वारसदार - भाग १ - ओळख

Submitted by महाश्वेता on 2 July, 2019 - 04:49

प्रेरणा - विदूषक (जी.ए. कुलकर्णी)

मायबोलीवर स्वतःची कुठलीही कथा पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ. अनेक कथा लिहिलेल्या आहेत, अनेक पाने भरलेली आहेत, पण टायपायचा कंटाळा म्हणा, की देण्याचा कोतेपणा म्हणा, आजपर्यंत कधीही कोणतीही कथा इथे टाकलेली नाही.
जसजसं आयुष्य बदलत जातं, तसतसं जुन्याची कात टाकून नव्याची कास धरली जाते, आणि स्वतःला मोकळं करण्यासाठी नव्या अवकाशाची गरज भासते, ते अवकाश मी शोधतेय, पण स्वतःकडच काहीतरी देऊन मनाचा एक कोपरा उघडण्यासाठी हा लेखप्रपंच. शक्यतोवर प्रत्येक आठवड्यात एक भाग टाकेन.
आणि हो, या कथेवर चांगल्या वाईट काहीही प्रतिक्रिया देण्याचं स्वातंत्र्य वाचकांना आहेच, आणि यात माझ्याकडून काहीही हस्तक्षेप होऊ नये, म्हणून मी एकदा कथा टाकल्यावर पुन्हा प्रतिसाद देणार नाही. सर्वांचे स्वागत आहेच.
---------------------------------------------------------------------
मुंबई म्हणजे मायाजाल, आणि या मायाजालात प्रत्येकाला स्वतःहून गुरफटायचं असतं. एकीकडे आभाळाला कवेत घेणाऱ्या इमारती, आणि दुसरीकडे जमिनीत गाडली जाणारी स्वप्ने. मुंबई म्हणजे स्वप्नांचा मिलाप, आणि भ्रमनिरासाचा अभिशाप सुद्धा!
अशाच एका चमचमत्या रात्री दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलसमोर काही आलिशान गाड्या थांबत होत्या. गेटकीपरला हे नवीन नव्हतं, मात्र आज काहीतरी महत्वाचं घडतंय याची त्याला जाणीव झाली.
सर्वात आधी रेंज रोवर आली, मग ऑडी. त्यानंतर पाच मिनिटात लांबलचक बी एम डब्लू हॉटेल समोर उभी राहिली. तिलाही लाजविण्यासाठी मागे जग्वार होतीच. हे बघून पाच मिनिटांनी मागे येणारी मर्सिडीज कॉम्रेप्सर जरा अवघडलीच, आणि तिच्या साथीला मागे वोल्वो उभी राहिली. या सगळ्यांवर तुच्छतेने हसत लॅम्बोरगिनी दिमाखात उभी राहिली,
...मात्र फँटम आल्यावर सगळ्यांचा मोठेपणा गळून पडला, आणि गेटकीपरही प्रचंड तत्परतेने पुढे झाला.
तेरा मजली हॉटेलचा नववा मजला आज कुलूपबंद तिजोरीसारखा स्वतःला संरक्षित करून उभा होता. जवळजवळ तीस ते चाळीस सशस्त्र लोक, या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून तयार होते.
मधोमध एका यू आकाराच्या टेबलावर दोन्ही बाजूनी प्रत्येकी सात खुर्च्या होत्या, आणि यु च्या खालच्या बाजूला एकच खुर्ची होती.
रेंज रोवरमधून उतरणारी व्यक्ती होती, जयकिशन पुरोहित. विदर्भातील एक मोठं प्रस्थ. विदर्भाच्या कोळशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात बंदुका, हातबॉंब आणि काडतुसे पोहचवण्यात याचा हात कुणीच धरू शकत नव्हतं.
ऑडीमधून उतरणारी व्यक्ती होती, सिल्वालाईन डिसुझा. महाराष्ट्रातल्या ऑइल डेपोचा अनभिषिक्त सम्राट. नाशिकमधल्या मनमाडमधून तो आपलं साम्राज्य चालवत असे. भेसळीच्या पेट्रोल-डिझेलमधून त्याने किती पैसा कमावला याची गणना होत नव्हती.
बी एम डब्लूत आलेली व्यक्ती होती, गांजाकिंग भारद्वाज भोसले. कोल्हापूर, सातारा व सांगलीच्या उसाच्या फडात अफू आणि गांजाची शेती करून भारद्वाजने प्रचंड पैसा कमवला होता
जॅग्वारचा मालक होता, सम्राट शहा NA. पुणे आणि आसपासच्या शहरातील सर्वात मोठा बिल्डर, शेतजमिनी नॉन ऍग्रीकल्चर करण्यात त्याचा हात कुणीही धरू शकत नव्हतं, म्हणून NA ही बिरुदावली त्याला चिकटली होती.
कॉम्प्रेसरचा मालक वेंकटेश कुलकर्णी. नाशिकमार्गे गुजरातहून सोने आणि हिऱ्याची तस्करी करणारा, आणि सगळ्या राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवणारा.
व्हॉल्वोमधून औरंगाबादचा मुसा उतरला, महाराष्ट्रातले सगळे भंगार डेपो ताब्यात ठेवणारा.
लॅम्बोरगिनी विजय नायरच्या मालकीची होती. सगळे ड्रग्जचे धंदे त्याच्या इशाऱ्यावर चालत.
...रोल्स रॉयसमधून उतरणारी व्यक्ती होती, अनिरुद्ध साळगावकर. द ट्रान्सपोर्टर!
आणि या सर्वांबरोबर त्यांचे वारसदार सुद्धा आज मिटिंगसाठी आले होते.
सर्वजण नवव्या मजल्यावर येऊन टेबलावर बसले. साळगावकरांनी मधली खुर्ची घेतली.
"सन्माननीय सदस्य आणि त्यांचे वारसदार!"
साळगावकरांनी पेग उचलला, आणि वर केला.
जमलेल्या सातही सदस्यांनी त्यावर पेग उंच करून अभिवादन केले.
"मी अचानक ही मिटिंग का बोलावलीये, याच कारण कुणालाही माहीत नाही, याची मला जाणीव आहेच. पण, काही गुप्त गोष्टींना एक वेळ असते. जर ती वेळ साधता आली, तर माणूस जिंकतो, नाहीतर, खेळ संपतो."
"जेव्हा माणसाचा अंतिम क्षण जवळ येतो, तेव्हा त्याला वारसदाराची आठवण येते असं म्हणतात. मात्र हे मला मान्य नाही. किंबहुना हा काही नियतीचा खेळ असेल हेही मला मान्य नाही. माझ्या वारसदाराची निवड ज्यादिवशी मला हा क्षण परिपूर्तीचा असं वाटेल, तेव्हाच मी करणार होतो, आणि आज तो क्षण आहे, असं मला वाटतं."
उपस्थितांमध्ये आश्चर्यमिश्रीत अभिलाषा पसरली.
साळगावकरांनी अजून एक घोट घेतला.
"तुम्ही सर्व माझे सोबती आहात, सर्व माझे पाठीराखे आहात, याचा मी आजन्म ऋणी राहील, पण, तुमच्यापैकी एकही मला माझा वारसा चालवू शकेल असं वाटत नाही, याबद्दल मी खेदाने माफी मागतो. कुणाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल, तर त्याने मला गोळी घातली तरी चालेल."
साळगावकरांनी बंदूक टेबलाच्या मधोमध सरकवली.
कुणाचीही बंदुकीला हात लावायची हिंमत झाली नाही.
साळगावकरांच्या चेहऱयावर हसू पसरलं.
"आज सगळा भारत तुमच्यापुढे मान तुकवतो, आणि मग पुढची बोलणी करतो. मराठा सिंडिकेट म्हणतात ते हेच नाही का?"
"नक्कीच." भारद्वाज म्हणाले.
"तर एक गोष्ट सांगतो, मग तुम्हाला कळेल साळगावकरांच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नांच स्फूर्तिस्थान काय असेल. इटलीचा एक भाग आहे, सिसली नावाचा. लोकसंख्या असेल पन्नास लाख."
"तर या सिसलित प्रचंड गरिबी होती. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा सिसली बनलेला होता. मात्र त्यात अवैध धंदे करून ऐशोआरामात जगणारा एक वर्गही होता, आपल्यासारखा. त्या वर्गात अनेक घराणी होती. त्यांना फॅमिली म्हणत, आणि फॅमिलीच्या प्रमुखाला डॉन म्हणत..."
"...बघायला गेलं तर या फॅमिलींमध्येही हाडवैर असे, पण, कुणा तिसऱ्या शत्रूसाठी लढताना त्या एकत्र होत."
"असाच एक डॉन होता, डॉन लासो. प्रचंड हुशार. आपली फॅमिली प्राणपणाने जपणारा. त्याच्या माफिया सिंडिकेट मध्ये अनेक नामवंत डॉन होते, मात्र डॉन लासोची कीर्तीच वेगळी. जसा अनेक ताऱ्यांमध्ये ध्रुवतारा उठून दिसतो तशी. मात्र आजकाल डॉन लासोसमोर एक वेगळीच समस्या उभी ठाकली होती, एक दरोडेखोर जो स्वतःला रॉबिनहूड जूनियर म्हणवून घेत होता, आणि उघड सिंडिकेट ला आव्हान देत होता. कित्येक प्रयत्न करूनही तो हाती येत नव्हता. याला कारण होतं तिथलं अल्पाइन जंगल! या जंगलात सूर्यप्रकाशाला सुद्धा प्रवेश करायला मुभा नसे. यातच त्याने आपला तळ वसवला होता. मार्ग काढण्यासाठी सिंडिकेटची बैठक बोलावली गेली, कित्येकांनी नवीन मार्ग सुचवले, पण शेवटी सर्वांनी डॉन लासोनेच सुचवलेला मार्ग निवडला."
"आणि तो मार्ग कोणता होता?" मुसाने अधीर होऊन विचारले.
"डॉन लासो स्वतः बंदूक घेऊन जंगलातून बाहेर जाणाऱ्या चिंचोळ्या पायवाटेवरून उभा राहिला, आणि तेलाचे ड्रम नि ड्रम ओतून त्याने जंगलाला आग लावली. जूनियर रॉबिनहूड ला पळता भुई थोडी झाली, तो अनाहूतपणे रस्त्यावर डॉन लासोच्या समोर येऊन उभा राहीला आणि त्याच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडला. या महासंहारात कित्येक वनचर, वनवासी आणि झाडे बळी पडले असतील याची गणना नाही, मात्र यानंतर डॉन लासोची कीर्ती अजून वाढली."
साळगावकर थांबले. त्यांनी एकवेळ सगळीकडे नजर फिरवली.
"तुमचं लक्ष्य गाठताना तुमच्या लक्ष्याशी संबंधित नसलेल्या गोष्टींचा त्रास होत असेल, तर त्यांना नष्ट करणंच शहाणपणाचं ठरतं."
"साळगावकर, कधीकधी तुमच्या मध्ये सुद्धा आम्हाला डॉन लासो दिसतो," असं म्हणत कुलकर्णी छद्मीपणे हसत म्हणाले.
साळगावकर खळखळून हसले.
"आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडलं तरी तेच प्रतिबिंब चंद्र होत नसतं."
'सुरेख, सुरेख' म्हणत बऱ्याचशा लोकांनी माना डोलावल्या.
"बर कुलकर्णी, तुमचं नाशिक काय म्हणतंय, बरेच दिवस झाले सोनं आलं नाही?"
कुलकर्णींचा चेहरा गोरामोरा झालं. त्यांना उत्तर सुचेना.
...आणि साळगावकरांच्या विरोधात जाण्यात आपलं काही हशील नाही हे सगळ्या डॉनला कळून चुकलं.
"तर मंडळी डॉन लासोची कीर्ती दिगंत झालीच पण फार वर्षानंतर लोकांना एक गोष्ट कळली."
"कोणती?" शहाने उत्सुकतेने विचारले.
"हा रॉबिनहूड म्हणजे डॉनचा एक विश्वासू शिपाई. डॉनच्या शब्दाखातर जीव देणारा. डॉननेच तो मुखवटा उभा केला, पण त्यामागचा राक्षस तो होता. डॉनची दहशत प्रचंड वाढली, आणि दुसरं म्हणजे आपला शत्रू डॉन मार्कोचा नायनाट केला. डॉन लासो आणि डॉन मार्को या दोघांचा सगळ्यात मोठा व्यवसाय कोकेनचा. दोघांनाही एक स्पेशल कोटा आणि विभाग देण्यात आला होता. मात्र डॉन मार्कोची मती फिरली, आणि त्यांनी अल्पाईनच्या जंगलात कोकेन फॅक्टरी चालू केली, आणि या कराराला समांतर असा कोकेन विक्रीचा व्यवसाय सुरू केला.डॉन लासोने याच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं, आणि आपल्याकडे कुणाचे लक्ष जात नाही हे बघून डॉन मार्कोनी आपला सगळा व्यवसाय जंगलात हलवला."
"अजस्त्र सैन्य मोकळ्या मैदानात लाभदायी ठरतं, पण चिंचोळ्या खिंडीत ते काही वीरांचच भक्ष्य ठरतं. सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नसतात, एकच टोपली पडली, की सर्व अंडी विनाश पावतात."
सगळ्यांकडून गोष्टीला दाद दिली गेली.
"धन्यवाद, अशा गुणग्राहक लोकांची संगत लाभावी, म्हणूनच ही सिंडीकेट तयार केली गेली. मात्र डॉन लासो बिचारा निपुत्रिक वारला, आणि शेवटी ती फॅमिली लयाला गेली. मनुष्याला मरणानंतर फक्त एक गोष्ट स्वतःसाठी मागे ठेवता येते, ती म्हणजे कीर्ती. आणि ही कीर्ती सांगायला कुणीतरी हवं, आणि वाढवायलासुद्धा."
साळगावकर उभे राहिले. त्यांनी कोटची बटणे लावली. हातात काठी घेतली.
"म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलंय, तुमच्या वारसदारांना घेऊन, माझा वारसदार निवडायला. आता सगळ्यांनी जेवण घ्या, मद्याचा आस्वाद घ्या. उद्या पुन्हा इथेच भेटू."
साळगावकर तडक निघाले, आणि सर्वजण त्यांच्याकडे बघतच राहिले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात उत्ककंठावर्धक,
पण ते साळगावकर फावल्या वेळात किस्त्रीम किंवा माहेर च्या दिवाळी अंकात लिहितात का? फारच अलंकारिक बोलतात Happy