ओसरल्यावर छंद कालचे, काळ आजचा सरकत नाही
कागद कोरा, एक गझलही कलमेमधुनी झिरपत नाही
कसे जगावे शरण जाउनी परिस्थितीला सायंकाळी?
अश्वमेध मी केला यावर कुणी भरवसा ठेवत नाही
ओंजळीतली फुले वाहिली देवाला अन् प्रसादरूपी
सुगंध उरला तळहातांना, ईश कृपा का उमगत नाही?
आनंदाला गुंफत असता प्रयत्नपूर्वक गझलांमधुनी
दु:ख होउनी रदीफ येते, पुन्हा पुन्हा का उमजत नाही
काक न शिवल्याने पिंडाला, प्राक्तनात ना माझ्या मुक्ती
किती गुंतलो पाडसात मी, मुलांस का हे समजत नाही?
जाम जाहली ट्रॅफिक देवा याचकांमुळे तुझ्या दिशेने
बायपास दे तुला भेटण्या, नश्वरात रे! करमत नाही
जरी पारडे दु:खाचे जड, आनंदाचे हलके असते
कृतज्ञ आहे तुझा जीवना, कृतघ्न म्हणता म्हणवत नाही
आठवणींच्या लाटांवरती नांदायाची सवय जडवतो
आज भयानक इतका आहे! जगावयाची हिंमत नाही
नकोस तू "निशिकांत" विचारू प्रश्न जीवनाला इतकेही
शोध उत्तरे तुझी तूच तू, एकलव्य हो हरकत नाही
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
आहा हा!
आहा हा!
अगदी सुरेख! अप्रतिम!
ओंजळीतली फुले वाहिली देवाला अन् प्रसादरूपी
सुगंध उरला तळहातांना, ईश कृपा का उमगत नाही?>>> खुप छान!
एकदम छान! सुरेख कविता!
एकदम छान! सुरेख कविता!
सहीये !
सहीये !
सगळे शेर मस्त !
कसे जगावे शरण जाउनी परिस्थितीला सायंकाळी?
अश्वमेध मी केला यावर कुणी भरवसा ठेवत नाही>>>
हा अतिशय आवडला !
फारच छान , आवडली
फारच छान , आवडली
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर