वाघोबा मंदिर बांधतात

Submitted by टोच्या on 23 September, 2019 - 03:28

वाघोबा मंदिर बांधतात

हिंदूस्थानच्या कुठल्याशा एका राज्यात निबिड जंगल होतं. परंपरेने वाघ तिथला राजा होता. वानरं, माकडं, हरीण, काळवीट, गेंडे, गायी म्हशी, रानगवे, बिबटे, गाढवं, लांडगे, कोल्हे, कुत्रे तसेच मोर, पोपट, चिमण्या, कावळे यांच्यासह नाना प्रकारचे पक्षी येथील नागरिक होते. पण, यात सर्वाधिक संख्या वानर, माकडांची होती. वानरं पिढ्या न पिढ्या रामभक्त होती. त्यामुळे वानरांची तरुण पिढी जंगलात राम मंदिर व्हावं यासाठी आग्रही होती. जंगलात इतर सुविधा मिळो न मिळो, पण राम मंदिर असावंच, अशी त्यांची आग्रही मागणी होती. याबाबत वाघोबाला अनेक निवेदनंही प्राप्त झाली होती. निवडून यायचं तर तरुण मतदारांची मते मिळणं आवश्यक होतं. तरुण वानरांसाठी राम मंदिर हा भावनिक मुद्दा आहे, हे चाणाक्ष वाघोबाने ओळखले होते. म्हणून मग वाघोबाने जंगलात राम मंदिर उभारायचे ठरवले.
एके दिवशी वाघोबाने मंदिर उभारण्याचा चंगच बांधला. त्याने जंगलातील दगड विटा गोळा केल्या आणि त्या रचण्याचा प्रयत्न करू लागला. पण, एक वीट रचली की दुसरी पडून जायची. अनेकदा असं झालं. वाघोबाची ही कसरत जंगलातील प्राणी बघत होते. आसपास झाडाला लटकलेली तरुण वानरं मंदिर होतंय म्हणून खूश होती, तर अनुभवी वानरं हे सगळं पाहून मनातल्या मनात हसत होती. पुन्हा एक वीट खाली पडली आणि एक वृद्ध वानर ही फजिती पाहून फिदीफिदी हसले.
वाघोबा- (रागाने डरकाळी फोडत) कोण आहे रे तिकडे? आणि माझ्यावर हसण्याची हिंमत कशी झाली? जीवाची पर्वा नाही वाटतं तुला?
वृद्ध वानर नम्रपणे समोर येत...
'क्षमा असावी महाराज. पण राम मंदिराचं आपण फारच मनावर घेतलेलं दिसतंय! '
वाघोबा- हो मग. खूप झाल्या भूलथापा. आता राम मंदिर होणार म्हणजे होणार. आणि ते आम्हीच बांधणार...'
वानर- पण राममंदिर बांधायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे माहिती आहे का तुम्हाला? नुसत्या दगड विटा रचून राम मंदिर होईल असं वाटतं का तुम्हाला?
वाघोबा- हो मग, त्यात काय अवघड आहे?
वानर- 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असं संतांनी सांगून ठेवलं असलं तरी तसे वागणारे फार कमी असतात, महाराज. नाहीतर, 'गरजेल तो पडेल काय' ही म्हण उगाच नसती पडली. अनेकांच्या कथनीत आणि करणीत महदंतर असतं!
वाघोबा- खामोश! मी राजा आहे इथला. 'वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा!'
वानर- हो... पण ती माकडेच तुम्हाला राजसत्तेवर ठेवायचं की नाही, हे ठरवणार आहेत. तेव्हा जरा जपून...
वाघोबा- (जरा नरमाईने) बरं... बरं...
वाघोबा पुन्हा विटा रचू लागतो. पण पुन्हा त्या ढासळू लागतात. तितक्यात त्याला आठवते की वानरांच्या पूर्वजांनी प्रभू रामचंद्रांसाठी समुद्रावर सेतू बांधला होता. त्यांच्याकडून माहिती मिळेल या अपेक्षेने वाघाने त्या वानराला जवळ बोलावले आणि म्हणाला, 'अरे, तुमच्या पूर्वजांनी तर प्रभू रामासाठी सेतू बांधला होता ना! मग, त्यावेळी दगड जागेवर कसे राहिले?'
वानर - महाराज, त्या प्रत्येक दगडात 'राम' होता. हनुमंताने प्रत्येक दगडावर राम नाम लिहिले होते. आणि महत्वाचे म्हणजे आमचे पूर्वज अगदी निःस्वार्थ भावनेने सेतू बांधत होते. कुठलीही अपेक्षा नव्हती. संपूर्ण सेवाभाव. समर्पण. आणि 'राम' नामावर आजवर किती तरले, मग निर्जीव दगड नाही तरले तरच नवल!
वाघोबा- मग या दगडावर रामनाम लिहिलं तर ते जागेवर राहतील?
वानर - महाराज, खरंतर दगडावर रामनाम लिहिणं हे तर निमित्त होतं. तो सेतू तरल्याचं खरं कारण वेगळंच होतं...
वाघोबा- काय ते?
वानर - महाराज, आमच्या पूर्वजांमध्ये नल-नील नावाचे तरुण, निष्णात वास्तुविशारद तर होतेच, शिवाय हनुमंत, जांबुवंत, महाराज सुग्रीव यांच्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शकही होते. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद, या सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि वानरांच्या एकीतून हा 'प्रोजेक्ट रामसेतू' यशस्वी झाला. पण, तुम्ही तर एकटेच निघालात मंदिर बांधायला. सीनियर लोकांना तुम्ही स्टेजपुरतंच मर्यादीत ठेवलंय... आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट....
वाघोबा- आणि काय आता?
वानर- महाराज, तुम्ही कधी हनुमानाचा फोटो पाहिलाय?
वाघोबा - हो मग, आमच्या ऑफिसात लावलाय...
वानर - महाराज, जरा फोटो बारकाईने बघा. हनुमंताच्या म्हणजेच आमच्या पूर्वजांच्या हृदयात राम होता. तुमच्या फक्त मुखी राम आहे. प्रत्यक्ष मंदिर बांधाल की न बांधाल, पण आधी मनात त्याचे मंदिर बांधा. मनमंदिरात त्याला स्थान द्या. मग दगड विटांच्या मंदिरासाठी भांडायची गरज पडणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो मुखी शिवराय आहेत. शिवराय , श्रीराम या नावावर दुकान चाललंय आजवर. पण पुढचं सांगता येणार नाही.

मी मधुरा, <लिखाण आवडलं. पण आशय नाही.> हा लेख गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लिहिला होता जेव्हा उद्धव ठाकरे भाजपला विरोध करीत होते आणि मंदिर बांधणारच म्हणत अयोद्धेला गेले होते. त्यामुळे आशय त्यावेळी रिलेट होणारा आहे.
मानव पृथ्वीकर, रश्मी प्रतिसादाबद्दल धन्यवाद

अमर ९९ <नाही हो मुखी शिवराय आहेत. शिवराय , श्रीराम या नावावर दुकान चाललंय आजवर. पण पुढचं सांगता येणार नाही.>
उद्धव ठाकरेंनी तेव्हा राम मंदिर आम्हीच बांधू असा चंग बांधला होता. त्यावर लिहिलंय

ओके, टोच्या. Happy पण मला वाटते की त्यांच्या आधीच्या पिढीपासूनच त्यांचा पक्ष राममंदिराकरता झटत होता. आणि त्यात कोणतेही राजकारण नव्हते. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि तुझे लिखाण खूप छान आहे. अभ्यासपूर्ण आणि हसवणारी लिखाणशैली आहे.

एकदा पप्पूवर पण एखादा लेख येऊ दे! Happy

<< उद्धव ठाकरे भाजपला विरोध करीत होते >> गोष्ट जंगलाची, वाघाची, इतर प्राण्यांची, माकडांची आहे. उद्धव ठाकरे आणि भाजप कुठुन आली?

<पण मला वाटते की त्यांच्या आधीच्या पिढीपासूनच त्यांचा पक्ष राममंदिराकरता झटत होता. आणि त्यात कोणतेही राजकारण नव्हते. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि तुझे लिखाण खूप छान आहे. अभ्यासपूर्ण आणि हसवणारी लिखाणशैली आहे.>
मी मधुरा, मंदिराबाबत बाळासाहेब ठाकरे आग्रही होते. त्यांचे कट्टर हिंदुत्व सर्वांना माहिती होते. त्यांच्या कोणत्याच भूमिकेत आडपडदा नव्हता. पण ते गेल्यानंतर मंदिर हा मुद्दा मतांपुरता मर्यादित राहिला आहे, मग भाजप असो की शिवसेना. या मुद्द्याची तीव्रता कमी झाली आहे.

शरद, हे पॉलिटिकल सटायर आहे.

मस्त जमलाय.

वाघोबा ज्या अरण्यात राहत होते त्या अरण्यातील बाकी प्राणी सुद्धा मोठे बिलंदर आणि चतुर होते .
त्या मुळे कधी कधी वाघोबा च शिकार बनत .
त्या मुळे बाघोबा दुसऱ्या अरण्याचा शोधात निघाले आणि त्यांना ते सापडले सुद्धा .
आणि दुसऱ्या अरण्यात प्रवेश करण्यासाठी एक विधी करण्याची गरज होती तो त्यांनी केला .
बघुया वाघोबा ना तिथे प्रवेश मिळतो का ते

धन्यवाद अॅमी, राजेश १८८, प्राचीन
राजेश, वाघोबा तेथे प्रवेश करण्यासाठी मांजर बनलेत सध्या