खूप दिवसांपासून खोपोलीला जायचे होते, पण वेळेअभावी जमत नव्हते. पण आज तो योग जुळून आला. खरतरं कालपर्यंत काहीच ठरले नव्हते, पण काल रात्री अचानक ठरले की पाऊस मस्त रिमझिम पडतोय, सो जाऊया खोपोलीला, तिकडचा मठ छान आहे असे ऐकले होते. अन खासकरून पावसाळ्यात तर खूप छान असते तिथले वातावरण. तसेही एकदातरी बघायची इच्छा होतीच, सो दुसऱ्या दिवशी सकाळी निघुया असे ठरले.
ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता ट्रेनने खोपोली स्टेशनवर उतरलो. बरेच जणांनी आम्हाला पायी चालत जायला सुचवले होते. पण पाऊस अन खराब रस्ता, त्यात अनोळखी शहर म्हणून आम्ही रिक्षाने गेलो मठावर. खोपोली रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे हा मठ, चालत १५-२० मिनिटे तर रिक्षाने फक्त ५ मिनिटात पोहचलो आम्ही. ट्रेनने येत असतानाच वांगणी ते खोपोली दरम्यान सगळीकडे हिरवळ , धबधबे, नदया, व्हळ्या सोबत रिमझिम पाऊस यामुळे आधीच खूप छान, प्रसन्न वाटत होते, मठात प्रवेश करताच त्यात भर पडली. वातावरण इतके छान होते न की मनावरची सगळी मरगळ कधीच निघून गेली होती.
मठ खूप स्वच्छ, सुंदर, शांत आहे, मुख्य म्हणजे तिथले सगळे अगदी शिस्तबद्ध आहे. आत आल्यावर एन्ट्री करून दर्शनाला गेलो. तिथे थोडी गर्दी होती, तरीही शांतता होती. मला नेमके शब्दात सांगता येणार नाही कारण मी काही लेखक नाही. पण ते वातावरण खूप खूप छान अन मनाला शांत करणारे होते. नेहमी इतक्या गर्दीत जो गोंधळ गडबड असतो तो तिथे नव्हता. दर्शन झाल्यावर तिथल्या एका सेवेकरी काकांनी आम्हाला अल्पोपहार घ्यायला सांगितला. आम्ही आधी घरीच नाष्टा खाल्ला होता तरी परत थोडे पोहे अन चहा घेतला.
चहा - नाष्टा झाल्यावर परत एकदा दर्शन घेऊन , हवन हॉल मध्ये गेलो. हवन हॉल अन मुख्य दर्शन यांच्यामध्ये जो रस्ता आहे तिथे नदीचे पाणी वाहत होते, पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता, त्या नदीवर पूल बांधलाय मुख्य दर्शन झाल्यावर हवन हॉल अन शंकर मंदिराकडे जायला. हवन हॉलच्या छतावर खूप सारी माकडे होती. त्यातली बरीचशी तर फक्त आपल्या तळहाताच्या एवढी छोटी पिल्ले होती. काही मोठी माकडे खाली उतरून जर कुणाच्या हातात काही खायचे सामान असेल तर पळवून नेत. पण तरी भिती वाटत नव्हती त्यांची. आम्हीपण आमच्याकडचा बिस्कीट चा पुडा दिला त्यांना.
हवन हॉलमधून बाहेर आल्यावर छान छोटेसे गार्डन आहे, अन दोन्ही बाजूंनी झाडे लावलेला शंकर पार्वती मंदीराकडे जाणारा रस्ता आहे. तो रस्ता अन गार्डन दोन्ही खूप छान आहे. इकडे आम्ही खूप सारे फोटो काढले. जिथवर नजर जाईल तिथवर डोंगर, धबधबे, झाडे, खुपच छान. मस्त रमतगमत, आम्ही शंकर पार्वती मंदीरात आलो. हे मंदिरही खूप छान आहे. मुख्य म्हणजे इथे दगडाचे शिवलिंग आहे. इथे थोडाच वेळ बसलो तितक्यात इतका वेळ थांबलेला पाऊस परत सुरू झाला. तो रिमझिम पाऊस अन हिरवाईने नटलेला निसर्ग म्हणजे सोने पे सुहागा.
या मंदिराच्या वरच्या बाजूला गुफा आहे, पण पावसामुळे वाट निसरडी झाल्यामुळे तो रस्ता बंद केलाय. मग आम्ही त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हेलिपॅड जागेकडे निघालो. हाही रस्ता स्वच्छ, शांत, सुंदर आहे. वर गेल्यावर वाटले की इथून परत जाऊच नये. इतका सुंदर देखावा होता. निसर्गाचा हा नजराणा बघता बघता अडीच तास कसे निघून गेले कळलेच नाही.
१ वाजता प्रसाद होता, म्हणून मंदिरात परत आलो. मला इथली एक गोष्ट आवडली, प्रसाद खाल्ल्यावर प्रत्येकाने आपले ताट स्वच्छ धुऊन द्यायचे होते, अन ते नीट स्वच्छ झाले की नाही हे बघायला दोन सेवेकरी बायका होत्या. जर समजा कुणी स्वच्छ ताट धुतले नाही तर त्या त्यांच्याकडून ते ताट पुन्हा धुवून घेत होत्या.
प्रसाद झाल्यावर पुन्हा एकदा फेरफटका मारून आम्ही परतीला लागलो.
---------------------
मी कधी प्रवासवर्णन लिहिले नाही, मला खरंतर असे काही लिहिता येतच नाही. पण आज या ठिकाणी जाऊन आल्यावर का कुणास ठाऊक लिहावेसे वाटले. फोटो आहेत खूप सारे , अर्थात मंदिरात फोटो काढण्याची परवानगी नाही, म्हणून ते नाहीत, पण जे आहेत ते सुद्धा इकडे देणे जमत नाही, एकतर ते सगळे मोबाईल कॅमेराने काढलेत, त्यातही त्याचे स्क्रीनशॉट काढून मग इकडे अपलोड करणे त्रासदायक आहे, म्हणून जास्त फोटो नाही देत इकडे.
शंकर पार्वती मंदिराकडे जाणारा रस्ता
हवन हॉल अन मंदिराला जोडणाऱ्या पुलाखालची नदी
हवन हॉल बाहेरून
माकडे
डोंगर अन धबधबे
.
आभाळ भरून आलेले
ह्या धबधब्याच्या बाजूला गुफा आहे म्हणे
हेलिपॅड- ही हेलिकॉप्टर उतरायची जागा, पण इकडून खूप छान दिसतो सगळा परिसर
.
हो छानच आहे तो परिसर. रम्य.
हो छानच आहे तो परिसर. रम्य.
ती नदी आहे त्या पाण्यातच महाराज तासनतास ध्यानास उभे राहात. माशांनी पायाची बोटे कुरतडली होती. मी कधी गेलो नव्हतो. अमचे एक नातेवाईक खोपोली गावात राहतात. एकदा त्यांचेकडे असताना संध्याकाळी म्हणाले चला जरा मठात फेरी मारून येऊ मग येऊन जेवू. दारातच अमच्या सोसायटीत राहणारे सेवेकरी भेटले. "अहो, आता इकडे अचानक?" आणि लगेच शिरा -प्रसाद आणला. नाही म्हणता येईना.
त्यांनीच मठ दाखवला.
वरची गुहा मठाकडेच आहे. संध्याकाळी एकजण वर जाऊन दिवा लावून येतो. त्यावेळेस त्यांच्याबरोबर पटकन जाऊन येता येईल.
महाराज इथे आणि गगनबावड्याला येऊनजाऊन असायचे.
महाराज असताना मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती आणि वरिष्ट नेते याच हेलीप्याडवरून येत असत.
सुंदर लेख. माझीही खूप
सुंदर लेख. माझीही खूप दिवसांपासून इच्छा आहे मठाला भेट देण्याची. मुक्कामाची सोय/ भक्तनिवास वगैरे काही आहे काय मठात?
VB प्रवास वर्णन आणि फोटो
VB प्रवास वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त जमले आहे.
छान
छान
शरदकाका, अमर ९९, च्रप्स आणि
शरदकाका, अमर ९९, च्रप्स आणि BLACKCAT , आभारी आहे☺️
अमर ९९, रहायच्या सोयीबद्दल माहीत नाही, पण मठ जास्त मोठा नाहीये, अर्धा/एक दिवस पुरतो. हा जर तिथे सेवा करायची असेल किंवा महाराजांवर खूप श्रद्धा असेल तर गोष्ट निराळी.
शरदकाकांनी सुचवल्याप्रमाणे
शरदकाकांनी सुचवल्याप्रमाणे आधी आम्ही दुपारी महड ला गणपतीच्या दर्शनाला जायचे ठरविले होते, पण इकडे मन इतके रमले की तो प्लॅन रद्द केला. नवरात्री नंतर परत जाणार आहोत, तेव्हा जाऊ.
पण पहाटे लवकर निघून आधी महडचा गणपतीचे दर्शन घेऊन मग नंतर मठात जाणे बरे, म्हणजे वेळेचे योग्य नियोजन होते अन दगदगही कमी.
फोटो आणि प्रवासवर्णन दोन्हीही
फोटो आणि प्रवासवर्णन दोन्हीही छान...
असेच लिहत राहा....मी पण जाईन म्हणतो..
फिरायला तेवढं जाईन...बाकी महाराजांबद्दल उलटसुलट खुप ऐकल आहे...खरं काय खोटं काय...ते देव जाणे...
सुरेख लेख. फोटोही मस्त!
सुरेख लेख. फोटोही मस्त!
एकदा भेट द्यायला हवी.
छान लिहिलंयत, फोटोही मस्त
छान लिहिलंयत, फोटोही मस्त
छान वाटतेय जागा.
छान वाटतेय जागा.
बाकी गगनगिरी नाव पहिल्यांदा ऐकलं पण हे महाराजदेखील इतर महाराजसारखेच वाटताहेत.
> महाराज असताना मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती आणि वरिष्ट नेते याच हेलीप्याडवरून येत असत.
बाकी महाराजांबद्दल उलटसुलट खुप ऐकल आहे...खरं काय खोटं काय...ते देव जाणे...>
सुंदर प्रवास वर्णन.
सुंदर निसर्ग रम्य परिसर.
अजय, शाली, आशिका आणि ॲमी
अजय, शाली, आशिका आणि ॲमी , आभारी आहे.
फिरायला तेवढं जाईन...बाकी महाराजांबद्दल उलटसुलट खुप ऐकल आहे...खरं काय खोटं काय...ते देव जाणे... >>> मी ही फिरायलाच गेले होते, मी तर मंदीरात पण फिरायलाच जाते. बाकी, मी महाराजांबद्द्ल काहीच ऐकले नव्हते. पण अगदी कॉलेजात असताना पासुन ऐकले होते की पावसाळ्यात एक तरी भेट द्यावी ईतका सुंदर आहे हा मठ, तेव्हापासुनची ईच्छा होती तीकडे जायची जी ईतक्या वर्षांनी पुर्ण झाली. पण खरेच खुप शांत अन छान वाटते तीकडे.
ॲमी , माझेही असेच काहीसे मत आहे की सगळे महाराज / बाबा / अम्मा सारखेच असावेत. असो, शेवटी ज्याची त्याची श्रद्धा
मला अश्या ओपेन ठिकाणी फिरायला जास्त आवडते, पुणा - मुंबईच्या जवळ अशी अजुन काही ठिकाण असतील अन कळले तर तीथेही जायला नक्कीच आवडेल.
त्या नदीचे नाव काय?
त्या नदीचे नाव काय?
अरे वा! ह्या मठाबद्दल काहीच
अरे वा! ह्या मठाबद्दल काहीच माहित नव्हतं. पावसाळ्यात फिरायला जायला छान आहे हे ठिकाण. पुढल्या वेळी त्या भागात असेन तेव्हा जमतंय का बघते. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.
>>त्या नदीचे नाव काय?
>>त्या नदीचे नाव काय?
Submitted by झंपी on 16 September, 2019 - 11:32<<
पाताळगंगा
धन्यवाद
धन्यवाद
बघितला आहे फार पूर्वी एकदा..
बघितला आहे फार पूर्वी एकदा.. आम्हाला शाळेत 8वी ते 10वी ला टेक्निकलला एक सोनार म्हणून मास्तर होते ते ह्या बाबांचे मोठे भक्त. त्यांनी 8वीला सुरुवातीलाच बाबांचा कम्पास बॉक्स मध्ये मावेल असा एक फोटो दिला होता आणि बाबांचा एक मंत्र पण, बहुदा " ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः " असा काहीतरी. एकदा भर पावसाळ्यात गगनबावडा इथे पण बाबांच्या आश्रमात घेऊन गेले होते त्यांच्या दर्शनासाठी☺️
सुंदर!
सुंदर!
स्वप्ना_राज , लंपन आणि सामो
स्वप्ना_राज , लंपन आणि सामो धन्यवाद
मठाच्या नावातच नदीचे नाव पण आहे - पाताळगंगा, पण ती खुप लहान आहे एखाद्या व्हळीसारखी
स्वप्ना, एखाद्या पावसाळ्यात नक्कीच जा, खुप छान वाटेल, पण शक्यतो श्रावणात किंवा नंतर जा म्हणजे निट फिरुन बघता येईल सारे
फोटो, वर्णन मस्तच
फोटो, वर्णन मस्तच
सहल म्हणून जाणेबल जागा वाटत आहे
पण महाराजांबद्दल उलट सुलट खूप ऐकले आहे या अजय चव्हाण यांच्या मताशीही सहमत
धन्यवाद बेफ़िकीर
धन्यवाद बेफ़िकीर
सहल म्हणून जाणेबल जागा वाटत आहे >>> नक्कीच, पण जास्त मोठी नाहीये जागा, अर्धा दिवस पुरतो फक्त
पण महाराजांबद्दल उलट सुलट खूप ऐकले आहे या अजय चव्हाण यांच्या मताशीही सहमत >> आतामात्र मलाही जाणुन घ्यायची ईच्छा झालीये. कोणी सांगाल काय की काय बोलायचे महाराजांविषयी.
>>स्वप्ना, एखाद्या पावसाळ्यात
>>स्वप्ना, एखाद्या पावसाळ्यात नक्कीच जा, खुप छान वाटेल
हो, ह्या महिनाअखेर त्या बाजूला जायला लागेल असं वाटतंय. जमलं तर तेव्हाच जाऊन येईन. कल करे सो आज कर, आज करे सो अब