दिवाळी अंक २०१९

Submitted by रंगासेठ on 17 October, 2019 - 05:49

यंदाच्या दिवाळी साठीच्या दिवाळी अंकासाठी धागा दिसला नाही अजून, म्हणून हा धागा काढतोय. इथे यावर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा करुयात.
नुकतीच बुकगंगा वर चक्कर टाकली तर मोजकेच अंक उपलब्ध आहेत, हळूहळू होतील. मागील वर्षी थोडा उशीरच झाल मला अंक घ्यायला, त्यामुळे काही अंक राहिलेच वाचायचे. निदान यावर्षी तरी ते चुकता कामा नयेत म्हणून हा प्रयत्न.

अक्षरगंध, लोकमत, कालनिर्णय, हंस, नवल, मोहिनी हे आहेत उपलब्ध.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>ऑनलाइन दिवाळी अंकांची पण नावे सांगा ना (साईट्सची)>>>
https://www.misalpav.com/node/45460
मिपाचा दिवाळी अंकही चांगला आहे, कथा कमी आहेत पण लेख छान आहेत.
बिपीन भाऊंची कथा पण आहे त्यात.

अक्षरलिपीतले रिपोर्ताज छान आहेत. जमलं तर वाचा. मुशाफिरी चा अंक जवळपास वाचून सम्पला. तोही छान आहे. त्यात आपल्या दिनेशदांचा लेख आहे समरकंद वर.

>>लोकमतचा दिवाळी अंक कसा आहे? लोकसत्ताचा अंक अजून आला नाही वाटतं.

लोकमत माझा अजून वाचून व्हायचाय. झाला की इथे लिहिते. गेली 2-3 वर्षं नेमाने घेतेय. अंकाने एकही वर्ष निराशा केली नाहिये आजवर. लोकसत्ता अंक आज मिळाला मला.

Chioo.. माहितीपूर्ण लेख ल निसर्ग ह्या दोन्ही categoriesसाठी 'भवताल' (संपादक - अभिजीत घोरपडे) वाचा.
पण online वाचायची सोय नाहीये.ते कुरियर करतात.
ह्याच नावाने त्यांचं फेसबुक पेजही आहे.

>>माहितीपूर्ण लेख ल निसर्ग ह्या दोन्ही categoriesसाठी 'भवताल' (संपादक - अभिजीत घोरपडे) वाचा.

अगदी बरोबर. हाही अंक गेली काही वर्षं घेतेय. केवळ जागा नाही म्हणून संग्रहात ठेवता येत नाही. Sad लहान मुलांसाठीच्या निसर्ग अंकाबद्दल विचारलं होतं त्यामुळे हे नाव सुचवलं नाही कारण मुलांचा वयोगट माहित नसल्याने ह्यातले लेख कितपत सूट होतील ह्याची कल्पना आली नाही.

बरोबर स्वप्ना. सगळ्या लहान मुलांना आवडेल का नाही सांगता येत नाही.
पण आमच्या घरातील दोन्ही लहान मुलं (५वी व ७वीतील) हे मासिक आवडीने वाचतात.

लोकसत्त्तात धर्मभास्कर बद्दल आलंय. जालियनवाला बाग, राजा हरिसिंग, ग्रीसवरिल हिंदू संस्कृतीचा प्रभाव, बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या वेळचा एका विंग कमांडरचा अनुभव ह्या विषयांवर लेख आहेत असं दिसतं. पृष्ठं २१४, किंमत ९०. तसंच दुसरा अंक साप्ताहिक कोकण मिडिया. ह्यात सामवेदी, मालवणी, संगमेश्वरी, कोकणी, बालकोटी ह्या बोलीभाषातल्या कथा आहेत. पृष्ठं ८२, किंमत १२५.

मी हे अंक वाचले नाहीत. पण इथे निरनिराळ्या अंकावर चर्चा चालू आहे म्हणून लिहिलं.

या वर्षी २०१९ च्या दिवाळीमध्ये आवाज, धनंजय, सामना, कथाश्री आणि झपूर्झा (कोकण मराठी साहित्य परिषदेचा दिवाळी अंक) या अंकांमध्ये माझ्या(निलेश मालवणकर) कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. वाचा आणि अभिप्राय नक्की कळवा.
१. आवाज : एका मराठी सुपरहिरोची खुसखुशीत कथा
२. धनंजय : एक रहस्यमय वेगवान पोलीस तपास कथा (Murder Mystery).
३. झपूर्झा : परग्रहावर गेलेल्या भारतीयांची विज्ञान कथा. मजेशीर योगायोग म्हणजे मी पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कथेत विक्रम नावाचं एक पात्र आहे. (आठवा : विक्रम लँडर ,चांद्रयान )
४. सामना : लग्न जमत नसल्याने बेजार होऊन बाबा-बुवांकडे जाणाऱ्या तरुणाची हलकीफुलकी तरीही हृदयस्पर्शी कथा
५..कथाश्री : एक सामाजिक कथा

दीपावली अंकाबद्दल लिहिलेला मोठा प्रतिसाद विजेने क्षणभर विश्रांती घेतल्याने उडाला.
पुन्हा लिहीन. तूर्तास - अंक छान आहे. लोकसत्तेत स्थलांतर या विषयावर परिसंवाद / लेख आहेत. विश्वनाथन आनंदवरचा लेखही आवडलाय.

यावर्षी मी खालील ११ दिवाळी अंकांत कथा लिहल्या आहेत. शक्य झाल्यास जरूर वाचा.

१)धनंजय :वज्रपेच ( गूढ कथा ) वज्रबाहुच्या नगरीवर होणार आहे सैतानी शत्रूचं आक्रमण, त्याला वाचवायचा आहे आपल्या प्रिय पत्नीचा प्राण. ताक्ष नावाच्या मायाव्याची मदत घेऊन हा पेच सोडवता येईल का ?

२)हंस : टिचल्या बांगडयांचं घर ( सामाजिक ) शाहिद सैनिकाच्या धीरोदात्त पत्नीच्या मनात सुरू असलेल्या युद्धाची कथा.

३)देशोन्नती : नाते जन्मांतरीचे ( सामाजिक ) लहान भाऊ व त्याच्या छोटुशा बहिणीची कथा. बहिणीला दत्तक घेतलेलं आहे हे कळाल्यामुळे भावाच्या बालमनात पडलेली अढी त्यांची आई कशी सोडवते याची हळुवार कहाणी.

४)पिंगळावेळ : डोह ( भयगूढ ) तीन मित्र मासेमारी करायला जातात पण बोट बिघडल्यामुळे रात्री एका शापित डोहात अडकतात. अख्खी रात्र काढायची असते त्यांना तिथे. काळ्याशार निगुढ डोहाप्रमाणे वाचकांनाही आत आत खेचत नेणारी कथा.

५)नवलकथा : दृष्टी ( भयगूढ ) चष्मा डोळ्यांवर नसला की तिला भुतं दिसतात. एक दिवस अपघाताने भररस्त्यात तिचा चष्मा खाली पडतो व फुटतो. ते सगळीकडे आहेत, त्यांना कळालंय की एक मनुष्य आपल्याला बघू शकतो. आत्म्यांच्या विश्वात मानवी हस्तक्षेप त्यांना अजिबात सहन होणार नाही.

६)झपूर्झा ( कोकण मराठी साहित्य मंडळ ) : भ्रम ( विज्ञानकथा )
वाघांना वाचवण्यासाठी सरकारने विज्ञानाचा आधार घेतला, पण प्रशासनाचा कारभार गलथान असल्यावर फायदा होईल का? वाघ कमी झालेत... जंगलातले अन् माणसातले.

७) पासवर्ड : बिबट्या आला रे आला ( बालकथा ) जंगलानजीक असलेल्या गावात शिरलाय बिबट्या. सगळ्यांची टरकली आहे. त्याच गावातील दोन लहान मुलांचा मित्र आहे बिबट्याचं पिल्लू. तिघांनी मिळून केलेली धमाल म्हणजेच 'बिबट्या आला रे आला'

८)दिवाळी आवाज ( संपादक : मगदूम ) उलट पुलट प्रेम ( विनोदी )
ती महिला मुक्तीवाद्यांची लीडर, तो छिछोरा आशिक, आणि आधीच अवघड प्रेमकहाणीत फूट पाडण्याचा प्रयत्न करणारा टीकोजी टवणे.

९) हसवंती जत्रा : प्रेम, लफडं, प्रकरण ( विनोदी )
तुमची आमची सर्वांची प्रातिनिधिक प्रेमकहाणी. आधी प्रेम होतं, लोक त्याला लफडयाचं नाव देतात, शेवटी ते आयुष्यातील प्रकरण बनून राहतं.

१०) सुभाषित : मी गायब झालो ( विनोदी ) 'त्याच्या बायकोचा नवरा' ही पुरुषांची आवडती मालिका पाहून मला प्रेरणा मिळाली गायब होण्याची, सगळं सुरळीत होणारच होतं, पण नात्यात नेता घुसल्यावर जांगळबुत्ता तर होणारच.

११) गोवन वार्ता : बंध ( सामाजिक ) नात्यांचे बंध अतूट असतात

#########

दीपावलीतल्या तीन कथा वाचल्या. गांधीवादाचा केमिकल लोचा . गेल्या वर्षभरातल्या आणि त्याही आधीच्या काही घटना, प्रवाद , दावे प्रतिदावे घेऊन या कथेची मांडणी केली आहे. पात्रे व्यक्ती नसून प्रवृत्ती वाटतात. शेवट विशफुल थिंकिंग वाटला.

गणेश मतकरींची कथा आवडली.
मरे एक त्याचा या कथे चं कथानक आयटी कंपनीत घडतं. त्याबाबतीतले बारकावे किती र टिपलेत ते संबंधित क्षेत्रातल्या लो कांकडून ऐकायला आवडेल. या कथेत पात्रांना नावं दिलेली नाहीत. त्यांचे हुद्दे, त्यानुसार जॉब प्रोफाइल, हीच त्यांची व्यक्तिमत्त्व.

मिलिंद बोकील यांनी त्यांच्या आईबद्दल लि हिलेला लेख आवडला. हा लेख एका मुलाने आईबद्दल लिहिण्यापेक्षा समाज शास्त्राच्या अभ्यासकाने, एका विचारकाने एका स्त्रीबद्दल लिहिलाय.

पार्ल्यातला प्रार्थना समाज रोड तेवढा माहीत होता. त्या समाजाबद्दल आपल्याला काहीच कसं माहीत नव्हतं किंवा करून घ्यावंसं वाटलं नाही, अशी खंत कालाय तस्मै नमः हा ले ख वाचताना वाटली. महाराष्ट्राच्या जडणघडणनावं, महत्त्वाच्या घटनांमधील कितीतरी महत्त्वाची नावं प्रार्थना समा जाशी संबंधित आहेत किंवा प्रार्थना समाजींचे वंशज आहेत.

फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियाही दुसर्‍या स्त्रीकडे एक व्यक्ती नव्हे तर वस्तू म्हणून पाहतात, अशा संशोधनावर सुबोध जावडेकर यांचा ओलेतीचे रहस्य आणि (काही ) स्त्रीवाद्यांची अडचण हा लेख संपला आहे. वाटेत अगदी वेगवेगळी स्टेशनं घेतली आहेत. पण कुठेही असं बद्ध गोष्टींची मोळी बांधलीय असं वाटत नाही.
शरद व र्दे यांचा ले ख वाचायला सुरुवात केली आणि अमेरिके वर आणखी एक लेख म्हणून सोडून देणार होतो. या लेखात त्यांनी मध्ये अमेरिकेतून आलेल्या इल्लिगल इमिग्रंटसवर लिहिलं नाट्यमय, कौटुंबिक ढब देऊन लिहिलं आहे.

सदा शिव पेठेत शेरलॉक होम्स हे हृषीकेश गुप्तेंच्या आगामी कादंबरीतलं प्रकरण आहे, हे वाचून संपल्यावर कळलं. भाषेचा डौल, रहस्य फुलवणं दोन्ही आवडलं. ही कादंबरी येईल तेव्हा वाचणं आलं.

अस्वस्थतेचे पडघम या लेखमा लेतले लेख वरवर वाचले. माझ्यासाठी त्यांत नवीन फार काही नाही.

अंकातल्या बहुतेक कविता आवडल्या . व्यंग्यचित्रे आवडली नाहीत.

धन्यवाद विनय!
निलेश, अभिनंदन!

विनय, तुझे ही अभिनंदन!!

मुशाफिरी चा अंक जवळपास वाचून सम्पला. तोही छान आहे. त्यात आपल्या दिनेशदांचा लेख आहे समरकंद वर.
>>>
मुशाफिरीत यावेळी ९ मायबोलीकरांचे लेख आहेत.
आशीष महाबळ - स्टॉकहोम
मोहना जोगळेकर - जॉर्डन-इस्त्राइल
कामिनी केंभावी - आर्मेनिया
दिनेश शिंदे - समरकंद
प्रकाश काळेल - मेघालय
आशुतोष आकेरकर - भिगवण
शैलजा रेगे - चोपता ट्रेक
माधव मुंडल्ये - नर्मदा
प्रीति छत्रे - उत्तर युरोप

चिऊ,
मुलांचे माहितीपूर्ण लेख, निसर्ग, गंमत - यासाठी 'पासवर्ड' दिवाळी अंकही चांगला असतो.

बुकगंगावर पीडीएफ स्वरूपात विकत घेता येतो.

शरद व र्दे यांचा ले ख वाचायला सुरुवात केली आणि अमेरिके वर आणखी एक लेख म्हणून सोडून देणार होतो. या लेखात त्यांनी मध्ये अमेरिकेतून आलेल्या इल्लिगल इमिग्रंटसवर लिहिलं नाट्यमय, कौटुंबिक ढब देऊन लिहिलं आहे. >>>>>>>> मला आवडतात शरद व र्देचे लेख वाचायला. मिश्कील आणि हलकेफुलके असतात.

ललिता, ह्या माबोकरांचे आय डी पण सांगा ना इथले
>>>

आशीष महाबळ (अस्चिग) - स्टॉकहोम
मोहना जोगळेकर (मोहना) - जॉर्डन-इस्त्राइल
कामिनी केंभावी (श्यामली) - आर्मेनिया
दिनेश शिंदे (दिनेश.) - समरकंद
प्रकाश काळेल (प्रकाश काळेल) - मेघालय
आशुतोष आकेरकर (आशुतोष०७११) - भिगवण
शैलजा रेगे (शैलजा) - चोपता ट्रेक
माधव मुंडल्ये (माधव) - नर्मदा
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति) - उत्तर युरोप

काही आयडी आता बदललेले असू शकतात. मला माहिती असलेले दिले आहेत.

धन्यवाद विनय , विनिता !!
<<< आशीष महाबळ (अस्चिग) - स्टॉकहोम
मोहना जोगळेकर (मोहना) - जॉर्डन-इस्त्राइल
कामिनी केंभावी (श्यामली) - आर्मेनिया
दिनेश शिंदे (दिनेश.) - समरकंद
प्रकाश काळेल (प्रकाश काळेल) - मेघालय
आशुतोष आकेरकर (आशुतोष०७११) - भिगवण
शैलजा रेगे (शैलजा) - चोपता ट्रेक
माधव मुंडल्ये (माधव) - नर्मदा
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति) - उत्तर युरोप >>
मुशाफिरीत झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन !!

विनय याही वर्षी दिवाळी धमाका. अभिनंदन !!
विनिता अभिनंदन !!

मी खालील दिवाळी अंक विकत घेतले :

१. मौज : पहिला मान अर्थातच "मौज"चा. यावर्षी विनया जंगले मिसिंग आहेत. एलकुंचवारांचा ललित लेख अजून वाचला नाही. कारण, नंतर पुरवून पुरवून वाचायला काहीतरी हवं. मिलिंद बोकीलांचा त्यांच्या वडलांविषयीचा लेख आवडला. संतुलित म्हणता येणार नाही पण लेख खूप संयत, तटस्थ आणि प्रवाही आहे. गेली काही वर्ष अश्विन पुंडलिक नेमाने मौजसाठी लिहितो आहे. कालिदासाच्या रघुवंशाचं रसग्रहण करत रामप्रवासाच्या भूगोलावर अश्विनने उत्तम लेखन केलं आहे. मौजच्या काही वर्षांतल्या साच्यात अश्विन फिट्ट बसला आहे. ज्याप्रमाणे मायबोलीवरचे चिनूक्स यांनी खाण्यावर कितीही आणि काहीही लिहिलं तरी ते वाचनीयच असतं अशी बेअर मिनिमम खात्री देता येईल, त्याचप्रमाणे अश्विनचं आहे.
यावर्षी विजय पाडळकरांनी सत्यजित रेंना धरलं आहे. तीन चार अंकांत त्यांचे सत्यजित रेंवरचे लेख आहेत. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा की सत्यजित रेंवरती ते पुस्तक काढणार आहेत, त्यातली एकेक प्रकरणं त्यांनी विविध अंकांना पाठवून दिली आहेत. वयाच्या एका टप्प्यावर पाडळकर आवडत होते तरी आता त्यांची "घे सिनेमा काढ पिळून" छाप समीक्षा आवडत नाही. म्हणून मी वेळ मिळाल्यास हे लेख वाचणार आहे.
श्रीरंग भागवत हे शेफ आता मौज दिवाळीचे गो-टू लेखक झालेले आहेत. त्यांचा लेख अजून वाचला नाही. मृत्योर्मा ही प्रणव सखदेवची कथा वाचली. कथा वाचनीय आहे. युवाल नोवा हरारींची पुस्तकं वाचून त्यातली एखादी कल्पना-भविष्यवाणी ढापून आधुनिक(मॉडर्न) कथा लिहिता येते. त्यामुळं ही कथा परप्रकाशी आहे. विशेष काही नाही. असल्या आधुनिक कथेला वा वा म्हणण्याची प्रथा आहे. असल्या कथा वाचण्याऐवजी सरळ होमो डेअस वाचावे. अनिल अवचट, नरेंद्र चपळगावकर, आशा बगे हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत. त्यांना पास.
मौजचा कविता विभाग निर्विवादपणे श्रेष्ठ असतो.

२. हंस : दुसरा मान नेहमी प्रमाणेच हंसचा. नवीन नावांना आवर्जून स्थान देण्याची हंसची परंपरा आहे. पंकज कुरुलकर हे नाव हंस मध्ये सातत्याने दिसतं. त्यांची दीर्घकथा "निर्णय" त्यांचं आत्मकथन असावी अशी आहे. कांड्याकरकोचा ही सचिन गिरी यांची दीर्घकथा यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट कथांमधली एक म्हणावी लागेल. लैंगिकता, वंशसातत्य, परंपरा, मिथकं आणि मंगोलियातून हिमालय ओलांडून महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांसोबत विलक्षणरित्या गुंफलेले कथेतील पात्रांच्या काळाचे आणि घटनांचे तुकडे. माणसांचे स्थलांतरण, परिस्थितीचे स्थित्यंतर, सर्वांवर प्रभाव टाकणाऱ्या मुलभूत जैविक प्रेरणा अशा अनेक गोष्टींना स्पर्शून उत्कर्षबिंदू गाठणारी ही कथा मस्ट रीड.

आशिष महाबळ यांची "कारटीची कथा" अशी एक विज्ञानकथा आहे ती अजून वाचली नाही. विजय पाडळकर रेंना घेऊन इथं आहेतच. विनय खंडागळे या तरूण मायबोलीकराची "टिचल्या बांगड्यांचं घर" ही कथा वाचली. अनपेक्षित ट्विस्ट असलेली ही कथा एका तरूण शहीदपत्नीच्या आयुष्यातला एक दिवस अनेक तपशीलांनी त्याने अचूक चितारला आहे.

३. मुक्त शब्द : तिसरा मान मुक्त शब्दचा. मौजचा खरा उत्तराधिकारी. मला सगळ्यात जास्त आवडलेला लेख म्हणजे मेघना भुस्कुटे यांचा "अस्तित्त्वाच्या जिथून पडल्या गाठी" हा लेख. अस्तित्त्ववादी कादंबऱ्या लिहिणाऱ्यांच्या लिंगभावावर अनोखा प्रकाश टाकणारा लेख. अस्तित्त्ववादी नायक आणि त्यांचे टिपीकल टॅन्ट्रम्स मेघना यांनी अचूक पकडले आहेत. अस्तित्त्ववाद आणि स्त्रीवाद या दोघांच्या सांध्यावर खंबीरपणे उभी राहिलेल्या नातिचरामी ह्या मेघना पेठे कृत कादंबरीची अनोखी अनौपचारिक समीक्षा केली आहे. अतिशय वाचनीय लेख.

प्रशान्त बागड यांच्या आगामी "नवल" कादंबरीतला एक अंश "मानवी पुरवणी त्याला ठार आवडत नाही" हा वाचला. बागड हे वाक्य न् वाक्य कोरुन लिहितात. त्यांच्या कथा अस्तित्त्ववादी म्हणता येतील अशा आहेत. ही कादंबरी देखील कोसलाएस्क वाटते. पण बागड यांच्या लेखनाची खरी गम्मत त्यांची काही विलक्षण काव्यात्म वाक्ये. उदा.(तो) कुणा भावनेच्या ओटीपोटात निस्तरत राहतो. त्याला भाबडे अंतरे आणि अंतराय सुचत जातात. चपलेला घाम येतो तितकाच तो किदरतो. किंवा - पुढे गेल्यावर तो पिंपळाच्या सळसळीतला 'ळ' ऐकतो.

सतीश तांब्यांची "जातो माघारी बद्रीनाथ ताजमहाल फाट्यावर" ही कथा वाचली. बद्री नावाच्या पानवाल्याची भन्नाट कथा. ह्या पानवाल्याचं नशीब पालटताना त्याच्या मनातल्या उंची लोकांचं आयुष्य आणि त्याला मिळणाऱ्या आर्थिक समृद्धीतून बदलत जाणारं त्याचं आयुष्य सतत पडताळलं जातं. एकुणच मजा आली ही कथा वाचताना.
सखदेव यांची "ट्रोलभट्टाचं शेवटचं आख्यान" ही नेहमीप्रमाणं आधुनिक व्ह्यायला जाऊन गंडते. असो.
मनस्विनी लता रवींद्र यांच्या कादंबरीतला एक अंश आहे. हे मी चाळलंय फक्त. आत्ता कादंबऱ्यांमध्ये सलग पत्रांची (किंवा डायऱ्यांची) डिवायसेस वापरणाऱ्यांना धाडसी म्हंटलं पाहिजे. पण पूर्वग्रह टाळून वाचायला हवंय. त्यामुळे पास. बाकी अंक अजूनही वाचतोच आहे.

Pages