Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 15 April, 2019 - 06:38
गोडवा टिकवून होतो फार आम्ही !
आणला नात्यात मग व्यवहार आम्ही !
गोष्ट उडण्याची कुठे पंखास कळली ?
ह्या नभाचा घेत गेलो भार आम्ही !
कोंब सूर्याला नवे फुटतील आता..
झाकला कर्मठ जुना अंधार आम्ही !
हसत म्हटल्या पाकळ्या कोमेजताना -
बहर घेऊनी नवा.. फुलणार आम्ही !
फारसा त्यांचा कुठे उपयोग झाला !
गिरवले शाळेत जे सुविचार आम्ही !
पानगळ ही.. बालपण घेऊन गेली..
सोसले होते ऋतू चिक्कार आम्ही !
अंगणी माझ्या सुखाचे रोप आले..
पेरले आई तुझे संस्कार आम्ही !
शेवटी अपुलेच आले.. हाक देता !
ठेवले जोडून बघ, घरदार आम्ही !
- ऋषभ कुलकर्णी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा