त्याचा येळकोट राहीना.

Submitted by कृपाचार्य on 30 September, 2019 - 18:50

एके दिवशी एक दारुडा यथेच्छ दारु पिऊन, गटारात लोळून आपल्या घरी आला आणि त्याला एक नविनच शोध लागला. आज तो ज्या रस्त्याने घरी आला तो रहदारीने भरलेला रस्ता चक्क सुनसान झाला होता. त्याने रुबाबात शर्टची कॉलर सरळ केली आणि बायकोने वाढलेला शिळा भात तिच्या शिव्यांसोबत खाल्ला. आता दारुडा रोजच मनसोक्त पिऊन, गटारात लोळून त्या रस्त्याने जाऊ लागला. त्याला पाहून रस्ता बदलणाऱ्या लोकांना पाहून शेफारु लागला. एखाद्या दिसणाऱ्या पादचाऱ्यावर स्वतःच्या अंगावरील गटारातली घाण उडवायला लागला. दिवस चालले होते, दारुड्याचा माज वाढत होता. एक दिवस मस्तीत झुलत जात असताना त्याने समोरुन एक माणूस येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटले. सगळे रस्ता सोडून गायब झाले असताना हा कोण शहाणा माझ्या मार्गात चालत येत आहे? दारुड्याला संताप अनावर झाला. त्याने रागातच समोरच्या माणसाच्या अंगावर गटारातली घाण फेकायचा प्रयत्न केला आणि काही कळायच्या आतच त्याच्या पार्श्वभागावर सणसणीत लाथ बसली. अधोभागात असलेली अवयवद्वयी उर्ध्वभागाकडे गतीमान होऊन कपाळात स्थिर झाली. पार्श्वभागातून निघालेली वेदना मेंदूत शिरुन डोळ्यात प्रगटली. दारुड्याने भितीने समोरच्या व्यक्तीकडे पाहीले. समोरची व्यक्ती दारुड्याच्या तोंडावर थुंकत अर्वाच्य भाषेत म्हणाली “अरे चिकारभोट माणसा, शहरातली गटारे साफ करताना तुझ्यासारखे पन्नास दारुड्यांनाही मी रोज साफ करतो. उठ आणि काळं कर येथून. यावेळी फक्त कपाळातच घातल्यात पुन्हा दिसलास या रस्त्यावर तर त्यानेच गोट्या खेळेन. निघ” दारुड्याने दोन्ही हाताने ओटीपोट दाबून धरले आणि कमरेत वाकत तो कसाबसा घराकडे निघाला. मागून त्याला त्या व्यक्तिचा आवाज आला “मुर्खा ज्याला तू तुझी दहशत समजतोस, दरारा समजतोस ती दहशत नाही तर लोकांना वाटणारी तुझ्याविषयीची किळस आहे, दरारा नाही ती घृणा आहे. बायको मुठभर भातासोबत पसाभर शिव्या वाढते त्यावरुनही तुला समजत नाही?” दारुड्या खजील होऊन घरी आला. दोन दिवस दारुच्या गुत्त्याकडे फिरकला नाही. गटारात लोळला नाही. रस्त्याच्या दिशेने गेला नाही. आणि - - -

तिसऱ्या दिवशी रस्त्याच्या नाक्यावर गटारात लोळलेला दारुड्या मस्तीत उभा राहून रस्ता मोकळा व्हायची वाट पहाताना पुन्हा दिसला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> दहशत नाही तर लोकांना वाटणारी तुझ्याविषयीची किळस आहे, दरारा नाही ती घृणा आहे. > हम्म. ट्रोलांबद्दल रूपककथा आहे का ही?