
‘सर, आम्ही आपल्या घराबाहेर उभे आहोत.’
गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील माझा शोधनिबंध अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये स्वीकारला गेला असल्याने मी आजच पुण्याहून अमेरिकेला जाण्यासाठी निघणार होतो. मी आत्ता एक महिनाभर सुट्टीवर जाणार असल्यामुळे काम मात्र संपता संपत नव्हते. कालची तब्बल एकशे पंधरा रुग्णांची ओपीडी आणि आज सकाळचा हॉस्पिटल राऊंड, होम व्हिजिटस आटोपून नुकताच घरी आलो होतो. अमेरिकेने नुकत्याच लागू केलेल्या नियमांमुळे ई चेकिंग फारच क्लिष्ट झालेले आणि त्यातच पुन्हा एकदा फोनची घंटी वाजली. घरा बाहेर ऍडव्होकेट सुभाष फॅमिलीसह उभे होते. ऍड सुभाषराव आणि माझा गेल्या चाळीस वर्षांचा घरोबा ! सुभाषराव, शोभाताई आणि त्यांची मुले, सुकृत आणि स्वप्ना असे सर्वचजण सुविद्य कायदेतज्ज्ञ ! दुपारच्या उन्हात आंब्याच्या पेटीचा उपहार घेऊन दारात उभे होते.
‘सर, आपण सांगितल्याप्रमाणे सौ. शोभाच्या पाठीचा एम् आर आय चा रिपोर्ट दाखविण्यासाठी आलो आहोत.’ वकीलसाहेब सांगत होते.
रिपोर्ट तर नॉर्मल होता. सौ. माधुरीने लगबगीने सर्वांसाठी तयार केलेल्या थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेताघेता गप्पा सुरु झाल्या.
‘शोभाताई, तुमची जरीची साडी छान दिसतेय !’ माधुरी.
‘अहो माधुरीताई, या जरीच्या साडीने काल माझा जीव चांगलाच गोत्यात आणला होता’ शोभाताई म्हणाल्या.
‘कसे काय बरे?’ माझ्यातील चौकस डॉक्टर जागा झाला.
‘त्याचे असे झाले,’ शोभाताई सांगू लागल्या.
‘एक तर मी मुलखाची भित्री आहे.’ त्याच्याकडे पाहून सुभाषरावांनी मान डोलावली.
‘खरे म्हणाल तर आमच्या सौ म्हणजे अर्ध्या वकील आणि अर्ध्या डॉक्टर आहेत. वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना उपजतच डॉक्टरकीचे ज्ञान आहे बर का !’ सुभाषरावांनी एक शाब्दिक चिमटा काढला. खरोखरच शोभाताईंचे वडील म्हणजेच डॉ. कल्याणकर हे श्रीरामपूर येथील एक प्रसिद्ध आणि सेवाभावी लोकप्रिय डॉक्टर होते.
‘पुढे काय झाले?’
माझी उत्सुकता जागृत झाली होती.
त्या पुढे सांगू लागल्या.
‘ त्या एमआरआय मशीनचे नाव ऐकून मला आधीच धडकी भरली होती. तेथील टेक्निशियनच्या सल्ल्याप्रमाणे मी सर्व धातूंचे दागिने, पर्स इत्यादी वस्तू साहेबांच्या ताब्यात दिल्या. त्यांनी माझ्या शरीरात काही धातू तर नाही ना याची चौकशी तर केलीच पण माझ्या शरीरावर एक मेटल डिटेक्टरची कांडी फिरवून खात्रीदेखील केली. त्यानंतर मला त्या मशीनच्या खोलीत घेऊन गेले. सुमारे दहा फूट उंच गोलाकार अश्या मशीनच्या मध्यभागी एक पोकळ भाग दिसत होता आणि त्याला लागूनच एक जेमतेम झोपता येईल असा लांबट भाग होता. बहुतेक मला त्यावर झोपावे लागेल असा मला अंदाज आला होता. तेव्हड्यात तो टेक्निशियन मला सांगू लागला.
‘बाई, घाबरू नका. या कोचवर झोपा. झोपल्यानंतर हालचाल केलीत तर फोटो चांगला येणार नाही. म्हणून तुम्हाला आम्ही या कापडी पट्ट्यांनी कोचला बांधणार आहोत. मशीन चालू झाल्यावर एक प्रकारचा आवाज येतो त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुमच्या कानात आम्ही कापसाचे बोळे घालणार आहोत. मशीन चालू झाल्यानंतर तुमचा कोच हळूहळू सरकत मशीनच्या मधील पोकळीत जाईल. फोटोचे काम सुमारे तीस मिनिटे चालेल. तुम्ही डोळे मिटून शांत पडायचे आहे. झोपलात तरी चालेल. एव्हडे सांगून तो खोलीतून बाहेर गेला. मशीन चालू झाल्याचा आवाज सुरु झाला आणि माझे प्राण मुठीत धरून मी हळूहळू त्या मशीनच्या पोकळीमध्ये शिरले.’
मित्रहो, या ठिकाणीं थोडेसे थांबून आपण MRI विषयी थोडेसे समजाऊन घेणे आवश्यक आहे. आपले शरीर हे सत्तर टक्के पाण्यामुळे बनलेले आहे. पाणी म्हणजे हैड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने तयार होते. प्रत्येक हायड्रोजेनच्या अणूमध्ये एक प्रोटॉन असतो व त्या प्रत्येकावर एक पॉसिटीव्ह विद्युतभार असतो. म्हणजेच प्रत्येक प्रोटॉन हा एक मिनीमॅग्नेट अथवा अतिलघुचुंबक असतो. शरीरामधील हे अब्जावधी लघुचुंबक एकमेकांविरोधी दिशेमध्ये असल्यामुळे आपल्या शरीराभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही. एमआरआय मशीनमध्ये एक प्रचंड शक्तिशाली चुंबक म्हणजे मॅग्नेट असतो. याची क्षमता टेस्ला ह्या मापकाद्वारे मोजतात. आपल्याकडे साधारणतः 0.3 ते 3T शक्तीची मशिन्स उपलब्ध आहेत. जेंव्हा शरीर या महाचुंबक पोकळीत जाते तेंव्हा शरीरातील सर्व प्रोटॉन चुंबक एखाद्या शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे सरळरेषेमध्ये फिरतात. आत्ता जर या चुंबकाच्या क्षेत्रामध्ये आणखी एक चुंबक ९० अंशामध्ये जोडला तर शरीरातील सर्व प्रोटॉन १८० अंशामध्ये फिरतात. जेंव्हा हा दुसरा मॅग्नेट बंद होतो तेंव्हा सर्व प्रोटॉन्स पुन्हा १८० अंशामध्ये फिरतात व त्या बरोबर छोटासा विद्युत प्रवाह तयार करतात. हा प्रवाह संगणकाद्वारे मोजला जातो व त्याच्या साहाय्याने शरीराची प्रतिमा तयार होते. शरीरातील प्रत्येक पेशीतील पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असल्यामुळे आतील सर्व पेशींचे बिनचूक चित्र तयार होते. शरीरातील आजारांचे बिनचूक निदान करता येते. फंक्शनल एमआरआय मशीनमुळे पेशींच्या कार्याचा अभ्यास करता येतो. एक्सरे किंवा सिटी स्कॅन पेक्षा एमआरआय या तंत्राचा शरीरावर कोठलाही दुष्परिणाम होत नाही व मिळणारी माहिती कित्येक पटींने जास्त असते. असो, पुन्हा आपल्या कथेकडे वळू या.
शोभाताई पुढे सांगत होत्या, ‘मी डोळे घट्ट मिटून निपचित पडले होते. कानात बोळे असूनही मशीनचा कर्णकर्कश हातोडा ठोकल्याप्रमाणे आवाज येतच होता. मधूनच दूरवरच्या ग्रहावरून यावा तसा त्या टेक्निशियनच्या सूचनांचा आवाजहि येतच होता. काही वेळातच माझे सर्व अंग गरम होऊ लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले कि माझी साडी गरम होत आहे. साडीच्या निऱ्या जेथे खोचल्या होत्या त्या ठिकाणी तर करवतीने कापावे तसे काहीतरी होत होते. माझ्या संपूर्ण अंगाचा दाह होत होता, लाही लाही होत होती. मी मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. शब्दही फुटेना व माझा आवाज कदाचित बाहेरपर्यंत जात नव्हता. ३० मिनिटे संपता संपत नव्हती. मी तर घामाने पूर्ण न्हाऊन निघाले होते. ते एकदाचे आवाज थांबले, आणि मी त्या मशीनच्या गुहेमधून बाहेर सरकले. दरवाजा उघडून काही व्यक्ती आत आल्या व माझी त्या संकटातून सुटका झाली. बाहेर आल्यावर तेथील टेक्निशियनला माझा अनुभव सांगितलं पण बहुतेक त्याला त्याचे काही महत्व वाटले नाही. मी त्यांना माझ्या साडीला स्पर्श करून पाहायला देखील सांगितले पण त्यांना त्यात काही विशेष वाटले नसावे असे दिसले व मी देखील सर्वांना असेच होत असेल असे समजून साहेबांसह एमआरआय युनिटमधून बाहेर पडले. घरी येऊन पहिले असता निऱ्या बांधलेल्या ठिकाणी चक्क भाजल्याप्रमाणे लाल रेषा दिसत होत्या.’ एव्हडे बोलून त्यांनी मला पोटावरील भाजल्याच्या खुणाही दाखवल्या. त्यांना चांगलेच भाजलेले दिसत होते. त्यांच्या साडीच्या किनारीमध्ये जरीच्या तारा स्पष्ट दिसत होत्या.
मी त्यांची ती परिस्तिथी पाहून आश्चर्याने भयचकित झालो. जर त्या साडीने पेट घेतला असता तर ....?
काही दिवसांपूर्वी वाचलेली अशीच एक कथा मला आठवली. अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये एक निराधार तरुण डोक्याला अपघात झाल्यामुळे दाखल झाला होता. शुद्धीवर आल्यानंतर त्याचे डोके दुखू लागले. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला. ते ऐकून तो रुग्ण काळजीग्रस्त झाला. त्याने डॉक्टरांना एमआरआय करू नका अशी विनंती केली. आपल्या संपूर्ण शरीरावर गोंदवलेले असून जर एमआरआय केला तर शरीर भाजून निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सिनियर डॉक्टरांनी त्याला असे होण्याची शक्यता नसून एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नाईलाजास्तव त्याने संमतीपत्रावर सही दिली. एमआरआय स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. एक शिकावू डॉक्टर हे सर्व संभाषण ऐकत होता. सर्वजण तेथून गेल्यानंतर तो त्या पेशंटपाशी गेला व त्याची चौकशी केली. ज्या माणसाने त्याचा सर्वांग tattoo केला होता त्याने एमआरआय बद्दल स्पष्ट इशारा दिला होता कि ट्याटू करण्यासाठी जो रंग वापरला आहे त्यामुळे एमआरआयकेल्यास शरीराला भाजण्याचा धोका संभवतो. सदर डॉक्टरने लायब्ररीत जाऊन इंटरनेटवर सर्च केल्यानंतर हि शंका खरी असल्याचे दिसले. गोंदवण्यासाठी वापरात असलेल्या प्रुशियन ब्लू या रंगद्रव्यामध्ये आयर्न ऑक्सिईड अर्थात लोहभस्म असल्याने एमआरआय मशीनच्या प्रभावामुळे अनेक व्यक्तींना थर्ड डिग्री बर्न्स झाल्याच्या घटनांची नोंद सापडली. एव्हडेच नव्हे तर शरीरात बसवलेले पेसमेकर्स, इम्प्लांट्स, धातूंचे भाग इत्यादीमुले धोका संभवतो. काही खेळाडूंनी घातलेल्या मायक्रोफायबर जर्किनमुळे भाजल्याच्या घटनाही नोंदलेल्या दिसत होत्या. जगामध्ये अशा घटनांची दखल घेऊन काही प्रतिबंधक उपाय म्हणून एमआरआय मशीनमध्ये जाण्यापूर्वी घेण्याची खबरदारी म्हणून रुग्णांनी उत्तर देण्याची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. पण आपल्या देशामध्ये अश्या अघटित आणि अनपेक्षित घटना नेहमीच घडतच असतात. खरे तर बऱ्याच एमआरआय सेंटर्समध्ये रुग्णांना तेथील गाऊन घालण्याची सक्ती आहे. पण कार्यबाहुल्याच्या दबावामुळे म्हणा किंवा प्रतिबंधक सूचनांचे महत्व कर्मचाऱ्यांना न समजल्यामुळे म्हणा अश्या चुका पुन्हा पुन्हा होत राहतात. एमआरआयच्या प्रचंड चुंबकक्षेत्रामुळे घडलेले अनेक प्राणघातक अपघात तर आपल्या देशात अज्ञानामुळे किंवा बेदरकार वृत्तीमुळे झालेले आपण ऐकत असतो. जरीच्या साडीमुळे घडलेली हि अश्या प्रकारची घटना पहिलीच असावी ती पुन्हा होऊ नये म्हणून योग्य त्या माध्यमांपर्यंत पोहोंचवण्याचा प्रयत्न करण्याचे काम माझे काही सहकारी करणारच आहेत. सौ शोभाताईंना झालेला शारीरिक त्रास जरी फारसा जास्त नसला तरी कदाचित त्यातून काही गंभीर घटना होऊ शकली असती हि शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात ऍड. सुभाषराव हि घटना हॉस्पिटलच्या संचालकांच्या निदर्शनास आणून देतीलच पण हि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न !
छान माहितीपुर्ण लेख! एम. आर.
छान माहितीपुर्ण लेख! एम. आर. आय. तंत्राबद्दल व त्या यंत्रामध्ये जाण्यापुर्वी घेण्याच्या खबरदारी बद्दल थोडीफार कल्पना करता येऊ शकते. आता बहुतेक रोग निदानासाठी एम. आर. आय. व सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. पण एम. आर. आय. यंत्रात शिरण्यापुर्वी घेण्यात येणार्या खबरदारीची अजून तितकीशी स्पष्टता दिसत नाही.
बादवे, एम. आर. आय. व सिटी स्कॅन मध्ये काय फरक असतो? दोन्ही मशीन तर सारख्याच दिसतात. आणि सिटी स्कॅन यंत्रामध्ये जाण्यापुर्वी सुध्दा खबरदारी घ्यावी लागते का?
कुमार१ यांचा लेख नोबेल संशोधन
कुमार१ यांचा लेख
नोबेल संशोधन (८) : MRI प्रतिमातंत्र
नी रिप्लेसमेंट झाली तर त्या
नी रिप्लेसमेंट झाली तर त्या ट्रान्सप्लांटचे काय कराय्चे?
>>>स्कॅन करण्यापुर्वी
>>>स्कॅन करण्यापुर्वी हॉस्पिटलचे कपडे असतात तसे घालायला देउ शकतात. हॉस्पिटलाइज झालेल्या पेशंट्सना देतात तसे.<<<
भारतात सर्वच ठिकाणी देत नाहित. इतक्या लोकांनी दुकानं उघडल्यासारखी लॅब असतात आता सगळीकडे. टेकनिशिअन नवशिके असतात का नाही कोणाला कळतय..
लेखात डोक्याच्या स्कॅनचा फोटो
लेखात डोक्याच्या स्कॅनचा फोटो का दिलाय?
खुप दिवसांनी मायबोलीवर तुमचा
खुप दिवसांनी मायबोलीवर तुमचा लेख आला डॉक्टर.
MRI बद्दल सोप्या शब्दात माहिती दिलीत.
MRI शब्द ऐकल्यावर गेल्यावर्षीची नायरमधली दुर्घटना आठवली.
डॉक्टरसाहेब, वेलकम बॅक.
डॉक्टरसाहेब, वेलकम बॅक. एमआरआय मशीन्सच्या बाबतीत, तुमच्या शैलीत मांडलेले डूज अँड डोंट्स आवडले. या लेखमालेचं पुस्तक प्रकाशित झालं कि कळवा...
सोप्या भाषेतील लेख
सोप्या भाषेतील लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
>>नी रिप्लेसमेंट झाली तर त्या ट्रान्सप्लांटचे काय कराय्चे?>>
अमा, डॉकना याबद्दल सांगायचे. खालच्या दुव्यावर छान यादी दिली आहे.
https://www.nhs.uk/conditions/mri-scan/who-can-have-it/
उत्तम माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
वेलकम बॅक सरजी!
वेलकम बॅक सरजी!
माहितिपुर्ण लेख! ह्यातल काहिहि माहिति नव्ह्त!
<विषयांतर>
< विषयांतर >
शीर्षकाविषयी. वर एका प्रतिसादात श्री संत ज्ञानेश्वरांचा ओझरता उल्लेख आला आहे. हो या मूळ ओळी ज्ञानेश्वरांच्याच आहेत...
परिशिष्ट- श्री ज्ञानेश्वरांची विराणी[मूळ]
घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥
चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु ।
देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥
तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।
कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥
दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ ॥
पण या नावाचा मराठी चित्रपट अनेक वर्षांपूर्वी येऊन गेला तेंव्हापासून चित्रपटाचे नाव हीच या ओळींची ओळख झाली आहे.
< / विषयांतर >
Claustrophobic लोकांना MRI
Claustrophobic लोकांना MRI मशीनमध्ये त्रास होतो का? काही बिल्डींगजला 3-4 माणसांच्या कपॅसिटी एवढी छोटी लिफ्ट असते, मी त्यातसुद्धा ब्रेथलेस होते. मला ऐसपैस बाथरूम्स, मोठ्ठी लिफ्ट with fan लागते. अशा लोकांना MRI मशीनमध्ये काही विशिष्ट त्रास होतो का?
खूप उपयुक्त माहिती
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
कथा सुद्धा छानच आहे....
गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील माझा शोधनिबंध अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये स्वीकारला गेला>>> सर, तुमच्याकडून मधुमेहावरही माहिती यावी अशी ईच्छा आहे.
वेलकम बॅक डॉक्टर. खुप उपयुक्त
वेलकम बॅक डॉक्टर. खुप उपयुक्त माहिती दिली.
>> Claustrophobic लोकांना MRI
>> Claustrophobic लोकांना MRI मशीनमध्ये त्रास होतो का?
होतो असे गुगल सांगते. MRI claustrophobia हे शब्द एकत्र गुगलून बघा. काही दुवे आहेत तिथे यावर उपायांवर पण चर्चा केली आहे. अर्थात, याबाबत अधिक माहिती (अनुभवजन्य) डॉक्टरसाहेबच सांगू शकतील.
Pages