स्मरणरंजन.... आठवणींचा जागर! - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

माणूस हा मुलत: गप्पिष्ट प्राणी आहे. गप्पा मारायला त्याला फार आवडते. दोन गोष्टीवेल्हाळ माणसे भेटली, की मग त्यांना स्थळ काळाचेही भान राहत नाही. एकातून दुसरा... दुसऱ्यातून तिसरा असे लडी लागल्यासारखे विषय निघत जातात.
गप्पा वाफाळत्या चहाबरोबर रंगतात, गप्पा गरमागरम पोह्यांसोबत रंगतात, तश्या त्या भरल्या पानावरही रंगतात अन गावच्या पारावरही रंगतात.
मायबोली हा तर आपल्या सगळ्यांचा हक्काचा अड्डा.
इथे अनेक धागे, अनेक पाने केवळ गप्पांना वाहिलेली आहेत.
एखादा जरा नॉस्टेल्जिक व्हायचा अवकाश, सगळे लगोलग भूतकाळाच्या सफरीवर निघून जातात. किश्श्यामागून किस्से आठवले जातात आणि आठवणींचा महापूर येतो.
तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने असाच आपल्या आठवणींचा जागर घालूया!

या स्मरणरंजनातला पहिला विषय आहे:
"मी आणि माझे गणपती मंडळ"

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी तरी कुठल्यातरी गणेश मंडळात काम केलेले असते. वर्गणी गोळा करत घराघरातून हिंडलेलो असतो आणि कार्यकर्ता म्हणून मिरवलेले ही असते!
आमचे ही बालगोपाळांचे असेच एक न्यू बाल गणेश मंडळ होते. त्यावर्षी आम्ही मोठ्यांच्या मंडळाकडून स्फूर्ती घेवून हलता देखावा करायचे ठरवले होते. त्यावेळी टीव्हीवर रामायण फार फेमस होते. म्हणून आम्ही हनुमान द्रोणागिरी उचलून आणतो तो देखावा करायचे ठरविलेले. त्याकाळी अश्या ऐतिहासिक/पौराणिक चित्रे असलेल्या कॅलेंडरची फॅशन होती. त्यामुळे चित्र शोधायला फारसे कष्ट पडले नाहीत. हनुमानाचे चित्र कापून ते पुठ्ठ्यावर चिकटवून आमचे कटआउट तयार झाले. आमच्या छोट्याश्या मंडपातल्या खालच्या कोपऱ्यापासून वरच्या कोपऱ्यापर्यंत आम्ही तारा बांधल्या. त्यातली मधली तार फिरती ठेवून त्यावर ते कटआउट अडकवले. आणि एका डीसी मोटारीच्या मदतीने मधली फिरती तार हलवून आमचा देखावा हलता झाला. बाकीची सजावट झाली. कापसाचे डोंगर सजले. टेबल लॅम्पला पुढे रंगीत जिलेटीन पेपर लावून प्रकाशयोजना ही मस्त झाली होती. एका टेपरेकॉर्डरवर पार्श्वसंगीत ही ठेवले होते. आजूबाजूच्या गल्ल्यातून आमचा हा हलता देखावा बघायला बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागली. आणि एकदा ऐन गर्दीच्या वेळेला आमची मोटार बंद पडली. पुढचा पडदा पाडून दादा लोकांनी ती चालू करायचा खटाटोप केला पण ती काही सुरू व्हायला तयार नव्हती. आता हळूहळू गर्दी अजून वाढली होती. प्रसंग बाका होता. मग आमच्यातला एक मंडपाच्या वरच्या बाजूला कुणाला दिसणार नाही असा जाउन उभा राहिला. अस्मादिक मांडवाखाली मांडी ठोकून बसले आणि हाताने ती फिरती तार वरखाली करून तो दिवस निभावून नेला!
आज इतकी वर्षे झाली तर ती धम्माल विसरता विसरत नाही... अजूनही जुने मित्र भेटलो तरी ही आठवण हमखास निघतेच.

तुमच्याकडे ही तुमच्या गणपती मंडळाच्या, वर्गणीच्या, सजावटीच्या, मंडळामंडळातल्या खुन्नसच्या, मिरवणुकीच्या आणि नंतरच्या श्रमपरिहाराच्या खूप साऱ्या आठवणी असतीलच ना?
मग वाट कसली बघताय.... लिहिते व्हा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा देखावा काय करायचा याचे प्लॅनिंग दोन-तीन महिने आधीच सुरु व्हायचे.... आजच्यासारखे ready reference at fingertips नव्हते त्यामुळे काय काय मटेरिअल मिळू शकेल याच्यावर देखावा काय करायचा हे ठरायचे.
मग साहित्याची जुळवाजुळव झाल्यावर प्रत्यक्ष देखावा उभा करण्याचे जे पाच सात दिवस असत ते फारच भारी असायचे.

मोठ्या मंडळातुन तर देखाव्यांची अदलाबदल व्हायची
महीनाभर आधी छोट्या जाहिरातींमध्ये सगळ्या डीटेल्ससह अमुकतमुक देखावा विकणे आहे/भाड्याने देणे आहे अश्या जाहिरातीही यायच्या!