१४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग
डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.
माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!
माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत
माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना
माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन
माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना
माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!
माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट
माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल
माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री
माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप
माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना
माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी
माझं "पलायन" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू
मुंबई मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर ठरवलं की, रनिंग तर सुरू ठेवायचंच, पण दर महिन्याला एक लाँग रन करायचा. तरच मॅरेथॉनचा फिटनेस/ स्टॅमिना टिकून राहील. म्हणून जानेवारीनंतर मार्चमध्ये एकदा २५ किमी पळालो व एप्रिलमध्ये २२ किमी पळालो. छोटे रन्स सुरूच राहिले. तसंच सायकलिंग, चालणं, योग, स्ट्रेंदनिंग हे आता जगण्याचा भाग बनले. ते 'करावे' लागत नाहीत. किंबहुना ते न करून चालतच नाही.
कोणतीही गोष्ट आपण शिकत असतो तोपर्यंत ठीक असतं. पण एक ना एक दिवस ती इंटर्नलाईझ करायची असते. जीवनशैलीत तिचा समावेश व्हायला पाहिजे. ती गोष्ट एक स्वतंत्र activity राहायला नको. जीवनशैली व जीवनदृष्टीमध्ये तिचा समावेश व्हायला पाहिजे. जसं रनिंगसोबत चालणं एक व्यायाम म्हणून सुरू केलं. आणि मग छोट्या आणी नंतर मोठ्या अंतरासाठीही लिफ्ट घेणं- रिक्षा करणं कमी झालं. चालण्यातली मजाही कळत गेली. आणि नंतर तर जसं सायकलीवर नवीन जागी फिरायला जायचो, तसंच चालत जाऊन दूर फिरायला लागलो. नव्या जागाही चालतच एक्स्प्लोर केल्या. रोजच्या रूटीनमध्ये जिथे कुठे चालण्याची संधी मिळेल, ती दोन्ही पायांनी घेत राहिलो. आणि अशा संधी नेहमी असतातच. चालणं हा खूपच श्रेष्ठ व्यायाम आहे. कधीही, कुठेही. घरातल्या खोलीत बोलतानाही किंवा कुठे वेटिंग करतानासुद्धा. त्याचे फायदेही रनिंग सारखेच आहेत. आणि आपल्याकडे जर सजगता असेल, तर कोणतीही गोष्ट रुपांतरित होऊ शकते. जसं भगवान बुद्धांनी चालण्याचंही एक ध्यान केलं होतं. विपश्यनेत जसा येणारा व जाणारा श्वास बघितला जातो, तसंच चालण्याच्या ध्यानामध्ये पायाने होणारं संतुलन बघितलं जातं. कुठे संतुलन एका पायावर आहे आणि केव्हा दुस-या पायावर आहे. हे बघता बघता जेव्हा संतुलन दोन्ही पायांच्या दरम्यान असते, तो सूक्ष्म क्षणही आपण बघू शकतो. आणि तीसुद्धा विपश्यनाच आहे. असो.
एक हाफ मॅरेथॉन आणि मग फुल मॅरेथॉन केल्यानंतर आता कोणत्या ईव्हेंटची इच्छा नाही. कारण त्यामध्ये ईव्हेंटला जाण्याची काही गरज वाटत नाही. मला जेव्हा जितकं पाहिजे, तितकं मी पळू शकतो. माझ्यासाठी टायमिंग किंवा लोकांना दाखवण्यापेक्षा त्यातली प्रक्रियाच जास्त एंजॉयेबल आहे. अगदी सोलो सायकलिंगसारखं! तल्लीन होऊन एकट्याने रनिंग करतानाही मला तितकीच मजा येते. कदाचित अनेकांना अशी मजा ईव्हेंटमध्येही येत असेल. आपली आपली आवड आणि शैली!
माझ्या दृष्टीने रनिंग फक्त रनिंग नाही. त्यामध्ये एक स्वस्थ जीवनशैलीसुद्धा आहे. फक्त व्यायाम नाही, आहाराबद्दल सजगता, व्यायामाच्या मानसिक पैलूंवरही लक्ष दिलं जायला हवं. माझ्यासाठी रनिंगचा हा सर्वांत मोठा लाभ आहे. रनिंगमुळे एक आत्मविश्वास मिळाला, एक उत्साह मिळाला व तो सायकलिंगमध्ये उपयोगी तर पडलाच, पण जगताना इतर प्रकारेही उपयोगी ठरला.
मार्च- एप्रिलनंतर मोठे रन नाही होऊ शकले. पण रनिंगबद्दल एक नवीन अनुभव आला. मॅरेथॉननंतरही सायकलिंग- वॉकिंग हे सगळं सुरू होतं. त्यामुळे रनिंगमध्ये सुधारणा येत राहिली. आणि एप्रिलनंतर तर रनिंगचा पेसही वाढला; म्हणजे पेस कमी झाला (म्हणजे एक किलोमीटर पळायला कमी वेळ लागू लागला). पहिल्यांदा पाच किलोमीटर अर्ध्या तासाच्या आत पळता आले आणि नंतर तर दहा किलोमीटरही एक तासाच्या आत पूर्ण झाले. खरोखर एक रनर आणि एथलीट म्हणून हे खूप समाधानकारक वाटलं.
रनिंगची स्पीड वाढण्यामागचं आणखी एक कारण कळालं. ते माझे रनिंगचे मार्गदर्शक संजय बनसकर सरांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, मार्च- एप्रिलमध्ये जेव्हा हवा पातळ असते व हवामान स्वच्छ असतं (ढग, आर्द्रतेचा अभाव), तेव्हा श्वास शरीराला जास्त ऊर्जा देतो. त्यामुळे रनिंगमध्ये जास्त फोर्स मिळतो व तो जड हवेच्या दिवसांमध्ये (जशी पावसाळी किंवा थंड हवा) तितका मिलत नाही. पण मार्च- एप्रिलमध्ये उष्णताही असते. त्यामुळे गमतीची गोष्ट म्हणजे जरी फास्ट पळता आलं तरी मोठे रन करताना अडचण येते. घसा लवकर कोरडा होतो; घामाने भिजायला होतं. रनिंगच्या अशा गोष्टी अजूनही शिकतोय, समजून घेतोय. सध्या तरी समोर काही उद्दिष्ट नाही. मध्ये मध्ये जेव्हा जास्त सायकल चालवेन, तेव्हा रनिंगमध्ये थोडी गॅपही येईल. पण पूर्ण प्रयत्न करेन की सलग अशी गॅप पडणार नाही. कमीत कमी छोटे रन तरी सुरू राहतील.
ही लेखमाला वाचल्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद! आणि रनिंग, वॉकिंग किंवा अन्य कोणताही फिटनेस व्यायाम करण्यासाठी/ पुढे सुरू ठेवण्यासाठी आपल्यालाही अनेक शुभेच्छा!
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
ही लेखमाला अगदी क्रमाने
ही लेखमाला अगदी क्रमाने संपूर्ण वाचली नाही पण काही भाग वाचले आणि आवडले. हा भाग अंतिम असल्याने आता विचारतो.
१) एक सामान्य तरुण (गावाकडे वाढलेला) , कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला धावला तर एक तासात किती अंतर जाईल? ताशी वेग काय असतो?
२) हेच अंतर भारतीय/परदेशी आशिया/युअरोपिअन/आफ्रिकन देशांत वेगळे असेल का?
क्रमांक १ आणि २ मध्ये नैसर्गिक फरक बराच असला तर आपली ध्येये साध्य करण्यातही कष्ट वाढतील. कारण दमण्याची क्रिया लवकर होईल.
लेखमालेत तुमचे वेगवेगळे अनुभव
लेखमालेत तुमचे वेगवेगळे अनुभव वाचले आणि चालायला सुरवात केलेली पण आता त्यात खंड पडायला लागलाय. तरी त्यात सातत्य ठेवायचा प्रयत्न चालु आहे.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!
@ Srd, मला वाटतं गतीचं इतकं नीट सांगता येणार नाही. अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. व्यक्ती व्यक्तीत फरक असू शकतो. आणि मला वाटतं जेनेटीक व परिस्थितीजन्य लाभ काही प्रमाणात कदाचित असला किंवा नसला कोणाला तरी तसा विचार करणं फारसं बरोबर नाही. शेवटी खरी स्पर्धा स्वतःसोबतच असते.
खुपच सुन्दर लेखन
खुपच सुन्दर लेखन