मायबोलीवर एखाद्याने लेख लिहिला की त्याच्या वरती जे प्रतिसाद येतात त्यात लेखक / लेखिकेच्या मताशी सहमत अथवा विरुद्ध असे दोन तट पडतात. जे विरुद्ध असतात त्यांची मतं वाचली किंवा प्रतिक्रिया पाहिली की अगदी जहाल ते मवाळ असे सर्व प्रकार दिसतात. काही जण असे लिहितात की वाचल्यावर " आली मोठी शहाणी / शहाणा" " काय समजतो/ समजते स्वतःला " " अक्कल नाही तर लिहिते/ लिहितो कशाला" असा सूर असावा प्रतिक्रिया देतांना असं वाटतं. समजूतदार वाचक असतात ते " बरं लिहिलंय पण हे असं नको होतं, " ठीक आहे पण असा बदल केला असता तर, " मी या वाक्याशी सहमत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे" वगैरे सौम्य भाषेत लिहितात.
जहाल मतं मांडणारे तो लेख बहुदा एकदाच वाचतात आणि लगेच प्रतिक्रिया लिहायला बसतात. मवाळ मतं मांडणारे बहुतेक तो लेख दोन तीनदा वाचून त्यावर चिंतन करून मगच मतं मांडत असावीत.
जहाल मतं मांडणारी लोकं बहुतेकदा वास्तविक जीवनात ही अशीच वागत असतात आणि, त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं! त्यांना पाहिलं कि माझी तळपायाची आग मस्तकात जाते! ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं! त्याने माझं खुप डोकं खाल्लंय! ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही. अशी वाक्यं उच्चारत असतात. अशा लोकांना मित्र कमीच असतात आणि संपूर्ण जग आपला शत्रू आहे अशी त्यांची धारणा असते. मनावर सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा पगडा जास्त असतो.अशी वाक्ये सतत बोलली कि ते विचार सुप्त मनात जमतात आणि त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर होतो. परिणामी उच्च रक्तदाब आणि हृदय विकार होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात. अशीच माणसे चिडचिड करतात आणि ती चिडचिड प्रतिसादातल्या लिखाणात ही झिरपते. अशा स्वभावामुळे लोकं यांच्यापासून दुरावतात. यांची बौद्धिक पातळीही जास्त वाढत नाही कारण यांना कोणाचेच ऐकून घ्यायचे नसते. आपणच खूप शहाणे, इतर सर्व मूर्ख आहेत अशी यांची समजूत असते. थोडक्यात अशा लोकांमध्ये जो स्पष्ट गुण ( दुर्गुण ) दिसतो तो म्हणजे अहंकार.
अशा अहंकारी लोकांकडे अधिकार आले आणि सत्ता आली की ते माजावर येतात. बहुतेकदा ऑफिसातले अहंकारी बॉस असतात ते कितीही काम केले तरी कौतुकाचे चार शब्द बोलत नाहीत. सतत कपाळावर आठया आणि कामात चुका काढून कधी मेमो, कधी वॉर्निंग लेटर, कधी नेमकं ऑफिस सुटायच्या वेळेला केबिनमध्ये बोलावून दिवस भरातल्या कामाचा उगीचच आढावा घेणे असा त्रास देतात. लोकं अशांचा कंटाळा येऊन नोकरी सोडतात. You don't leave jobs, you leave bosses. ही उक्ती अशी लोकं खरी ठरवतात.
लोकांना न दुखवता प्रतिक्रिया मांडणाऱ्या मंडळींचा मनोविकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला असतो. जाणीव, जागृती आणि अनुकंपा हे गुण ह्या लोकांमध्ये प्रकर्षाने जाणवतात. ह्या लोकांचे तत्वज्ञान दयाळू व्हा, मनात राग ठेऊ नका. कोणाचेही वाईट चिंतू नका. कारण मनातली नकारात्मकता शेवटी बूमरॅंग प्रमाणे आपल्यावरच उलटते आणि केवळ आपल्यावर नाही तर आपल्याशी संबंधीत असणाऱ्या आपल्या अगदी जवळच्या माणसांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो असा असतो. अध्यात्माचा अभ्यास न करता देखील अशा लोकांचा अध्यात्माकडे नैसर्गिक कल असतो आणि माणसात देव पहा अशी शिकवण उपजतच ह्यांच्याकडे असते. अशी माणसं जेंव्हा बॉस बनतात तेंव्हा हाताखालच्या माणसांनी गैरफायदा घेतला तरी चालेल पण सौजन्य सप्ताह वर्षभर पाळायचा आणि चालूच ठेवायचा अशी त्यांची भूमिका असते. आपली वैखरी शुद्ध ठेवायची. आणि समोरच्या व्यक्तीशी सौजन्याने वागून मगच जबाबदारी सोपवायची. ती व्यक्ती संवेदनशील असेल तर नीट समजून घ्यायची. आपण नकारात्मक भूमिकेत शिरलो कि नात्यातली सहजता हरवून जाते याचं त्यांना उपजत ज्ञान असतं. त्यांना राग येत नाही असे नाही पण राग आल्याक्षणी ते कागद घेतात आणि रागाचे सविस्तर कारण लिहून काढतात. मनातले सगळे भाव ओतून रिते करतात. कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवतात आणि नंतर फाडून टाकतात. कागद फाडताना ज्या माणसाबद्दल राग आहे त्याला क्षमा केली असं म्हणतात. अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकतात आणि क्रोधाची भावना नाहीशी करून हलकं वाटेल असं करतात.
अशी माणसे सकारात्मक विचारांच्या कार्यशाळेत कधीच जात नाहीत कारण त्यांना त्याची गरजच भासत नाही. जाणीव आणि अनुकंपा हे दोन गुण आपल्याला आज २४/७ आणि ३६५ दिवस अशा केविलवाण्या परिस्थितीत अभावानेच आढळतात. परंतु संवेदना बाळगायला काय हरकत आहे? काय बिघडतंय आपण समोरच्या व्यक्तीचा विचार केला तर? मला काय त्याचे असे विधान प्रत्येकाने केले तर आपल्या भोवताली बजबजपुरी माजेल म्हणून अशी लोकं जागरूक असतात.अशी लोकं जात्याच क्षमाशील असतात.
क्षमाशीलता हे औषध आहे. फुकट मिळतं. लोकांना माफ करून टाका. तुमची दुखणी पळून जातात. आपल्या कडे अधिकार येतात तेंव्हा सत्ताही येते आणि ती कशी वापरायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. कोणी सकारात्मक वापर करतो तर कोणी नकारात्मक. जगावर सूड उगवायचा कि त्याला प्रेमानं मिठीत घ्यायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लोकं दुखावली जाऊ नयेत हे पाहायलाच हवं. आपल्याला नात्यात हिशेबी असून चालत नाही. बदलत्या काळानुसार नात्यांचे परीघ बदलतात. विरलेल्या आणि विझलेल्या क्षणांचे ओझे झुगारून देण्यातच शहाणपणा आहे.
लेख आवडला.
लेख आवडला.
मात्र जिथे मिलिटरी खाक्याच लागतो तिथे
मेषचलढवय्येच हवे. तिथे नेहमीचे संयत, बॅलन्स्ड यशस्वी कलाकार उपयोगाचे नाहीत. उदा - माझे जे बॉस खमके होते त्यांच्याकडूनच मी मॅक्झिमम शिकले.जेवणात तिखट नसले तर काहीतरी कमी आहे कमी आहे वाटतच ना!
@ सामो
@ सामो
होय. खरं आहे. अशी तिखट व्यक्ती बॉस आहे तो पर्यंत ठीक. पण अशी तिखटजाळ व्यक्ती आपला नवरा/ आपली बायको असेल तर मात्र काय काय शिकणार? ती आणि तो क्षमाशील आणि प्रेमळ नसतील तर लिंग युद्धाला सुरुवातच . ( battle of sexes ) परिणाम एकतर विभक्ती किंवा विवाहबाह्य संबंध. म्हणजे आयुष्य डागाळलेल्या अवस्थेत. मनाची शांती ढळलेली. मुलं असतील तर त्यांची अवस्था ना घरका न घाटका. सेकंडहॅण्ड जीवन. काय उपयोग अशा तिखटाचं...
तिखट स्वैपाकघरातच ठीक आहे. तिखटानं बेडरूम मध्ये प्रवेश केला की कायमचं युरीनरी इन्फेक्शन ठरलेलं.
बाकी तुमचा प्रत्येक लेख मी वाचत असतो. उगीच कौतुक करायचा माझा स्वभाव नाही. तुम्ही खूप छान लिहिता. तुमचा व्यासंग दांडगा आहे आणि अभ्यास ही. अनेक विषय हाताळता. बरंच काही शिकायला मिळतं. पाश्चात्य संगीताबद्दल तुमचा ऐसी अक्षरे इथला लेख वाचला. कानसेन तर आहातच पण तानसेन सुद्धा असाल असं वाटतंय. असो. खूप धन्यवाद.