बटाट्याचा कीस

Submitted by योकु on 9 July, 2019 - 18:15
batata kiss
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा नेहेमी केला जाणारा प्रकार आहे. पण साबा जरा जाड किसाचा करतात ते पाहून स्पे. मोठ्या भोकाची किसणी आणून केला. त्याची ही कृती.
प्रमाण तीन लोकांकरता.
७-८ मध्यम आकाराचे बटाटे
वाटीभर खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जरा जाडसर कूट (थोडा कमीजास्त लागू शकेल)
हवं असेल तर लाल तिखट
तिखटपणा जसा हवा असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या
मीठ, साखर, जिरं आणि शेंगदाण्याचं तेल किंवा साजुक तूप

क्रमवार पाककृती: 

बटाटे सालासकट स्वच्छ धूवून मोठ्या भोकाच्या किसणीनं किसून घ्यावेत. हा कीस दोनदा पाण्यानी स्वच्छ धूवून रोवळीत किंवा मोठ्या गाळण्यात निथळत ठेवावा. फोडणीत पडण्याआधी किसातलं पाणी पूर्णपणे निघून जायला हवंय.
मोठ्या (म्हणजे कीस परतायला पातेल्याची उंची, रूंदी बरी पडते) जाड बुडाच्या पातेल्यात (पितळी वगैरे असेल तर उत्तमच. लोखंडी कढई, भांड इथे वापरायचं नाहीय) जरा दमदमीत तेल किंवा तूप तापवून जिरं, मिरची घालून फोडणी करावी वर कीस घालावा. मोठ्याच आचेवर चांगले २/४ मिनिटं लांब दांड्याच्या सरात्यानं किंवा झार्‍यानं कीस परतावा.
तेल सगळं नीट माखलं की वर झाकण घालून १० मिनिटं वाफवावा. मध्ये एकदोनदा हलवायला लागेल. ८०% झाला की यात चवीनुसार मीठ, साखर आणि कोरडसर होईल इतपत दाण्याचं कूट घालून नीट हलवून घ्यावं. झाकण घालून अजून एक पाच मिनिटं वाफ द्यावी. बटाट्याचा खमंग कीस गरमागरमच खायला घ्यावा, सोबत साधं दही घ्यावं. सुरेख लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन व्यक्तींकरता
अधिक टिपा: 

- मोठं भांडं + लांब सराता/ झारा मुद्दामच लिहिलाय कारण लहान चमचा वगेइरे असेल तर कीस नीट एकसारखा मिसळता येत नाही
- जरा भांड्याच्या तळाला लागलेला कीस (खरपुडी) फारच उत्तम लागतो
- लाल तिखट वापरणार असाल तर फोडणीतच घालायचं आहे
- लोखंडी कढई, भांडं वापरू नका. तयार कीस फारच काळपट होतो.
- वर लिंबाचा रस ही घालता येइल. त्याचीही सुरेख चव येते.

इथे अजून एक कृती आहे - वेकापा -१ : बटाट्याचा कीस

माहितीचा स्रोत: 
नेहेमी केल्या जाणारा प्रकार आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आळस. पदार्थ केल्यावर फोटो काढण्याइतका धीर नसतो आणि मोबाईलवर चे फोटो ऑफिस पिसी वर घेऊन अपलोड करणं कटकटीचं आहे/वाटतं; एकूणात केल्या जात नाही हे खरं...

मस्त!
तुम्हालाच फक्त रेसिपीबरोबर 'लोखंडी कढई वापरू नका' असं खास लिहावं लागतं Wink

भारी प्रकरण आहे. बटाटा कोणत्याही रुपात आवडतोच.
वावे सणसणीत तापलेली कढई नसली तरी दमदमीत तुप आहेच. युद्धज्वर चढावा तसा स्वयपाकज्वर चढतो अशा शब्दांनी. ही खासीयत आहे योकु यांच्या पाकृची. Happy
योकू विपू पहा.

वा वा!! मस्त , आज करतेच रात्री जेवायला!! तुमच्या पाककृती माझ्या माहेरच्या स्वयंपाकाची खूप आठवण करून देतात. पद्धतीमधे खूप साम्य आहे! दे.ब्रा. स्पेशल!

मस्तच, आषाढी एकादशी जवळ आलीय, वेळेवर रेसिपी आहे-अन्जू ++१

वा छान रेसिपी.
लाल तिखट वगळुन एकादशी स्पेशल मेन्यु म्हणुन करता येईल.
साबुदाण्याला तेवढाच आराम.

सणसणीत तापलेली कढई नसली तरी दमदमीत तुप आहेच. ही खासीयत आहे योकु यांच्या पाकृची. >>>> +१.

अन्जू,सुरणाच्या किसामधे खाजरेपणा जावा म्हणून सोलं(कोकमं)टाकता का?

हो देवकी, आई कोकम किंवा आंबट ताक घालायची. मी नाही करत. मी भाजी करते सुरण, बटाटा, लाल भोपळा मिक्स उपासाची त्यात कोकम must.

भारी प्रकरण आहे. बटाटा कोणत्याही रुपात आवडतोच.
वावे सणसणीत तापलेली कढई नसली तरी दमदमीत तुप आहेच. युद्धज्वर चढावा तसा स्वयपाकज्वर चढतो अशा शब्दांनी. ही खासीयत आहे योकु यांच्या पाकृची. Happy >>>>>>++१११११ योकु यांच्या पाकृच्या अदृष्य चाहत्यांपैकी मी एक आहे. रोमात असते. Happy

ही एकदम फिट रेसीपी आहे. फक्त लक्षात असूद्या खिचडी, बटाटा पूर्ण किंवा जास्त स्टार्ची पदार्थ आहेत. चव कंफर्ट फूड म्हणून बेस्ट पण लो कार्ब नाहीत. आमच्या लहान पणी, पाकिटा तले चिप्स वगैरे फार कमी उपलब्ध असत व आणले जात नसत त्याहूनही. तर एकदा असेच आईने नेहमीच्या किसणीतून बारीक कीस काढला बटाट्याचा व तळून घेतला. मग शेंगदाणे तळून घेतले. हे सर्व हलक्या हाताने एकत्र करून त्यात वरून तिखट मीठ व पिठी साखर चिमूट भर व जिरे पाव्डर शिवरली. एकदम भन्नाट चिवडा होतो. हाय कॅलरी पदार्त पण एखादी वाटी कधीतरी खायला मस्त लागतो. योकू एकदा करून बघ.

अमा तो चिवडा जाम भारी लागतो, करायचे मी पूर्वी, आई किस द्यायची तिने केलेला म्हणजे मी आईला मदत करायला जायचे, हल्ली नाही होत, विकतच्या किसाची मजा नाही तेवढी.

आई फार सुंदर करायची माझ्यापेक्षा हा चिवडा. जिरे मात्र नाही घालायचो आम्ही. दाणे तिखट मीठ साखर एवढंच.

फोटो एकदम तोंपासू आहे सायो!
अमा करून पाहायला हवं ते प्रकरण.

बटाट्या ऐवजी पोटॅटो नक्कीच वापरू शकाल. फक्त ते प**, युनिकॉर्न चे शिंग वगैरे वापरू नका Wink

रच्याकने, ती वेफर्स ची भाजी सुद्धा अफलातून होते असं ऐकून आहे. करून पाहीन तीही एकदा...

रेसिपी छान आहे .
भांड्याच्या तळाला लागलेला कीस (खरपुडी) मला ही खुप आवडते.
अमा नी वर दिलेला बटाट्याचा चिवडा माझी आई देखील करते. बटाटा खिसुन तो कीस पाण्यातून काढून लगेच तळायचा इन्स्टंट होतो.मस्त लागतो तो घरगुती आणी चवीचा असा.

लगेच तळायचा इन्स्टंट होतो.मस्त लागतो तो घरगुती आणी चवीचा असा. >>> असा instant कधीतरी व्हायचा, अमानी पण लिहिलाय तसा. पण आई वर्षभराचा कीस वाळवण करून ठेवायचीना डबे भरून त्याचा जास्त व्हायचा. तो संपला की असा. तोपण सेम अमानी लिहिलेल्या रेसिपीने फक्त जिरं नाही घालायचो आम्ही.

त्या वाळवलेल्या किसाचा पण ह्या रेसिपीने बटाटा कीस व्हायचा फक्त भिजवून ठेवायला लागायचं जास्त वेळ.

त्या वाळवलेल्या किसाचा पण ह्या रेसिपीने बटाटा कीस व्हायचा फक्त भिजवून ठेवायला लागायचं जास्त वेळ.>> असे पण ट्राई करायला हवे कधितरी

एक शंका - बटाटा धुवून किसल्यावर परत कीस धुणे ह्यामागे काही कारण आहे का? खरतर त्यात जास्त काही पोषण मुल्ये नाहीतच पण असे धुतल्यावर तर अगदीच काहीच राहात नसावे.

बाकी बटाटा हा सगळ्या रुपात आवडताच आहे. फक्त ते फ्लेवरड वेफर्स (टोमाटो, चिली अलाणा फलाणा) आणि बेक्ड ते नाही आवडत. सिम्पली सोल्टेड ओन्ली फॉर मी!

बटाटा धुवून किसल्यावर परत कीस धुणे ह्यामागे काही कारण आहे का? >>
हो. नुसत्या कीसाला बर्‍यापैकी स्तार्च असतो, तो तसाच फोडणीत टाकला तर चिकट होतो कीस. आधी धूवून घेतला की स्टार्च निघून जातो आणि कीस मोकळा, सुटा होतो.

Pages