व्रत

Submitted by विको on 14 June, 2019 - 09:54

यंदा बऱ्याच वर्षांनी आई बाबा जूनमध्ये तिच्याकडे आले होते. एका शनिवारी सकाळी नेहेमीप्रमाणे तिचं लॅपटॉपवर काहीतरी चालू होत तेव्हा अचानक आईचा प्रश्न आला "साबुदाणा आहे का ग, या गुरुवारी माझा उपवास आहे".
ती: "श्रावण तर अजून लांब आहे आता हा कसला उपास"?
आई: "वटपौर्णिमेचा".

ती हसली. त्या हसण्याचा अर्थ ओळखून आई म्हणाली "अग सावित्रीच्या बुद्धिमत्तेची, चातुर्याची आठवण म्हणून हा उपवास".
ती: "हो हो".
आई: "हे सात जन्म, तोच नवरा हे सगळं तुमच्या सिनेमामुळे आलेलं आहे. सावित्रीच्या कथेत हे असलं काही नाही. हा निव्वळ फिल्मीपणा. पूर्वीच्या बायकांकडे दुसर काय होत? म्हणून सावित्रीची, तिच्या हुशारीची आठवण यासाठी हा उपवास. स्मरण ठेवणं महत्वाचं".
ती: "बर. साबुदाणा आहे कपाटात दाणे मात्र भाजावे लागतील".

वा! या गुरुवारी आईच्या हातची खिचडी मिळणार तर. मनातल्या मनात ती खूष झाली आणि परत लॅपटॉपमध्ये डोक घालून पत्र पूर्ण करायच्या कामाला लागली.

"... सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरु करून १७० वर्ष झाली. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जरूर यावे. सावित्रीबाईंच्या कार्याचा मागोवा आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे...."

"लेकीला आणि तिच्या मैत्रिणींना पण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं पाहिजे" लॅपटॉप बंद करताना मनातल्या मनात पुढच्या कामाची नोंद करत विचार आला "सावित्रीबाईंच्या कार्याचं, त्यागाचं, विचारांचं स्मरण ठेवणं महत्वाचं".

Group content visibility: 
Use group defaults