चमत्कारी मन

Submitted by vt220 on 2 June, 2019 - 08:39

विकांताला गाडीतून असेच फिरून येत होतो. कोपरखैरणेला पेट्रोल भरायला थांबलो. हमरस्त्याच्या जवळच असलेल्या पंपावर फारच थोड्या जागेत सगळा कारभार होता. आधीच्या सिग्नलला एका रिक्षावाल्याने टायरमध्ये हवा कमी आहे सांगितले म्हणून पंपावर हवा भरायचे ठरवले तर थोडी लाईन होती. थोडीच जागा असल्याने माझ्या गाडीने पंपावर पेट्रोल भरत असलेल्या गाडीचा रस्ता अडवला होता. त्याचे पेट्रोल भरून झाल्यावर हॉर्न वाजवून मला इशारा दिला. सुदैवाने मागे थोडी जागा असल्याने मी गाडी मागे घेतली. मोकळ्या झालेल्या जागेतून जाताना त्या ड्राईवरने हात दाखवला. मैत्रिणींबरोबर बोलण्यात गुंग असलेल्या मला का कोण जाणे त्याचे ते वागणे खटकले. "अरे जागा करून दिली, गपचूप जायचे सोडून शहाणा हात काय दाखवतो!" - मी बोलून गेले. मैत्रिणीने समजावले - "अगं फ्रेंडली गेश्चर म्हणून हात दाखवला असेल गं!" खरच की तसेच होते, तसेच असणार... पण मनाने जो वाईट विचार करायचा होता तो केलाच!
मन असेच चमत्कारी आहे. ज्यात त्यात वाईटच शोधत राहते. मायबोलीवर सुद्धा ह्याचे दाखले मिळतात. मागे एका कथेत सून आणि सासऱ्याचे चांगले नाते दाखवले होते तर बऱ्याच जणांना वाटले असे कुठे असते का? एक लेखक त्यांना भेटलेल्या अवलिया व्यक्तींचे व्यक्तिचित्रण लिहितात, तर त्यांनाच कसे असे लोक भेटतात बुवा! खर्र खरं सांगावं तर मला सुद्धा त्यांचे वर्णन थोडे गुडी-गुडी वाटते. तशी माणसे अगदीच नसतील असे वाटत नाही पण ती इतकी लवेबल असतील असे वाटत नाही. काल परवा आलेल्या पुढचं पाउल कथेत शेवटी नवऱ्याचे मतपरिवर्तन होते आणि तो तिच्यावर प्रेम व्यक्त करतो, तर लोकांच्या प्रतिक्रिया - असे कुठे होते का? पण दुसऱ्या एका कथेत सख्ख्या बहिणीमध्ये एकमेकिंबद्दल असूया दाखवलीय तर कुणाकुणाला वाटले नाही "असे कुठे होते का". उलट बऱ्याच लोकांचे प्रतिसाद "असे होते बरेचदा" असेच आहेत.
का असे आपले मन उगीच वाईट ते शोधून कष्टी होत असते बरे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काही वेळा पूर्वानुभवावरून मन आडाखे बांधत असते तर काही बाबतीत खरोखरच छिद्रान्वेषी वृत्ती तसं करायला भाग पाडत असते. अर्थात हे वैयक्तिक मत आहे.

काही प्रमाणात डिफेन्स मेकॅनिझम (बचावात्मक) असू शकते. ज्याच्यात्याच्यावर विश्वास न टाकणे हे एव्होल्युशनरी असावे असा कयास.

प्राचीन, सारिका - प्रतिसादासाठी धन्यवाद.
सारिका तुमचे म्हणणे खरे आहे. विश्वास टाकून मग विश्वासघाताचे दु:ख जास्त तापदायी असते.

तुलना करत नाहीए, फक्त उदाहरण देतो. पुलंची व्यक्तिचित्रे खुप गाजली. पण त्यांच्यावर एक फार मोठा आरोप नेहमीच केला जातो तो हा की तुम्हाला काय फक्त देवमाणसेच भेटली का? त्यांच्या संपर्कात आलेली माणसे अशा क्षेत्रातील होती की तेथे माणसात नकळत स्वभावदोष येतातच. त्या त्या व्यक्तिंचे हे स्वभावदोष ओळखणारी माणसेही होतीच त्यावेळी. पुलंनाही त्यांच्या या मित्रांच्या स्वभावदोषांचा त्रास झालाच असणार. पण चांगले तेच पहाणे हा पुलंचा स्वभाव होता आणि जे काही चांगले आहे ते जास्तच अधोरेखीत करुन त्यांनी लिहिले. समोरच्या व्यक्तितील फक्त चांगले तेच पहाणे हा पुलंचा स्वभावदोष होता असे म्हणा हवे तर. त्यामुळे त्यांची सगळी व्यक्तिचित्रे एकसुरी झाली. तसे आरोप आजही होतात त्यांच्यावर.

माझ्याबाबतीत म्हणाल तर एखादा सद्गुण पाहुन मी जर कुणाबरोबर मैत्री केलीच तर सुरवातीलाच मी ठरवतो की या एका चांगल्या गोष्टीसाठी या व्यक्तिला शंभर दोष माफ. त्यामुळे मला मग त्या व्यक्तिच्या स्वभावदोषांचा फारसा त्रास होत नाही. आणि कधी काळी झालाच तर मन नकळत त्याला माफही करुन टाकते. ब्रुटस, यु टू? सारखं "तू असं वागावस माझ्याशी?" या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो माणसाला. आपल्या माणसाने त्रास दिला की जास्त दुःख होते. माझ्या या स्वभावामुळे माझी यातुन सुटका होते. अहंकार दुखावत नाही. मुळात आपल्याला कोण आवडतो? तर जो आपल्या मनासारखे वागतो. आपल्या मनाविरुध्द कुणी वागायला लागले की आपले बिनसते. दोष आपल्यातच आहे. 'तू तुझ्या मनासारखे वाग, त्यामुळे आपल्या मैत्रीत काही अंतर येणार नाही' असे जेंव्हा एखादा म्हणतो तेंव्हा ती मैत्री खरी मैत्री ठरते, दिर्घकाळ टिकते. त्रास कमी होतो. झालाच तरी "आपलाच माणूस आहे यार" असं म्हणून सहज पुढे जाता येतं. मी एकदा म्हटलं होतं प्रतिसादात, चांगलं तेच पहायचे असं ठरवलं की गेटवरच्या वॉचमनबरोबर सुध्दा तार जुळते छान पैकी. आहे काय त्यात एवढं!

लिहावं तर अजुन वाटतय पण लेखापेक्षा प्रतिसाद मोठा व्हायला लागला. Happy

लिहावं तर अजुन वाटतय पण लेखापेक्षा प्रतिसाद मोठा व्हायला लागला.>>> ह्या विषयावर १ विस्तृत लेख येऊ दे लवकर .. खुप दिवस झाले काही लिहिलं नाहीत

आपण नेहमी स्वताच्या सुरक्षेची काळजी आधी घेतो.
साहजीक आहे कुनीतरी आपल्या विचांराच्या, आतापर्यत आलेला अनुभवांच्या विरुध्द वागला की शंका येतेच.

माझ्याबाबतीत म्हणाल तर एखादा सद्गुण पाहुन मी जर कुणाबरोबर मैत्री केलीच तर सुरवातीलाच मी ठरवतो की या एका चांगल्या गोष्टीसाठी या व्यक्तिला शंभर दोष माफ >>>> असा मी पण विचार करायचो पण दोन-तीन जणांनी चांगला झटका दिल्यावर मी आता सर्वाना तोलूनमापूनच जवळ करतो