे नाव आहे.
पण माणसांची केस किंचीत वेगळी आहे. आपण जरी स्वतंत्र बुद्धीचे असलो तरी आपण सामाजिक प्राणी आहोत. आपल्यावर आसपासच्या अन्य लोकांचा प्रभाव हा नाही म्हटले तरी पडतोच. हा प्रभाव टाळता येत नाही. पण लेखक इथे असे म्हणतो की जितके आपण अधिकाधिक अन्य लोकांच्या प्रभावाखाली येउ तितका आपल्या स्वतंत्रबुद्धीचा ऱ्हास होतो. We become individually smarter but collectively dumber. आणि मग असा प्रश्न उद्भवतो की अन्य लोकांशी संबंध ठेउनही आपण एक गट म्हणुन चाणाक्ष, हुषार कसे राहू शकतो?

हे पुस्तक 'Decision Making' अर्थात निर्णय प्रक्रिया या मुद्द्यालादेखील स्पर्श करत असल्याकारणाने, तदनुषंगिक काही उदाहरणे, व्याख्या यांचा उहापोह यात होतो. १९६८ मध्ये Stanley Milgram, Leonard Bickman आणि Lawrence Beckowitz या शास्त्रद्न्य त्रिकुटाने एक प्रयोग केला. त्यांनी एका माणसाला रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे केले व आकाशात ६० सेकंद पहावयास सांगीतले अर्थात झाले काय गर्दीच्या काही अंशी लोकांनी थांबुन वर पाहीले की काय हा माणुस पहातो आहे ब्वॉ. पण अन्य बहुसंख्य लोक वरती न पहाताच चालते झाले. दुसऱ्या वेळेस या शास्त्रद्न्य त्रिकुटाने ,५ लोकांना उभे केले. यावेळेस चौपट लोक तरी थांबुन आकाशात बघु लागले. तीसऱ्या वेळेस १५ लोक उभे केले. यावेळेस ४५% गर्दीने थांबून आकाशाकडे पाहिले. अशा रीतीने आकाशात पहाणाऱ्या लोकांची संख्या वाढवत गेले तसतसे बघे बवाढतच गेले. हे कशाचे उदाहरण म्हणता येइल तर 'कन्फर्मिटी' फक्त म्हणता येणार नाही कारण ना बघ्यांवरती पीअर प्रेशर होते ना आकाशात पहाण्याचा कसला दबाव होता. आणि तरीही लोक पहात होते. याचे कारण होते पुढील तत्व - जेव्हा कधी अनिश्चितता असते तेव्हा , अन्य लोक वागतील तसे वागण्यात शहाणपण असते.आपण आताच मागे पाहीले की गट हा नेहमी थोड्या लोकांपेक्षा अधिक हुषार असतो, स्मार्ट असतो. त्यामुळे गट जसा वागतो तसेच प्रत्येकाने वागणे हे शहाणपणाचे ठरतेच वादच नाही पण त्यातही मेख अशी की जितके अधिकाधिक लोक सारखे वागू लागतात तसतसा गट अधिकाधिक निष्प्रभावी होउ लागतो. हे थोडं परस्परविरोधी वाटेल पण ही fine balancing act च आहे. मग अशी 'मेंढीकळप' विचारसरणी आपल्याला अधिक सुरक्षितता देउ शकते का? तर उत्तर बऱ्याच अंशी होय असे येते कारण प्रत्येकाकडे अपुरी व्यक्तीगत माहीती असते. त्या माहीतिच्या आधारे निर्णय घेण्यात रिस्क असते याउलट गटामध्ये माहीती विभागलेली (de-centralized) असते. पण कळीचा शब्द आहे 'बऱ्याच अंशी' म्हणजेच नेहमीच नव्हे.
.
एक विशिष्ठ संज्ञा आहे - Information Cancade म्हणजे जेव्हा एकच निर्णय हा टप्प्याटप्प्याने घेतला जातो तेव्हा जर पहील्यांदा चूकीचा निर्णय झाला असेल अतर पुढील सर्व निर्णय चूकीचे ठरत जातात. उदा. - २ रेस्टॉरंटस आहे एक आहे भारतिय व एक आहे थाइ. भारतिय रेस्टॉरंट उत्तम आहे व थाइ बंडल आहे. टप्प्याटप्प्याने लोक कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाणार आहेत. अशावेळि प्रत्येकाकडे चूक किंवा बरोबर 'Private information' आहे तसेच प्रत्येकाला हे माहीत आहे की अन्य लोकांकडेही काही एक माहीती आहे. अशा वेळी पहिले काही लोक जर थाइ रेस्टॉरंटमध्ये गेले तर 'मेंढीकळप' विचारधारेस अनुसरुन बाकीचे लोकही त्याच रेस्टॉरंटमध्ये जातील आणि सर्वांचे निर्णय चुकतील.
.
लेखकाने 'Information cascade' विषद करण्यासाठी अनेक छान उदाहरणे दिलेली आहेत. सांगायचा मुद्दा हा की गटाचे नेहमी बरोबरच निघते असे नाही कधिकधी Information Cancade मुळे चुकीचा निर्णयहीहोउ शकतो.
पुस्तक विविध किचकट , सोप्या, रंजक प्रयोगांच्या माहीतीने, उदाहरणांनी परिपूर्ण आहे. रोचक वाटले.

Group content visibility: 
Use group defaults

लेख वरवरच वाचला (फॉर ऑबविअस रिझन्स), लेखाचे शीर्षक अयोग्य/चूक आहे.

Intelligence = बुद्धिमत्ता - जी परिस्थितीनुसार बदलत नाही आणि बुद्ध्यांकाने मोजता येऊ शकते.
wisdom = शहाणपण -- जे परिस्थितीतून येते आणि परिस्थितीनुसार त्याचा अर्थ बदलू शकतो.

जर पुस्तकात सुद्धा असे असेल तर, जो लेखक wisdom आणि Intelligence ह्या व्याख्या सोयीनुसार बदलतो/वापरतो, हायपोथिसिसला सपोर्ट करतील तेवढीच सोयीस्कर ऊदाहरणे निवडतो त्याचे पुस्तक किती गांभीर्याने आणि का वाचावे हा मोठाच प्रश्न मला पडेल.
स्टॉक मार्केट बद्द्ल लिहिलेले तर पूर्ण मिसरिप्रेझेंटेशन वाटले .. स्टॉक मार्केटच्या वागण्याला रिचर्ड थेलर सारख्यांनी बेहिविअरल फायनान्स अंतर्गत खोलात जाऊन ऊत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे... त्याचे एवढे सुलभीकरण Uhoh

विजडम = शहाणपण करेक्ट!! समाजपुरुषाचे शहाणपण म्हणता येइल.
रिचर्ड थेलर यांनी लिहीलेले पुस्तक वाचायला हवे. बिहेव्हिअरल सायन्स , कंझ्युमर बिहेव्हिअर हे आवडते विषय आहेत. फार वाचलेले नाहीत परंतु जेवढे वाचलेले आहे त्यावरुन आवडतात असे लक्षात आलेले आहे.
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
__________________
आमच्या गावच्या ग्रंथालयात - Nudge : improving decisions about health, wealth, and happiness Revised and expanded edition. हे पुस्तक दिसते आहे. वाचण्यात येइल.
__________________
Intelligence = बुद्धिमत्ता - जी परिस्थितीनुसार बदलत नाही - असे का म्हणता हाब? ग्रोथ माईंडसेट इज अबाउट एक्झॅक्ट अपोझिट आय बिलीव्ह.
बुद्धीमत्ता ही स्थिर नसते तर ती बदलू शकते, वाढू शकते यालाच मला वाटतं ग्रोथ माईंडसेट म्हणतात.

Intelligence = बुद्धिमत्ता - जी परिस्थितीनुसार बदलत नाही - असे का म्हणता हाब? >> बुद्धय़ांक (IQ) लिटर, मीटर सारखे एकक आहे ते एका माणसाचे एका वेळी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात कुठल्याही परिस्थितीत सारखेच मोजले जाईल. शहाणपण कसे मोजतात मला माहित नाही.

Magnus Carlsen विश्वनाथन आनंद बरोबर चेन्नईमध्ये खेळला काय किंवा ऑस्लो मध्ये, उन्हाळयात खेळला किंवा हिवाळ्यात तो आनंदला हरवणारच (अपवादाने दहा पैकी एखादा दुसरा गेम हरू शकेल).
पण
चेन्नई मधला सर्वात अनुभवी आणि यशस्वी शेतकरी ऑस्लो मध्ये जाऊन तिथल्या यशस्वी शेतकर्‍याशी उत्पन्नाच्या बाबतीत स्पर्धा करू शकेल का? नाही. कारण त्याचे शहाणपण, अनुभव चेन्नई मधल्या हवामान, माती इ. परिस्थितीबद्दलचे आहे.

Mindset = मानसिकता. त्याचा बुद्धिमत्ता आणि शहाणपण ह्याच्याशी सबंध नाही. बुद्धिमान माणसे आळशी, भित्र्या, प्रगतीशील, स्वप्नाळू अशा कुठल्याही मानसिकतेची असू शकतात.

समाजाचाही काही संबंध नाही... हे केवळ एका पेक्षा जास्त माणसांच्या समूहाच्या अनुषंगाने आहे... हे असे का होते ह्याची Basic statistics मध्ये अनेक उत्तरे मिळतील.

>>> बुद्धय़ांक (IQ) लिटर, मीटर सारखे एकक आहे ते एका माणसाचे एका वेळी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात कुठल्याही परिस्थितीत सारखेच मोजले जाईल. >>>> याचा अर्थ बुद्धीची वाढ होत नाही असे तुम्ही म्हणताय. 'ग्रोथ माईंडसेट',संकल्पनेमध्ये याच्या विरुद्ध मांडलेला आहे.
'आव्हाने स्वीकारणे', 'चिकाटी', 'संकटां कडे सकारात्मकपणे पहाण्याचा दृष्टीकोन' या सर्व बाबी , कौशल्ये वाढू शकतात ज्याला शास्त्रज्ञांनी 'इन्टेलिजन्स' म्हटलेले आहे. म्हणजे बुद्धी. तेव्हा बुद्ध्यंक वाढू शकतो.
>>>>> समाजाचाही काही संबंध नाही... हे केवळ एका पेक्षा जास्त माणसांच्या समूहाच्या अनुषंगाने आहे... हे असे का होते ह्याची Basic statistics मध्ये अनेक उत्तरे मिळतील.>>>>>>> हे मान्य. मी समाजाचा हा शब्द चूकीचा वापरला असेल, समूहाचा पाहीजे. धन्यवाद हाब. बदल केलेला आहे.

Galton याचे म्हणणे होते की जर सत्ता फार कमी संख्येने असणाऱ्या हुशार, बुद्धिमान आणि सर्वगुणसंपन्न, श्रेष्ठ अशा काही लोकांतच एकवटली तर अधिक उत्तम समाजनिर्मिती होईल. अर्थात बाकी सारे फडतूस, काही मूठभर लोकच निरोगी समाजाचे जनक.>> हे किती चुकीचे व भंपक आहे हे अने क वेळा सिद्ध झाले आहे. हे सो कॉल्ड हुशार बुद्धेमान श्रेष्ठ म्हणजे कोण? ब्राम्हण समुह? व्हाइट कॉकेशिअन लोकांचा समुह? रिपब्लिकन्स? कोण आहेत हे उच्च लोकांचे समुह?

आणि त्याच्या लक्षात आले होते कि बहुसंख्य लोकांमध्ये ते गुणधर्म नसतात. आणि त्याच्या प्रयोगाअंती त्याने हा निष्कर्ष काढलेला होता कि सरासरी व्यक्तीचा बुद्ध्यंक म्हणा किंवा समाज स्वास्थ्याकरता लागणारा कोशंट फार कमी असतो, > हे तर विचित्रच आहे. इतराना नगण्य व
मूरख समजणा र्‍या शास्त्रज्ञाचे म्हणणे सीरीअसले कसे घेउ शकतात? ह्याचा डाटा काय आहे. काय प्रश्न मालिका डिझाइन केली ज्यावरून हे सिद्ध झाले सँपल साइज काय? विदा पाहिजे.

उलट जनतेचा असा एक नेटिव्ह विजडम असतो. जो हे सो कॉल्ड मूठ भर लोक इग्नोअर करतात. व त्यांचे एकतर्फी निर्णय समुहांव र लादतात. सध्या हाँ ग काँग मध्ये जनतेला लोक्शाही हवी आहे. तर ते दडपत आहेत. तरूण लोकांना ब्रेक्झिट नको होती पण लादली गेली.
क्लायमेट चें ज विरोधात पण असाच सिनेरिओ आहे. जनतेचे म्हणनॅ ऐकूनच घेतले जात नाही.

याचा अर्थ बुद्धीची वाढ होत नाही असे तुम्ही म्हणताय. 'ग्रोथ माईंडसेट',संकल्पनेमध्ये याच्या विरुद्ध मांडलेला आहे.>> तुम्ही सगळी सरमिसळ करता आहात. एकक time स्थिर ठेऊन मोजतात आणि growth मोजण्यासाठी change in time अध्याहृत आहे. एका व्यक्तीचा IQ आज जगात कुठेही मोजला तरी तो सारखाच असेल, सरासरी IQ दहा वर्षांनी 3 पॉईंट वाढतो असे मानतात. दहा वर्षांनी Carlsen चा IQ अजून वाढू शकतो पण तेव्हाही तो जगाच्या पाठीवर कुठेही मोजला तरी सारखाच असेल.

ह्याबाबतीत लंडन cab drivers चे उदाहरण देता येईल. त्यांना license मिळवण्यासाठी 25000 रस्त्यांचे जाळे डोक्यात फिट करावे लागते. हा रस्त्यांचा अभ्यास करण्याआधी आणि नंतर त्यांची शॉर्ट टर्म memory आणि त्यातून fluid intelligence वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
Mindset चा संबंध नाही.

@हाब,
>>>>>>>> एकक time स्थिर ठेऊन मोजतात आणि growth मोजण्यासाठी change in time अध्याहृत आहे. एका व्यक्तीचा IQ आज जगात कुठेही मोजला तरी तो सारखाच असेल>>>>>>>>> स्थलातीत. कळलं.

>>>>>>>>> सरासरी IQ दहा वर्षांनी 3 पॉईंट वाढतो असे मानतात. दहा वर्षांनी Carlsen चा IQ अजून वाढू शकतो पण तेव्हाही तो जगाच्या पाठीवर कुठेही मोजला तरी सारखाच असेल.>>>>>>>>>>>> ह्म्म!! स्थलातित. पण काळानुसार वाढ होते

>>>>>>>>ह्याबाबतीत लंडन cab drivers चे उदाहरण देता येईल. त्यांना license मिळवण्यासाठी 25000 रस्त्यांचे जाळे डोक्यात फिट करावे लागते. हा रस्त्यांचा अभ्यास करण्याआधी आणि नंतर त्यांची शॉर्ट टर्म memory आणि त्यातून fluid intelligence वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.>>>>>>>>>>>>>>> हे उदाहरण माहीत नव्हते. आवडले.
_________________________________________

@अमा
>>>>>>>>>>>ह्याचा डाटा काय आहे. काय प्रश्न मालिका डिझाइन केली ज्यावरून हे सिद्ध झाले सँपल साइज काय? विदा पाहिजे.>>>>>>> हा डाटा त्या पुस्तकात दिलेला नाही. तो प्रयोग यात मांडलेला नाही.
>>>>>>>>इतराना नगण्य व मूरख समजणा र्‍या शास्त्रज्ञाचे म्हणणे सीरीअसले कसे घेउ शकतात? >>>>>>> एक रोचक संकल्पना म्हणुन मी ते पुस्तक वाचले.
>>>>>>उलट जनतेचा असा एक नेटिव्ह विजडम असतो. जो हे सो कॉल्ड मूठ भर लोक इग्नोअर करतात. व त्यांचे एकतर्फी निर्णय समुहांव र लादतात. सध्या हाँ ग काँग मध्ये जनतेला लोक्शाही हवी आहे. तर ते दडपत आहेत. तरूण लोकांना ब्रेक्झिट नको होती पण लादली गेली.
क्लायमेट चें ज विरोधात पण असाच सिनेरिओ आहे. जनतेचे म्हणनॅ ऐकूनच घेतले जात नाही.>>>>>> ह्म्म!! तू दिलेल्या उदाहरणांत तसे दिसते खरे.

शाळेत राष्ट्रगीत म्हणताना मला असाच अनुभव आला आहे. कुणाला एक कडवं माहित असतं तर दुसऱ्याला पुढचं पाठ असतं. शेकडो मुलांमध्ये आपसूकच पुर्ण राष्ट्रगीत म्हणून होते.

कौन बनेगा करोडपतीमध्ये बुद्ध्यांकाची आवश्यकता पडेल असे प्रश्न विचारतात का?
स्टॉक मार्केट बद्दल हाब ने वर लिहिलेच आहे.
समुहाच्या निर्णय क्षमतेबद्दल

@मानव - छान आहे तो लेख. त्या लेखात म्हटले आहे - की नक्की असा निष्कर्ष काढता येणार नाही.
.
बरेचदा ऑफिसमध्ये 'डायव्हर्र ग्रुप हवा/ डायव्हर्स टीम हवी' हे जे स्तोम माजविले जाते. स्तोम म्हणजे 'डिव्हर्सिटी' बद्दल कम्प्लायन्स ट्रेनिंग वगैरे घ्यावे लागते. I wonder ते कितपत अचूक असेल?
डिव्हर्सिटी (विविधता) मग ती जात/वंश/वर्ण/ कौशल्य/वय/ लैंगिक ओरिअंटेशन/ बुद्धीमत्ता सर्वच बाबतीत ..... अशा विविधतेचा फायदा असेलच असा निष्कर्ष काढता येत नाही. पण कॉमन सेन्स वापरला तर मात्र असे वाटते की विविधता ही उत्तम निर्णयक्षमतेस पूरक असावी.
अजुन बरेच आणि ठोस संशोधन व्हायला हवे बहुतेक.

ऑफिसची गोष्ट वेगळी आहे. तिथे डायव्हर्सिटी ठेवली तरी त्या त्या क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी गट निवडलेला असेल , अशा गटाच्या निर्णय क्षमतेची आणि रँडमली जमलेल्या/निवडलेल्या गटाच्या निर्णय क्षमतेची तुलना करणे योग्य ठरणार नाही.

My idea of a group decision is to look in the mirror.
- Warren Buffett

असं नाही मी काय म्हणते आहे - फक्त जाणकार/तज्ञ स्ट्रेट कॉकेशिअन लोकांचे ऑफिस.
व्हर्सेस
जाणकार तज्ञ कॉकेशिअन, हंगेरिअन्,आयरीश, पोलिश वगैरे वगैरे गे, लेस्बिअन. स्ट्रेट लोकांचे ऑफिस

यात फरक पडत असेल का? असो. या जर तर ला काहीच अर्थ नाही. आता यामध्ये अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात पाहू.

जर १०वी च्या ३ तुकड्या एका शाळेत असतील (अ, ब, क प्रतीप्रमाणे वर्गवारी) तर एकाच शिक्षकांनी शिकवून झाल्यावर एकाच प्रश्नपत्रिकेला उत्तर देताना त्या वर्गाला ९०, ७०, आणि ५० असे सरासरी गुण पडतील. हे वरील लेखातील तत्वात कसे बरे बसेल. कारण याचे उत्तर हे आहे की एखाद्या गोष्टीची अचूकता रँडम नसून त्यात वापरल्या जाणार्‍या प्रक्रियेबरोबर गुणवत्तेवरही अवलंबून असते.

केबीसीचे उदाहरण चूकच आहे. सामान्य जनतेला माहित असलेले प्रश्नच जनतेच्या मतासाठी टाकले जातात. त्यामुळे तेथील आकडेवारी या उदाहरणात गृहित धरता येणार नाही. याउलट. १८८० साली ब्राझिलचा परराष्ट्र मंत्री कोण होता या प्रश्नाला प्रत्येक उत्तराला सारखे मात्र पडतील. यात बरोबर उत्तराकडे बहुतांश जनता जाईल याची सूतराम शक्यता नाही. मग अशा उदाहरणात लेखातील पुस्तकात दिलेल्या सिद्धांताच काय?.

तरीपण पुस्तक वाचून बघीन. सध्या Everywhere Chaos वाचतोय.

विक्रमसिंह, सँपलसेट पुरेसा वैविध्यपूर्ण हवा. सगळे हुषार विद्यार्थी 'अ' तुकडीत, मध्यम हुषार 'ब' तुकडीत व कमी हुषार 'क' ...
हा वैविध्यपूर्ण सँपलसेट नाही.
__________
एव्ह्रीव्हेअर केयॉस, - काय विषय आहे? कसे वाटते आहे सो फार?

केबीसीचे उदाहरण चूकच आहे. >> ते अनेक पातळ्यांवर चूक आहे.
कारण केबीसी च्या प्रश्नांना ऊत्तरे येणे हे कुठल्याही बुद्धीमत्तेचे (ईंटेलिजन्स) प्रतीक नाही.... ती केवळ माहिती (जनरल नॉलेज) आहे.
ज्यात कुठलेही डिसिजन मेकिंग करावे लागत नाही... माहिती आहे किंवा नाहीये असा बुलिअन मामला आहे. म्हणूनच माहिती स्टोर केलेली मशीन्स ईंटेलिजंट नसतात.. ती प्रोसेस करून डिसिजन घेऊ शकणारी माणसे ईंटेलिजंट असतात.

वरती स्टॉक मार्केटचे ऊदाहरण पुस्तकाच्या लेखकाने दिले आहे ते सुद्धा किती पोकळ आहे ... वॉरन बफे हा एक माणूस (आणि त्याच्यासारखे काही डझनभर प्रज्ञावंत ईन्वेस्टर्स) स्टॉक मार्केटमध्ये ईन्वेस्ट करणार्‍या जगभरातल्या सगळ्या समुहांपेक्षा (ज्यात अनेक हेज फंड्स, ईन्वेस्टमेंट बँक्स, क्वांट ट्रेडर्स, लो लेटन्सी, हाय फ्रीक्वेन्सी ट्रेडिंगवाले असे एकसे एक बुद्धीमान लोकांचे समूह आहेत) कितीतरी अधिक यशस्वी आहे..
बफे सारखेच, सचिन, फेडरर, बोल्ट वर्षानुवर्षे समुहांपेक्षा आप्पपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. अशी अगणित ऊदाहरणे लेखकाचे हायपोथिसिस रिजेक्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. पण चेरी पिकिंग ऊदाहरणे घेऊन फॉल्स पॉझिटिव दाखवत रंजक काहीतरी लिहिणे हा पोटापुरती यशस्वी पुस्तकविक्री करण्याचा धंदाच आहे.

Sorry. Not Everywhere chaos. The name is Everyday Chaos by David Weinberger - Harward business press.
It's on effect of AI and Machine learning and possibilities..

पहिल प्रकरण एकदम gripping आहे.

म्हणूनच माहिती स्टोर केलेली मशीन्स ईंटेलिजंट नसतात.. ती प्रोसेस करून डिसिजन घेऊ शकणारी माणसे ईंटेलिजंट असतात.>>

हाब पण ए आय व मशिन मशिन लर्निंग मुळे ही कन्सेप्ट बदललेली आहे. (मी विषयांतर करतोय).

आता संगणक एखाद्या विषयाचे ज्ञान त्याला दिलेले नसताना केवळ साठवलेल्या माहिती वर आधारित अनुमान्/निर्णय/भाकितं याबद्दल मानवी इंटलिजन्स पेक्षा जास्त अचूक वेध घेऊ शकतो. यासाठी डीप पेशंट, अल्फा गो, केंब्रिज अ‍ॅनलिटिका ही उदाहरणे आहेत.
याचे कारण लाखो प्रकारच्या डेटा पॉइंट मधे दडलेले संबंध एकाच वेळी तपासून निर्णय घेणे मानवी मेंदूच्या पलिकडचे आहे .
काही बाबतीत ते संबंध आहेत अशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही असे संबंध ए आय मुळे उघडकीस आले आहेत. आणि हे सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या बुद्धीपलिकडे झाले आहे.

<< चेरी पिकिंग ऊदाहरणे घेऊन फॉल्स पॉझिटिव दाखवत रंजक काहीतरी लिहिणे हा पोटापुरती यशस्वी पुस्तकविक्री करण्याचा धंदाच आहे. >>
@हायझेनबर्ग - एकदम सहमत.
इच्छुकांनी How to Lie with Statistics हे पुस्तकसुद्धा वाचावे.