'गेम ऑफ थ्रोन्स' ह्या महामालिकेचा आठवा आणि शेवटचा सीजन सुरु झाला आहे. २०११ मध्ये सुरु झालेल्या ह्या मालिकेचे प्रत्येकी १० भागांचे सहा आणि ७ भागांचा एक असे आत्तापर्यंत सात सीजन्स झाले आहेत. आठवा सीजन ह्या सातही सीजन्सपेक्षा वेगळा ठरतो आहे. कारण आत्तापर्यंत ह्या मालिकेने प्रेक्षकांना निराश अनेकदा केलं, त्यांचे अंदाज अनेकदा चुकवले. मात्र तरी अपेक्षाभंग मात्र कधी केला नव्हता. आणि ह्या शेवटच्या सीजनचे आत्तापर्यंतचे भाग त्यांचा अपेक्षाभंग करणारे ठरले आहेत.
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, हो.. माझाही थोडासा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र तरी मला हा आठवा सीजन इतकाही टाकाऊ वगैरे वाटलेला नाही. असे अनेक लोक असतील ज्यांनी GoT बद्दल ऐकून ऐकून अखेरीस ही मालिका पाहायला सुरुवात केली असेल. त्यांना सोशल मीडियावर लोकांचा वैफल्यग्रस्त आणि चिडचिडा उत्सर्ग पाहून असं वाटत असेल की पुढे पाहावं की नाही ! मी त्यांना सांगू इच्छितो की, लोकांचा अपेक्षाभंग फक्त गेल्या काही एपिसोड्समुळे झाला आहे. त्याआधी एकूण ६७ एपिसोड्स आहेत, जे अख्ख्या जगाला आवडलेले आहेत. शेवटच्या सीजनच्या सहा एपिसोड्समुळे हे ६७ एपिसोड्स मी तरी विसरू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे, अपेक्षाभंग काही लोकांचा झाला आहे म्हणजे तुमचाही होईलच असं नक्कीच नाही. त्यामुळे ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय आणि पाहायची इच्छा आहे त्यांनी ते नक्कीच पाहावं. रु. १९९/- महिन्याचे भरून हॉटस्टारवर ते पाहता येऊ शकेल. क्रिकेट वर्ल्ड कप जवळ येतो आहे.तोसुद्धा हॉटस्टारवर दिसेलच. ही वेळ १९९/- अगदी पूर्णपणे वसूल होण्याची आहे.
आता आठव्या सीजनबाबत बोलू.
तत्पूर्वी ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय, त्यांच्यासाठी पटकन कथानक सांगतो. 'Throne' म्हणजे 'सिंहासन'. 'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे अर्थ सुस्पष्ट आहेच. ही कहाणी मूलत: सत्तासंघर्षाची आहे. ह्या संघर्षात अनेक घराणी उतरली आहेत. GoT च्या भाषेत घराण्यांना 'House' म्हणतात. टार्गेरियन, स्टार्क, लॅनिस्टर आणि बरॅथिअन ही चार प्रमुख हाऊसेस ह्या संघर्षात आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त ग्रेजॉय, टायरेल, मार्टेल, बोल्टन आणि अशी अनेक लहान-मोठी घराणीही आहेत. ह्या कथानकाचा पसारा प्रचंड मोठा आहे. उत्तरेकडे जिथे कायम शून्याखाली तापमान असतं, अश्या बर्फाच्छादित भागापासून दक्षिणेकडे समुद्र आणि साधारण आग्नेय दिशेला रखरखीत वाळवंटापर्यंत हा भौगोलिक पसारा आहे आणि त्यासोबतच त्या त्या जागांच्या स्वत:च्या लहान-मोठ्या कहाण्या आहेत. पण अनेक उपकथानकांना एकत्र आणणारं एक मुख्य कथानक म्हणजे 'सत्तासंघर्ष'. जवळजवळ सात सीजन्सपर्यंत हा पसारा असाच दूर दूरपर्यंत होता आणि अनेक कथानकं एकाच वेळी सुरु होती. हळूहळू करत सगळी कथानकं आणि सगळी पात्रं - काही संपली, काही उरली - आठव्या सीजनला फक्त दोन जागी एकत्र आली आहेत. ह्यावरून लक्षात यावं की आता साहजिकच उरकाउरकी होणार आहे. तीच ह्या सीजनमध्ये चालू आहे.
पहिल्या दोन भागांत 'पात्रांचा एकमेकांमधला संवाद' हाच मुख्य अजेंडा आहे. 'हा ह्याला भेटला, तो त्याला भेटला' ह्यामध्ये दोन भाग खर्च केले गेले, इथून प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाची सुरुवात झाली. मात्र मला असं वाटतं की, भेटीगाठी आणि गप्पांत दोन भाग खर्च होणे आवश्यकच होतं. कारण अनेक पात्रं पहिल्यांदाच एकमेकांसमोर आली होती आणि अनेक पात्रं बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटत होती. त्यामुळे त्यांच्यात संवाद साधला जाणं साहजिक होतं. प्रॉब्लेम हा होता की हे संवाद GoT च्या स्वत:च्याच पातळीचा विचार करता फारच सपक होते. सात सीजन्समध्ये एकापेक्षा एक वनलायनर्स आणि मोनोलॉग देणाऱ्या लेखकांनी इथले संवाद त्या मानाने फारच उथळ लिहिल्यासारखे वाटले.
तिसरा भाग म्हणजे Most Awaited युद्धाचा भाग होता. नाईट किंग, त्याची आर्मी ऑफ डेड विरुद्ध सगळे सजीव. ह्या युद्धासाठी अवेक जाती, जमातीचे लोक, वेगवेगळ्या भागांतले लोक आपापले मतभेद, इतिहास विसरून जीवितासाठी एकत्र आले होते. प्रेक्षक ह्या महासंग्रामाची वाट गेले अनेक सीजन्स पाहत होते. Winter is coming and the Dead are coming with it अशी भीती घालून, गूढगम्य चेहरा करून कायम चिंतीत चेहऱ्याने वावरणारा जॉन स्नो ह्या एका कारणासाठी ग्रेट वाटत होता कारण त्याला एकट्याला जाणीव होती की भविष्यात काय आव्हान आपल्यासमोर असणार आहे.
मात्र ह्या युद्धाने प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाचा कडेलोट केला !
एक तर रात्री झालेलं युद्ध असल्याने सगळीकडे अंधार अंधार ! त्यात मारामारी आणि कापाकापीची गती इतकी भयंकर की त्या अंधारात, त्या गतीने नेमकं चाललं काय आहे ह्याची टोटल लागतच नव्हती.अनेकांनी स्क्रीन रिजोल्युशनही बदलून पाहिलं. कुणी 'मोबाईलवर कळत नसेल' म्हणून मोठ्या स्क्रीनवर पाहायचा प्रयत्न केला, पण तरी अंधार काही उजळेना ! मोस्ट अवेटेड युद्ध अश्याप्रकारे झाकोळलेलं पाहावं लागल्याने वैताग येणं स्वाभाविकच होतं. मलाही आलाच.
GoT मध्ये ह्याआधी अनेक लहान-मोठी युद्धं, मारामाऱ्या, कापकाप्या झाल्या आहेत. ती सगळीच रोमांचक, उत्कंठावर्धक होती. मृतात्मे विरुद्ध सजीव, हे युद्ध सगळ्या युद्धांचा बाप ठरणारं असायला हवं होतं. ते तसं झालं नाही. ह्याचं कारण फक्त अंधारातलं चित्रीकरण इतकंच नाही. त्याहून महत्वाचं आणि जरासं विचित्र कारण म्हणजे ह्या युद्धात अपेक्षेपेक्षा कमी पात्रं मेली ! आमची अशी अपेक्षा होती की जिंकणाऱ्या सैन्यालाही ह्या युद्धाचा एखादा मेजर सेटबॅक बसेल. त्या मानाने तेव्हढा मोठा सेटबॅक बसला नाही.
प्रेक्षकांसाठी हा एपिसोड अपेक्षाभंग करणारा ठरला तरी मला त्यात काही गोष्टी फार आवडल्या.
त्यांत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 'आर्या स्टार्क'. तिचे सगळे प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत. ह्या ग्रेसफुली ती लढते ते केवळ पाहत राहण्यासारखं आहे. सिरिओ फॉरेल, जॅकन हेगार, द हाउंड ह्या सगळ्यांकडून आणि स्वत:ची स्वत:च ती जे जे शिकली आहे, ते तिने ह्या भागात दाखवलं आहे. एका विशिष्ट प्रसंगी जेव्हा तिचं मनोधैर्य खचायला लागतं, तेव्हा 'रेड वूमन' तिला सिरिओचे शब्द आठवून देते. 'What do we say to the God of Death? 'Not Today!' हा प्रसंग फार महत्वाचा आहे. (Will come back to this)**
दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराह मॉरमोन्ट. ह्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणारा कुणी असेल तर तो जोराह. शत्रूवर सगळ्यात आधी तो चाल करून जातो. त्याच्यासोबतची सैन्याची भलीमोठी तुकडी ठार मारली जाते, तेव्हा तो योग्य वेळी माघार घेऊन मागे उरलेल्या सैन्यासोबत जखमी अवस्थेत पुन्हा लढायला उभा राहतो. आपल्या राणीसाठी जीवाची बाजी लावतो. शिवाजी महाराजांच्या मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू, प्रतापराव अश्या अनेक सरदारांनी जसं शौर्य गाजवलं, तसा हा जोराह मॉरमोन्ट शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राणीच्या जीवाचं रक्षण करतो आणि अनेक वार झेलूनही तो प्राण तेव्हाच सोडतो, जेव्हा ती सुरक्षित झाल्याचं त्याला समजतं. एकतर्फी प्रेमी जोराहचा असा अंत खूप भावनिक होता. जिच्यासाठी त्याने अनेकदा आयुष्य पणाला लावलं, त्या त्याच्या प्रेमासाठी, राणीसाठीच तो धारातीर्थीही पडला. 'मेरी ख़तम कहानी बस तुम तक' असं त्याचं आयुष्य संपतं. इयान ग्लेन ह्या स्कॉटीश अभिनेत्याने 'जोराह मॉरमोन्ट' अविस्मरणीय करून ठेवला आहे.
तिसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराहची पुतणी 'लिआना मॉरमोन्ट'. अंदाजे १२-१४ वर्षांची ही चिमुरडी खतरनाक असते. तिच्या घराण्याला शोभेल असा बाणेदारपणा आणि निडरपणा तिच्यात पुरेपूर भरलेला दाखवला आहे. 'आर्मी ऑफ डेड'मधला डेड जायंट विंटरफेलच्या किल्ल्यात येऊन सगळं उद्ध्वस्त करत असताना तिला जाणवतं की ह्याला संपवणं किती आवश्यक आहे ! जखमी अवस्थेत लंगडत लंगडत ही चिमुरडी तिच्यापेक्षा अनेक पट महाकाय दानवावर धावत जाते. तो तिला एका हातात उचलून अक्षरश: चुरडतो आणि तोंडासमोर आणतो. तिला तेच हवं असतं. हातातून सुटू न दिलेलं ड्रॅगनग्लासचं शस्त्र ती त्याच्या डोळ्यात खुपसते आणि स्वत:च्या जीवाचा सौदा करून आलेलं संकट परतवते.
आता coming back to आर्या.
**'What do we say to the God of Death? 'Not Today!' ह्यातला 'गॉड ऑफ डेथ' म्हणजे आत्ताच्या प्रसंगी 'नाईट किंग' आहे. तो किल्ल्यात शिरतो आहे आणि ब्रानकडे पोहोचणार आहे. 'Not Today' हे मी त्याला सांगायला हवं. आर्मी ऑफ डेड तर मरणार नाहीच, संपणारही नाही. त्याला संपवणं हाच एकमेव उपाय आहे. - हे सगळं आर्याला त्या प्रसंगी समजतं आणि मग ती उडी..
ह्या उडीबाबतही प्रेक्षकांनी अनेक प्रश्न केले. कुठून उडी मारली, हे कळायला काहीच मार्ग नाही. शक्य आहे की 'विअरवूड'मधल्या एखाद्या झाडावरून तिने उडी मारलेली असावी. पण हे सगळीकडे पसरलेल्या वाईट्सना कळत नाही, नाईट किंग आणि त्याच्या सरदारांनीही कळत नाही, हे अचाट आहे. पण मला तेव्हढी सिनेमॅटिक लिबर्टी द्यायला हरकत नसावी.
मागे एका एपिसोडमध्ये आर्या जेव्हा ब्रियानसोबत तलवारबाजीचा सराव करत असते, तेव्हा अगदी अखेरच्या क्षणी ती दुसऱ्या हाताचा वापर करून ब्रियानला चित आणि चकित करते. तेव्हा ब्रियान तिला कौतुकाने विचारते, 'Who taught you this?' त्यावर आर्या 'Noone!' असं उत्तर देते. आर्याकडे असे युद्धकौशल्य आहे, जे इतर कुणाकडेही कदाचित नाहीय. ती निडर आणि शूर तर आहेच, पण चलाख आणि कुशलही आहे. तिच्या कौशल्याची चुणूक आणि एक प्रकारे हिंट त्या भागात दिली होती. जे कौशल्य वापरून ती ब्रियानसारख्या एका ताकदवान, यशस्वी आणि शूर तलवारबाजाला शरण आणते, तेच कौशल्य वापरून ती नाईट किंगला संपवते.
अनेकांची अशी अपेक्षा होती आणि ती गैरही नव्हती कारण बिल्ट अपही तसा केला गेला होता की कुठे तरी, केव्हा तरी नाईट किंग आणि जॉन स्नोमध्ये वन-ऑन-वन युध्द होईल. पण तसं काही न होता अचानक आर्याच 'हिरो' बनते ! एका प्रसंगी ते जोन आणि नाईट किंग समोरासमोर येतातही. मात्र स्वत: नाईट किंग तेव्हा जॉनशी लढण्यापेक्षा मृतांना जिवंत करून त्याच्यावर पाठवायची चाल खेळतो. नेहमीप्रमाणे बावळट जॉन जे करायचं ते सोडून दुसरीकडेच गुंतून राहतो आणि नाईट किंग ब्रानपर्यंत पोहोचतो.
जॉन आणि नाईट किंगमध्ये आमनासामना न होणं, हा मला अपेक्षाभंग वाटला नाही. जे आपल्याला वाटतं ते होणार नाहीच, सयाची सवय मला GoT ने ६७ भागांतून लावली आहेच ! ध्यानीमनी नसताना अचानक आर्याने नाईट किंगला संपवणं हेही मला आचरट वाटलं नाही. कारण धक्कातंत्र वापरून कधीही काहीही घडवणं, हेही GoT ने अनेकदा केलं आहे.
माझा अपेक्षाभंग दोन बाबतींत झाला.
एक म्हणजे नाईट किंगचं मुख्य लक्ष्य 'ब्रान' आहे. तो त्यालाच संपवायला येणार आहे, हे सगळ्यांना माहित असतं. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी थिऑन ग्रेजॉय स्वत:कडे घेतो. पण ह्यासाठीचं नियोजन ? थिऑन आणि त्याचे साथीदार धनुष्य-बाण घेऊन अविरतपणे येतच राहणाऱ्या वाईट्सचा सामना करणार होते ? धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नसतो. त्यांना हत्यार असं हवं, जे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील, इतकी साधी गोष्ट लक्षात येऊ नये, हे हास्यास्पद नव्हे तर मूर्खपणाचं वाटलं. शेवटी बाण संपल्यावर थिऑन भालाच घेतो. तलवारी आणि भाले बाकीच्यांकडे का नव्हते ?
दुसरी अपेक्षाभंग करणारी गोष्ट म्हणजे 'नाईट किंग' चा काही आगापिछा शेवटपर्यंत कळतच नाही. त्याला लॉंग नाईट आणायची आहे, त्यासाठी अख्ख्या जगाच्या मेमरीजचं मोर्र्तीमंत क्लाउड स्टोरेज बनलेल्या 'थ्री आय्ड रेव्हन' 'ब्रान'ला मारणं आवश्यक आहे, हे सगळं समजलं. पण मुळात तो कोण आहे/ होता ? लॉंग नाईट आणायची अफलातून आयडीया त्याला सुचली कशी ? मृतांना जिवंत करणारी ताकद त्याच्यात कुठून आली ? हे सगळं अनुत्तरीतच राहिलं. पहिल्या दोन भागांत अनेकविध पात्रांचं जे हळदी-कुंकू सुरु होतं, त्यातच कुठे तरी ह्याचीही कहाणी उलगडता आली असती. ते काही न होणं, एक महत्वाचा धागा मोकळाच सोडून देणं प्रचंड खटकलं.
ह्या भागाचा शेवट नाईट किंगच्या शेवटाने होतो. पण तत्पूर्वी थिऑनचाही शेवट होतो. अतिशय विचित्र, गुंतागुंतीचं आणि मरणप्राय यातना सहन करणारं, अनेक अप्स-डाऊन्स असणारं थिऑन ग्रेजॉय हे पात्र आहे. त्याच्याकडे कुठलंही अतुलनीय कसब नाही. एका मोठ्या घराण्यात जन्माला आला खरा, पण जवळजवळ सगळा जन्म दुसऱ्या एका मोठ्या घराण्यात - जरी घरच्यासारखाच होता तरी - बंदी म्हणून घालवलेला थिऑन. त्याचा मनावरचा ताबा अनेकदा सुटतो. कारण तो माणूस असतो. स्वत:ची शरम वाटत असतानाही तो स्वत:विरुद्धही लढतो आणि केलेल्या चुकांची भरपाई करण्यासाठी झटतो. त्याच प्रयत्नात जीवही देतो. अखेरच्या क्षणी 'ब्रान' निर्विकार चेहऱ्याने का होईना त्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन 'Theon, you are a good man. Thank you!' असं म्हणतो, तेव्हा फक्त थिऑनच्याच डोळ्यात पाणी येत नाही, आपल्याही पापण्या अंमळ ओलावतात.
भागाचा शेवट अतिशय आवडलेल्या ह्या दोन गोष्टींनी होतो. 'नाईट किंगवर उडी घेणारी आर्या' हे चित्र तर कधीच विसरता येणार नाही आणि आपला शेवट समोर दिसत असतानाही नाईट किंगवर जीवाच्या आकांताने भाला घेऊन धावत जाणारा थिऑनसुद्धा कधी विसरता येणार नाही.
एकूणात पहिले तीन भाग अपेक्षेपेक्षा जरा कमी वाटले, हे जरी खरं असलं तरी there were a few moments of brilliance too. ह्या लेखात बरेचसे लिहायचे राहून गेले आहे. उदाहरणार्थ - सर्सी, सान्सा, टिरीयन आणि जेमी अश्या महत्वाच्या पात्रांचा उल्लेखही आला नाही, जॉन आणि डॅनीने केलेला ड्रॅगन्सचा केलेला बावळट वापर, बेरिक डँडेरियनचा मृत्यू, दोथ्राकी आर्मीचा जवळजवळ विनाश, स्पेशल इफेक्ट्स, तिसऱ्या भागाच्या शेवटच्या दृश्याचं अफलातून पार्श्वसंगीत (The Night King) असं सगळं आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहिताना आठवत आहे. पण अतिविस्तार टाळणं आवश्यक असल्याने लिहित नाही.
पुढील तीन भागांबाबत काही दिवसांनी लिहीनच.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2019/05/game-of-thrones-season-8-with-spo...
लैच शॉर्टमधे आवरलंय
लैच शॉर्टमधे आवरलंय
गेल्या सात सीजनमध्ये नाईट
गेल्या सात सीजनमध्ये नाईट किंग खूप भाव दिला, पण एका क्षणात त्याला मारून टाकलं, "अरे असं कसं पटकन मारलं.." म्हणून लोकं निराश झाली. आठव्या सीजनला पहिले दोन एपिसोड काही झालंच नाही, त्यामुळे लोकं अजून वैतागली. बरं त्या आर्याला मारलं नाही, नाहीतर लोकांनी मोर्चा काढला असता.
डॅनी वेडी झाली, तिने अन तिच्या ड्रॅगनने ते जाळून टाकलं, लोकं म्हणाली असं का? असं नाही व्हायला पाहिजे. अरे पण तिच्या बाजूने तुम्ही विचार करा. तिचा लव्हर तिचा भाचा निघाला, जॉन तिच्यापासून दूर गेला, तिच्या विश्वासातला तो कोण तो मेला , तिच्या समोर त्या मेसॅन्द्री का काय तिला मारलं, तिचा ड्रॅगन मुलगा मेला, लोकं तिच्या विरोधात कट रचू लागले, असं झाल्यावर ती येडी होणारच, तिने कितीवेळा चांगुलपणा घ्यायचा..
बोगस निघालाय शेवटचा सीझन.
बोगस निघालाय शेवटचा सीझन. स्टार बक्स कॉफी ची फुकट जाहिरात, डेनीची अक्षम्य जाळपोळ जॉनराव वाया गेला आहे.
डॅनी वेडी झाली, तिने अन
डॅनी वेडी झाली, तिने अन तिच्या ड्रॅगनने ते जाळून टाकलं, लोकं म्हणाली असं का? असं नाही व्हायला पाहिजे. >> डॅनी चे विचार स्पष्ट आहेत. people do not take me as their Queen by love then they will have to do so by fear. John Snow च्या वागणूकीने होता नव्ह्ता होतो कडेलोत झाला. तरीही जाळपोळ करण्याआधी ती थोडी थांबली, कदाचित तीचा सारासार विवेक जागा झाला असेल काही क्षणापुरता. ....
BTW आज एक थियरी वाचली कि जाळ्पोळ ड्रोगोन मार्फत ब्रान ने घडवून आणली आहे म्हणून त्या वार्ज करताना ड्रॅगनची सावली दिसलेली होती नि म्हणून जाळ्पोळ होते तेंव्हा कधीच डॅनी चा चेहरा दिसत नाही.
हो मीपण वाचलं, कारण ब्रॅंन
हो मीपण वाचलं, कारण ब्रॅंन काहीच करत नाहीये, त्याचं कॅरॅक्टर का आहे? आता डॅनीच्या विरोधात सगळं स्टार्क कुटुंब आहे, मग डॅनीला जॉन स्नो मारून टाकेल, पण त्याला थ्रोनवर बसायचं नाहीये, मग सर्व संमतीने ब्रॅंन थ्रोनवर बसेल...