अॅड्रिनल ग्रंथी आणि तिची हॉर्मोन्स
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्स ही एक महत्वाची आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५० हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात.
या ग्रंथींपैकी थायरॉइड, स्वादुपिंड आणि जननेंद्रिये ह्या अगदी परिचित ग्रंथी. याव्यतिरिक्त ज्या ग्रंथी आहेत त्या सामान्यांना सहसा माहित नसतात. अशाच एका काहीशा अपरिचित पण महत्वाच्या ग्रंथीचा या लेखात परिचय करून देत आहे. त्या ग्रंथीचे नाव आहे अॅड्रिनल (adrenal) ग्रंथी. आपल्या प्रत्येक मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूस या ग्रंथी वसलेल्या आहेत. वैद्यकाच्या इतिहासात या ग्रंथींचा शोध तसा उशीराने लागला. वैज्ञानिकांचा सुरवातीस असा समज होता की ‘अॅड्रिनल’ हा मूत्रपिंडाचाच एक विशेष भाग आहे. अखेर १९व्या शतकात पुरेशा अभ्यासानंतर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाले. मूत्रपिंडालगत (renal) त्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांना अॅड्रिनल (ad-renal) हे नाव मिळाले. जेमतेम ५ ग्राम वजन असलेली ही पिटुकली ग्रंथी आहे. मात्र तिच्यात अनेक महत्वाची हॉर्मोन्स तयार होतात. त्या सर्वांचेच कार्य मोलाचे आहे आणि त्यातील काही तर जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधाराने करतो:
१. ग्रंथीची रचना व भाग
२. ग्रंथीतील हॉर्मोन्स
३. हॉर्मोन्सचे कार्य
४. ग्रंथीचे आजार
५. हॉर्मोन्सचे औषधी उपयोग
ग्रंथीची रचना व भाग
ही लहानशी ग्रंथी प्रत्येक मूत्रापिंडाच्या वरच्या बाजूस असते. तिचा रंग पिवळसर असतो (चित्र पहा).
या ग्रंथीत रक्तवाहिन्यांचे दाट जाळे असते. ग्रंथीचे दोन स्वतंत्र भाग
असतात – बाह्यपटल (cortex) आणि गाभा (medulla). हे दोन्ही भाग जरी एकत्र नांदत असले तरी त्यांची हॉर्मोन्स ही पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची आहेत; अगदी वेगळ्या कुळातील म्हणता येतील. त्यांची आता माहिती घेऊ.
ग्रंथीतील हॉर्मोन्स
१. बाह्यपटल भाग: इथे ३ प्रकारची हॉर्मोन्स तयार होतात:
अ) Glucocorticoids : यातले Cortisol हे मुख्य असते.
आ) Mineralocorticoids : यातले Aldosterone हे मुख्य.
इ) Androgens : ही लैंगिक हॉर्मोन्स आहेत पण इथे ती अत्यल्प प्रमाणात तयार होतात.
वरील सर्व हॉर्मोन्स कोलेस्टेरॉल या मेदापासून तयार होतात. त्या सर्वांना ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स असे म्हणतात.
२. गाभा : इथे Catecholamines तयार होतात आणि त्यातले मुख्य असते Adrenaline. ही हॉर्मोन्स एका अमिनो आम्लापासून बनतात.
हॉर्मोन्सचे कार्य
१. Cortisol : हे हॉर्मोन मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीच्या नियंत्रणात असते. ती ग्रंथी ACTH हे हॉर्मोन सोडते आणि त्याच्या उत्तेजनातून अॅड्रिनल Cortisol तयार करते. याच्या उत्पादनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे प्रमाण रोज सकाळच्या वेळी (८ वाजता) सर्वाधिक असते तर मध्यरात्री सर्वात कमी. हे निसर्गनियमानुसार आहे कारण सकाळच्या वेळेत आपल्याला सर्वाधिक तरतरीची गरज असते. निसर्गातील दिवस-रात्र या चक्रानुसार शरीरात एक ‘वेळनिर्देशक’ यंत्रणा असते आणि ती काही जनुकांच्या नियंत्रणात असते. त्याद्वारा या हॉर्मोनचे प्रमाण वेळेनुसार ठरवले जाते. परिणामी आपल्याला सकाळच्या वेळेस सर्वाधिक कार्यक्षम राहण्याची प्रेरणा मिळते.
या हॉर्मोनची दोन महत्वाची कार्ये अशी आहेत:
अ) पेशींतील चयापचयात ते महत्वाची भूमिका बजावते. ते इन्सुलिनच्या विरोधी गुणधर्माचे हॉर्मोन आहे. जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होऊ लागते तेव्हा ते ती वाढवायला मदत करते. तसेच जेव्हा आपण अतिरिक्त ताणतणावांना सामोरे जातो तेव्हा त्याची पातळी बरीच वाढते. म्हणूनच त्याला ‘स्ट्रेस हॉर्मोन’ असे म्हणतात.
आ) दाह-प्रतिबंधक क्रिया: जेव्हा कुठल्याही कारणाने शरीरात दाह (inflammation) होतो तेव्हा ते त्या प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते.
२. Aldosterone : याचा शरीरातील सोडियमच्या चयापचयाशी महत्वाचा संबध आहे. त्याच्या मूत्रपिंडातील कार्यामुळे रक्तातील सोडियम तसेच पोटॅशियम यांची पातळी योग्य राखली जाते. परिणामी रक्तातील पाण्याचे प्रमाण आणि रक्तदाब हे सर्व नियंत्रणात ठेवले जाते.
३. Adrenaline (Epinephrine) : ग्रंथीच्या गाभ्यात तयार होणारे हे प्रमुख हॉर्मोन. ते शरीरात जोश निर्माण करते. विशेषतः आपल्याला जेव्हा एखाद्या अवघड परिस्थितीला ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने सामोरे जायचे असते तेव्हा हे हॉर्मोन महत्वाचे ठरते. त्याची विविध कार्ये अशी आहेत:
अ) हृदयाचे ठोके आणि त्याची आकुंचन क्षमताही वाढवणे, रक्तदाब वाढवणे
आ) श्वसनाचा वेग वाढवणे आणि श्वासनलिका रुंदावणे
इ) यकृतातील चयापचय क्रियांवर परिणाम करून रक्तातील ग्लुकोज पातळी वाढवणे. या बाबतीत ते इन्सुलिनच्या विरोधी गटातील हॉर्मोन आहे.
दणकून व्यायाम करणे, भावनिक आंदोलने, तीव्र भीती वाटणे, महत्वाच्या स्पर्धा अथवा परीक्षेला सामोरे जाणे यासारख्या परिस्थितींत Adrenalineचे प्रमाण वाढते. त्याच्या शरीरातील वरील क्रियांमुळे आपण त्या परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज होतो.
एखाद्या आणीबाणीच्या (crisis) परिस्थितीत तर ते खूप मोठ्या प्रमाणात उसळते (rush) आणि त्यातून एखाद्या माणसात अचाट ताकद निर्माण होते. अशा प्रसंगी एरवी ‘काडीपैलवान’ असलेली व्यक्ती प्रचंड मोठे वजन उचलणे किंवा अशक्य वाटणारी मारामारी करणे असली कृत्ये करू शकते !
Adrenaline मुळे शरीरात निर्माण होणारा जोश हा एक प्रकारे मर्दानगीचे प्रतिक समजला जातो. या कल्पनेचा वापर व्यापारजगतात केलेला दिसतो. शर्यतींसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वेगवान मोटारसायकल्स व कार्सना “Adrenaline वाहने” असे संबोधले जाते. एखाद्या तरुणाला जर सनसनाटी, धाडशी आणि बेदरकार कृत्ये करायची सवय असेल तर त्याला “Adrenaline junkie” असे म्हणतात.
ग्रंथीचे आजार
हे आजार तसे दुर्मिळ आहेत. दोन शक्यता असतात:
अ) क्षयरोग किंवा ऑटोइम्यून आजारांत या ग्रंथीचा नाश होऊ शकतो. त्यामुळे तिच्या सर्व हॉर्मोन्सची कमतरता होते. अशा रुग्णांत वजन कमी होणे, उलट्या, डीहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
आ) काही विशिष्ट ट्युमर्समुळे या ग्रंथीची हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवतात. तसेच ही हॉर्मोन्स जर उपचार म्हणून दिली असल्यास त्यांचेही दुष्परिणाम दिसू शकतात. अशा रुग्णांत चेहरा सुजणे, पोट सुटणे व वजनवाढ, हाडे ठिसूळ होणे आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.
हॉर्मोन्सचे औषधी उपयोग
A. वर आपण पहिले की ग्रंथीच्या बाह्य विभागात ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स तयार होतात. त्यातील Cortisol हे मुख्य आहे. त्याच्याच गुणधर्माची काही कृत्रिम ‘स्टिरॉइड्स’ औषधे म्हणून वापरली जातात ( उदा. Dexamethasone). आधुनिक वैद्यकात त्यांचा वापर बऱ्यापैकी होतो. त्यांच्या गुणधर्मानुसार ती मुख्यतः खालील प्रकारच्या आजारांत वापरतात:
१. दाह कमी करण्यासाठी : दमा, सांधेदुखीचे आजार
२. अॅलर्जी कमी करण्यासाठी
३. तीव्र जंतूसंसर्ग (sepsis) झाला असताना
४. अवयव प्रत्यारोपणानंतर प्रतिकारशक्ती दाबण्यासाठी (Immunosuppresants)
५. अॅड्रिनल ग्रंथीचा पूर्ण नाश झालेला असल्यास ही हॉर्मोन्स औषधी रुपात कायम घ्यावी लागतात.
अशा विविध आजारांत स्टिरॉइड्सचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. उपचाराचा डोस आणि कालावधी यानुसार त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. विशिष्ट आजारांत स्टिरॉइड्सची बहुमोल उपयुक्तता बघता त्यांचे अटळ दुष्परिणाम सहन करावे लागतात. अर्थातच ही औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायची असतात हे वेगळे सांगायला नकोच !
B. Adrenaline हे तातडीच्या वैद्यकसेवेत इंजेक्शनद्वारा देतात. त्याचे २ मुख्य उपयोग असे:
१. ‘शॉक’ अवस्थेतील रुग्णात जेव्हा त्याचा रक्तदाब खूप कमी झालेला असतो तेव्हा.
२. एखाद्या तीव्र अॅलर्जीक प्रतिक्रियेने रुग्ण ‘शॉक’ मध्ये गेल्यास.
समारोप
मूत्रपिंडाच्या निकट सानिध्यात असलेली अॅड्रिनल ही एक लहानशी पण महत्वाची हॉर्मोन-ग्रंथी आहे. तिच्या बाह्यपटलात तयार होणारी स्टिरॉइड् हॉर्मोन्स ही जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्यापैकी रोज सकाळी अधिक प्रमाणात सोडले जाणारे Cortisol हे एक निसर्गाशी निगडित कुतूहल आहे. तर ग्रंथीच्या गाभ्यातून निघणारे Adrenaline हे आपल्यात गरजेनुसार जोश निर्माण करते. आयुष्यातील ताणतणावाच्या प्रसंगी या दोन्ही हॉर्मोन्सचे कार्य महत्वाचे असते. नैसर्गिक स्टिरॉइड् हॉर्मोन्सच्या गुणधर्माशी जुळणारी कृत्रिम ‘स्टिरॉइड्स’ ही वैद्यकातील महत्वाची औषधे आहेत. अनेक किचकट आणि गंभीर आजारांत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
****************************************************
खूपच धन्यवाद सर. कॉर्टिसॉल
खूपच धन्यवाद सर. कॉर्टिसॉल हार्मोन व रात्रपाळीत काम करणारे लोक या बाबतीत काही अभ्यास/ संशोधन झाले आहे काय.
मला नेहमीच एक आश्र्चर्य वाटत
मला नेहमीच एक आश्र्चर्य वाटत आलंय की या निरनिराळ्या ग्रंथीमधून स्रवणाऱ्या पदार्थांचा अभ्यास कसा केला गेला असेल. मृत मानवी शरीरातील ग्रंथी निष्क्रीय होत असतील. आणि चालत्या फिरत्या जिवंत शरिरातील ग्रंथींची चिरफाड करून अभ्यास करणे अशक्यच असले पाहिजे. तर नेमके हे संशोधन कसं झालं असेल.
माहितीपूर्ण लेख
माहितीपूर्ण लेख
चैतन्य , धन्यवाद .
चैतन्य , धन्यवाद .
रात्रपाळीत दीर्घकाळ काम केल्यास आपली वेळनिर्देशक यंत्रणा असते तिचा ताल बिघडतो . काही अभ्यास झालेले आहेत . हवाई सुंदरींत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.
..... ….
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सवडीने देतो.
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
माहितीपुर्ण लेख!
माहितीपुर्ण लेख!
माहीतीपूर्ण लेख .
माहीतीपूर्ण लेख .
चैतन्य,चालत्या फिरत्या जिवंत
चैतन्य,
चालत्या फिरत्या जिवंत शरिरातील ग्रंथींची चिरफाड करून अभ्यास करणे अशक्यच असले पाहिजे. तर नेमके हे संशोधन कसं झालं असेल.>>>
बरोबर.
१. बऱ्याचदा प्रथम प्रयोग प्राण्यांवर होतात. उदा. कुत्र्याचे स्वादुपिंड काढून टाकल्यावर पुढे त्याची ग्लुकोज पातळी वाढते. हे महत्वाचे निरीक्षण.
२. आधी बऱ्याच रुग्णात एखादा आजार आढळून येतो. मग उलटा विचार सुरु होतो की कुठल्या अवयवातील दोषाने हा होत असावा. असे संशोधन विकसित होत जाते.
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
नेहमीप्रमाणेच मस्त लेख!
नेहमीप्रमाणेच मस्त लेख!
कॉर्टिसोल हार्मोन आणि जाडेपणा यांचा परस्परसंबंध आहे का?
बहुतेक ह्याच adrenaline
छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर!
बहुतेक ह्याच adrenaline secretions वर आधारित Jason stathomचा २००६ साली एक अतिशयोक्तिपूर्ण मुव्हि आलेला Crank नावाचा.
देवकी, धन्यवाद.
देवकी, धन्यवाद.
*कॉर्टिसोल हार्मोन आणि जाडेपणा यांचा परस्परसंबंध आहे का? >>
चांगला प्रश्न. निरोगी अवस्थेत शरीरात जेवढे कॉर्टिसोल तयार होते त्यामुळे जाडेपणा नाही येत.
पण, ज्या आजारांत कॉर्टिसोल प्रमाणाबाहेर स्त्रवते तेव्हा मात्र रुग्णाचे वजन वाढते. ही वाढ वैशिष्ट्यपूर्ण असते. चेहरा आणि पोटाचा भाग जाड होतात आणि हातपाय मात्र होत नाहीत.
अज्ञानी,
माहितीबद्दल धन्यवाद. त्या चित्रपटाचा विषय काय आहे?
डॉ. कुमार,
डॉ. कुमार,
नेहमीप्रमाणेच मस्त लेख!
स्टेरॉईड्स गोळ्या शरीराला चांगल्या नाहीत असे म्हणतात ते कितपत खरे आहे?
साद, धन्यवाद.
साद, धन्यवाद.
स्टेरॉईड्स गोळ्या शरीराला चांगल्या नाहीत असे म्हणतात ते कितपत खरे आहे?
>>>>>
ही अर्धवट माहिती झाली. यानिमित्ताने स्टिरॉइड्स बद्दलचे गैरसमज दूर करतो:
१. योग्य वैद्यकीय तज्ञाचे सल्ल्याने आणि ठराविक काळच ती घेतल्यास नुकसान नाही.
२. काही जुनाट किचकट आजारांत त्यांचा फायदा जरूर होतो; जरी काही दुष्परिणाम सहन करावे लागले तरी. इथे फायदा व तोटा हे तराजूत घालून पाहिल्यास फायद्याची बाजू जड राहते !
३. काही गंभीर रुग्णांत ती जीवरक्षक ठरतात.
४. भोंदू मंडळी मात्र स्टिरॉइडस छुप्या पद्धतीने देऊन त्यांचा गैरवापर करीत आहेत. हे अर्थातच धोकादायक आहे.
४. भोंदू मंडळी मात्र
४. भोंदू मंडळी मात्र स्टिरॉइडस छुप्या पद्धतीने देऊन त्यांचा गैरवापर करीत आहेत. हे अर्थातच धोकादायक आहे.
> > आमच्या येथील मेडिकल मालक असलेला व्यक्ती एक्झिमा च्या त्रासाने हैराण झाला होता. अॅलोपॅथिक उपचार घेऊन फरक पडत नव्हता. कोणीतरी एका आयुर्वेद तज्ञाचे नाव सुचवले. त्याचे उपचार दोन वर्षे घेतल्यानंतर संपुर्ण शरिरावर कोडासारखे डाग आले. चाळीस वर्षे वयाच्या मेडिकल मालकाला दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू झाले. शस्त्रक्रिया करावी लागली. त्याला शंका आली तेव्हा त्या आयुर्वेदिक तज्ञाच्या औषधांमध्ये स्टेरॉईड सापडलं. आजकाल खूप शिव्या देत असतो त्या तज्ञाला.
छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर! >
छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर! >>>+999
आयुर्वेदिक तज्ञाच्या
आयुर्वेदिक तज्ञाच्या औषधांमध्ये स्टेरॉईड सापडलं. >>>>> हे बर्याचवेळा होतंय.दुर्दैवी प्रकार आहे.
हो ना. बिचारा खूप वैतागला आहे
हो ना. बिचारा खूप वैतागला आहे.
माहितीसाठी धन्यवाद, डॉक्टर.
माहितीसाठी धन्यवाद, डॉक्टर.
Adrenaline ही एक इटालियन मोटारसायकल पूर्वी सिनेमात दाखवायचे.
वरील सर्वांचे चर्चेत
वरील सर्वांचे चर्चेत सहभागाबद्दल आभार !
माणुस खुप चिडला की अ
माणुस खुप चिडला की अॅड्रेनलिन स्त्रवते, हे बरोबर का? आणि जर हे अॅड्रेनलिन योग्य प्रमाणत स्त्रवले नाही तर त्यामुळे त्याच्या शरीरावर विअपरीत परीणाम होऊ शकतो का? उदा: पक्षाघाताचा झटका?
चिवट,बरोबर. कुठल्याही
चिवट,
बरोबर. कुठल्याही तणावपूर्ण प्रसंगी ऍड्रेनॅलीन अधिक स्त्रवते. त्यामुळे तात्पुरता रक्तदाब वाढू शकतो.
पण त्यामुळे पुढे पक्षघाताचा झटका येईलच असे नाही. ते संबंधित व्यक्तीच्या एकंदर तब्बेत आणि पूर्व आजारावर अवलंबून राहील.
चिवट,बरोबर. कुठल्याही
दु प्र का टा आ.
Adrenaline आणि डोपामिन यांचा
Adrenaline आणि डोपामिन यांचा काही संबंध असतो का?
Adrenaline आणि डोपामिन यांचा
Adrenaline आणि डोपामिन यांचा काही संबंध असतो का?
>>>>
होय, असतो. ऍड्रिनल ग्रंथीच्या गाभ्यात एका अमिनो आम्लापासून तयार होणारे Catecholamines हे कुटुंब आहे. त्याचेच हे दोन्ही सदस्य आहेत. त्यांचा तयार होण्याचा क्रम असा असतो:
डोपा >> डोपामिन >> नॉरऍड्रिनलिन >>ऍड्रिनलिन
ते जे मायबोलीवर एक अतिशय
ते जे मायबोलीवर एक अतिशय ऊच्चविद्या विभुषित विद्वान डॉक्टर आहेत, ते नाही का ते सदैव समोरच्याला तुमच्या प्रज्ञेच्या तराजूत चुकून माप पडल्यासारखे ऊपकृत करून बोलत असतात, अहो ते नाही का ते प्रेमाने बोलले तरी त्यांच्या वाणीतून मर्मस्थानी रेशमी असूडाचे फटकारे मारल्यासारखी शब्दसंपदा बाहेर पडते ... हां बरोबर तेच ते... ते कधी येत नाहीत का ह्या मेडिकलच्या धाग्यांवर लेखकाशी किंवा वाचकांशी हितगूज साधायला?

एका डॉक्टरने दुसर्या डॉक्टरच्या श्ब्दाला अनुमोदनही द्यायचे नाही आणि खोटेही पाडायचे नाही असा काही अलिखित नियम/करार झाला आहे का विपूमध्ये?
हाब भाऊ नाव घ्याना डायरेक्ट.
हाब भाऊ नाव घ्याना डायरेक्ट. किती आडून आडून बाण मारता हो.
आरारा येत नाहीत ते बरं आहे.
आरारा येत नाहीत ते बरं आहे.
ऑनलाईन फोरम वर जुजबी माहितीच्या आधारे निदान/ उपचार करण्याचा डायरेक्ट नसेल कदाचित पण इन-डायरेक्ट हेतू आहे असं मला वरकरणी तरी वाटतंय. ते चूक असलं आणि तो हेतू अजिबात नसला तरी चार आंधळ्यांच्या गोष्टीसारखं लिमिटेड स्कोप मधली माहिती फक्त बघून त्यावरून अंदाज बांधणे मला स्वतःला धोकादायक वाटते. वाचक एक्स्ट्रापोलेट कसं करतील काही सांगता येत नाही. ते करणं ही सर्वस्वी त्यांची (वाचकांची) चूक असली तरी त्या दिशेने पाऊल पडू नये म्हणून काही करता येणं शक्य असेल तर ते करावं असं मला वाटतं.
असे लेख माहिती म्हणूनच ठेवावे, त्यावर चर्चा करताना मला स्वतःला ह्या एक्स्ट्रापोलेशनच्या भितीने मायबोलीपेक्षा जास्त ओपन फोरमवर चर्चा असवी असं वाटतं.
अर्थात हे सर्वस्वी माझं मत झालं.
कुमार सरांचे लेखन म्हणजे
कुमार सरांचे लेखन म्हणजे हातचं काहीही राखून नं ठेवता जेजे आपणासी ठावे ते इतरां सांगावे असेच आहे. महत्त्वाचे म्हणजे शंका निरसन खूप छान करतात. माबोवरील सज्जन, कोणत्याही वादात न अडकणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत ते.
डॉ. कुमार, माहितीबद्दल अनेक
डॉ. कुमार, माहितीबद्दल अनेक आभार.
पार्किन्सनच्या संदर्भात डोपामिन चा उल्लेख वाचनात येतो म्हणून विचारले.
आपण एकदा या आजारावरही लिहावे अशी विनंती.
Pages