भूपाळी

Submitted by मिलिंद जोशी on 3 September, 2019 - 02:39

आज खूप दिवसानंतर मी सकाळच्या वेळी भूपाळी गायली. तसा आपला आवाज खूप दमदार आहे. ते पहाडी का काय म्हणतात ना... तस्साचं... निमित्त होते माझ्या भावाला उठवण्याचे. तसा तो नेहमीच माझ्या आधी उठत असतो, पण काल जवळपास पहाटे चार वाजेपर्यंत एडिटिंगचे काम करत बसला होता. त्यामुळे मग सकाळी फक्त दोन तीन तासात जाग येणे कितपत शक्य आहे? अर्थात व्यवसाय म्हटला की या गोष्टी येतातच. रात्री कितीही वाजता झोपला तरी सकाळी ९ वाजता ऑफिसला जावेच लागते... त्याला हो... इथे त्याच्याबद्दल बोलतोय मी. तर... काय सांगत होतो? हां आठवलं... मी गायलेली भूपाळी... याबद्दल सांगत होतो मी.

तसे माझ्या वडिलांनी त्याला हाक मारून उठवलेही होते, पण शेवटी तोही माझाच भाऊ. त्यातून रात्री जागरण झालेले. त्याचा परत डोळा लागला आणिं मग त्याला उठवायची जबाबदारी माझ्यावर येवून पडली. बरे आपला तर स्वभावच आहे... जी जबाबदारी आपल्यावर येवून पडेल, तिला शक्य तितके व्यवस्थित पार पाडायचे. मी त्याच्या खोलीत गेलो. तो मस्त झोपलेला दिसला. अगदी शांत झोप लागली होती त्याला. त्याच्या चेहऱ्यावर जे भाव होते, त्यावरून एखादे चांगले स्वप्न पहात असावा. त्याला जागे करणे खरंच जीवावर आले होते, पण अंगावर घेतलेली जबाबदारी तर पार पाडलीच पाहिजे ना? डोळे मिटले, घसा खाकरून मोकळा केला आणि माझ्या दमदार पहाडी आवाजात भूपाळी म्हणायला सुरुवात केली.

“उठी उठी बाऽऽऽऽऽ मोरेश्वराऽऽऽऽ...”

भाऊ तर एकदम कावराबावरा होऊन उठून बसला. काय झाले हेच त्याला समजत नव्हते.

“अरे काय झाले रे?????” म्हणत दुसऱ्या खोलीतून वडील धावतच तिथे आले. घराची बेल जोरजोरात वाजवून बाहेरूनच शेजारच्या काकू ‘काय झाले?’ हे विचारू लागल्या. दार उघडतो न उघडतो तोच खालच्या मजल्यावर राहणारे काका दारात हजर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर संताप दिसत होता. मला तर समजेच ना... ते इतके का बरे चिडले असावेत?

“अरे पापी माणसा..!!! तुला ओरडायला हीच वेळ मिळाली का?” त्यांनी एका हाताने माझी कॉलर पकडून विचारले आणि मी गोंधळलो.

“काका... काय केले मी?” मी घाबरून विचारले.

“काय केले म्हणजे? इतक्या मोठ्याने ओरडलास की क्षणभर मी दचकलोच. माझ्या हातात चहाचा कप होता. सगळा गरम चहा माझ्या चेहऱ्यावर उडाला आणि माझे तोंड भाजले. आणि परत तोंड वर करून विचारतोस की, काय केले मी म्हणून?” माझ्या दारात असल्यामुळे बहुतेक त्यांनी स्वतःला आवरले असावे. त्यांच्या दारात असतो तर नक्कीच थोबाड रंगले असते. आता मात्र सॉरी सॉरी म्हणत माझे वडील पुढे आले आणि त्यांनी काकांच्या हातून माझी कॉलर सोडवली.

“याद राख...!!! परत कधी इथे गाणं गायलास तर, मला दम लागेस्तोवर मारेल...” अगदी संतापाने त्यांनी वाक्य उच्चारले. पण खरं सांगू.., त्यांचा तो चहा उडालेला चेहरा, मोठे झालेले डोळे, आणि संतापाने लाल झालेला रंग पाहून मला त्याही परिस्थितीत हसू येत होते. पण हसलो असतो तर काकांबरोबर वडिलांचाही मार खावा लागला असता.

मनात विचार आला.., साला कुणाला कदरच नाही आपल्या दमदार आवाजाची. माझ्या आवाजात किती दम आहे हे या तुच्छ जीवांना काय कळणार? जाऊ दया... आता ऑफिसला निघालोय मी. तिथे जाऊन गाणे गाईल. कालच कव्वाली ऐकली आहे... दमादम मस्त कलंदर... पहाडी आवाजातली. हीच कव्वाली मी इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या सिलेक्शनमध्येही गायचे ठरवले आहे. जेव्हा तिथे मी सिलेक्ट होऊन इंडियन आयडल बनेल ना, हेच सगळे लोकं मला विनंती करतील... ‘एक तरी गाणं ऐकव !!!’ पण शप्पथ सांगतो... मी बिलकुल त्यावेळेस आढेवेढे घेणार नाही. काय आहे ना... मोठे लोकं सांगून गेलेत...

‘पैसा आला तर माजू नये आणि श्रोत्यांसमोर गायला लाजू नये.’

मिलिंद जोशी, नाशिक...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोशी साहेब,
तुमच्या समद्या मेड-अप किश्श्यांसाठी ईनोदी लेखन असा एक शेप्रेट ईभाग हाये मायबोलीवर.

खूप खूप धन्यवाद... पण याला विनोदी म्हणता येईल का नाही हे मला सांगता येत नाही... म्हणून थोडं हलकं फुलकं असं अवांतर मध्ये लिहितो...

रूढार्थाने ललित विभागात लोक काही तरी गंभीर टोनचं, चर्चात्मक, ऊपदेशपर, अनुभव वगैरे असे लिहित आले आहेत. तुमच्या हलक्या फुलक्या लेखांना जास्ती कंष्टंबर विनोद विभागात मिळतील असे मला वाटते. लिहित रहा.