गुर्जींची आणि माझी अशीच ओळख झाली. फार दुर्गम नसला तरी आदिवासी भाग होता तो. गुर्जी सुध्दा आदिवासी समाजातील व्यक्ती होते. नोकरी निमित्त त्यांच्या गावाला नेहमीच जाणं होत असे. कायम सायकलवर दिसत. शर्ट पायजमा पेहेराव आणि हातात सायकल. समोर आले की तोंड भरून हसणार. बोलणं इतकं मधाळ आणि मायेने भरलेले की गुर्जी फार जवळचे वाटत.
आपुलकीने चौकशी करणार, घरी जेवायला नेणार. नागलीची भाकरी, पोळी, पापडाची चटणी, असेल ती भाजी आणि दाळ भात. माझा डबा तसाच शिल्लक राही. गुर्जींच्या घरचे सुध्दा आनंदाने स्वागत करीत. दोन्ही मुले आणि सुना खूप मनमिळाऊ होत्या. गुरुजींच्या पत्नी सुध्दा तोंड भरून बोलायच्या. दोन्ही मुलगे शेतीच करत होते. एक मुलगी होती, तिचे लग्न होऊन सासरी गेली होती. ती फक्त शिकून प्राथमिक शाळेवर शिक्षिका होती.
गुर्जी रिटायर होऊन साताठ वर्षे झाली होती. नोकरी मध्ये असताना त्यांनी शेतजमीन विकत घेतली होती. त्या शेतीमध्ये सोसायटीचं कर्ज काढून द्राक्ष बाग लावला होता. सोसायटीच्या कर्जातला मोठ्या रकमेतून अवाढव्य आकाराचे घर बांधले. द्राक्ष बाग लावला पण मग मशागतीसाठी पैसा अपुरा पडू लागला. लागोपाठ चार पाच वर्षे मेहनत करून देखील तोटाच होत होता. गुर्जी, मुले, सुना, नातवंडे सगळेच शेतीत राबत होते. नातेवाईकांकडून दरवर्षी भांडवल आणायचं आणि बाग विकला की त्यांचे पैसे परत करायचं हे दुष्टचक्र चालूच होते. गुर्जींचे बरेच नातेवाईक डॉक्टर, सरकारी अधिकारी, नोकरदार होते. तेही मदत करीत पण पैसा शिल्लक पडत नव्हता. बॅंकेचे कर्ज भरणं देखील कठिण होत चालले होते. मार्च एन्डला इकडून तिकडून पैसे आणून कर्ज भरायचं आणि परत कर्ज काढून देणेकऱ्यांचं देणं मिटवायचं. बॅंकेच्या वसुली पथकाची भेट देऊन घरात मौल्यवान वस्तू आहेत का याचा शोध घेत. मळ्याकडं कोणती चारचाकी गाडी येताना दिसली की यांना धडकीच भरायची. आदिवासी भाग असल्याने शेती चांगल्या किंमतीत विकली जाणं अवघड होते.
दिवसेंदिवस कर्जाची रक्कम वाढतच गेली. घरचे आता गुर्जींमागे लागले की गुर्जींना मिळणारी पेन्शन ची जी काही तुटपुंजी रक्कम होती ती कर्ज फेडण्यासाठी द्यावी. पण गुर्जी या गोष्टीला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की विकत घेतलेली जमीन परत विकून टाकू. मुलं जमीन विकायची नाही या मताचे होते.
दरम्यान माझी दुसरीकडे बदली झाली. फोनवर अधुनमधून बोलणं होई कारण या कुटुंबाबरोबर भावनिक बंध जुळले होते. नंतर समजलं की गुर्जी घर सोडून निघून गेले. दुसऱ्या गावाला रहात होते. मुलांचीही भांडणं होऊन ते विभक्त झाले. गुर्जींच्या मुलीनं गुर्जींची बाजू घेतली म्हणून तिला माहेरी येणं बंद केले. तिनं जमिनीत हिस्सा मिळावा म्हणून दावा दाखल केला. भावा बहिणींचं भांडण होऊन हाणामारी पर्यंत गोष्टी पुढे गेल्या. एकमेकांवर पोलिसात फिर्यादी केल्या.
मध्ये केंद्र सरकारची कर्जमाफी येऊन गेली पण जमीन पाच एकरापेक्षा जास्त असल्याने कर्जमाफीचा फायदा झाला नाही. गुर्जी या सगळ्या प्रकारामुळे फार वैतागून गेले होते. ते परत गावाला येऊन भाड्याच्या खोलीत राहू लागले. वयही झाले होते. गुर्जी पत्नीला आपल्याबरोबर चल म्हणत होते. पण ती माऊली मी मेले तरी मुलांजवळच मरेन पण कुठे जाणार नाही असं म्हणाली.
गावातल्या लोकांनी अजूनच गुर्जींना मानसिक ताण दिला, आता गुर्जी जवळजवळ भ्रमिष्ट झाले. सर्व नातलग असुनही वाट चुकलेल्या जनावरासारखं एकटं पडले होते. मुलांना सुध्दा दया येत होती पण गुर्जी घराकडे परतत नव्हते. एका चांगल्या कुटुंबाचा हा प्रवास पाहून मलाच निराश, हताश वाटत होते.
गुर्जी
Submitted by सोमा वाटाणे on 4 October, 2019 - 03:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगलं लिहलंय.
चांगलं लिहलंय.
> तिनं जमिनीत हिस्सा मिळावा म्हणून दावा दाखल केला. > हे कसं केल? गुर्जींची स्वार्जीत जमीन आहे ना?
काही वडिलोपार्जित पण होती. हे
काही वडिलोपार्जित पण होती. हे सांगायचे राहिले होते. प्रतिसादासाठी धन्यवाद अॅमी जी.
मलाही आवडली ही कथा.
मलाही आवडली ही कथा.
धन्यवाद सामो जी.
धन्यवाद सामो जी.