सुनेत्रा !!

Submitted by Sujata Siddha on 30 July, 2019 - 04:49

सुनेत्रा !!!

तिन्हेसांजेची वेळ असून काळोख मात्र गच्च दाटून आला होता !....वर आभाळाकडे बघत सुनेत्राने पायाची गती वाढवली , आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस केव्हा कोसळेल भरवसा नाही , ड्रेस भिजला तर सगळ्या अंगाला चिकटून बसेल , त्यात ओढणी नाहीये , अरे देवा .. मान झटकून तिने पायाचा वेग वाढवला . लांबून शोभा काकींचा बंगला दिसला तस तिला हायसं वाटलं , काकींचा बंगला बैठा असला तरी त्याला एक सुरेख गोलाई होती , गरत्या बाईला असते तशी, एखादी गरती बाई साडीचा पसारा न आवरता मांडी घालून बसल्यावर जशी दिसेल तसा बंगला दिसे , गावापासून दूर आणि एकाकी. सुनेत्रा त्याच्या आवारात खेळतच लहानाची मोठी झालेली , तिची आई तिथे स्वयंपाकाला येत असे. ,फाटकाशी यायला आणि पाऊस कोसळायला एकच गाठ झाली , फाटक उघडून दारात येईपर्यंत सुनेत्रा भिजलीच , घाईघाईने तीने बेल वाजवली आणि तिच्या लक्षात आलं कि लाईट गेले आहेत , मग बेलचा नाद सोडून तिनं हातानं दारावर थापा मारायला सुरूवात केली,'काकी SSSSSS ,शोभा काकी SSS “ आतून काही प्रतिसाद आला नाही , “कोणीच नाही कि काय घरात ? पण असं कसं होईल ? पाहुणे येणार, मदतीला ये असा त्यांचाच निरोप आला होता ना !”
"काकी SSSSSS. "शोभा काकी SSSSSS " सुनेत्राने पुन्हा हाक दिली . आजूबाजूच्या त्या नीरव शांततेत फक्त पावसाची रिपरिप चालू होती , दार कोणी उघडत नाहीये असं बघून , बंगल्याच्या भोवतीचा पालापाचोळा पावसात तुडवत ती मागच्या दाराशी आली ,चेहेऱ्यावरच ओघळणारं पाणी टिपत तिनं परत हाका मारायला सुरूवात केली , "शोभा काकी SSSSSSSS " काहीच आवाज येईना तशी ती वैतागली ,परत पुढच्या दारात आली, आणि काही चाहूल दिसली नाही म्हणून परत जायला निघाली , तेवढ्यात करकर करकर आवाज करत बाहेरचं फाटक वाजलं , ती वळून मागे बघतच होती तोच इकडे दारही उघडलं , " .... आलीस ?..ये ना ".... खोल आणि अंधाऱ्या विहिरूतून यावा तसा शोभा काकींचा आवाज आला , " केव्हाची वाट पहातेय तुझी ग .., उशीर केलास खूप ..."
“ मघापासून मी हाका मारतेय काकी पण काही आवाजच येत नव्हता , मला वाटलं पावसा मुळे कॅन्सल झालं असेल पाहुण्यांचं येणं ,
आणि लाईट्स केव्हा गेले ? इन्व्हर्टर लागला नाही का? ....सुनेत्रा बोलत बोलत अजून चप्पल काढतेच आहे तोवर, तिच्यामागे धाडदिशी दार आपटून बंद झालं , डोळ्यासमोर एकदम मिट्ट काळोख !.... ती क्षणभर तिथेच स्तब्ध झाली , शोभा काकींना झालंय तरी काय आज? एवढ्या काय भांबावल्या आहेत, कांदेपोह्याचा प्रोग्राम असल्यासारख्या !...
सवयीने ती उजव्या हाताला असलेल्या स्वयंपाक घराकडे वळली , "काकी एव्हढी थंडी वाजतेय ,दात कडकड वाजतायत नुसते बघाना , जरा गॅस वर हात शेकू ? ,” बोलता बोलता ,सुनेत्राने गॅस चं बटन चालू केलं . काकींचा काहीच आवाज आला नाही तसं तिने मागे वळून पाहिलं ,होतं कुठे तिथ कोण ? जिथंपर्यत नजर जाईल तिथपर्यत फक्त मिट्ट काळोख…. !!! वरच्या रूममध्ये गेल्या का ? , .शोभा काकींच असं काहीच न बोलता जाणं तिला जरा खटकलं पण मग 'असेल त्यांना कामाच टेंशन ' असा सुज्ञ विचार करून , ओले कपडे अंगावरच पिळून ती मेणबत्ती शोधायला लागली, समजा आले अचानक पाहुणे तर शोभा काकींची फजिती नको , आपण अंदाजाने सुरूवात तर करू स्वयंपाकाला , आधी कणिक मळून पोळ्या करू , मेणबत्तीचा नाद सोडून सुनेत्राने नेहेमीच्या जागेवर असलेला पिठाचा डबा शोधून काढला , हळू हळू डोळे अंधाराला सरावले तसं तिने गॅस पेटवून पोळ्या करायला सुरुवात केली , शेवटची पोळी लाटून झाली आणि सुनेत्राच्या एकदम लक्षात आलं , अजून लाईट आले नाहीत आणि शोभा काकीही !!.., अंगावरचे कपडे निम्मे ओले निम्मे वाळलेले , ती तशीच चाचपडत वर शोभाककींच्या खोलीत निघाली , सगळ्या बंगल्यात अंधार भरून राहिला होता , सरावातलंच घर पण आज किती अंगावर येत होतं , वरच्या मजल्यावर कोणीही नव्हतं , अचानक कुठे गायब झाल्या या ? परत खाली येऊन ती पुढच्या दोन्ही खोल्यांमध्ये शोधून आली , कुठेच नाहीत या , मग मात्र ती खुर्चीवर बसून राहिली , वाट बघत ,किती वेळ गेला कुणास ठाऊक , पाऊस चालूच होता ,, समोरचा कळाकुट्ट अंधार जाईना , एरवीही इतका काळोख असतो ? इतका …? क्षणभर सुनेत्रा ला वाटून गेलं , नक्की लाईट्स गेलेत ना ? की आपण आंधळे झालो ? या विचारसरशी तिला धस्स झालं , छे मघाशी गॅस च्या ज्वाळा दिसल्या कि ,मग परत उठून हाताच्या अंदाजाने नेत्रा पुढे पुढे सरकत , हॉलच्या डाव्या बाजूला असलेल्या अरूंद खिडकीशी आली , पडदा बाजूला केला , देवा !.... जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यत घनदाट काळोख, कधी येणार हे लाईट्स ? घरी जायचंय लवकर ,आईला बरं नाहीये घरचा स्वयंपाक करायचाय , शिवाय उद्या कॉलेजला जर्नल submission आहे , कुठून आलो असं झालं तिला ,आईपण ना, सांगितलं असतं या काकींना एखादा दिवस नाही जमते तर काय झालं असतं ?आता बसा काकी लवकर नाही आल्या तर काय करायचं ? पण त्या गेल्या कुठे ? !!! तशीच पुढे चाचपडत मग ती दारापर्यँत आली , दार मघाशीच लॉक झालं होतं , “आता काय करू ?” … शोभा काकी SSSSSSSSS " ती जोरात ओरडली ,त्या शांततेत तिचाच आवाज तिला विचित्र , चिरका वाटला . घरात कोणीही नव्हतं ,
मोबाईल !..शीट!.. आत किचनमध्ये राहिला वाटत , तिला एकदम आठवण झाली , शी किती मूर्ख आहे मी मघाशीच का नाही सुचलं हे मला ? पुन्हा एकदा चाचपडत ती किचन मध्ये आली , आणि तिथेच थबकली ,तिला आठवलं ' आपण येताना काहीच घेऊन आलो नाही , ' आईच्या ओरडण्याकडे लक्ष न देता घाईने निघालो , ती बिचारी म्हणत होती , पर्स घेऊन जा , मोबाईल घेऊन जा" आईच्या आठवणीसरशी नेत्रा चे डोळे भरून आले , ती येईल नक्की शोधायला , आई फार रात्र करून येऊ नकोस ग , लवकर ये ...' नेत्राचे डोळे पाझरायला लागले , किती तरी वेळ ती एकटीच रडत राहिली , किती वेळ गेला माहिती नाही , ती येऊन आता तीन -चार तास झाले होते , आजूबाजूला वस्ती फारशी नाही , जाताना असाच अंधार असेल तर काय करायच ? , ताप होता आईच्या अंगात म्हणून आपण आलो , आणि असे अडकून पडलो ,पण येईल आई तरी ,येईल धडपडत बिचारी , नाहीतर शोभा काकीना सांगेल फोन करून की नेत्रा ला रात्री एकट दुकट घरी पाठवू नका , पण शोभा काकींचाच पत्ता नाही , ती परत हॉलमध्ये आली ,फोन !.... माय गॉड!.. लॅन्ड्लाईन आहे की इथे , याच्यावरून कॉल करू , तिने रीसीव्हर हातात घेतला मात्र , फोन डेड होता , नेत्रा मटकन खाली बसली ,आणि अचानक एक विचार मनात आला ... ती आली तेव्हा शोभा काकीनी दार उघडल त्यानंतर त्या तिला कुठेच दिसल्या नाहीत , दारही लगेच बंद झालं ,आणि मघाशी तिने ओढून बघितलं तर ते लॉक झालं होतं , मग त्या आत गेल्या की बाहेर ? कि आपल्याला आत ठेऊन गेल्या ? पण त्या गेल्या तरी कुठे ? कुठल्या दिशेने गेल्या ? नेत्रा स्मृतीला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करायला लागली , आपण बोलत बोलत थेट किचन मध्ये आलो , मग एकदम दार बंद झालं , समोर काळोखात काहीच दिसलं नाही , त्यांचा आवाज पण नाही . अशा कशा गायब होतील एकदम ? कुठे शोधू ?काय करू ?काय करू ?....
बाल्कनी !..देवा !.. . आपण बाल्कनीतून उतरून जाऊ शकतो , नेत्रा चाचपडत वरच्या बाल्कनीत गेली , बाल्कनी फारशी उंच नव्हती , आणि समोर जरी खूप अंधार होता तरी ही बाल्कनी बगीच्याच्या बाजूला होती., खाली उडी मारून उतरू मग पुढे फटकापर्यंत असच अंदाजाने जाऊ आणि एकदा रस्त्यावर पोहोचलो की मग बघू काय करायच , तिने अंदाज घेऊन उडी मारली ,थोडफार खरचटल पण आपण बाहेर पडलो याचा तिला आनंद झाला , आता पुढे चाचपड्त फाटका पर्यत , मग रस्ता , तिला वाटल , सुटलो !... पाय आणि हाताच्या अंदाजाने पुढे चालताना तिच्या लक्षात आल की हे जास्त अवघड झालय , बंगल्यात वस्तू , फर्निचर च्या अंदाजाने आपण हात लावून चाचपड्त पुढे जाऊ शकत होतो , इथे ते नाही , त्यामुळे कुठल्या दिशेला फाटक आहे , हे कळायलाही मार्ग नाही ,पावसाने सगळा चिखल झालाय आणि रात्री रस्ता सापडलाच नाही तर ? कुठे भटकायच ?
लहानपणा पासून येतोय आपण इथे , मागचं जंगल आणि बंगल्याचं एकाकीपण आपल्या लक्षात कसं नाही आलं ?
आजूबाजूला काळोखाच साम्राज्य असताना कुठे भटकायच ? पावसात एखादा विषारी किडा , साप आला तर काय कळणार आपल्याला ? त्यापेक्षा वर बंगल्यातच बरे होतो आपण ,निदान सुरक्षित तरी होतो , परत आत जाण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून तिने जिवाच्या आकांताने किंकाळी फोडली , "कुणी आहे का? मी सुनेत्रा ..या बंगल्यात अडकून पडलेय ,मागचे किती तरी तास ... आहे का कुणी ?" काहीही प्रतिसाद आला नाही ,जणू ती मानवी वस्तीत नव्हतीच , खरंच हा बंगला असा एकाकी आहे हे आपल्याला जाणवलं कसं नाही आत्तापर्यँत ?

पुन्हा धडपडत ती बाल्कनीतून वर आली ,बंगल्यात एवढी रात्र कशी बशी काढून तिने सकाळी बागेतून उतरून घरी जायच ठरवलं , आत उतरून अंदाजाने सोफ्यापाशी येऊन तिने धाड्कन अंग टाकलं , मानसिक आणि शारीरिक थकव्याने तिचा डोळा लागला .
किती वेळ गेला कोण जाणे , पोटातल्या भुकेने तिला जाग आली , डोळे उघडल्यावर क्षणभर आठवलं नाही आपण कुठे आहोत ,समोरचा काळा अंधार आरपार डोळ्यात घुसला आणि भीतीची एक लाट सरसरत तिच्या पायावरून वरपर्यँत गेली .अजून आपण बंगल्यातच आहोत , भयाण आणि एकाकी अवस्थेत , शोभा काकी आल्याचं नाहीत . ती परत परत सगळं आठवायचा प्रयत्न करू लागली , अचानक तिला आठवलं की आपण जेव्हा बंगल्यापाशी (किती वेळापूर्वी कोण जाणे ? ) आलो तेव्हा दार उघडायच्या आधी बाहेरचं फाटकही करकर आवाज करत उघडलं होत ..मग कोणी आत आलं होतं बाहेर कि गेलं होतं ? कि शोभा काकीचं बाहेर गेल्या ? पण मग आपल्याशी कोण बोललं ? ,तेच तेच विचार करून तिचा मेंदू शिणून गेला , कशाशी काहीच सांगड लागत नव्हती , आणि पोटात भुकेने आगीचा लोळ उठलाय याची जाणीव तीला झाली , सोफ्यावरून ती उठली आणि चाचपडत किचन मध्ये आली , किचनच्या ओट्यावर तिने अंदाजे हात फिरवून बघितला , पोळ्या होत्या !... सुनेत्राला हायसं वाटलं .. तिनेच करून ठेवल्या होत्या एका ताटात ती आली तेव्हा आणि वर झाकण ठेवलेलं , गार झाल्यावर डब्यात ठेउ म्हणून , ती आनंदाने ताट उघडायला गेली आणि जोराचा भपकारा आला , तिने हाताने चाचपडून पाहिलं , ताटात फक्त बुरशीचा लगदा होता ,’ओ माय गॉड !....हे काय ?? असं कसं होईल ?एका दिवसात कशी बुरशी लागेल?इतका वेळ सरळ विचार करणाऱ्या सुनेत्राला आता मात्र ,काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायला लागली .हे काहीतरी अमानवी आहे , मला इथे अडकून नक्की किती दिवस झालेत ? शोभा काकी कुठे गायब झाल्या ?आईही कशी आली नाही शोधायला ? नक्की मी आहे तरी कुठे ? हे हे सगळं काय आहे ? कसल्यातरी विचित्र जाणिवेनं दोन पावलं मागे सरकून तिने जीवघेणी किंकाळी फोडली “आई sssssssss !...”.

“ ए सुन्या , आत्ता इथे एक किंकाळी ऐकू आली !...” चंदनवाडीच्या च्या घनदाट जंगलातून दोन मित्र चालले होते त्यातल्या एकानं दचकून म्हटलं , त्याबरोबर दुसऱ्या मुलाचा चालण्याचा वेग वाढला , जवळ जवळ पळतच निघाला तो , “अन्या चल पट्कन , आयला इतके दिवस आज्जी सांगत होती मी कधी विश्वास ठेवला नाही , अन्या पळ लवकर , हि जागा बाधित आहे ,इथं दिवसा ढवळ्या, वेळी अवेळी एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येतात ,आईच्या नावाने टाहो फोडत असते !!!!!…

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय जबराट लिहिलंय.
पण पोळीला बुरशी लागण्याचा एकच प्रसंग डबल लिहिल्या गेलाय..

बापरे!
हो एक प्रसंग डबल झालाय.

छान!!

बिचार्‍या पोरीची दया आली Sad

आवडली कथा, वातावरण निर्मिती छान साधली आहे

छान लिहिलय.
मला वाटतं कथेतले मुख्य पात्र तो बंगला आहे त्यामुळे कथेचे नाव सुद्धा त्याच अनुषंगाने असावे.
सुनेत्रा, शोभा असा पात्रांच्या नावाने फार फरक पडत नाही.

छानेय भूतबांग्ला कथा!

> शोभा काकी कुठे गायब झाआईही कशी आली नाही शोधायला ? > झाली? आईही

मला वाटतं कथेतले मुख्य पात्र तो बंगला आहे त्यामुळे कथेचे नाव सुद्धा त्याच अनुषंगाने असावे. >> अनुमोदन

बाब्बो! जबरी.
नाव बदला कथेचं.
काहीतरी ढॅणट्डँग असं ठेवा.

कथा छान म्हणावी तर सुनेत्रा ला अडकविणारी व्यक्ती/ शक्ती कोण आहे व कोणत्या कारणासाठी तिला अडकविण्यात आले हे कळलं नाही. सुनेत्रा ची आई नंतर तिथं आली कि नाही, का आली नाही. मला तरी पटली नाही.

धन्यवाद !... विनिता.झक्कास , हर्पेन , किल्ली, रश्मी.. anjali_kool , मी अश्विनी , मित, ॲमी, आसा. , सस्मित आणि चैतन्य रामसेवक.''
चैतन्य , हि एक गूढ कथा आहे , त्याला लॉजिक नसतंच , infact आपल्या लॉजिक च्या बाहेर त्या जातात म्हणूनच impact करतात , आणि म्हणून त्यानां गूढ कथा म्हणतात .

हि एक गूढ कथा आहे , त्याला लॉजिक नसतंच , infact आपल्या लॉजिक च्या बाहेर त्या जातात म्हणूनच impact करतात , आणि म्हणून त्यानां गूढ कथा म्हणतात . >> बापरे! खरंच की काय. भारीच!

Happy

मला वाटलं मी प्रतिसाद लिहिलेला आहे..... पण आज धागा वर आला तर माझा प्रतिसाद दिसत नाहीये यावर हे लक्षात आले.

मस्त भावनांचा गुंता मांडला आणि शेवट नीट लिहिलात.

मला प्रश्न पडलेत, शोभा काकूंचे नक्की काय झाले, एकाच दिवसात त्या भूत बनल्या कश्या? आणि बंगला झपाटलेला का झाला??
बाकी भयकथा मला फार आवडतात. Happy

हि एक गूढ कथा आहे , त्याला लॉजिक नसतंच , infact आपल्या लॉजिक च्या बाहेर त्या जातात म्हणूनच impact करतात , आणि म्हणून त्यानां गूढ कथा म्हणतात .>>>> असहमत.

Pages