विषवल्ली -४
वाड्यातील विषारी विकारांची लागण झाल्याचा परिणाम राजेशसमोर आला तेंव्हा तो हबकून गेला. जी गायत्री आपली मदत करण्यासाठी निघाली होती; तिच्यावरचं अतिप्रसंग करण्याचा आपण प्रयत्न केला..! पश्चाताप आणि संतापाने त्याचे मन भरुन आलं.
“या वाड्यात जे काय आहे, त्याचा आता निकाल लावायचाचं”, माणशी ठाम निर्धार करुन तो सकाळीचं वाड्याबाहेर पडला. त्याची पाऊले लक्ष्मीताईच्या घराकडे वळली. सकाळचा वेळ असल्याने लक्ष्मीताईकडे फारशी वर्दळ नव्हती. तो सरळ आत गेला. राजेश ला पाहताच ताईला आश्चर्य वाटलंस दिसलं. स्नान वगैरे उरकून त्यांनी नुकतीच बैठक मांडलेली दिसत होती. राजेश त्यांच्यासमोर बसला आणि काल रात्रीची संपूर्ण हकीगत त्यांना सांगितली. राजेशची हकीकत एकूण लक्ष्मीताईही हादरून गेल्या. त्यांची मुद्रा विचारमग्न झाली..! पाहता पाहता त्यांचं ध्यान लागलं. दहा मिनिट कुणीच काही बोललं नाही. एकाएकी खोलीतलं वातावरण बदललं..खोलीत मोगऱ्याचा मंद सुगधं दरवळला..घंटीचा मधुर नाद कानात वाजायला लागला. राजेशने लक्ष्मीताईच्या चेहऱ्यावर नजर टाकली; त्यांच्या चर्येवर तेज आल्याचं त्याला जाणवलं. दोन मिनिटानंतर लक्ष्मीताईने डोळे उघडले. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. राजेशकडे एक मंद स्मित करुन त्यांनी बोलायला सुरवात केली..!
“काळ, अघोर...! एका भयन्कर दृष्ट शक्ती त्या वाड्यात वास करत आहे.. तुझं नशीब बलवत्तर म्हणा कि गायत्रीची ईश्वरावरची श्रद्धा बळकट. पण तुम्ही दोघे त्याच्या कचाट्यातून वाचलास हा दैवाचाच भाग! स्वगत बोलावं तसं ताई बोलत होत्या..!
" काही माणसं नीतीधर्माचं उल्लन्घन करण्यासाठीच पैदा होतात..! त्याच्या इच्छा, आकांशा इतक्या विकृत आणि अमानवी असतात कि, त्यांना माणूस म्हणावं तरी कसं ? माणसातले जाणावरच ते. जसे ते विकृत तशी त्यांची दैवतही आसुरी. गूळ-खोबरं-लाह्या-साखरेच्या नैवेद्याने त्यांचं पोट भरत नाही..तर, बळीच्या गरम रक्तमांसाचा त्याना नैवद्य लागतो. सगळा प्रकारचं अमानवी! त्या पटवर्धननेही अशाच एका घातकी, राक्षसी शक्तीला जागवले आहे.. त्या विषारी शक्तीला या जगात राहण्याचा अधिकार नाही.. हे जग मानवासाठी आहे.. माणसात राहणाऱ्या राक्षसांच या जगात काय काम ? त्याचा नायनाट झालाच पाहिजे ! ताईंच्या डोळ्यात आग चमकू लागली..त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या. त्यांचा हा रुद्रावतार पाहून राजेश भांबावला..भीतीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यातून सावरण्याआधीच ताईंचा रोकडा सवाल त्याच्या कानावर आला..!
“त्या शक्तीचा नायनाट झाला पाहिजे..तो करावाचं लागणार आहे..पण तू त्यासाठी तयार आहेस का?”
“हो, तयार आहे!”
“राणा भीमदेवी गर्जना करणं फार सोपं असतं; पण त्या गर्जना प्रत्यक्ष कृतीत आणायला फार मोठं मानसिक धैर्य लागते.. ध्यानात असू,दे, काहीही होऊ शकतं. म्हटलं तर आगीशीच खेळ आहे हा..!”
“काय व्हायचं ते होऊ द्या..! तसंही ते आता माझी पाठ सोडणार नाहीये. त्याला भीत भीत पळण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लावायला अगदी काहीही करायला मी तयार आहे..!”
राजेशने ठामपणे सांगताच ताईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
“ आज रात्री आपण वाड्यात जाणार आहोत ”
राजेश च्या चेहऱ्यावरची चलबिचल पाहून हसत ताई म्हणाल्या.. “काळजी करु नको, त्या शक्तीलाही काही मर्यादा आहेत.. त्याचंही एक कर्मकांड आहे..यमनियम आहे. त्याचं उल्लंघन त्यालाही करता येत नाही. आणि, त्याला किमान माझ्यासमोर काही करता यायचं नाही.”
संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास राजेश वाड्यावर पोहचला. ताई येण्याअगोदर वाड्यात पाऊल ठेवण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तो रस्त्यावरचं वाट पाहत थांबला. दोन तास झाले तरी ताई न आल्याने त्याच्या मनात शंका-कुशंकानी थैमान घातले होते. वाड्यात जाण्याचे सोडा; वाड्यासमोर उभे राहणेही त्याला आता असाह्य झाले. शेवटी अकरा वाजेच्या सुमारास एक लाल रंगाची मारोती कार वाड्यासमोर येऊन थांबली. लक्ष्मीताई खाली उतरल्या. त्यांनी एक ओहर कोट परिधान केला होता. तो जवळ येताच त्याला आत चालण्याचा इशारा करुन लक्ष्मीताई पुढे झाल्या. त्यांच्या हातात काट्या-काट्याची एक काडी होती. काडी पाहून त्याला नवल वाटले.
“ तुम्ही या काडी ने त्याला मारणार आहात काय?"
राजेश ने ताईला प्रश्न केला. अर्थात त्यात उपहास नाही तर नवल होतं.
“ राजेश, इथं साधनापेक्षा सध्याला खरं महत्त्व आहे.. सक्षम असेल तर हातातल्या गवताच्या पतीचीदेखील तलवार होते..आणि, ज्याच्यापाशी क्षमता नाही त्याच्याकडे अगदी बंदूक सुद्धा असली तरी त्याचा काही उपयोग नाही. तसंही आज आपण फक्त काही अंदाज बांधण्यासाठी इथं आलो आहोत..!'
बरोबर 12 च्या ठोक्याला ताईने वाड्याचं दार आत ढकललं. आत अंधार होता. शांतताही होती; पण ती फसवी वाटत होती. कोणत्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नव्हतं. काही क्षण गेले, मग नजर काम करायला लागली. रस्त्यांवरल्या दिव्यांचा परावर्तित प्रकाश आत येत होता. वस्तूंचे अंधूक आकार दिसत होते. उजव्या हाताला भिंतीवर बटणांचं पॅनेल होतं. त्यातलं एक बटण लक्ष्मीताईंनी दाबलं. हॉलमधला छताचा दिवा लागला. इतक्या वेळेच्या अंधारानंतर तो प्रकाश अगदी लखलखीत वाटत होता. दरवाजापासून हाताभराच्या अंतरावरची जागा ताईंनी निवडली. अंगावरचा ओहोर कोट काढून टाकला..ताईंनी भगव्या रंगाचं एक जुनाट वस्त्र परिधान केलं होतं. केस मोकळे सोडले होते. खांद्यावरच्या पिशवीतून त्यांनी विणलेल्या आसनाचा चौकोन बाहेर काढला. फरशी फटकारून साफ केली, आसन खाली पसरलं. आसनावर बैठक मारून ताईंनी पिशवीतल्या एकएक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. त्या वस्तू नेमक्या काय होत्या, हे राजेशला कळलं नाही. त्यापुढच्याही त्याच्या क्रिया चालूच राहिल्या. त्यांची प्रत्येक क्रिया आत्यंतिक श्रद्धेने, विश्वासाने केल्या जात होती. हिशेबाप्रमाणे मांडणी झाल्यावर त्यांनी अंगाऱ्याची पुडी सोडली त्यात कुंकू टाकलं. मळवट भरल्यासारखं स्वतः च्या कपाळावर लावलं. राजेशलाही अंगारा लावण्यास सांगितले. आता वेळ आली होती. हातात कुंकूमिश्रित अंगारा घेऊन त्यांनी कुठला तरी मंत्र म्हटला. त्या साध्या कृतीचा विलक्षण परिणाम झाला. डिवचल्या गेलेल्या एखाद्या हिंस्र श्वापदाने द्याव्यात तशा डरकाळ्या फोडण्याचा आवाज वाड्यात आला. त्यापाठोपाठ विषारी हसण्याचा गडगडाट झाला. थंड हवेचा एक प्रचंड झोक दोघांच्याही अंगावरून गेला. राजेशचं अंग त्याने शहारलं. ताईंच्या चेहऱ्यावरही आश्चर्यकारक भाव उमटले. त्यानंतर वाड्यात एक गगनभेदी गडगडाटी हाष्य उमटलं. धरणीकंप झाल्यासारखी वाड्याची जमीन हलू लागली. काहीतरी चुकलं होतं. काय? ते ताईच्या ध्यानी येईना! प्रतिक्रिया होईल याची ताईला अपेक्षाच होती. पण प्रतिक्रिया इतकी स्कोटक असेल याची मात्र त्यांनी अजिबात कल्पना केली नव्हती. वाडयातले दिवे एकदा अतिशय प्रखरपणे लकाकले आणि विझून गेले. अंधारात आसपासचा अवकाश घुसळला जात होता. अंधारातून त्याचा शोध घेत काहीतरी त्याच्या दिशेने येत होतं. आणीबाणीची वेळ आली होती.. अशा आणीबाणीच्या प्रसंगीचा एक खास आणीबाणीचा मंत्र ताईकडे होता. त्याचं पाहिलं आवर्तन त्यांनी खड्या आवाजात म्हटलं. सर्व प्रतिक्रिया क्षणांत स्तब्ध झाल्या. पण, प्रत्येक क्रिया जशी हवी तशी, ज्या क्रमाने व्हायला हवी तशी होत नव्हती. एकाएकीं आपल्या खांद्याला कुणाचा तरी स्पर्श होत असल्याची जाणीव ताईला झाली. हा प्रकार पुर्ण पणे अनपेक्षित होता..! विषाची अजून परीक्षा पाहण्यात अर्थ नव्हता.. ताईंनी तात्काळ माघार घेतली. राजेश चा हात धरून त्याला अगदी फरफटतचं वाड्याच्या बाहेर काढले.....!
*
वाडयातुन सहीसलामत बाहेर येताच लक्ष्मी ताई आणि राजेशने घरचा रस्ता धरला. रस्त्यात कुणीच कोणाशी बोलत नव्हतं. वाड्यातील अघोरी शक्तीची विषवल्ली अनेक वर्षांपासून वाढत गेल्याने तिचा प्रभाव प्रचंड वाढल्याचा अनुभव स्वतः ताईंनी घेतला होता. वास्तविक, आशा प्रकारांशी दोन हात करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. अमानवीय शक्तीसोबत आजवर अनेकदा त्यांनी आमना-सामना केला होता. पण, यावेळच्या अनुभव त्यांनाही चकित नव्हे तर विचलित करणारा होता.वाड्यातील वातावरणावर अंधाराचा, भयाचा, अभद्राचा जो जाडसर लेप चढला होता तो केवळ पटवर्धनच्या काळ्या कृत्यातून साकार होणे शक्य नव्हते. कोणतीतरी प्राचीन अघोरी शक्ती त्याला साह्य करत होती. तिचा प्रभाव इतका प्रचंड होता की तिच्या संपर्कात आल्यावर खुद्द ताईच्या प्रशिक्षित मनावरही त्याचा अमल झाला होता. ताईंना वाड्यातला शेवटचा क्षण आठवला आणि त्यांच्या ही अंगावर भयाचा शहारा उभा राहिला. वाड्यातल्या क्रूर शक्तीने एक क्षण त्यांनाही आपल्या अमलाखाली घेतले होते. क्षणभर त्यांच्या मनातून काहीतरी उसळून वर आलं होतं. काहीतरी कडवट, काहीतरी घाण. मग ते विचार आले. विषारी वासनेचे विचार..आजवर ज्या विकारांना कृतीत सोडा, पण साधं मनात येण्याचीही परवानगी नव्हती. ते विकार रोमारोमावर हावी होऊ बघत होते. भीतीची एक अत्यंत अपरिचित कळ त्यांच्या शरीरभर हलकेच पसरली होती.. वाड्यात जे काही आहे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सक्षम नसल्याचा नकारात्मक विचार पहिल्यांदाचं लक्ष्मीताईच्या मनात येऊन गेला..!
काहीश्या विमनस्क मनस्थितीतचं दोघेही लक्ष्मीताईंच्या घरी पोहचले. एव्हाना सकाळचे तीन वाजत आले होते. राजेशची गेस्ट हाऊस मध्ये थांबण्याची व्यवस्था करुन लक्ष्मीताई थेट बाथरूममध्ये दाखल झाल्या. थंड पाण्याने स्नान करुन देव्हाऱ्यासमोर येऊन बसल्या. देवाची विधिवत पूजा करुन त्यांनी आपल्या गुरुला वंदन केले, आणि ध्यान लावलं..मन एकाग्र झालं. शरीर हलकं झालं..हवा तो कौल मिळाला..! अंगावर मळकट भगवी कफनी, खाली दोन काच्यांचं धुवट धोतर, केस जरासे वाढलेले, शांत पण तेजस्वी चेहरा. गुरूचं दर्शन होतांच समाधीवस्थेतही ताईच्या चेहऱ्यावर समाधान आलं. चित्त गुरुचरणी नत झालं..मनसंवाद सुरु झाला..!
“ वर्षानुवर्ष 'त्या' विषारी रोपाला पटवर्धन नावाच्या राक्षसाने बळीचं रक्त पाजलं आहे..त्याचं आता काटेरी झुडपं झालंय..त्याला काढायला गेलं तर हाताला काटा टोचनारचं..! विश्वास ढळू देऊ नको..करता करविता परमेश्वर आहे..त्याच अधिष्ठान उभं राहिलं पाहिजे..मुळावर घाव घातल्याशिवाय यश येणार नाही..! मार्ग कठीण आहे..पण, जशी त्याला अंधाराची साथ आहे तशी तुला उजेडाची साथ मिळेल..तू एकटी नाहीस ! ”
गरुउपदेश लक्ष्मी ताईच्या मनपटलावर उमटला..! मार्ग सापडला तसा कृतींना वेग आला. सकाळच्या प्रहरी राजेश आणि ताई पुन्हा वाड्यावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत चार माणसंही होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात वाडा अगदी निष्पाप भासत होता. तरीही वाड्यात पाऊल टाकताना राजेशच्या अंगावर काटा उभा राहिला. कालपासूनच्या घडामोडीने तो अगदीच निराश झाला होता. 'पहिला घाव त्याचा, दुसरा आपला..!' या शब्दात ताईंनी त्याच्या मनाला उभारी दिली म्हणून तो पुन्हा वाड्यात यायला तयार झाला. वाड्यात येताच सोबतच्या माणसांनी वाडा झाडून पुसून स्वच्छ केला. ताईंनी राजेशच्या हस्ते वाड्यात श्री दत्तगुरूची प्रतिमा स्थापित केली.
"जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता आरती ओवाळू तुज, विश्वंभरिता, जय देव ॥ जय देव ॥ आरतीचे मंगलमय स्वर वाड्यात घुमू लागले. मात्र, वाड्याचा एका भागात काहीतरी संतापानं खदखदत होत..मनातल्या मनात घुमसत होतं.. मुंडकं तोडलेल्या बोकडासारखा धडपडत होतं. कुठला तरी आवाज आतल्या आत तोंड दाबून बसला होता..!
**
वाड्यात ईश्वराची स्थापना झाल्यावर ताई दुसऱ्या कामाकडे वळल्या. वाड्यातील विषारी शक्तीचं मूळ त्यांना शोधून काढायचं होतं. अर्थातचं त्यासाठी वाड्याचा पूर्वइतिहास धुंडाळणे गरजेचे होते. नंदकिशोर पटवर्धनने राजेशला आपला उत्तराधिकारी नेमले, त्यामागे काहीतरी डाव असावा ! असा संशय ताईला आला. त्याचा छडा लावण्यासाठी त्यांनी संपूर्ण वाडा शोधून काढला पण त्याठिकाणी काहीही मिळून आले नाही. ताईंनी वाड्यातचं ध्यान लावलं. मन एकाग्र करुन वाड्यातील सुप्त शक्तीच्या उगमाचा त्या शोध घेऊ लागल्या.
' धूसर-काळपट-पिवळट प्रकाशात वाडा भयाण दिसत होता..स्वयंपाकघरच्या मागच्या बोळात एक व्यक्ती जमिनीत काहीतरी उकरत होता. त्याच्या भोवती काही आकृत्या वेड्यावाकड्या नाचत असल्यासारख्या दिसत होत्या. त्या व्यक्तीने आपल्या हातातलं गाठोडं त्या खड्यात पुरलं. तो व्यक्ती पुन्हा वाड्यात आला. स्वयंपाक घरच्या दक्षिणेला असलेला एक गुप्त दरवाजा त्यानं उघडला. त्याचा चेहरा कुठल्यातरी अनामिक आनंदाने चमकत होता. खोलीच्या मध्यभागी होम पेटला होता. एका कपोऱ्यात सतरा-अठरा वर्षाची एक मुलगी हात बांधलेल्या अवस्थेत पडली होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्या व्यक्तीने आत येताच दरवाजा लावून घेतला. तो होमाजवळ आला. होमच्या समोर रक्ताळलेली जीभ बाहेर काढलेली हिंस्र श्वापदासारखी दिसणारी एक मूर्ती ठेवली होती. त्याने त्या मूर्तीची पूजा केली. मूर्तीवर हळद कुंकू उधळले. तार स्वरात त्याचं मंत्र पठण सुरु झालं. मंत्र म्हणता म्हणता तो उभा राहिला. कपोऱ्यात पडलेल्या मुलीच्या केसाला धरुन तिला होमाजवळ आणलं. तिच्यावरही हळद कुंकू टाकलं. त्याच्या डोळ्यात वेगळीच लकाकी आली. आकाशाकडे पाहत ती कुणाचं तरी आहवान करत होता. एकाएकी त्या खोलीत काहीतरी अवतरलं असावं! काय? ते समजत नव्हतं. पण, खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. त्या खोलीत नजर नेमक्या अशा ठिकाणी स्थिरावतच नव्हती. जणू त्या खोलीच्या भिंतीही निसरड्या झाल्या होत्या. एवढ्या निसरड्या, की त्यावरून नजरही घसरावी. आता त्याच्या हातात खंजीर दिसू लागला. दुसऱ्याचं क्षणी त्याने तो खंजीर मुलीच्या छातीत आरपार घुसवला. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. त्याच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत होतं..!
पडद्यावरील दृष्य बदलावं तसं, ताईंच्या नजरेसमोर पुढचं दृश साकार झालं. यात तो त्याचं विशेष खोलीत उभा होता. समोर हात पाय बांधलेल्या अवस्थेत एक युवती पडलेली. मघाच्या मुली पेक्षा सुंदर..देहयष्टी अशी की, कुणालाही वेड लागावं! तो तिच्याकडे नुसता पाहत उभा असतो. एकाएकी त्याच्या अंगात वासनेचा सैतान संचारतो. समोरच्या मुलीवर तो अक्षरशः तुटून पडतो..तिचे कपडे क्षणांत शरीरावेगळे होतात.. पुढचा प्रकार ताईकडून पहावला जात नाही. त्या डोळे उघडतात.
एव्हाना दुपारी झाली होती. बऱ्याच गोष्टींची कार्यसिद्धी पार पडली होती. वाड्यातील त्या अभद्र शक्तीचा उगम स्रोत असणारी ती गुप्त खोली ताईला ध्यानस्थ अवस्थेत दिसली होती. तिचा प्रत्यक्ष शोध फार काही अवघड नव्हता. परंतु, तूर्तास तरी ताई त्या शक्तीच्या वाटी जाणार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आवरते घेतले आणि राजेशसह त्या वाड्यातून बाहेर पडल्या.
राजेशच्या बाबतीत त्यांच्या मनात अजूनही संभ्रम होता. पटवर्धनने त्याची निवड का केली?; आपला वारसदार नेमण्यामागे आणि त्याला वाड्यात राहण्याची शपथ देण्यामागे त्याचा काय उद्देश होता? असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित होते. त्याची उत्तरे शोधणे अत्यावश्यक होते. वाड्यातील असुरी शक्तीशी आमना-सामना करतांना यावेळी कुठलीही कसूर ठेवून चालणार नव्हती. त्यामुळे या प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी ताईंनी जंगम वकिलाच्या घराकडे गाडी वळवली. पटवर्धन आणि राजेश यांच्यात जंगम हाच एक दुवा होता. शिवाय त्याला पटवर्धनचा सहवासही लाभला होता. त्याच्याकडून काहीतरी दुवा हाती लागण्याची शक्यता ताईंना दिसत होती..!
***क्रमशः ***
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद!
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद!
>>व्यस्ततेमुळे थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगीर आहे..पुढचे भाग वेळेत देण्याचा प्रयत्न आहे. मनःपूर्वक आभार
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग
छान. खूप दिवसांनी पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद! >> + १
पुढे काय होते त्याची उत्सुकता आहे.
पुढचा भाग खरंच लवकर टाका, फार
पुढचा भाग खरंच लवकर टाका, फार मजा येतेय!
खुप छान. पण बरेच टायपो आहेत.
खुप छान.
पण बरेच टायपो आहेत.