माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

Submitted by मार्गी on 2 July, 2019 - 07:45

१२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

नोव्हेंबर २०१८ मध्ये परत एकदा लाँग रन्स सुरू केले. २० जानेवारी‌ २०१९ च्या मॅरेथॉनची तयारी करायची आहे. त्याआधी एकदा मला ३६ किमी पर्यंत पळायचं आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये जेव्हा दर आठवड्याला २५- ३० किमी पळालो होतो, तेव्हा त्रास झाला होता आणि इंज्युरीही झाली होती. त्यामुळे ह्यावेळेस विचार केला की, दर आठवड्याच्या ऐवजी दर दोन आठवड्यांनी मोठे रन करावेत आणि मध्ये फक्त छोटे रन्सच करावेत. त्याशिवाय मॅरेथॉनच्या आधी काही गोष्टीही नीट करायच्या आहेत. शूजचा निर्णय घ्यायचा आहे आणि टेक्निकही ठीक करायची आहे. ह्याच सुमारास माझे रनिंगचे मित्र व मार्गदर्शक बनसकर सरांनी मला अदिदा-सचे शूज गिफ्ट केले. पायांमध्ये ते चांगले बसले. आता ह्या शूजसोबत लाँग रन करून बघेन. तसंच २५ किलोमीटर पार केल्यानंतर जो त्रास होतो, त्यावरही मात करायची आहे.

अनेक रनर्ससोबत ह्यासंदर्भात बोलत आहे. २५ किलोमीटरनंतर रनिंग कठीण होऊन चालावं लागतं. त्याचे अनेक कारण असू शकतात. जसं योग्य डाएट नसणं, रनिंगची टेक्निक चुकीची असणं किंवा मानसिक अडथळासुद्धा! त्यानुसार काही बदल केले, प्रोटीनचा इन्टेक वाढवला. काही इतरही व्यायाम सुरू केले. ह्याच सुमारास बनसकर सरांनी मला पुश अप्स करण्याची ट्रिकही सांगितली. आधी कधीच पुश अप्स केले नसल्यामुळे ते करणं जमत नव्हतं. कारण पूर्ण शरीराचं अर्ध वजन दोन हातांवर त्यात उचलावं लागतं. तेव्हा सरांनी मला एकदा रनिंग झाल्यानंतर समजावून सांगतान एक फूट किंवा दोन फुटाच्या पायरीवर पुश अप्स करून बघायला सांगितले. आणि मला ते जमले! आणि हळु हळु त्यातून ती ट्रिक आली आणि ते करता यायले लागले. रनिंगसाठी काही जिममधले व्यायाम, योग, प्राणायाम, चालणं, सायकलिंग हे फार उपयोगी आहे. मसल्स तयार होतात आणि स्टॅमिनाही वाढतो. त्यामुळे ह्या काळात मोठे वॉक केले आणि पुढेही करत राहिलो. त्यामुळे फास्ट वॉकिंगची स्पीड वाढली आणि जर २५ किमी किंवा ३० किमीनंतर चालावं लागलं तरी उरलेलं अंतर चालत आरामात पार करेन, हा विश्वासही मिळाला.

ह्या सुमारास काही रन्स चढावर केले आणि काही इन्डोअरही केले. इन्डोअर रनिंग करताना एक गंमत झाली. इन्डोअर पळत असताना एकदा आपोआप टो- रनिंग झालं. म्हणजे पायांच्या बोटांवर पळालो. स्वत: काही न करता, पायच तसे पळायला लागले. आणि ते खूप चांगलंही वाटलं. तसं पाहिलं तर रनिंगची योग्य पद्धत टो- रनिंग (पायाच्या बोटांवर पळणे) हीच आहे. कारण पूर्ण पाय लँड करण्याच्या ऐवजी फक्त चवडे टेकले तर पाय लगेच उचलणं सोपं जातं, वेळ व ऊर्जा वाचते. त्यामुळे रेसमध्ये पळणारे जास्त रनर्स टो- रनर्स असतात. इन्डोअरमध्ये अडचण आली नाही. पण नंतर जेव्हा शूजसोबत टो- रनिंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अडचण आली. अनेक दिवस टो- रन आणि टो- वॉक करून बघितले. नंतर वाटलं की, शेवटी चालावं लागणं आणि स्पीड दोन्ही समस्यांवर ही गोष्ट उपयोगी पडेल. पण जेव्हा अनेक दिवस टो वॉक आणि टो- रन केले, तेव्हा कळालं की, ही पद्धत चांगली आहे, पण माझे पाय त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे नॉर्मल- सोप्या रन व वॉकपेक्षा जास्त वेळही लागतोय आणि पायही दुखतोय. आणि मॅरेथॉनला फक्त दिड महिना बाकी असताना मला हे करायला नको असं वाटलं. बोटांना तयार करावं लागेल, सराव करावा लागेल. कदाचित भविष्यात कधी मी टो- रन किंवा टो- वॉक करेन. असा विचार करून दोन- तीन आठवडे टो- रनिंगचा प्रयत्न केल्यानंतर ते बंद केलं. मग नॉर्मल रनिंग सुरू केली- ज्यामध्ये पाय लँड होताना जास्त वेळ व उचलताना जास्त ऊर्जा लागते. पण माझ्यासाठी हेच जर सहज असेल तर तेच योग्य!

डिसेंबरमध्ये आता लाँग रन्स करायचे आहेत. २५ किलोमीटर तर मी कधीही करू शकतो, त्यामुळे ३० किलोमीटरचा रन ठरवला. त्याआधी अनेक छोटे रन्स केले. १६ डिसेंबर २०१८, मॅरेथॉनच्या एक महिना आधी ३० किलोमीटरसाठी निघालो. लाँग रन्स अगदी सहज स्पीडने- आरामात करायचे असतात. तसंच मी सोबत पाणी- एनर्जाल- चिक्की हे घेऊन पळतो. त्यामुळे स्पीड कमीच असते. लाँग रन्स मला टेस्ट क्रिकेटच्या बॅटिंगसारखे वाटतात. आणि छोटे रन्स जसे ५-६ किंवा कधी १०- १५ किमीसुद्धा लिमिटेड ओव्हर क्रिकेटसारखे वाटतात- सोबत काहीच घेण्याची गरज नाही, फक्त पळत राहायचं! असा लाँग रन सुरू केला आणि जेव्हा ३० किमी पूर्ण झाले, तेव्हा पहिला व तिसावा किलोमीटर एकाच स्पीडने पळालो होतो! त्याचा खूप आनंद वाटला. पहिल्यांदा २५ नंतरही पळता आलं, शूजनी काहीच त्रास दिला नाही! त्यामुळे माझ्या दोन समस्या सुटल्या! आणि जवळजवळ ३:४६ टायमिंगमध्ये ३० किमी पूर्ण केले. जर पुढचे १२ किमी चालावे जरी लागले तरी मी सुमारे साडेपाच तासांमध्ये मॅरेथॉन पूर्ण करेन!

दोन आठवड्यांनंतर ३६ किमी पळण्यासाठी निघालो. पण ह्यावेळी काही चुका झाल्या. रात्री लवकर झोपू शकलो नाही. मध्ये काही दिवस सलग रन्स केले नव्हते. त्यामुळे ३६ पळू शकलो नाही आणि २९ नंतर चालावं लागलं, शेवटी पायांना त्रासही झाला आणि जास्त रिस्क न घेता ३१ किलोमीटरला थांबलो. आता मॅरेथॉनला फक्त २० दिवस बाकी! माझ्या काही मित्रांनी मॅरेथॉनच्या आधी ४२ किलोमीटरचा मॅरेथॉन रनही केला. एकाने तर ५० किमी रनिंगही केलं (ट्रेनिंग जास्त कठीण असावं, ह्या लॉजिकनुसार)! मी ३६ पळू शकलो नव्हतो, पण त्याआधी एक समान गतीने ३० किलोमीटर पळालो, त्यामुळे आत्मविश्वास चांगला आला. जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ११ किलोमीटरचे मोठे वॉक केले. सायकल चालवताना अनुभवलं होतं की, सलग पाच- सहा दिवस सायकल चालवल्यानंतर एक टेंपो येतो आणि सायकलिंग खूप सोपं होतं. त्यामुळे मॅरेथॉनच्या आधीच्या आठवड्यातही रनिंग बंद केलं नाही. छोटे पाच- सहा किलोमीटरचे रन करत राहिलो. त्यामुळे गॅप येणार नाही, मूमेंटम तयार राहील, मसल्स तयार राहतील. अशी मॅरेथॉनची तयारी झाली. आता रनिंगचं तितकं दडपण वाटत नाही. पण ईव्हेंटचं व तिथे जाऊन पळण्याचं थोडं दडपण वाटतंय. पण काहीही असलं तरी माझं जे टायमिंग येईल, ते माझं पर्सनल बेस्टच असेल. आणि काही अडचण आली तर माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे. मी १२ काय १५- १८ सुद्धा चालत पार करू शकतो, अशी मनाची तयारी झाली आहे! बघूया कसं होतं!

पुढील भाग- माझं "पलायन" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

:थंम्स अप: Happy

लेखाच्या सुरवातीला जानेवारी 2019 ऐवजी जानेवारी 2020 असं म्हणायचं आहे का?