२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .
३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
नमस्कार! मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तिला लिहिलेलं पत्र. ह्यामध्ये असलेले विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असतील व तसेच अनुभवही आले असतील म्हणून आपण सर्वांसोबत शेअर करत आहे. धन्यवाद!
दि. १७ सप्टेंबर २०१९
प्रिय अदू, लाडू, मनीमाऊ, सोनपापडी, टमडी इ. इ.!
आज तुझा पाचवा वाढदिवस! आजचा दिवस खरंच स्पेशल! तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीसुद्धा. तू तर यादीच करून ठेवली आहेस की, मला पाचव्या वाढदिवसाला हे हे गिफ्ट घ्यायचं, सहाव्याला हे, सातव्याला हे हे! आजच्या सोहळ्याबरोबरच गेल्या वर्षभरातील आठवणी स्मृतीरूपाने पुन: जगण्याचाही हा दिवस. तेव्हा गेल्या वर्षभरातील अनेक आठवणी परत एकदा डोळ्यांपुढे आणतो आहे. एक गोष्ट राहून राहून लक्षात येते. ती म्हणजे प्रत्येक वेळेस तुझी टिकून असलेली प्रसन्नता. अनेक वेळेस तुला मनासारखं करता येत नाही; तुला हवं तसं होत नाही. थोडा वेळ तू त्रागा करतेस, पण दुस-या मिनिटाला परत हसत चेकाळत खेळत असतेस. तुला जे हवं ते नसेल तर तुझ्याकडे पर्याय तयार असतात! तुझ्या मनात इतकी प्रसन्नता आहे की, कोणतंच कारण किंवा निमित्त तुला हसण्यापासून रोखू शकत नाही. आणि इतक्या प्रसन्नतेबरोबरच तुझ्यामध्ये तितकी ऊर्जा, तितकी कल्पकता आणि तितकी कल्पनाशक्तीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर तूच पर्याय शोधून काढतेस. मागच्या वर्षी मी काही दिवस सायकलिंगमुळे तुझ्यापासून दूर गेलो होतो. जाताना तुला वाईट वाटत होतं, पण तू मला अजिबात अडवलं नाहीस. फोनवरही तू आजीला विचारत होतीस, निरंजन तुझ्याकडे आलाय का? पण तुझी तक्रार नव्हती. नंतर जेव्हा मी तुला सांगितलं की, मी अनेक मुलांना भेटायला गेलो होतो, तेव्हा तू मला इतकंच म्हणालीस, मी होते ना तुझ्याशी खेळायला, मग का गेलास तू!
तुला सांगितलेली समुद्राची गोष्ट! ती तुला इतकी जास्त आवडली की, जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलीस तेव्हा अनेक दिवस तू मला सलग चार वेळेस वन्स मोअर करून ती सांगायला लावत होतीस! ती गोष्ट तू इतकी एंजॉय करतेस की, इथे सांगायचा मोह आवरत नाही. तुला समुद्र आवडतो, तसा मलाही आवडतो. लहान असताना मला वाटलं समुद्र घरी घेऊन यावा. म्हणून देवगडला चिनूकाकाकडे गेलो असताना घरातली एक बाटली घेतली. नंतर समुद्रावर खेळायला गेलो. खेळता खेळता समुद्र बाटलीत भरून घेतला आणि घरी आलो. नंतर समुद्र घेऊन परभणीला आलो. आता त्या समुद्राला ठेवायचं तरी कुठे? बाहेर ठेवलं तर धक्का लागून सांडून जाईल ना. म्हणून मी समुद्राला फ्रीजमध्ये ठेवलं. जेव्हा मला समुद्र बघायचा होता, तेव्हा मी फ्रीज उघडून बघत होतो. पण एकदा काय झालं, निखिलकाका आला! त्याला लागली होती तहान. त्याने धाडकन फ्रिज उघडला. त्याला माझीच बाटली सापडली! त्याने झाकण काढलं. बाटली वर केली. आणि गट गट पाणी प्यायला. आणि आक थू! छी छी! हे काय खारट आहे? हे काय ठेवलं! असं तो म्हणाला आणि त्याने माझा समुद्र सांडून दिला! ही गोष्ट सांगताना तुझ्या चेह-यावरचे भाव आणि आनंद ही एक वेगळी अनुभूती आहे! आणि मग मला तू समजावतेस आणि म्हणतेस, तुझा समुद्र सांडून गेला, तरी मी माझे शंख- शिंपले तुला देईन ना! ही गोष्ट किंवा माकडांनी डुकरांवर उड्या मारल्या ती गोष्ट! अशा अनेक गोष्टी! आता तर तू खूप छान वाचायला आणि लिहायला लागली आहेस. म्हणून मी ह्या वर्षात तुला रोज एक गोष्ट किंवा गाणं लिहून देणार आहे. आणि तुझ्या अशा सगळ्या परीकथा आता लवकरच तू वाचूही शकशील!
गेल्या वर्षातली आणखी एक अविस्मरणीय आणि अखंड आठवण म्हणजे तू माझं रनिंग बघायला मुंबईला आली होतीस तो प्रसंग! आई- बाबा आणि आई व तू! तुम्ही चीअर अप करतानाचं ते चित्र माझ्यासाठी नेहमी लाईव्ह आहे. गंमत म्हणजे त्याच वेळी तू समुद्रावरही गेलीस आणि तूसुद्धा समुद्र भरून घेतलास! फरक इतकाच की वाळू रूपातला समुद्र तू तुझ्या बुटात भरून घेतलास! आणि नंतर बहुतेक समुद्राच्या पिल्लाची समुद्रासोबत ताटातूट नको असं तुला वाटलं आणि तू परत तो सोडून दिलास! समुद्र सोडून दिला तरी डोंगर तू घरी नेतेसच. डोंगरातले अनेक दगड तू घरी आणतेसच! आणि असाच ढीग तुझ्या बाहुल्यांचा आहे! एकदा तर तू त्यांची परेड उभी केली होतीस आणि म्हणत होतीस नऊ, दहा, अकला, बाला, तेला! प्रत्येक बाहुलीचं नाव व पात्र वेगळंच! तुझ्यासाठी तेसुद्धा अगदी खरे सोबती! तुझं त्यांच्यासोबतचं किंवा तुझ्यासोबतचं स्वगत बघणं हीसुद्धा सुंदर अनुभूती! स्वत:शीच बोलताना तू वेगळीच गाणी गुणगुणतेस किंवा तेव्हा तुला खूप जुनं काही तरी आठवतं! एकदा खेळता खेळता स्वत:शीच बोलताना मी ऐकलं आहे- ‘हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलो आहे तुमचा आवडीचा कार्यक्रम...’
तुझ्या स्मरणशक्तीचे तर अनेक किस्से आहेत. कधी तरी काही महिन्यांपूर्वी खेळताना तुला कुत्र्याचं भुंकणं असलेलं गाणं म्हणून 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान' ऐकवलं होतं. त्यानंतर अनेक महिने होऊन गेले. आणि मग एक दिवस तू म्हणतेस, ते गाणं लाव ना कुत्र्यासारख्या भुंकण्याचं! किंवा त्या दिवशी मला सांगत होतीस, अरे ती मुलगी तुला आवडते ना ती. मी विचारतो कोणती मुलगी? तू म्हणतेस अरे ती सोनी टीव्हीवर येते आणि नाच करते. मी म्हणतो कोण मुलगी? मग तू म्हणतेस अरे ती मुलगी, तुला आवडते! ती सोनी टीव्हीवर नाचते ती. गूगल कर ना! मग मी विचार करतो तुला हे आत्ताच कसं आठवलं? आत्ता कुठलं तरी गाणं लागलं होतं का? मग मला क्ल्यू मिळतो. मी तुला विचारतो तुला अलका याज्ञिक म्हणायचं आहे का? मग तू एकदम हो म्हणतेस! मग मी तुला सांगतो की, ती तर गायिका आहे. तू मला समजावतेस की, ती सोनी टीव्हीवर येते आणि तिथे नाचते! मग मला कळतं! तुला अशा अनेक बारीक गोष्टी बरोबर लक्षात राहतात!
आणि तीच गोष्ट तुझ्या व्यवस्थितपणाची आहे! हा व्यवस्थितपणा किंवा नेमकेपणा स्त्रियांना जन्मजातच मिळत असावा बहुतेक! त्याबाबतीत माझं एक हायपोथेसिस आहे. पुरुषांना जितकं नेमकेपणाचं भान आणि जाणीव वेळेची असते (अमुक वाजून अमुक मिनिटांनी हे हे होणार आहे); तितकीच नेमकेपणाची जाणीव स्त्रियांना स्पेसची असते (कुठे काय काय नेमकं कसं ठेवलंय). त्यामुळे तुझे सर्व टेडी, बाहुल्या, बाकी प्राणी, अभ्यासाच्या वस्तु, कलर्स, क्ले, वही, दप्तर हे कुठे आहे हे तुला सतत माहिती असतं. किंबहुना कधी कधी तर माझ्या वस्तुही कुठे आहेत हे तू सांगू शकतेस! ती शिस्त आणि नीटनेटकेपणा तुझ्यामध्ये फार आहे. त्यात किंचितही फेरफार तुला खपत नाही! तुझी शिस्त खरंच खूप वेगळी आहे! इतकी की, शाळेचा गृहपाठ तू स्वत:हून करतेस. आणि तो होत नसेल तर तुलाच ते आवडत नाही. स्वत:हून तो तू पूर्ण करतेस. आणि तीच गोष्ट तुझी वेळेच्या बाबतीत आहे. तू रात्री उशीरा झोपली आहेस आणि सकाळी उशीरा उठलीस असं होतंच नाही! वेळेची शिस्त पक्की अगदी. आता बघता बघता तुला बाराखडी तर येतेच; पण बरेच कठीण शब्दही लिहिता वाचता येत आहेत! तुला त्यामध्ये गतीही आहे आणि आवडही आहे! आणि चित्रकलेचीही खूप गोडी आहे. त्यामुळेच तू दोन दोन तासांच्या चित्रकला वर्गामध्ये बसू शकलीस. तिथला होमवर्कही करू शकलीस. तुझी चित्रं आणि तुझं हस्ताक्षर बघितलं की, लगेच कळतं की तुझ्या बोटांमध्ये जादू आहे!
लहान मुलांचं मन किती सरळ असतं; किती निर्मळ आणि अखंड असतं, ह्याचे अनेक अनुभव तू नेहमी देतेस! एकदा मी तुला सांगितलं, उद्या पहाटे उठून आपण फिरायला जाऊ. सकाळी साडेपाचला उठू आणि जाऊ. तर तुला बरोबर पहाटे जाग येते! मी उशीरा उठतो पण तू स्वत: उठलेली असते! गेल्या वर्षातली आणखी एक मोठी आठवण म्हणजे आपण दोघं परभणीत पंधरा दिवस राहून केलेली मजा! पहिल्यांदाच तुला आईपासून दूर अनेक दिवसांसाठी घेऊन गेलो. तुला आईची सतत आठवण येत होती, पण तू तरीही आनंदी राहिलीस. परभणीतली तुझी बहीण जुई तुला भेटली. नंतर स्वानंदसोबतही तू खेळलीस. आणि आपण स्वानंदकडून घरी आलो तेव्हा काय विलक्षण दृश्य होतं! तू कडेवर मस्ती करत होतीस म्हणून मी तुला आडवं उचलून आणत होतो. दारात आलो तेव्हा दोघंही दचकलो! अंगणात आणि गच्चीवर माकडंच माकडं होती! समोर गेलो तर भिंतीवर माकडानी उडी घेतली! टप टप माकडं गच्चीतून भिंतीवर व अंगणात आदळत होती! तुला तेव्हा अक्षरश: माकडांची लॉटरीच लागली! आणि आपण मॉर्निंग वॉकला फिरायला गेलो होतो तेव्हा अगदी जवळून झुकझुकगाडी बघितली होती! आणि नंतर तिकडेच फिरताना तू एकदम जोरात चिरकलीस! कारण अगदी बाजूलाच तुला माकडाचं पिल्लू दिसलं होतं! आपण ते १५ दिवस तुफान मस्ती केली! रात्री तू माझ्या अंगावर पाय ठेवून झोपायचीस. आणि मी उठलो की बरोबर उठायचीस. तुला आईची आठवण येत होती; पण तू हट्ट करत नव्हतीस. एकदा मात्र झोपेत तू बोललीस की, मला आईकडे जायचंय, मामाकडे जायचंय. मग परत शांत झोपलीस! अनेक वेळेस जेव्हा आई दौ-यावर जातेस, तेव्हा तुला ते नको असतं. पण एकदा जायचं आहे हे कळालं की तू शांत राहतेस. पण नंतर मग 'एकटी एकटी घाबरलीस का' गाणं लागल्यावर हमसून हमसून रडतेस!
तुझ्या अंगात इतकं चैतन्य सळसळतं, इतकी ऊर्जा खेळत असते ना की बस्स. त्यामुळे जरी तुला एखादी गोष्ट आवडत नसेल, तरी जर तुला तुझं मन रमेल असा खेळ दिला की तू त्यात रमून जातेस. मग तक्रार करत नाहीस. आणि अनेकदा तर असा खेळ किंवा उद्योग तू स्वत:च शोधून काढतेस. बाहुलीचे कपडे शिवत बसतेस. किंवा चित्र काढून रंग देत बसतेस. अगदी काल परवाची गोष्ट म्हणजे तू चक्क कागदाचे तुकडे कापलेस. तेही एकसारखे चौकोनी. तूच कात्रीने कापलेस. नंतर तूच ते असे स्टेपल केलेस की अगदी पुस्तक वाटावं! असं तू तुझ्या बाहुल्यांसाठी (म्हणजे पिंकी, अन्वी किंवा साक्षी अशांसाठी) पुस्तकच बनवलंस! असे तुझे उद्योग सतत सुरू असतात.
तू माझे तर नेहमीच लाड करतेस. मस्ती करतेस. पण कधी कधी मला तुला घाबरावंही लागतं! मस्ती करताना तू मला नेहमीच हरवतेस. तुझ्याकडे अशी शस्त्र आहेत की माझं काहीच चालत नाही. मी तुला जबरदस्तीने कडेवर पकडून धरलं तर तुझ्याकडे तीन शस्त्र असतात. एक म्हणजे डास आणि चिमटे. ते लगेच मला चावतात. नंतर लगेच तुझे दात तुझ्या मदतीला येतात! आणि जर मी माझ्या हातांनी तुझा हल्ला रोखला तर तू कानाशी येऊन "कुर्र" करतेस! मग मात्र मला तुला खाली ठेवावंच लागतं किंवा प्रार्थना करावी लागते की, देवी, मनीमाऊच्या रूपात या ना! मग तू मनीमाऊ होते आणि म्याऊ म्याऊ करून माया करतेस! कधी कधी तू इतका नाटकीपणा करतेस की तुझं एक नाव नौटंकीसुद्धा आहे! अगदी क्षणात हमसून हमसून रडल्याची नक्कल करतेस! मग मीच तुला सांगतो, अदू खरंच वाटत नाहीय! असं रड की सगळे जण घाबरत येतील! मग तू हसत हसत रडतेस! किंवा कधी फोनवर बोलताना मध्ये अदू बोलते आणि नंतर बाहुली किंवा मनीमाऊ बोलते! नौटंकी असली तरी हवीहवीशी वाटते ही नौटंकी!
तुझ्या बोलण्याबद्दलही खूप काही बोलण्यासारखं आहे! मला हाक मारण्याची तुझी खास स्टाईल, ‘निरंजन!’ एकदम हुकमी, दम देणारा आणि दरारा असलेला आवाज! किंवा कधी कधी चिरकणं, ओरडणं, खिदळणं! जेव्हा तुझा मूड असतो; तेव्हा तू स्वत:हून गाणंही मस्त म्हणतेस! पण मूड असेल तेव्हाच. आणि तुझी आवडीची गोष्ट तू इतक्या वेळा ऐकतेस की तुला ती पाठ होऊन जाते! आणि अशीच कधी तरी स्वगतातून तू ती सांगायला लागतेस! तुला चिंकू व पिंकू उंदरांची गोष्ट खूप आवडली! मग एकदा खेळता खेळता तूच ती सुरू केलीस. आणि गोष्ट सांगताना ऐकलेल्या गोष्टीप्रमाणेच आवाजातले उतार- चढाव, यमक, रिकाम्या जागा, सूर आणि भाव आणलेस! किंवा तू सांगितलेली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक गोष्ट! कुठे कुठे ऐकलेलं तुला बरोबर लक्षात राहतं! एकदाच ऐकलेलं गाणं तू खूप नंतरही आठवून गुणगुणू शकतेस! आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला माणसंही खूप चांगले लक्षात राहतात. अंतरामुळे अनेक जण नेहमी भेटू शकत नाहीत. पण तुझ्या दृष्टीने ते तुझ्यासोबत कनेक्टेड असतात. मग त्या दूरच्या बहिणी- भाऊ असतील किंवा काका- आत्या असतील. तू विसरत कोणालाच नाहीस. तुझ्या दृष्टीने सगळे तुझ्या समोरच असतात. अंतराची व वेळेची गॅप तुला जाणवत नाही. जेव्हा तू ज्यांना ज्यांना भेटतेस, तेव्हा त्यांच्यातलीच होतेस! तुम्ही तिघी बहिणी व आबांनी केलेली मस्ती! ऐतिहासिक दृश्य होतं ते!
तुझी व्हिजन मला हवीहवीशी वाटते! मला नजरेने दिसताना टेबलावर पसारा दिसतो! पण तुझ्यासाठी तिथे क्लेचा गणपती असतो; बाहुल्यांचं सामान असतं. तुझ्या डोळ्यापुढे एक रचना होत असते. आणि तुझं खेळून झालं की, तू स्वत: ते आवरूनही ठेवतेस- परत सगळं जागच्या जागी! माझ्या नजरेमध्ये अनेक विसंगती; त्रासदायक गोष्टी दिसत असल्या तरी तुझ्या दृष्टीने मात्र त्या सगळ्या गोष्टी हाताळता येणा-या; नव्हे एंजॉय करता येणा-या गोष्टी असतात. तितकं तुझं मन uncluttered आहे. आणि तथा कथित त्रासदायक गोष्टींमध्ये चांगलं बघण्याची दृष्टी तुझ्याकडे आहे! तितकी ऊर्जा तुझ्याकडे आहे. अशा किती तरी गोष्टी! गडबड गोंधळ तुला आवडत नाही; पण म्हणून तू वैताग करण्यात तुझी ऊर्जा वाया घालवत नाहीस.
गेल्या पाच वर्षांमध्ये तुझ्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. तुझ्या सोबतीत अनेक गोष्टी समजत गेल्या! आज जसा तुझा पाचवा वाढदिवस, तसा आई- बाबा म्हणून आमचाही पाचवा वाढदिवस! आणि आमचीही पहिलीच यत्ता सुरू होते आहे! कॉलेजमध्ये हॉस्टेलवरच्या मित्रांनी अनेक आवाज काढायला शिकवले. तशा अनेक गोष्टी तूच शिकवल्यास. तुला सांगण्यासाठी गोष्टी आठवून सांगत गेलो. पूर्वी मला अनेक गोष्टी ज्या जमत नव्हत्या; त्या करत गेलो! आता तर तू तुझे केस कसे बांधायचे, हेही मला शिकवतेस! अशा बाबतीत तू एक उत्प्रेरक आहेस. Catalyst हा मस्त शब्द आहे. कॅटलिस्ट स्वत: काही करत नसतं. केवळ त्याची उपस्थिती. एक प्रकारचा सत्संगच. प्रकाश काही कृती करत नाही. पण रात्रीचं दृश्य आणि दिवसाचं दृश्य ह्यामध्ये किती मोठा फरक असतो! अशा उपस्थितीमध्ये बाकी गोष्टी आपोआप बदलतात. तशी तुझी सोबत, अदू, एक वेगळा नावीन्यपूर्ण परस्पेक्टीव्ह देणारी!
अदू, अशा अगणित आठवणी! तुला सांगितलेल्या गोष्टींच्याही अनेक आठवणी! मला खूप आनंद होतोय की, आता तुला लिहिता व वाचता येतंय. कदाचित पुढच्या वर्षीचं माझं पत्र तू बरचसं वाचू शकशील! आणि तोपर्यंत तुझ्याच "लहानपणीच्या" खूपशा गोष्टी तुझ्या वाचूनही झालेल्या असतील! अशी तुझी आयुष्याची परीकथा करणारी सोबत! अशाच सोबतीविषयीचं एक गाणं आठवतं. हे गाणं सांगून हे शब्दरूपातलं पत्र थांबवतो.
तू ना जाने आसपास है खुदा
धुंधला जाएँ जो मंजिलें, इक पल को तू नज़र झुका
झुक जाये सर जहाँ वहीं, मिलता हैं रब का रास्ता
तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे
तेरा साथी, मेरे क़दमों के हैं निशां
तू न जाने आस पास हैं खुदा
खुद पे डाल तू नज़र, हालातों से हार कर कहाँ चला रे
हाथ की लकीर को, मोड़ता मरोड़ता है हौसला रे
तो खुद तेरे ख्वाबों के रंग में, तू अपने जहाँ को भी रंग दे
के चलता हूँ मैं तेरे संग में
हो शाम भी तो क्या
जब होगा अँधेरा, तब पायेगा दर मेरा
उस दर पे फिर होगी तेरी सुबह
तू न जाने आस पास हैं खुदा
मिट जाते हैं सबके निशां
बस एक वो मिटता नहीं हाय
मान ले जो हर मुश्किल को
मर्ज़ी मेरी हाय
हो हमसफ़र न तेरा जब कोई
तू हो जहाँ, रहूँगा मैं वहीं
तुझसे कभी न इक पल भी मैं जुदा
तू न जाने आस पास हैं खुदा
- तुझा निंजू/ निंजा इ. इ.
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
छान लिहिले आहे. मुलगी व्हायला
छान लिहिले आहे. मुलगी व्हायला नशिब लागते - खूप सुन्दर नाते आहे फादर डॉंटर चे.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
आवडली.
आवडली.
अदू, लाडू, मनीमाऊ, सोनपापडी,
अदू, लाडू, मनीमाऊ, सोनपापडी, टमडीला अनेक उत्तम आशिर्वाद
किती छान आहे हे पत्र अन बाळ
किती छान आहे हे पत्र अन बाळ सुद्धा..
किती गोड आणि सुंदर लिहीलंय,
किती गोड आणि सुंदर लिहीलंय, अगदी तुमच्या टमडी सारखं.. तिला गोड पापा, खूप साऱ्या शुभेच्छा
प्रतिसाद, शुभेच्छा
प्रतिसाद, शुभेच्छा आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद व नमस्कार!
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे.
माझ्या एका आवडत्या शेळीचं नाव मी टमरी ठेवलं होतं. तिला "टमरे" अशी हाक मारली की में.. करून उत्तर द्यायची. पुढे तिला मामाला पाळायला दिली. कितीही दिवसांनी मी तिकडे गेलो तर टमरे अशी हाक मारताच में... करुन माझ्या कडे ओढा घेई. अवांतराबद्दल क्षमस्व. टमडी वरुन आठवलं.