भविष्याचे भूत...

Submitted by झुलेलाल on 10 June, 2019 - 01:48

अंगावर भयचकिताचा सरसरीत काटा येणे म्हणजे काय ते आज अक्षरश: अनुभवास आले. रोजच्या राजकारण आणि भक्तरुग्ण वादाची झिंग एका झटक्यात उतरली, आणि मन भानावर आलं. असं काही झालं, की आपोआप सहावे इंद्रिय जागे होते, आणि भविष्य जणू भेसूर होऊन वर्तमानाच्या रूपाने विक्राळपणे समोर येते. भविष्याचे भय भेडसावू लागते, आणि कितीही अश्रद्ध, नास्तिक असलो, तरीही, हे असे भविष्य कधीच आकारू नये यासाठी मन नकळत प्रार्थनाही करते...
तो, जो कोणी अज्ञात नियंता-निसर्ग आहे, तो ती प्रार्थना नक्की ऐकेल अशी आशा आपोआप बळावते अन् अंगावर उमटलेला शहार हळुहळू मिटू लागतो...
तरीही भविष्यभयाची चाहूल देणारे भयाण वर्तमान मनाचा कब्जा घेऊन बसलेलेच असते...
ठाण मांडून !!
भविष्यात पाण्यासाठी युद्धे भडकतील असा इशारा काही दशकांपूर्वी कधीतरी पहिल्यांदा कुणीतरी दिला, तेव्हा त्याची नक्कीच खिल्ली उडविली गेली असणार! कारण, या इशाऱ्यानंतरही पाण्याचे मोल जाणण्यात माणूस कमीच पडला. तो निसर्ग आपल्या ठरल्या वेळी भरभरून बरसणार आणि पाण्याच्या झोळ्या पुरेपूर भरूनच परतणार अशा वेडगळ समजुतीत आपण राहिलो.
आता त्याची फळे भोगण्याची वेळ आली आहे.
पाण्यासाठीच्या संघर्षाचे भविष्य उंबरठ्यावर उभे ठाकले आहे.
गेल्या चारसहा महिन्यांपासून भीषण पाणीसंघर्षाच्या शेकडो कथा आपण ऐकत, वाचत आलो.
या मालिकेतील आजच्या कथेने त्या सर्वांवर कडी केली, आणि ते भविष्य खरे ठरणार या भयाची जाणीव मनाचा थरकाप उडवून गेली!
मध्य प्रदेशातील एका जंगलात, पाणी न मिळाल्याने तहानेने तडफडणाऱ्या१५ माकडांचा उष्माघाताने मृत्यू झाला, ही ती भविष्यभयाची जाणीव करून देणारी बातमी... पण याचा गाभा आणखीनच भयाण आहे. हे मृत्यू केवळ तहानेने तडफडल्यामुळे झालेले नाहीत. पाण्यासाठीच्या संघर्षाचे हे पंधरा बळी आहेत. माकडांच्या दुसऱ्या टोळीने पाणवठ्यावर येण्यास मज्जाव केल्याने एका टोळीतील ही तहानलेली माकडे मरण पावली. या वेळी नक्कीच दोन टोळ्यांमध्ये संघर्ष झालाच असणार! या दुसऱ्या टोळीने आसपासच्या पाणवठ्यांवर आपला कब्जा प्रस्थापित केला होता.
पाण्यासाठीचा संघर्ष!! पाण्यावरच्या हक्काचा संघर्ष!!
बहुधा, ‘त्या’ भविष्यवाणीतील हे पहिले युद्ध असू शकते.
अन्य माकडांवर अशी वेळ येऊ नये म्हणून वन खात्याला आता जाग आली आहे. त्यांच्यासाठी पर्यायी जलस्रोत कुठून उभे करायचे यासाठी शोध सुरू झाला आहे.
मनाचा थरकाप उडविणारी, शहारा आणणारी भविष्यभयाची जाणीव ती हीच!
मध्य प्रदेशातील जंगलातले हे वास्तव माणसाला जागे करणार का, हा नवा प्रश्न त्या भयाच्या हातात हात घालून आता समोर थयथयाट करणार!!

ही बातमी वाचत असतानाच माझ्या बहीणीचा फोन आला.
कोकणातून. रत्नागिरीहून.
अजूनही रत्नागिरीत पावसाचे टिपूस पहायला मिळालेले नाही.
अंगणातली विहीर, कोरडीठाक पडलीय.
कोपऱ्यातल्या एका खड्ड्यात दिवसभरानंतर थेंबाथेंबाने साचणाऱ्या ओंजळभर पाण्यात विहिरीतले मासे तग धरण्यापुरती जिवाची शिकस्त करतायत.
ही विहीर बांधल्यावर मोठ्या हौसेने बहिणीने तीत काही मासे आणून सोडले. दिसामासागणिक वाढणारी आणि पाण्यात बागडणारी त्यांची पिलावळ न्याहाळताना तिच्या डोळ्यात आनंदाची कारंजी फुलायची, आणि ती ते फोनवर सांगताना आम्हाला ती जाणवायची...
आज त्याच माशांची केविलवाणी कहाणी ऐकवताना तिला फुटलेला हुंदका थेट मन चिरत घुसला...
त्या माशांना जगवण्यासाठी आता तिने चंग बांधलाय.
दर दिवसाआड, त्या विहिरीत चार बादल्या पाणी ओतायला तिने सुरुवात केली.
पहिल्या दिवशी तिने विहिरीत पाणी ओतले, तेव्हा ते मासे आनंदाने अक्षरश: उसळ्या मारत होते.
आज पाणी आटले आणि पुन्हा ते केविलवाणे झाले!
ज्या विहिरीतून पाणी काढले जायचे, त्याच विहिरीत वरून पाणी ओतायची वेळ आली!
हीदेखील त्या भयाची एक जाणीवच!

ती शोकाकुल माकडीण...
निसर्गाला नक्कीच पाझर फुटेल!
त्यासाठी, नास्तिकतेचा सारा ताठा बाजूला ठेवून विनम्र प्रार्थना!!

https://www.indiatoday.in/india/story/15-monkey-die-heat-stroke-water-sc...

Group content visibility: 
Use group defaults

महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे आपण. अभिनंदन म्हणू शकत नाही पण विचार करण्यासारखीच गंभीर गोष्ट आहे ही.

माकडांची बातमी वाचून, भविष्याची चाहूल वाटली. असे ही प्राण्यांना काही गोष्टी मानवाच्या आधी कळतात. पण ही खूप दुर्दैवी वस्तुस्थिति आहे की मानवाचे प्रयत्न फार तोकडे आहेत. सध्या तरी तो इतर अकारण महत्त्वाच्या गोष्टीं मध्ये व्यग्र आहे.

भविष्यात पुन्हा महायुद्ध उद्भवेल तर ते पाण्यामुळे उद्भवेल, अशी भविष्यवाणी आधीच झालेली आहे.
लवकरच माकडांची वेळ माणसांवर येऊ नये हीच इच्छा!!!!

माणूस चतुर आहे. शुद्ध पाण्यासाठी त्याने आर ओ सारखं यंत्र शोधलं.‌ समुद्राचे पाणी शुद्ध करतोय, हवेतून पाणी वेगळे करण्याचं तंत्रज्ञान येतंय, उद्या हायड्रोजन व ऑक्सिजन एकत्र करून पाणीही बनवील.
पण निसर्गावर तो यंत्रांच्या सहाय्याने जो अत्याचार करत आहे तो भयानक आहे. बोअरवेल खोदणे, झाडी तोडणे, प्रदुषण, तळी बुजवणे, नदीपात्रात अतिक्रमण करणे, वाळु उपसणे ही सर्व कृत्य जीवसृष्टीच्या मुळावर येत आहेत. तो फोटो पाहून फार वाईट वाटले होते.

लवकरच माकडांची वेळ माणसांवर येऊ नये हीच इच्छा!!!!>> +१
अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न केले तरच मनुष्य प्राणी आपले वेगळेपण सिद्ध करू शकेल. स्वतः गैरसोय सोसून विहिरीतील मासे वाचवण्याचा तुमच्या बहिणीच्या प्रयत्नांना सलाम. अशा लोकांकडे पाहून, अशी वेळ माणसावर येणार नाही अशी आशा ठेवायला काही हरकत नाही.

माणसांनी विज्ञान च्या किती ही गप्पा मारल्या तरी रोजच्या जीवनात लागणारे प्रचंड प्रमाणातील पाणी माणूस कधीच निर्माण करू शकणार नाही .
विज्ञान निसर्गावर कधीच मात करू शकत नाही .समुद्राचे पाणी गोड बनवण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते ती कशी निर्माण करणार .
तापमान वाढत आहे माणसा कडे काहीच पर्याय नाही .
त्या मुळे स्वप्नात आणि गुर्मीत न राहता निसर्ग वाचवा .
निसर्गाची ताकद खूप मोठी आहे त्या पुढे मानवी विज्ञान कास्पटा समान आहे

Shashiram जी.
माणूस निसर्गावर अत्याचार करू शकत नाही.
निसर्गाची ताकत खूप मोठी आहे मानवी अहंकार माणसाला पृथ्वी वरून पूर्ण नष्ट करेल .पृथ्वी नष्ट करण्याची ताकत मानव मध्ये नाही .
विज्ञान खूप तोकडे आहे .
सर्व नद्या प्रदूषित आहेत त्या पूर्ण साफ करायची ताकत विज्ञान मध्ये नाही .
नाहीतर गंगा नदीचे जे गटार झाले आहे त्या गटाराचे परत नदीत रुपांतर झाले असते .
40 पुढे तापमान वाढलं आहे विज्ञान मध्ये ताकत असती तर ते तापमान 20, वर आणले असते /1
Ton cha AC फक्त 100, sqr फीट चा जागा थंड करू शकतो महिना 3000, रुपये खर्च करून .
महाराष्ट्र 310000 sqr km जवळ जवळ आहे .
किती ऊर्जा लागेल संपूर्ण राज्याचे तापमान 20 degre c करायला

धरणात पाणी फक्त 7/8 %, राहिले आहे सांगा विज्ञान ला संपूर्ण राज्य जावू ध्या फक्त पुणे शहरा साठी हवेतून पाणी निर्माण
करून पिण्याची पाण्याची आणि भाजीपाला पिकवण्यासाठी लागणारी पाण्याची गरज पूर्ण करायला .
एवढे सोप नाही ते त्या मुळे आहे ते निसर्ग चक्र बिघडून न देणे ह्यातच शहाणपण आहे

शशी रामजी .तुम्ही bmc चे पाणी वापरू नका,हवेतील ऑक्सिजन वापरू नका,भाजीपाला बंद करा
आणि आणि जगातील सर्व संशोधक बोलवून (पाहिजे तर खर्च भारत सरकार करेल) घरात पाणी निर्माण करा ,भाजी निर्माण करा,ऑक्सिजन निर्माण करा.
माहीत तरी पडेल महिना किती खर्च येतोय ते .
अंबानी ला सुद्धा परवडणार नाही

Maharashtra times la बातमी होती चेन्नई मध्ये पाणी नाही .त्या मुळे it कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगितलं आहे .ऑफिस मध्ये जे येतात त्यांनी घरातून पिण्यासाठी पाणी घेवून येण्यास ssngital आहे .
त्या दृष्टीने आपण पुणे मुंबई वाले स्वर्गा पेक्षा सुंदर शहरात राहत आहोत

वर्णन व तुलना अचुक ! जीव मेटाकुटीला आल्यावर, काही हवं म्हणुन, संशोधन म्हणुन तर कधी योग्य म्हणुन मानव प्रार्थना करतो, ती करताना सद्बुद्धी येत ही असेल, सर्व ठिक झाल्यावर ती गमावुही नये ! अन्यथा दर काही कालांतराने पुनरावृत्ती पण अधिकाधिक तीव्रतेने !!