सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो.
रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या माबोवरील पूर्वीच्या एका लेखात (https://www.maayboli.com/node/64645) केलेले आहे. या लेखात आपण रसायनांचा हॉर्मोन यंत्रणांवर होणारा परिणाम बघणार आहोत.
सुमारे ८०० रसायने ही आपल्या हॉर्मोन्सच्या कार्यात व्यत्यय आणतात आणि त्यामुळे शरीरात व्याधी निर्माण होतात. हे वाचून क्षणभर विश्वास बसणार नाही, पण ते वास्तव आहे. अशा काही रसायनांचा विचार या लेखात केला आहे.
रसायनांच्या संपर्काचे मार्ग :
ही रसायने आपल्या शरीरात खालील मार्गांनी शिरतात:
१. नैसर्गिक पिके व पाणी
२. कीटकनाशके व औद्योगिक वापर
३. प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी
४. धूम्रपान व मद्यपान
५. वैद्यकातील औषधे
६. सौंदर्यप्रसाधने व घरगुती स्वच्छतेची रसायने
७. इलेक्ट्रोनिक उपकरणे
या रसायनांशी आपला संपर्क आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांत येत असतो. तो जर माणसाच्या गर्भावस्थेत किंवा वयाच्या तीन वर्षांपर्यंत आला तर त्याचे परिणाम हे अधिक वाईट असतात. मुले वयात येण्याचा काळ तर खूप संवेदनशील असतो. तेव्हा जननेंद्रियांची वाढ आणि पुरुषत्व वा स्त्रीत्व प्रस्थापित होणे या महत्वाच्या घटना घडतात. घातक रसायनांनी या गोष्टी बऱ्यापैकी बिघडवल्या आहेत.
तसेच स्तन, प्रोस्टेट आणि थायरॉईड या ग्रंथीमध्ये रसायनांमुळे होणारे बिघाड गुंतागुंतीचे असतात. रसायने सुरवातीस संबंधित अवयवात हॉर्मोन-बिघाड करतात आणि मग त्याचे पर्यवसान कर्करोगात होऊ शकते.
बरीच रसायने ही ‘इस्ट्रोजेन’ या स्त्री-हॉर्मोन सारख्या गुणधर्माची असतात. त्यांचा पुरुषांच्या शरीरातील शिरकावामुळे पुरुष-जननेंद्रियांच्या अनेक समस्या आणि वंध्यत्व उद्भवते. या गोष्टी विसाव्या शतकात वाढीस लागल्याचे दिसून येते. काही रसायनांचे परिणाम तर पुढच्या पिढीपर्यंत गेलेले दिसतात. हॉरमोन्सच्या यंत्रणा बिघडवणाऱ्या असंख्य रसायनांपैकी (Endocrine Disrupting Chemicals) बारा रसायने ही आपल्या नित्य संपर्कात येतात आणि त्यांना ‘डर्टी डझन’ असे म्हटले जाते. त्यातील काही महत्वाच्या रसायनांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
वरील तक्त्यात दिलेली रसायने म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. यापैकी काहींचा विचार आता विस्ताराने करू.
१. Bisphenol A : हे रसायन प्लास्टिकच्या वेष्टनातले खाद्य-पेय पदार्थ व पाणी यांच्यातर्फे शरीरात शिरते. सध्याच्या आपल्या आहारशैलीमुळे ते रोज कुठल्यातरी प्रकारे शरीरात जातेच. एका वेळेस त्याचे शरीरात जाणारे प्रमाण तसे कमी असते. पुढे त्याचा चयापचय होऊन ते काही तासातच लघवीतून उत्सर्जित होते. पण दिवसभरात आपण जर सतत प्लास्टिक-संपर्कातील अन्नपाण्याचे सेवन करत राहिलो तर मात्र त्याचा ‘डोस’ सतत मिळत राहतो आणि ते रक्तात काही प्रमाणात साठत राहते. तेव्हा प्रवास वगळता इतर सर्व वेळी आपण उठसूठ प्लास्टिक बाटलीतले पाणी पिणे टाळले पाहिजे. अन्नपाणी साठवण्यासाठी भविष्यात प्लास्टिकला योग्य आरोग्यपूरक पर्याय निघण्याची नितांत गरज आहे.
२. Phthalates : अनेक सुगंधी प्रसाधनांमधून शरीरात जाणारी ही रसायने. त्यांचे पुरुषाच्या अंडाशयाशी चांगलेच वैर आहे. तेथील जननपेशींचा ती बऱ्यापैकी नाश करतात. त्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते तसेच त्यांची हालचालही मंद होते. यातून पुरुष-वंध्यत्व येऊ शकते. या व्यतिरिक्त त्यांचा स्वादुपिंड आणि थायरोइड ग्रंथींवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून मधुमेह, स्थूलता आणि थायरोइडचे विकार होऊ शकतात.
अलीकडे केसांची ‘निगा’ राखणाऱ्या प्रसाधानांमध्ये ही रसायने मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तेव्हा अशी प्रसाधने वापरणाऱ्या मंडळीनो, सावधान !
३. शिसे: या जड धातूचे मेंदू व मूत्रपिंडावरील दुष्परिणाम परिचित आहेत. अलीकडे त्याचे हॉर्मोन यंत्रणेवरील दुष्परिणामही दिसून आले आहेत. शरीरातील बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.
पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात. या उतरंडीतील सर्वोच्च स्थानावर शिसे दुष्परिणाम करते. त्यातून आपली अख्खी हॉर्मोन यंत्रणाच खिळखिळी होते.
४. धूम्रपान व मद्यपानातील रसायने: तंबाकूच्या धुरातून benzopyrene, aromatic polycyclic hydrocarbons आणि cadmium ही रसायने शरीरात जातात. तर काही प्रकारच्या वाईन्समध्ये Resveratrol हे रसायन असते. ही सर्व रसायने आपली हॉर्मोन यंत्रणा बिघडवतात. महत्वाचे म्हणजे सर्व गर्भवतीनी या व्यसनांपासून लांब राहावे.
५. वैद्यकातील औषधे : यापैकी काहींचा दुष्परिणाम हा हॉर्मोन-बिघाड करतो. दोन ठळक उदाहरणे म्हणजे diethylstilbestrol (एक कृत्रिम इस्ट्रोजेन) आणि spironolactone ( एक मूत्रप्रमाण वाढवणारे औषध). अशा औषधांचा वापर नेहमी काळजीपूर्वक केला पाहिजे.
आधुनिक जीवनशैलीत आपण अनेक अनावश्यक रसायनांना आपल्या शरीरात धुडगूस घालू दिला आहे आणि त्यांचे परिणाम चिंताजनक आहेत. आपल्या हॉर्मोन-ग्रंथींमध्ये जननेंद्रिये व थायरॉइड या खूप संवेदनक्षम आहेत म्हणून त्यांचे बिघाड जास्त दिसतात. काही वैज्ञानिकांनी तर अशी भीती व्यक्त केली आहे की अशा बिघाडामधून समलैंगिकता किंवा लिंगबदल करण्याची इच्छा या गोष्टी वाढू शकतील.
सध्याच्या सामाजिक आरोग्यावर एकंदरीत नजर टाकता काही आजारांचे खूप वाढलेले प्रमाण लक्षात येईल. यामध्ये तरुणींमधील थायरॉइड विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि तारुण्यात जडणारा मधुमेह यांचा समावेश आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या बहुमूल्य हॉर्मोन यंत्रणांना आपण आटोकाट जपले पाहिजे. त्यासाठी घातक व अनावश्यक रसायनांचा वापर टाळणे किंवा अगदी कमीतकमी करणे, हे गांभीर्याने घ्यायची गरज आहे.
*******************************************************************************************
* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ व मिपा संस्थळ.
धन्यवाद. हादेखील अतिशय
धन्यवाद. हादेखील अतिशय महत्त्वाचा विषय सोप्या शब्दात हाताळला आहे तुम्ही.
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण.
शिसेबद्दल असे निरीक्षण आहे. वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या फरसाण, वडे, भजी अशा पदार्थांत त्या पदार्थावर काही वेळा तर छपाईची शाई उमटलेली दिसते. खाद्यपदार्थ अशा कागदात दिले नाही पाहिजेत.
नेहमीप्रमाणे छान लेख !
नेहमीप्रमाणे छान लेख ! प्लॅस्टीकवर फुली मारली आहे. पाणी फिल्टर करायला टाटा स्वच्छ वापरतो. त्यात फिल्टर झालं की लगेच माठात ओततो .... किती वेळ पाणी प्सॅस्टीकच्या संपर्कात आल्याने पिण्या योग्य पाणी राहत नाही ?
वरील सर्व नियमित वाचकांचे
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
**किती वेळ पाणी प्सॅस्टीकच्या संपर्कात आल्याने पिण्या योग्य पाणी राहत नाही ? >>>
तसे उत्तर देणे अवघड आहे. आता आपण ज्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतो त्यात तर ते पाणी कित्येक महिने प्लास्टिक संपर्कात असते. शक्यतो दीर्घकाळ संपर्क नको.
छान माहिती
छान माहिती
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण. >>>>>> +9999
अनेक धन्यवाद.
चांगली माहिती
चांगली माहिती
खूप सुंदर लेख...
खूप सुंदर लेख...
मी पाहिलेला एक व्हिडिओ भाज्या, फळं बेकिंग सोड्यात धुवावी, लोकल भाज्या फळे घ्यावी इत्यादी.
https://youtu.be/Qn2AjYZZo-8
आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या
आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
साद, सहमत.
दत्तात्रय, चांगला दुवा.
सोप्या भाषेत छान माहितीपूर्ण
सोप्या भाषेत छान माहितीपूर्ण लेख!
धन्यवाद सर!
उपयुक्त माहिती. धन्यवाद
उपयुक्त माहिती. धन्यवाद कुमार१.
खाणे, श्वसन, त्वचेद्वारे शोषण हे सगळे मार्ग सारखेच घातक आहेत का?
डर्टी डझन व उरलेल्या ८०० रसायनांबद्दल विस्ताराने कुठे वाचता येईल? WHO वेबसाईटवर वा अन्यत्र?
फूड ग्रेड प्लस्टिकही सेफ नव्हे का?
ओले पदार्थ / लोणचे चिवड्यासारखे तेलयुक्त ज्याचा प्लस्टिकशी रासायनिक संपर्क + क्रिया घडेल ते योग्य नव्हे पण कोरडे पदार्थ जसे डाळी, कडधान्ये, पापड कुरड्या हेही ठेवू नयेत का?
बिस्कीटे, चिप्स इत्यादि प्लस्टिक किंवा फॉईलबंद पदार्थांचे काय?
खाण्याच्या पिण्याच्या पदर्थातील कृत्रिम रंग व त्यांचा टिकाऊपणा वाढवणारी द्रव्ये हीदेखील यात येतात का? की ती द्रव्ये ''खाण्यायोग्य आहेत'' अशी प्रमाणित असतात ?
एअर फ्रेशनर, कीटक / डास निर्मूलक द्राव, जे सहसा बंद खोलीतच वापरले जातात त्यांचे गुणधर्म कसे काय?
कारवी, धन्यवाद.
कारवी, धन्यवाद.
एकेक प्रश्न दमाने घेतो.
१. खाणे, श्वसन, त्वचेद्वारे शोषण हे सगळे मार्ग सारखेच घातक आहेत का? >>>
श्वसनामार्गेची घातकता सर्वात वाईट. बाकी दोघांचे रसायनानुसार ठरेल.
२. डर्टी डझन व उरलेल्या ८०० रसायनांबद्दल विस्ताराने कुठे वाचता येईल? WHO वेबसाईटवर वा अन्यत्र? >>>>
सविस्तर माहितीसाठी:
https://www.endocrine.org/-/media/endosociety/files/advocacy-and-outreac...
३. फूड ग्रेड प्लस्टिकही सेफ नव्हे का?
>>>> सामान्य प्लास्टिकपेक्षा ठीक .
चांगली माहिती.
चांगली माहिती.
नवीन Submitted by कारवी on 6 May, 2019 - 07:29>>+१
सोनाली, धन्यवाद.कारवी,
सोनाली, धन्यवाद.
कारवी,
• कोरडे पदार्थ जसे डाळी, कडधान्ये, पापड कुरड्या हेही ठेवू नयेत का? >>>
हे हरकत नाही. पण स्टीलचा डबा / काचेच्या बरण्या केव्हाही चांगलेच.
* बिस्कीटे, चिप्स इत्यादि प्लस्टिक किंवा फॉईलबंद पदार्थांचे काय? >>.
खरे म्हणजे त्यांचा दीर्घ संपर्क योग्य नाही.
* खाण्याच्या पिण्याच्या पदर्थातील कृत्रिम रंग व त्यांचा टिकाऊपणा वाढवणारी द्रव्ये हीदेखील यात येतात का? की ती द्रव्ये ''खाण्यायोग्य आहेत'' अशी प्रमाणित असतात ? >>>
हो, अशी काही यात येतात. प्रमाणित असतात ती त्यातल्या त्यात बरी. बाकी प्रमाणित करण्याचे ‘इतर काही मार्ग’ आपण ऐकतोच. आरोग्यदृष्ट्या ताजे पदार्थ सर्वात उत्तम !
डॉ. कुमार,
डॉ. कुमार,
मध्यंतरी पेपरात असे वाचले होते की काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यातून अर्सेनिक पोटात जाते. त्याने होर्मोन बिघाड होतो का?
कारवी,
कारवी,
• एअर फ्रेशनर, कीटक / डास निर्मूलक द्राव, जे सहसा बंद खोलीतच वापरले जातात त्यांचे गुणधर्म कसे काय? >>>>
हे सगळे अनैसर्गिक आणि आरोग्यास वाईटच. १ ‘coil’ जर पूर्ण जाळली तर तो धूर १०० सिगरेटच्या धुराइतका वाईट ! त्यातले आधुनिक प्रकारही वाईटच.
साद, पिण्याच्या पाण्यातून
साद,
पिण्याच्या पाण्यातून अर्सेनिक पोटात जाते. त्याने होर्मोन बिघाड होतो का? >>>>
होय, ते दीर्घकाळ पोटात गेल्यास हॉर्मोनचे बिघाड होतात. Glucocorticoids या हॉर्मोन्सचे कार्य बिघडते. त्यामुळे एकूण चयापचय आणि रक्तदाब आणि प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतात.
धन्यवाद कुमार१.
धन्यवाद कुमार१.
पण जाहिरातीत तर बाळासाठी लावतात. आणि त्याचा स्मार्ट दादा / ताई डासांची संख्या बघून मशीन अॅडजस्ट करतात.
भाजीचे तेल बाहेर येऊ नये म्हणून टप्परवेअर वापरतोय.
पितळेचे हंडे कळकतात घासावे लागतात म्हणून अजून काही...
सोय आणि आधुनिकतेच्या नावाखाली आपणच पायावर कुर्हाड मारून घेतोय थोडक्यात.
एक अपघाताने लक्षात आलेली गोष्ट --
घरात पाहुणे होते जास्तीचे म्हणून नेहमीच्या हंडा कळशी बरोबर २ पाच किलोचे प्लस्टिकचे डबे भरून ठेवले होते प्यायच्या पाण्याने. एक ओट्यावर आणि एक खाली जमिनीवर.
ओट्यावरच्या डब्याला लांब होता तरीही गॅसची धग काही प्रमाणात लागतच असणार + मावळतीची उन्हेही त्यावर पडायची अर्धा पाऊण तास जवळजवळ. तर त्यातल्या पाण्याला प्लास्टिकची चव आली. पूर्वी वॉटरबॅग नवीन असताना यायची तशी.
मग प्रयोग म्हणून डब्यांची अदलाबदल करून पाहिली.
तर ओट्यावरच्या दुसर्या डब्याला तोच अनुभव. जमिनीवरचा डबा नेहेमीची चव.
म्हणजे उष्ण हवेचा झोत (गॅसमुळे) + उन्हातील किरणे ( मावळतीची ३०-४० मिनीटे) यामुळेही प्लस्टिकची रसायने पाण्यात उतरली.
तर जी चिप्सची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या दुकानात दाराजवळ असतात, पूर्णवेळ कडक उन्हातही तापतात, किंवा लहान स्वयंपाकघरात डबे बाटल्या गॅसच्या धगीजवळ रहातात ---- त्यातील पदर्थात काही ना कही अहितकारी फरक होतच असावेत. आपणच सावध रहायला हवे.
फार सुंदर लेख.
फार सुंदर लेख.
धन्यवाद डॉ. कुमार.
धन्यवाद डॉ. कुमार.
आपल्याकडचे अनेक पिण्याचे पाणीसाठे देखील सुरक्षित नाहीत.
>>>>
पण जाहिरातीत तर बाळासाठी लावतात. आणि त्याचा स्मार्ट दादा / ताई डासांची संख्या बघून मशीन अॅडजस्ट करतात.>>>>>
हे म्हणजे असंय. मच्छरदाणी सारखे नैसर्गिक उपाय ठेवायचे गुंडाळून आणि वाईट रसायने शरीरात घ्यायची. जाहिरातींचे आपण गुलाम झालो आहोत.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
डोक्टर, स्वयंपाकाची ionized भांडी कितपत हानीकारक असतात?
अल्युमिनिअमची कढई आणि नॉनस्टीक कढई यात कमी हानीकारक काय आहे?
भाजीचे तेल बाहेर येऊ नये म्हणून टप्परवेअर वापरतोय. >>> बोरोसीलचे काचेचे गळणमुक्त डबे येतात. अर्थात झाकण प्लॅस्टीकचेच आहे पण पदार्थाचा झाकणाशी संपर्क जवळजवळ नसतोच.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
@ माधव,
* नॉनस्टीक भांड्यांचा उल्लेख लेखातील तक्त्यात आहे. त्यातून PFCs ही रसायने पोटात जातात.
*अल्युमिनिअमची घातकता हॉर्मोन संदर्भात नाही; ती कर्करोगाबाबत आहे.
घरगुती वापरातून (non- occupational exposure) जे अल्युमिनिअम पोटात जाईल ते कर्करोगकारक नसेल. पण, अल्युमिनिअम उत्पादन आणि वेल्डिंगमध्ये काम करणार्या (occupational exposure) व्यक्तींना कर्करोगाचा धोका संभवतो.
* ‘ionized भांडी ‘ >>>>
तुम्हाला anodized म्हणायचे आहे का?
तुम्हाला anodized म्हण्याचे
तुम्हाला anodized म्हण्याचे आहे का? >>> हो त्या बद्दल पण सांगा.
पण मला काही तरी दुसर्याच प्रकाराबद्दल विचारायचे होते. काही वर्षांपूर्वी तो प्रकार बाजारात होता.. त्याच्या कोटींगपासून कसले तरी active ions (म्हणून ionized लिहिलंय, नक्की नाव आठवत नाहीये) बाहेर पडतात आणि ते आरोग्याला चांगले असतात असा त्यांचा दावा होता.
@ माधव,
@ माधव,
Anodized भांडी ही उष्णतारोधक व बारीक छिद्राविना असतात. त्यामुळे त्यात स्वयंपाक केल्यास आतील अल्युमिनियम फारसे बाहेर येत नाही. त्यांचे उत्पादक असा दावा करतात की ती आरोग्यास पूर्ण सुरक्षित आहेत. पण काही संशोधक याबाबत साशंक आहेत.
त्यांच्या मते असे आहे. एका वेळच्या स्वयंपाकातून भांड्यातून निघणारे अल्युमिनियम हे किरकोळ असते. पण दीर्घकालीन वापरातून जे अल्युमिनियम पोटात जाईल ते पूर्ण सुरक्षित मानायचे का? यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट मते आहेत.
बीपीए फ्रि प्लॅस्टीकसुद्दा
बीपीए फ्रि प्लॅस्टीकसुद्दा घातकच का?
पेरु, बीपीए फ्रि
पेरु,
बीपीए फ्रि प्लॅस्टीकसुद्दा घातकच का? >>>
चांगला प्रश्न. गेल्या काही वर्षांत BPAच्या दुष्परिणामांची खूप चर्चा होऊ लागली. मग प्लास्टिक उत्पादकांनी ‘बीपीए फ्रि’ अशी प्लास्टिक बाजारात आणली. पण त्यात एक मेख होती.
त्यांत BPAच्या ऐवजी BPS, BPF, BPAF इत्यादी पर्याय वापरलेले होते ! आता मुळात ही सर्व रसायने ‘Bisphenol’ याच कुटुंबात येतात.
पुढे वैज्ञानिकांनी या ‘नव्या’ प्लास्टिकची घातकता काही प्रयोगांतून तपासली. ही सर्व रसायने बीजांडावर परिणाम करतातच, असा काही अभ्यासांचा निष्कर्ष आहे. अर्थात अजून बरेच संशोधन व्हायला हवे आहे.
वरच्या बीपीए फ्रि
वरच्या बीपीए फ्रि मुद्द्यावरून ‘शुगर फ्री’ प्रकारच्या केमिकल्सची आठवण झाली.
एक वेळ शुगर परवडली, पण हे ‘फ्री’वाले नको असला प्रकार असतो.
छान माहिती, लेख आणि चर्चा
छान माहिती, लेख आणि चर्चा
खूपच सुंदर लेख.
खूपच सुंदर लेख.
बरेच प्रश्न आहेत.
सध्या भारताबाहेर आहे. इथे डाळी आणि पीठे कमी मिळतात. त्यामुळे भारतवारीमधे एकदम जास्त प्रमाणात आणतो.
रोजच्या वापरातले सामान जरी प्लॅस्टिकमधे नसले तरी जास्तीचे पाकिटातच राहते. ते चांगले का? काढले तर लवकर हवा लागून खराब होईल ना?
पत्र्याचे डबे वापरणॅ चांगले का? इथे स्टीलचे डबे मिळत नाहीत.
बर्याचदा दही, आईसक्रीम इ. चे डबे परत वापरले जातात. ते वापरणे चांगले का?
सिलिकॉन वापरणे कितपत चांगले?
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
Pages