म्होतूर ( विधवा पुनर्विवाह )
काही मायबोलीकरांनी म्होतूर म्हणजे काय विचारले म्हणून -
( म्होतूर किंवा पाट हे समानार्थी शब्द आहेत. म्होतूर म्हणजे विधवेचा पुनर्विवाह. पूर्वी काही खालच्या जातीच्या विधवांना पुनर्विवाह करता येत होता. म्हणजे या जाती ख-या सुधारीत होत्या. सद्याही खालच्या जातीत विधवा पुनर्विवाह होतात. पण वरच्या जाती जसे ब्राम्हण, मराठा यांच्यात पुनर्विवाह होत नाहीत. अद्यापही काही शहरी अपवाद सोडले तर ग्रामीण भागात अजूनही वरच्या जातीत पुनर्विवाहाला स्थान नाही. )
आज शालीनी खूप खुश आणि गोंधळलेली होती. वारंवार प्रामाणिक प्रयत्न करुनही एखादी गोष्ट हवी तशी होत नाही तेव्हा वाटू लागतं आता तसं मनासारखं घडणारच नाही. नाद सोडावा. अन् अचानक नियतीचं दान आपल्या बाजूनं पडावं. त्याक्षणी होणारा आनंद आपलं अवघं विश्व व्यापतो. तो अत्यानंद आपल्याला कधी भविष्यात तर कधी भूतकाळात नेतो आणि या त्रेधातिरपीटीत बिचारा वर्तमान फरपटतो. मन भविष्य, भूतकाळात तर शरीर वर्तमानात असच काहीसं चालू असतं. त्यामुळे उडालेल्या गोंधळाला आपण बावरणे असे म्हणतो. शालीनी बावरली होती. कधी तिला भूतकाळ आठवायचा तर कधी भविष्याचं स्वप्नरंजन चालायचं. तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध संपला म्हणून आनंदली होती. बाप्पा , आई निश्चिंत झाले म्हणून सुखावली होती.
कोणी पाणी मागितले तर रिकामं भांड पुढे करायची . कोणाला चहा द्यायचा झाला तर पाणी द्यायची. सगळे तिला हसत होते अन् ती गोड लाजत होती.
ती त्याला आणि तो तिला पसंत होता. अवकाश होता त्याच्या आई बाबांच्या होकाराचा तो एकदाचा मिळाला आणि लग्न जुळले. त्या क्षणापासून तिचे चित्त था-यावर नव्हते.
तिच्या रानातल्या घराच्या दारात रंगीबिरंगी मांडव सजला होता. दादू तिचा लहान भाऊ. दादूनी वाडीतली पोरं जमवून रंगीबेरंगी पताका लावण्याचे काम केलं होतं. लग्न जुळल्याच केवढं अप्रूप त्याला. अगदी देहभान विसरून लगबग चाललेली त्याची.
बाप्पा, तिचे वडील सगळं बैजवार होतय का हे पाहत होते. सगळ्यांना वेगवेगळ्या सूचना करत होते. घरात उत्सवी वातावरण होते. माणसांची लगबग, लहानथोरांच्या अंगावरचे नवे नवे कपडे, मोगऱ्याच्या वेण्यांचा मंद सुवास , फुलमाळांनी सजलेला मांडव आणि घर, ओल्या मातीचा गंध लगडलेला रानवारा, सगळ वातावरण सुगंधी झालं होतं.
घराच्या आजूबाजूला उन्हाळी मका आणि गुडघाभर वाढलेली वांगी त्या उन्हातसुध्दा सुखद हरित गारवा पेरत होती. हिरव्यागार पाणाआडून जांभळी काटेरी वांगी पाहिल्यावर रसना चाळवत होती. वांग्याची निळसर छोटी फुले हिरव्या रानावर आपल्या सौंदर्याचा तोरा मिरवत होती. त्या भिजलेल्या रानावरुन ओल्या मातीचा गंध घेऊन येणारी वा-याची शीत लहर हवीहवीशी वाटत होती.
बाजूला मोकळ्या वावरात भिवा धनगर मेंढरांना बाभळी डहाळून घालत होता. मधेच ह्याssss हुर्रss असा आवाज करून आणि घुंगूर काठी वाजवत मेंढरे हुसकावून डहाळलेल्या पाल्यावर आणत होता. बाभळीची कोवळी लुसलुशीत पानं खाण्यात मेंढरं हरपली होती. मध्येच दोन बालिंग्यांची वर्चस्वाची लढाई जुंपली की शिंगाचा खडखडाट व्हायचा. चार पावलं मागे सरुण शिंगं सरसावून पवित्रे घेतले जायचे. मग भिवा त्यांना आठवण करुन द्यायचा डहाळा खायची.
पाटाच्या हौदावर दादूने जनावरांना पाणी पाजलं अन् जवळच्या डेरेदार आंब्याखालच्या गोठ्यात बांधलं. गव्हाणीत मका तोडून घातला तशी जित्राबं घंटीच्या तालावर मान हलवत मक्याचा फडशा पाडू लागली. वाघ्या कुत्रा गोठ्या बाहेर राखन देत बसला होता. भिवाला बाभळी डहाळताना बघून मधेच भुकंत होता. भिवाची मेढंर पाला खाता खाता मान वर करून टवकारून बघत होती. मग थोडावेळ भिवाचा खंड्या अन् वाघ्याची भुंकण्याची जुगलबंदी लागत होती. मग भिवा हाsssड म्हणून हस्तक्षेप करत होता. रानात फक्त भिवा धनगरालाच काम होतं . इतर लोकांनी कामाला आज सुट्टी घेतली होती. आजूबाजूच्या मळेक-यांनाही साखरपुड्याचे आमंत्रण होते.
कोणी तरी ऋतूराज वसंताला तिच्या साखपुड्याची चुगली केली आणि उत्कट रंगाचे, गंधाचे मांडव पडले रानभर. परसदारीचा आंबा मोहराच्या सोनेरी गदारोळात अलगद हरवला. दारातला गुलमोहर तरी कसा मागे रहावा त्यानेही केशरी छत्र धरले भर उन्हात . पहाट केशर विसरुन गेली गुलमोहरावर वाटतं . हिरव्यागार पानात मधेच चकाकते केशर पाहणा-याला मंत्रमुग्ध करत होते. घराभोवती मखमलीचा ताटवा तरारुन आला होता. बांधावरच्या मोग-याला सुगंधी नशा आली. मोगऱ्याचा सुगंध मखमलीच्या उग्र वासात मिसळून एक वेगळाच सुगंध दरवळला होता.
तिचं मनही आंब्याच्या मोहरासारखं मोहरुन गेलं अन् गर्द हिरव्या पानाआडच्या मोग-याच्या कळीसारखं लाजलं. निसर्गाच हे नटणं काहीतरी मंगलमय घडतय याचीच साक्ष देत होतं.
दारातल्या लाऊडस्पीकरवर कोळी गीतांनी ठेका धरला तशी लहान पोरांची पावलं थिरकली. कोळी गीतांची लय पकडुन सानथोर लगबग करतायेत की त्यांच्या लगबगीवर कोळी गीताने ठेका धरलाय कळायला मार्ग नव्हता.
एका एका कामासाठी दोघे दोघे धावत होते. मधेच बाप्पांना आठवले भटजी आले की नाही. आले नाहीत पाहिल्यावर एका पोराला ते कुठपर्यंत आलेत ते पहायला सांगितले आणि आले नसतील तर घेऊन ये लगेच असे सांगितले. हळद कुंकू, पान, सुपार्या, खारका, नारळ, पेढे, मुलाचे कपडे, अंगठी, मानापानाचे सामान, पूजेचे साहित्य सगळं तयार आहे ना असे शालिनीच्या आईला विचारले.
गावातल्या निवडक लोकांना आमंत्रणं गेली होती. तिने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावले होते. त्यांचे छेडणे सरत नव्हते किंबहुना ते सरु नये असेच तिला मनोमन वाटत होते . पण ती मैत्रिणींवर लटकेच रागावत होती . कालपासूनच मनात हुरहूर दाटून आली होती. रात्र तशी जागूनच काढली तरी चेह-यावर जाग्रणाचा शीण नव्हता. कधी एकदाचा दिवस उजाडतो असे झाले होते तिला. त्याला कारणही तसेच होते. दैवाचे पडलेले उलटे फासे पुन्हा एका लग्नाच्या होकाराने सुलटे झाले होते.
घरात तेलच्याच्या जेवणाचा बेत होता. भावकीतल्या दहा-बारा बायका स्वयंपाक करण्यात गुंग झाल्या होत्या. त्यांची तोंड आणि हात दोन्ही चालू होते. आई त्यांना मदत आणि सुचणा करत होती. तेलच्याची टोपल्यात चळत लागली होती. लहान पोरं न राहून पटकन परातीतून तेलची उचलत होती आणि मटकावत होती. आमटीला फोडणीचा खमंग वास सुटला होता. एका बत्त्यात गुळवणी कढत होतं. आचारी त्यातला वरचा फेस चाळणीने काढत होता. कढईत कुरडया पापड्या तडतडत होत्या. भजी तळण्याचा खमंग वास सुटला होता. खास आणलेल्या आंबेमोहर तांदळाचा भात चुलाणावर रटरटत होता. त्याचा वास फर्लांगभर येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत होता आज शालिनीचा साखरपुडा आहे .
स्वयंपाकासाठी आणि पंगतीसाठी अंगणात एका कोपर्याला बैलगाडीमध्ये दोन पाण्याची पिंप भरून ठेवली होती. गुलमोहराखालचा रांजण पाण्याने भरला होता. त्यावर लाकडी झाकण होते. बाजूला एका परातीत घासलेले लखलखीत पितळी लांब दांड्याचे ओगराळे अणि एक चकाकता पितळी तांब्या ठेवला होता. बाहेरुन आलेला माणूस स्वत: ते रांजणातले थंडगार पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर देत होता.
अंगण शेणाने सारवले होते. मांडवात आणि दारासमोर रांगोळी काढली होती. दाराला आब्याच्या पानाफुलांचे तोरण लावले होते. तिचं साधं रानातलं घर एखाद्या राजवाड्या सारखं सजलं होतं. का सजू नये आप्पांचा एकुलत्या एक लेकीचा साखरपुडा होता. मांडवात बसण्यासाठी रंगीत सतरंजी अंथरली होती, तीवर आतापासूनच म्हातारी माणसे बसून गप्पा मारत होती. पोरासोरांचा मांडवभर धुमाकूळ माजला होता.
बरोबर असंच सारं जुळलं होतं ती अकरावी झाल्यावर.
----------------------------------------------------------------------
पारगावच्या जनार्दन मेमाण्याचा अकरावी पास अंकुश तिला पाहून गेला अन् होकार कळवला. आई-वडील जे करतात ते मुलीच्या भल्यासाठीच करतात या न्यायाने अंकुश रंगाने तिच्यापेक्षा डावा होता तरी तिनं होकार भरला होता.
तसं हे स्थळ यायला मध्यतंरी बराच काळ लोटला. मुलं यायची पाहयची अन् काही कळवायची नाहीत. याची चिंता सारेच करायचे पण नसेल मुलगी पसंत या अंदाजावर येत सारे थांबायचे.
पण अंकुशच्या बाबतीत असं झालं नाही. घरही तिच्या मानाने मोठं . दोन भाऊ, तीन बहिणी. अंकुश धाकटा. बाकी सगळ्यांची लग्न झालेली. २०-एकर शेती पण विहीर बागायत. मोठा काही शिकला नाही म्हणून शेती करतो. पाऊसपाणी पडलं नाही तर एक कोणतरी नोकरीत असावा या हिशोबाने अंकुश ने पुण्याला गुळाच्या वखारीत नोकरी पकडलेली. त्याचा शेठ गुळाचा ठोक व्यापार करायचा. अंकुश तिथे दिवाणजी म्हणून काम करत होता. गुळाच्या वखारी जवळच त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. तिथं तो राहत होता. खोली छोटीशीच होती पण छान रंगरंगोटी केलेली. बाप्पा लग्न ठरल्यावर पुण्याला जाऊन सगळी चौकशी करून आले होते. लग्न जुळण्या पूर्वी मधु मामाचं दुरचं नातं देखील निघाले होतं. थाटामाटात साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली. शालीनीला अंकुश कडून साडी, ब्लाऊज पीस, पैंजण भेट मिळालं. शालीनी कडूनही अंकुशला शर्ट, पॅंटचे कापड भेट दिले. सगळं कसं मनाप्रमाणे घडत होतं पण नियतीला हे मंजूर नसावे.
लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती तस-तशी सगळी कामं आटोपून आली होती . बस्ता बांधून झाला होता. मुलासाठी एचएमटी घड्याळ, अंगठी आणि शालीनीला मंगळसूत्र, अंगठी, नथ, केले होते. आमंत्रणं केली जात होती. शालीनीचे गडंगण्यार, देवदर्शन चालू होते. किराणा भरला होता. पत्रावळ द्रोन आणले होते. मंडप कंत्राटदार ठरला होता. हारवाल्याला, कोळ्याला वर्दी गेली होती. येसकराला आवतणाची यादी दिली होती. हे सगळं करताना घरातल्या मोजक्या माणसांची दमछाक होऊ नये म्हणून दादू चे आणि आप्पांचे गावातले मित्र, नातेवाईक मदतीला धावत होते.
अन् एक दिवस अचानक दारात मधुमामा चिंतित चेहऱ्याने उभे होते. हेच ते मधुमामा ज्यांनी लग्न जुळवण्यात मध्यस्थी केली होती. मधुमामा पारगावातले आप्पांचे मित्र. अंकुश त्यांच्या दूरच्या नात्यातला .
मधु मामा आल्याबरोबर बाप्पांना म्हणाले
बाप्पा सगळं संपलं. मला माफ करा मी तुम्हाला चुकीचं स्थळ सुचवलं. तुमची सगळी तयारी झाली. खर्चाची जुळवाजुळव केली. पण आता सारं व्यर्थ. हे लग्न मोडल्यात जमा आहे.
बाप्पांना क्षणभर काय बोलावं ते सुचत नव्हतं. ते तसेच गप्प होते.
थोड्या वेळानंतर बाप्पा म्हणाले
पण झालं तरी काय? सगळं व्यवस्थित पाहूनच तर ठरलं व्हतं. आमची शालू पण मुलापेक्षा दिसायला उजवी हाये. धागेदोरे जुळले होते. एकुलती एक लेक म्हणून लग्न उलगडून द्यायचं कबूल केलं व्हतं. आता कुठं माशी शिकली म्हणायची. लग्नाची सगळी तयारी झाल्यावर हे समदं बोलतात याला काय अर्थ आहे का? झालेला खर्च, समाजात मान खाली घालायला लागल याला कोण जबाबदार ? मुलाच्या बापाला सोपं असतं. पण मी कुठल्या तोंडाने गावाला सामोरा जाऊ ? दुसऱ्या ठिकाणी शालूच लग्न जमवायला गेलो तर आधीच लग्न का मोडलं असं विचारल्यावर काय सांगू? मधुमामा तुम्ही असलं धरसोड करणारं स्थळ का सुचवलं? तुम्हीपण लग्न जुळवण्यापूर्वी मुलाकडची माणसं कशी आहेत याचा तपास करायला नको का?
यावर मधुमामा म्हणाले
अहो बाप्पा तुमची शालू आन माझी पोरगी रत्ना काय यगळी हायं का? शालू मला पोटच्या पोरीसारखी. मी तिचं अहित कसं करील. मी नीट चौकशी करूनच स्थळ सुचवलं व्हतं, आन ते पण माझ्या दुरच्या का होईना नात्यातलं. आता आसं होईल कुणाला माहित ?
पण आता उडत उडत कानावं पडलं ती खरं का?
बाप्पा- काय ऐकलसा.
मधुमामा – म्हणं तुमच्या आजीनं म्होतूर लावला व्हता तुमच्या आजाबरं . म्हणूनच शालिनी बरं नाय करायचं लगीन अंकुशला. तो म्हणतो पुढं त्याच्या किंवा भावाच्या पोराबाळांच्या लग्नात अडचण नको.
बाप्पा- आवं हे तर आमच्या पण ध्यानीमनी नाय . आन माझ्या आजीनं लावला म्होतूर त्याचा बाट शालीनीला ईल का? आन काय एवढा अपराध केला आजीनं ?
लग्न म्हंजी भातूकलीचा खेळ असं वाटावं असं लहान वय होतं तिचं तवा नवरा वारला. जीवलगाचं जीव लावणं काय असतं हे त्या बाल विधवेला अजून कळायचं होतं . माझा आजा सुधारक विचारांचा. आजीचा आधीचा नवरा सहा महिन्यांत वारला. आख्खी जिंदगानी तिनं असंच राह्याचं व्हतं का? एखाद्या पुरुषांची बायको वारली तर दुसरं लगीन लावता मग बाईनं तसच राहचं ह्यो कुठला न्याय असं आज्याचं मत.
मधुमामा- व्हयं ते बी खरं की? त्या नाना जमदाडयाची बहिण अशीच बाल विधवा झाली. सासरवरून हाकलली, पांढ-या पायाची, लगीन झाल्याबरोबर नवरा गिळला म्हणून. जमदाड्याच्या दारात. पडली. तिला बी वाटलं आपला संसार असता भावा सारखा तर किती बरं झालं असतं . भावाच्या पोरांना जीव लावायची. पण भाऊजयीला ती त्यांच्या संसारात लुडबूड करती अस वाटायचं. कधीकधी ते खरं असतया. तिला बी कळत नाही की आपण भावाच्या संसारात जरुरीपेक्षा जास्त लक्ष घालतोय. जरा घर कामात किंवा शेतातल्या कामात भावजय चुकली तर त्याची चुगली करायची. कधी भावाला पटायचं, कधी नाही पटायचं. भावजय रागाने बोलायची स्वतःचा संसार उलथून टाकला अन आमचा उलथायला आली.
आवं विधवा सासरी राहिली काय आन माहेरी काय . लय हिडीसफिडीस व्हतीया. त्यात तरणी असली तर निखा-यावरनं चालाया लागतं. समाजात मान नसतो. कुठल्या शुभकार्याला जाणं नाही. अंगावर चांगले कपडे दागिने घालायची खोटी. जरा नीटनेटकं दिसलं तरी गावाच्या भुवया उंचावतात.
नवरा मेल्यावर सौभाग्य अलंकार काढणारा समाज सर्वस्व ओरबाडतोय असं वाटतं. पायात जोडवी नाय म्हून पाय लपवायचं. पांढरं कपाळ म्हून हिणवून घ्यायचं. तिला वाटावं रोज मरण्यापरिस सती गेलेलं बरं. घरी ही हेळसांड. एवढं सुधारक झालं. सतीची चाल बंद झाली पण पुनर्विवाह उपेक्षित राहीलं तसच तिच मानान विधवा म्हून समाजात जगणं. एखादीचा नवरा दारु पिऊन मरतो. तिचा काय गुन्हा. एखाद्या विधवेचं मुलांवर, नव-यावर प्रेम असल तर गोष्ट एगळी. नको करुदे पुन्हा लगीन. आन विधवेशी लगीन करायला मन मोठं हवं.
बाप्पा -: आवं माझा आज्जा लै नंगाट माणूस. पाटील , कुलकर्णी, अंमलदार म्हणलं पाटदाम दे, पाट ( म्होतूर) लावायचं तर सांगितलं काय करायचं ती कर. काय बी चाल्ल नाय त्यांचं. पण गावानी बहिष्कृत केल्त तरी डगमगलं नाय. आजीनी खंबीरपणं साथ दिली. मला माहित होतं लोकं किती बुरसटलेली हायती म्हणून म्या मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं या म्होतराचं. अजूनही लोकं बेडीत अडकलेत रूढी-परंपरांच्या मग त्या चुकीच्या असल्या तरी चालतात.
मधुमामा- लई मोठी चूक झाली बाप्पा तुमची. मला लग्न जुळवणारा मध्यस्थ म्हणून तुम्ही सगळं सांगायला हवं होतं. आपण डॉक्टर वकिलाकडे गेल्यावर लपवतो का? मग इथंच का लपवाव.
बाप्पा- आहो काय चूक झाली. तुम्ही बी शानचं हायती. आमच्या पण ध्यानात नाय आलं. आन तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मधी पडला असता का? आन पडला असता तर विषय पोटात ठेवला असता काय?
मधुमामा- ते आता काय सांगू शकत नाही. पण झालं ते बरं झालं नाही. मलाही पटतयं तुमचं म्हणणं पण दुनियेला पटायला हवं ना.
बाप्पा – जाऊद्या मधुमामा . लग्न होऊन काहीतरी खुसपट काढून पोरीला माझ्या घरी आणून सोडलं असतं. त्यापरीस आत्ता मोडलं ते बरं झालं. कुठं तरी जमलच ना लग्न तिचं. फक्त अडचणी वाढल्या एवढं खरं. माझी शालू लय हुशार पोरगी हाय. उलट तिला याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल. बघा मी बोलते ते खरं होतं की नाही.
मधुमामा- कल्याण होऊदे बाबा लेकराचं. फक्त असं झालं म्हणून तुम्ही नाउमेद होऊ नका. मला जमल तशी मी मदत करेल. आपला काय पैसे जोडून लग्न जुळवायचा धंदा नाही एक समाजकार्य म्हणूनच मी हे काम करतो.
बाप्पा – मधुमामा म्या तुमची माफी मागतो. मी तुमच्यावर असले कर्मठ स्थळ सुचवलं म्हणून रागावलो होतो. पण आता समजलं तुमचा स्वभाव किती साधा सरळ हाय. यापुढं मी विनासंकोच शालूच लग्न जमवण्यासाठी तुमची मदत घेईल.
त्यादिवशी दुपारपर्यंत अंगणातल्या गुलमोहराखालच्या ओट्यावर बसून मधुमामा आणि बाप्पांनी गप्पा केल्या. त्या ऐकून गुलमोहरा वरची खारुताईही हळहळली.
शालूला झाले हे बरे झाले असे वाटले लग्न होऊन मोडण्यापेक्षा आत्ताच मोडले ते बरे झाले. पण या गोष्टीचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. खरंतर तिला आता लग्नच करू नये असे वाटू लागले. तिच्या एवढाच अंकुशही शिकला सवरलेला पण त्यानेदेखील वेगळा विचार करू नये याचे तिला खूप वाईट वाटलं. तिने बाप्पांना गळ घातली मला अजून शिकायचे आहे. मी तुमच्यावर माझ्या शिक्षणाचा आर्थिक भार टाकणार नाही. मी हिंगणे येथील महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या स्री शिक्षण संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेते.
यानंतरची चार वर्ष हिंगण्याला कशी गेली तिचं तिलाच कळलं नाही. यादरम्यान तिला एका चर्चा सत्रात वसंत भेटला. स्त्री स्वातंत्र्य एक भ्रम की सत्य या विषयावर चर्चासत्र होते. तिनं खूप संतुलित विचार मांडले.
स्वातंत्र्य म्हणजेच जबाबदारी. आदिमानव टोळीने राहायचा तेव्हा टोळीची प्रमुख स्री असायची. टोळीचे खाणेपिणे, सुरक्षितता इत्यादी विषयीचे निर्णय तिचे असायचे. देवी माणायचे स्त्रीला. स्त्री सत्ताक पध्दत होती त्या काळात. हे स्वातंत्र्य हळूहळू कसे कमी झाले? सती, केशवपण, बालविवाह, जरठ विवाह यांनी स्त्रीचे स्थान कसे दुय्यम झाले. जी बंधणं विधवेवर ती विदूरांना का लागू नाहीत ? समाजसुधारकांनी ओळखलेली स्त्री शिक्षणाची गरज आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न. शिक्षणातून पुढे आलेली आधुनिक स्री आणि तिने केलेली प्रगती, तिला संविधानाने दिलेले अधिकार. स्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांची बरोबरी की तिचे माणूसपण समाजाने स्वीकारणे ? स्त्री स्वातंत्र्यासाठी अजून काय हवे ?
आदी विषयी तिचे विचार ऐकून सारेच प्रभावित झाले होते. चर्चासत्रात विचारलेल्या प्रश्नांना तिनं दिलेली उत्तरे खूप समर्पक होती.
चर्चा सत्रानंतर वसंता भारावल्या सारखा तिच्याजवळ गेला आणि तिचे विचार मंत्रमुग्ध करणारे होते म्हणाला . दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
वसंत सुप्याचा . आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी त्यांच्याच शेतात राबायचे . विसेक एकर शेती चांगली पिकायची. वसंताने समाज शास्त्र विषय घेऊन B. A. केले. त्यानंतर तो MPSC च्या परीक्षेत प्रथम आला आणि त्याला डेप्युटी कलेक्टरची नोकरी लागली. नोकरी लागली म्हणजे स्थैर्य आले या पित्रृसुलभ भावनेने लग्नाचे बघायला हवे असे वसंताचे तात्या म्हणू लागले. गावातल्या उपवर मुलींच्या घरातील वडीलधारी लग्नासाठी चौकशी करु लागली तसतसा तात्यांचा रेटा वाढत होता. वसंता सुरवातीला म्हणायचा लग्न तर कधीतरी करायचय पण आता थोडा मोकळं वाटतयं. कशाला एवढ्यात? बघू निवांत. यावर तात्या म्हणत
“पोरा नातवंडं पाहिली की मी मोकळा. सगळं वेळच्या वेळी झालं म्हणजे बरं असतं. यावर वसंता काहीतरी सबब सांगून निभावून न्यायचा. वसंताची आई म्हणायची “ पोरा मलाबी वेळच्यावेळी सूनमुख पहायचय. आमच्या दोघांच्या डोळ्यादेखत तुझा संसार रांकेला लागलेला पाहायचाय. वसंतला जाणवायचं काळजीपोटी धाकट्यावर आई-वडिलांचा जास्त जीव असतो ते. मुख्य प्रश्न होता त्याने जर आई वडिलांना सांगितले की माझे शालिनी वर प्रेम आहे आणि तिच्या पणजीने म्होतूर लावला म्हणून तिचे लग्न एकदा मोडले तर त्यांना काय वाटेल ? ते लग्नाला होकार देतील काय? त्यांना जर ते आवडले नाही तर ते आपल्याशी कसे वागतील ? आपल्यापासून भाऊ आई वडील वहिनी दुरावणार तर नाहीत ना? या विचाराने तो विलक्षण घाबरला होता . तरी एक दिवशी मनाचा हिय्या करून त्याने तात्यांना ते सांगितले.
यावर तात्या त्याच्याशी चार-पाच दिवस काहीच बोलले नाही. त्यांनी घरातही वसंताला प्रेमविवाह करायचा आहे असे सांगितले. त्यामुळे संपूर्ण घराचा त्याच्याशी अबोला सुरू झाला. वसंताचे गावाला येणे कमी झाले. घरी आला तर त्याला वहिणी जेवण खान द्यायची पण बाकी सगळे गप्प. ही शांतता जीवघेणी होती. वसंताला ह्याची सतत टोचणी लागायची.
तात्या त्याला म्हणाले होते तुला शिकवला. एवढा मोठा केला. चांगले पांग फेडलेस. आम्हाला लोकात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. असंच होतं शहरात मुलं गेली की बिघडतातच. आईबापांना काही विचारावस वाटत नाही. त्यांची अडगळ झाल्यासारखी वाटते. आमचे लग्न आमच्या आई-वडिलांनी ठरवले तिथेच झाले. वसंताने जेव्हा तात्यांना समजावयाचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फैलावर घेतले. तुला काय वाटलं उपजिल्हाधिकारी झाला म्हणून मी सगळं माफ करेल? वसंताने तात्यांचे हे दबावतंत्र ओळखले.
वसंताने जाणले तात्या रागावले तरी त्यांचे त्याच्यावर खूप जीव आहे. त्या प्रेमापोटी त्यांनी त्याला शिकवून उप जिल्हाधिकारी बनविले. त्यांना आणि आईला किती आनंद झाला होता आपण उप जिल्हाधिकारी झाल्याची बातमी ऐकून. आता उतारवयात त्यांना माझा संसार मार्गी लागलेला पाहायचा आहे .समाजात आज पर्यंत मिळाला तसाच मान-मरातब मिळावा अशी इच्छा आहे. तात्यांना समाजाचे जास्त भय वाटते. नातीगोती दुरावतील त्याचे भय वाटते . आपणच थोडे दिवस वाट बघूया असे वसंताने मनोमन ठरवून टाकले. नाहीतरी काळ हे कोणत्याही दुःखावर रामबान औषध आहे हे तो शिकला होता. कुठलंही शल्य कालापव्ययानुसार कमी कमी होत जाते.
इकडे शालिनीच्या घरी वाद चालू होता. तिच्या पणजीन म्होतूर लावला याविषयी वसंताला सांगायचे की नाही. कारण आजपर्यंतची स्थळं केवळ या कारणासाठी परत गेली होती. तसे जर वसंताने केले तर ? या विचाराने शालीनीच्या बाप्पांचे आणि आईचे काळीज पोखरले जात होते.
पण लग्न म्हणजे दोन मनां बरोबर दोन कुटुंबांचे मिलन . त्यात कुठली लपवाछपवी नसावी. फसवणुकीच्या पायावर उभारलेला संसार फार काळ टिकत नसतो असे शालिनीचे विचार होते. या आधी देखील अंकुशला सांगायचे होते पण कोणाच्याही ध्यानात आले नाही. त्यामुळे पणजीच्य म्होतरा विषयी मी वसंतला सांगितले आहे हे ती बाप्पांना सांगायला विसरली नाही.
वसंताचे विचारही याबाबतीत पुरोगामी होते.
शालीनीच्या बाप्पांना आणि आईला ती प्रेमविवाह करते म्हणून सुरुवातीला थोडा धक्का बसला. पण नंतर पटले , पत्रिका जुळवून लावलेली लग्नही टिकतीलच याची शाश्वती कुठे असते. आणि टिकली तरी आयुष्यभर कुरकुर करत असतात. अशा टिकण्यालाही काय अर्थ आहे ? नवरा-बायकोत विश्वास, प्रेम नसेल तर अगदी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लावलेली लग्नही मोडतात. अशी लग्न मोडताना वाचवणं कुंडलीतल्या जुळलेल्या ग्रहाणांही शक्य होत नाही. मग काय हरकत आहे प्रेम विवाह करायला. मुलगा आणि मुलगी समंजस असली की स्वत:बरोबर इतरांचे मन जिंकायला फार वेळ लागत नाही. शिक्षणाच्या बरोबरच शालीनीच्या विचारातली प्रगल्भता तिच्या बाप्पांना जाणवत होती. त्यांना खात्री होती ती जे काही करेल ते योग्य करेल.
ठरवलेल्या लग्ना सारखेच लग्न करुया म्हणजे गावाच्या विरोधाची चिंता नको . मधुमामा ने जुळवलं सांगू. बाप्पांनी तिच्या आईलाही याबाबतीत समजावले.
जसजसा काळ गेला तस तसे तात्यांना वाटू लागले की वसंता शासनाचा एक जबाबदार अधिकारी आहे. तो शासनाचा समाजातला चेहरा आहे. तो कुठलाही भेदाभेद मानणारा नाही. तो पुरोगामी विचाराचा आहे. आपणही तसेच असायला हवे नाहीतर आपणच प्रतिगामी ठरु. काळानुसार आपणही बदलायला हवे. मलाच वसंता चांगला शिकावा खूप मोठा व्हावा असे वाटत होते अन् आता त्याचे मोठेपण खटकावं. ते ही केवळ लोकलाजेस्तव. नाही कितीही अडचणी आल्या तरी बेहत्तर आता माघार नाही. एके दिवशी वसंता घरी असताना रात्री जेवणानंतर सगळे एकत्र बसले . तात्यांनी वसंताचे कसे बरोबर हे सर्वांना समजावले. नातेवाईकांना तात्या भेटले त्यांना समजावले. म्हणाले लग्न झाल्यावर आपण प्रेम केले म्हणून संसार टिकला. कुणी लग्नाच्या आधीच होणा-या बायकोवर प्रेम केलं तर कुठं बिघडलं. म्होतूर तर समाजसुधारणेचं आवश्यक अंग. एखाद्या विधवेला सन्मानानं जगण्याचा हक्क देतो आपण. हे योग्यच की . तात्यांचं म्हणनं काहीना पटलं काहींना नाही.
शालीनीच्या बाप्पांना तात्या भेटले. दोघांनी साखरपुड्याचा मुहूर्त काढला. साखरपुडा शालीनीच्या घरीच करायचे ठरले.
----------------------------------------------------------------------
घरी कोणतरी बातमी आणली पांदीतून बैलांना झुली घातलेल्या गाड्या दिसल्याची. तो बातमी सांगेपर्यंत बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा खुळ्ळमखुळ्ळम आवाज येऊ लागला तशी सगळीकडे लगबग उडाली.
थोड्याच वेळात मांडवासमोर वसंताकडची मंडळी उभी होती . बायकांच्या हातात फळांच्या पराती, नवे कपडे होते. बायकांच्या अंगावर नवी लुगडी होती. गळ्यात एखाददुसरा दागीणा, नाकात नथी होत्या. पुरुषही पांढ-या शुभ्र पोषाखात होते. वयस्कांच्या डोईवर फेटा तर तरुणांनी टोप्या घातल्या होत्या. वसंता त्या सर्वांपुढे आणि त्याच्या पुढे वाजंत्री.
पाहुणे मंडळींची गळाभेट झाली. सर्वांना पाणसुपारी दिली गेली. मांडव माणसांनी फुलून गेला.
वसंता मधोमध एका पाटावर बसला. शालीनी त्यांच्यासमोर नटूनथटून बसली. थोड्याच वेळात भटजींनी पूजा आटोपली आणि दोन्हीबाजूच्या पुढा-यांनी लग्न कसे ठरलेय, तिथी कोठली याचा खुलासा केला. मग भटजींनी बाप्पा, तात्यांना विचारले फोडायची का सुपारी ? होकार मिळताच एका दगडावर ठेवलेल्या पाच सुपा-या दुसरा दगड घालून एका फटक्यात फोडण्यात आल्या. त्यांचे तुकडे उपस्थितांना पानांत घालून दिले गेले आणि जेवणाच्या पंगती बसल्या तसा शालीनीच्या बाप्पांनी सुस्कारा सोडला आणि शालीनी आणि वसंता एकमेकांत हरवले.
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे झाले
उरले ना वेगळाले
© दत्तात्रय साळुंके.
गावाकडील वर्णन आवडले. कथेचा
गावाकडील वर्णन आवडले. कथेचा विषय ही छान आहे.
आवडली कथा तेलची म्हणजे काय?
आवडली कथा
तेलची म्हणजे काय?
माझ्या माहिती नुसार तेलची
माझ्या माहिती नुसार तेलची म्हणजे तेलावरची पुरणपोळी.
वाह! सुरवातीचे वर्णन तर
वाह! सुरवातीचे वर्णन तर अप्रतिमच. जेवणाचे वर्णन ऐकुन तोंपासु. कथाही सुरेख आहे. आता एखाद्या कार्यक्रमात तेलच्यांचा मेन्यू ठेवावा काय असं वाटतय.
हर्पेन, तेलच्या म्हणजे मोठ्या आकाराच्या पुऱ्या. यासाठी खास गहू वापरला जातो. गुळवणीबरोबर म्हणजे गुळाच्या पाण्याबरोबर खातात. ऐकायला जरा वेगळे वाटत असले तरी एकदम चविष्ट प्रकार असतो हा.
@ Shitalkrishna खूप आभार ,
@ Shitalkrishna खूप आभार , कथेचा विषय अजूनही कालबाह्य होत नाही ही शोकांतिका आहे. मग ते लग्न मोडणं असो अथवा honour killing.
@ हर्पेन - धन्यवाद, तेलात तळलेल्या मोठ्या आकाराच्या गावरान पु-या म्हणजे तेलच्या . सत्तरच्या दशकात गावजेवनातला आवडता पदार्थ.
@ शाली खूप धन्यवाद, पुन्हा एक
@ शाली खूप धन्यवाद, पुन्हा एक दिलखुलास दाद
एखाद्या गटगला ठेवू शकता तेलचीचा मेणू पण नवीन खाणा-याला कितपत आवडेल ? मी लहानपणी ब-याचदा पोट तट्ट होईतो जेवायचो तेलच्याचे जेवण.
ओके धन्यवाद ShitalKrishna,
ओके धन्यवाद ShitalKrishna, शाली, दत्तात्रय साळुंके
तेलच्या म्हणजे मोठ्या पुर्या तर!
खूप आवडलं !सुरुवातीचं वर्णन
खूप आवडलं !सुरुवातीचं वर्णन तर खासच ! अश्या गावातल्या लग्नातल्या /गावजेवणाच्या /कोणत्याही कार्यक्रमाच्या जेवणाची मजा काही औरच असते !!
पण माझा बेसिक प्रश्न आहे .. म्होतूर म्हणजे काय मुळात ? सती न जाता विधवा म्हणून जगायचं का ?कि विधवेचा पुनर्विवाह ?!
पाट ( म्होतूर ) लावायचं तर सांगितलं काय करायचं ती कर >> इथे म्होतूर लावणे असा शब्दप्रयोग आहे का ? पण म्हणजे काय करायचं ?
-- फारच अकलेचे तारे तोडतेय का मी ?!
सुरेख , आवडलं!
सुरेख , आवडलं!
चित्रदर्शी लिखाण , कथेचा विषय भावला
म्होतूर म्हणजे काय मुळात ? >>
म्होतूर म्हणजे काय मुळात ? >> + १०००० .
मलाही कळलं नाही .
म्होतुर म्हणजे मुहुर्त..!
म्होतुर म्हणजे मुहुर्त नव्हे तर पाट लावणे..!
म्होतुर म्हणजे मुहुर्त..!>>
म्होतुर म्हणजे मुहुर्त..!>> धन्यवाद DJ. हा व्हिडिओ तूर्तास बघता येणार नाही .. नंतर बघेन
मधुमामा – म्हणं तुमच्या आजीनं म्होतूर लावला व्हता तुमच्या आजाबरं . म्हणूनच शालिनी बरं नाय करायचं लगीन अंकुशला. तो म्हणतो पुढं त्याच्या किंवा भावाच्या पोराबाळांच्या लग्नात अडचण नको>>> पण याचा अर्थ नाही लागला मग मला .. आजीनं म्होतूर लावला व्हता तुमच्या आजाबरं .. मग पुढे अडचण का येईल ? मुहुर्तात वाईट काय असणार आहे ?!
ह्या "तेलच्या" दिसायला आपल्या पुर्यांसारख्या लालसर न दिसता पांढऱ्या दिसतात का ? साधारण फुलक्याच्या आकाराच्या असतात का ?
@ anjali_kool, खूप धन्यवाद
@ anjali_kool, खूप धन्यवाद
म्होतूर किंवा पाट हे समानार्थी शब्द आहेत. म्होतूर किंवा पाट लावणे म्हणजे विधवा म्हणून जगणे नव्हे. म्होतूर म्हणजे विधवेचा पुनर्विवाह. पूर्वी काही खालच्या जातीच्या विधवांना पुनर्विवाह करता येत होता. म्हणजे या जाती ख-या सुधारीत होत्या. सद्याही खालच्या जातीत विधवा पुनर्विवाह होतात. पण वरच्या जाती जसे ब्राम्हण, मराठा यांच्यात पुनर्विवाह होत नसत. अद्यापही काही शहरी अपवाद सोडले तर ग्रामीण भागात अजूनही वरच्या जातीत पुनर्विवाहाला स्थान नाही.
कथेच नावच कळाल नाही म्हणून
कथेच नावच कळाल नाही म्हणून कथा वाचलीच नसती तर एका सुंदर कथेला मी आज मुकले असते.
माझ्यामते,विधवा बाईचं लग्न ह्या विषयाचा 'बाऊ' स्वतःला पुरोगामी विचारांची म्हणवुन घेणारी लोकंच जास्त करतात.
म्होतूर म्हणजे विधवा बाईचे लग्न. हाच अर्थ आहे का?
म्होतुर किंवा पाट लावणे
म्होतुर किंवा पाट लावणे म्हणजे पुनर्विवाह करणे, करुन देणे. अशा विवाहांमध्ये फारसे विधी वगैरे केले जात नाहीत. ती एक परस्पर संमतीने केलेली सोय असते. अशा विवाहांना समाज चांगले समजत नाही. काही तर त्याला विवाह मानतच नाहीत. असा विवाह ज्या घरातील स्रीने केला असेल तर त्या घरातील मुलींची लग्न जमायला अडचणी येतात ग्रामिण भागात. एखाद्या पुरुषाने कुणा स्रीला पाट लावून घरी आणले तर त्या पुरुषाला कुणी दोष देत नाही पण त्या स्रीला मात्र विवाहीत स्रीला मिळायला हवा तो सन्मान समाजात मिळत नाही. इतर स्रीयांकडुन तर अजिबात मिळत नाही.
धन्यवाद शाली. म्होतूर हा शब्द
धन्यवाद शाली. म्होतूर हा शब्द माझ्यासाठी खुपच नविन होता.
कथाविषय आणि वास्तव सुरेख
कथाविषय आणि वास्तव सुरेख मांडलाय.
@ anjali_kool
@ anjali_kool
ह्या "तेलच्या" दिसायला आपल्या पुर्यांसारख्या लालसर न दिसता पांढऱ्या दिसतात का ? साधारण फुलक्याच्या आकाराच्या असतात का ?>>>>
लालासरच असायच्या... फुलक्या एवढ्याच....
आमच्याकडे बक्षी गहू वापरत तो खूप चविष्ट असे...
किल्ली, स्वस्ति, DJ, मन्याS,
किल्ली, स्वस्ति, DJ, मन्याS, अज्ञातवासी
खूप आभार कथाविषय आणि कथा आवडल्याचे कळविल्याबद्दल...
शाली छान स्पष्टीकरण...
तेलच्याविषयी माझीही थोडी भर.
तेलच्याविषयी माझीही थोडी भर.
गावजेवणाबरोबर स्पेसिफिकली एखाद्या जत्रेत भरणाऱ्या शेवटच्या दिवशी देवाच्या महाप्रसादात यांचा वापर हमखास होई, पोळीच्या जागी. जास्त मेहनत करायला लागू नये म्हणून यांचा आकार हमखास मोठा असे. कुलच्यासारखा...
२१८९ आणि लोकवण गहू यासाठी बेस्ट. सिहोरचा वापर।केलाच, तर बेत फिस्कटला म्हणूनच समजायचा.
बटाटा भाजी उरली होती संध्याकाळी, लेख वाचून मस्त तेलच्या केल्यात आणि खाल्यात सुद्धा! झकास बेत!
@ अज्ञातवासी छान पुरवणी
@ अज्ञातवासी छान पुरक माहिती
बटाटा भाजी उरली होती संध्याकाळी, लेख वाचून मस्त तेलच्या केल्यात आणि खाल्यात सुद्धा! झकास बेत!
मलाही मोह होतोय आता....
धन्यवाद....
म्होतूर शब्द पहिल्यांदाच
म्होतूर शब्द पहिल्यांदाच वाचला.
वेगळ्याच विषयाचे कथानक. मांडणीही सुरेखच.
अनेक धन्यवाद.
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद !
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद ! आता झाला उलगडा सगळा
पणजीने म्होतुर लावला होता
पणजीने म्होतुर लावला होता म्हणून पणतीचे लग्न जुळायला अडचणी
पणजीने म्होतुर लावला होता
पणजीने म्होतुर लावला होता म्हणून पणतीचे लग्न जुळायला अडचणी>> हे खूपच रिग्रेसिव्ह आहे नाही का. कधी बदलेल बरे ही मानसिकता?
मी फॅमिली पेन्शन घ्ययला जात असे तेव्हा पण लाइफ सर्टिफिकेट मध्ये तुम्ही पुनर्विवाह केला आहे का असे विचारतात. व नाही असे लिहून द्यायला व त्यावर बँक ऑफिसर ची सही लागते. केलाच पुरविवाह तर आधीच्या नवर्याच्यानावाने मिळणारी फॅमिली पेन्श न बंद पडते.
पणजीने रीमॅरेज केले म्हणजे स्वतःच्या शारीरिक मानसिक गरजांना अॅक्नोलेज केले. महत्वाचे म्हणजे तिला चांगला जोडिदार मिळाला. हे किती छान पणजी रॉक्स. छान लिहीली आहे कथा.
पारगावच्या जनार्दन मेमाण्याचा
पारगावच्या जनार्दन मेमाण्याचा >>>>>तुम्हाला महितीये का की हे गावच नाव अणि आडनाव किती जुळतय ते? मी याच गावची अणि आडनाव पैन हेच
@ मी_परी
@ मी_परी
गाव माहित आहे, आडनाव माहीत आहे. तुमचे आडनाव मेमाणे. पण जनार्दन आणि अंकुश काल्पनिक नावं आहे. आडनाव, आणि नावं जुळत असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसे दुसरे गाव पण सुपे खरं आहे पण व्यक्तीरेखा काल्पनिकच आहेत सर्वत्र. मला माहित नाही पारगावात किंवा सुप्यात ही माणसे आहेत का ? त्यांच्या आयुष्यात असे काही घडलेय का?
कथा, कांदबरीत संपूर्ण काल्पनिक नावं किती लागतील ?
विषय खरा आहे.
मीही याच भागातला ...
अतिशय छान लिहीलयं, आवडली कथा
अतिशय छान लिहीलयं, आवडली कथा.
बादवे, पारगाव कुठल? सालूमालू का?
@ आसा खूप धन्यवाद सुंदर
@ आसा खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादाबद्दल...
मेमाणे पारगाव राजेवाडी जवळचे, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ होतोय त्यात पारगावची देखील जमीन जातेय. सालूमालू पारगाव ऐकून आहे. कधी गेलो नाही.
@ शशांकजी खूप धन्यवाद सुंदर
@ शशांकजी खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादाबद्दल...
@ आपला एखाद्या गोष्टीशी संबंध नसला तरी कधी कधी त्रास होतो. प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.
@अमा - पणजी राॅक्स, मन:पुर्वक धन्यवाद रॉकिंग प्रतिसादाबद्दल
खरं आहे तुमचं. कुटुंब निवृत्ती वेतन दुसरे लग्न केल्यास बंद होते. बादवे तुमचे निवृत्तीवेतन जर राज्य अथवा केंद्र सरकारचे असेल आणि काही समस्या असेल तर मला सांगू शकता. जमेल तशी मदत जरुर करेल.
Pages