वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : भाग १०
(भाग ९: https://www.maayboli.com/node/69454)
*******
नमस्कार,
दि. १३/२/२०१९ रोजी सुरु केलेली ही लेखमाला आज समाप्त करीत आहे.
‘नोबेल’ हा जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार समजला जातो. विज्ञानशाखांमध्ये तो मूलभूत संशोधनासाठी दिला जातो. यंदाच्या माबोच्या ‘मराठी भाषा दिन’ उपक्रमात ‘विज्ञानभाषा मराठी’ हा विभाग होता. त्याला अनुसरून ही लेखमाला सुरु केली. याचा उद्देश वैद्यकशाखेतील आजपर्यंतच्या महत्वाच्या पुरस्कारांबद्दल सामान्यांसाठी काही लिहावे हा होता.
हे पुरस्कार गेली ११८ वर्षे दिले जात आहेत. त्यापैकी सुमारे २० संशोधने ही ‘अभूतपूर्व’ आणि ‘क्रांतिकारी’ स्वरूपाची म्हणता येतील. या लेखमालेसाठी १९०१ ते २००८ या विस्तृत कालावधीतील काही मोजकी संशोधने निवडली. ही निवडताना वाचकाला रंजक वाटतील असे १२ विषय घेतले. संबंधित संशोधक, त्यांच्या मूलभूत संशोधनाची थोडक्यात माहिती आणि त्याचा समाजाला झालेला उपयोग अशा दृष्टीकोनातून हे लेखन केले. लेखमालेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद वाटतो. येथील सुजाण वाचकांनी प्रतिसादांतून काही छान शंका विचारल्या. त्यातून त्यांचे आरोग्यविषयक कुतूहल आणि जागरूकता दिसून आली.
१२ विषयांपैकी चौथ्या भागातील ‘रक्तगटांचा शोध’ हा लोकप्रिय विषय ठरला आणि ते अपेक्षित होते. सुशिक्षित वर्गाला या विषयाबद्दल विशेष ममत्व असते. हल्ली बऱ्याच संस्थांमध्ये आपली वैयक्तिक माहिती साठविताना आपल्या रक्तगटाची नोंद आवर्जून केली जाते. आपल्यातले अनेक जण स्वयंसेवी रक्तदान नियमित करतात. अशा सर्व दृष्टीने हा विषय महत्वाचा ठरतो. त्यामुळे ही चर्चा खूप रंगतदार झाली. पाचव्या भागातील ‘पेनिसिलिन’ वरची चर्चा वाचकांच्या स्वानुभव कथनामुळे रंगली. आठव्या भागातील MRI तंत्रावरील विषयाला मिळालेला अनपेक्षित मोठा प्रतिसाद हा एक सुखद धक्का होता. नउव्या भागातील ‘एड्स’ वरील चर्चाही अर्थपूर्ण झाली. त्या विषयावर वाचकांकडून विक्रमी संख्येने प्रश्न विचारले गेले, ही सुखावणारी बाब आहे. त्यामुळे एड्सवरील लेख हा खऱ्या अर्थाने लेखमालेतील चर्चेचा कळसाध्याय ठरला. लेखमालेत वेळोवेळी काही वाचकांनी प्रतिसादांतून पूरक माहितीची भर घातल्याने मलाही फायदा झाला.
या समारोपानिमित्ताने वैद्यकशाखेत आजपर्यंत दिल्या गेलेल्या पुरस्कारांबद्दल काही रोचक माहिती नोंदवत आहे:
१. एकूण ११८ वर्षे (१९०१- २०१८) हे पुरस्कार दिले गेले आहेत. त्यापैकी ९ वर्षी ते देण्यात आले नाहीत.
२. पुरस्कार न दिलेला कालावधी साधारण दोन्ही जागतिक महायुद्धा दरम्यानचा आहे.
३. १०९ पुरस्कारांसाठी एकूण २१६ संशोधकांची निवड झाली; त्यापैकी १२ महिला आहेत. ३९ जणांना हा पुरस्कार एकट्यासाठीच (न विभागता) मिळाला.
४. एकूण पुरस्कारांमध्ये क्रमवारीने पहिले तीन देश (पुरस्कार संख्येसह) असे आहेत:
* अमेरिका ९३
* यु. के. २९
* जर्मनी १६
५. वैद्यकातील विजेत्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नाही. मात्र जन्माने भारतीय असलेले हरगोबिंद खोराना हे एकमेव संशोधक आहेत. त्यांना १९६८चे नोबेल अन्य दोघांबरोबर विभागून मिळाले. पुरस्कार मिळताना खोराना अमेरिकेचे नागरिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय “जनुकीय सांकेतिक लिपी आणि प्रथिन निर्मितीचा अभ्यास” हा होता.
६. एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कार कोणालाही मिळालेले नाहीत (नोबेलसाठीच्या अन्य शाखांत अशी मोजकी उदा. आहेत).
७. १९२३चे विजेते Frederick G. Banting हे आजपर्यंतचे सर्वात तरुण (वय ३२) संशोधक होते. त्यांचा पुरस्कार इन्सुलिनच्या शोधाचा आहे.
८. १९४७ व २०१४चे पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते नवरा-बायको अशा जोड्यांना विभागून मिळाले आहेत.
* १९४७: Cori दाम्पत्य (ग्लायकोजेनचा अभ्यास)
* २०१४: Moser दाम्पत्य (विशिष्ट मेंदूपेशींचा अभ्यास)
९. १९३९चे विजेते G. Domagk यांना सत्ताधीश हिटलरच्या हुकुमाने तो पुरस्कार नाकारावा लागला.
. . .
वैद्यकाच्या अनेकविध शाखांमध्ये मूलभूत शोध लावून या सर्व संशोधकांनी मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. आजपर्यंतच्या सर्व विजेत्यांना विनम्र अभिवादन.
येथील सर्व वाचक, प्रतिसादक आणि प्रशासकांचे मनापासून आभार !
************************************************
परिशिष्ट:
या लेखमालेचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:
भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास
३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास
४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर
६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार
८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप
*********************
डॉ.सी.व्ही. रमण यांना नोबेल
डॉ.सी.व्ही. रमण यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही काय?
या लेखमालेत काही प्रतिसाद
या लेखमालेत काही प्रतिसाद कर्ते शंका विचारण्यापेक्षा मला जास्त कळतं असे इंप्रेशन मारीत होते अशी मला शंका आहे.
सॉरी वैद्यकशाखेच्या
सॉरी वैद्यकशाखेच्या पुरस्कारांची माहिती आहे हे मी लक्षात घेतले नाही.
माझे वाक्य नीट बघा:
माझे वाक्य नीट बघा:
"वैद्यकातील विजेत्यांत...."
डॉ रमण यांचा पुरस्कार नोबल च्या अन्य शाखेत येतो.
ही लेखमाला फक्त वैद्यकीय आहे !
खूप छान लेखमाला ! संपल्याची
खूप छान लेखमाला ! संपल्याची चुटपुट लागून राहील. अजून 1-2 लेख चालले असते.
>>>>>Frederick G. Banting हे आजपर्यंतचे सर्वात तरुण (वय ३२) संशोधक होते. त्यांचा पुरस्कार इन्सुलिनच्या शोधाचा आहे.>>>>
या नोबेलवर बराच वाद झाला होता असे वाचल्यासारखे वाटते.
लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद.
पुलेशु
कुमार भाव मी क्षमा मागितली
कुमार भाव मी क्षमा मागितली होती तरीही ........
अहो, आपले दोघांचे प्रतिसाद
अहो, आपले दोघांचे प्रतिसाद एका मिनीटभराच्या अंतरात इथे पडले !
गैरसमज नसावा. ☺️
उपयुक्त मालिका होती. तुमच्या
उपयुक्त मालिका होती. तुमच्या शंकानिरसनातील तत्परतेबद्दल _/\_
आता मूलपेशी वरची मालिका कधी सुरू करताय याची वाट बघतोय.
तुमचे सारेच लेखन " गागरमे
तुमचे सारेच लेखन " गागरमे सागर " याच स्वरुपाचे आहे. या साठी तुम्ही घेतलेली प्रचंड मेहनत दिसते. माहितीसंकलन कोणही करेल पण विश्लेषण करायला खूप अभ्यास लागतो. आपले लेख अभ्यासपूर्ण असतात. जो प्रांत आपला नाही तिथे तुम्ही प्रामाणिकपणे सांगितले हे मला माहीत नाही .प्रामाणिकपणाची ही भावना आवडली. डॉक्टरांचे जीवन खूप व्यस्त असते तरीपण आमच्यासाठी एवढा वेळ काढून लिहिता याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. प्रतिसादांना दिलेली उत्तरे खूप शांत आणि संयमी असतात.
खूप धन्यवाद....
@साद,
@साद,
धन्यवाद !
** 'इन्सुलिन’चे नोबेल कोणाला व किती जणांना विभागून द्यावे ही समिती पुढची डोकेदुखी होती, कारण ४ जणांनी या संशोधनात खूप योगदान दिले होते.
बऱ्याच काथ्याकूटानंतर हे पारितोषिक Frederick Banting आणि JJR Macleod यांना विभागून जाहीर झाले. पण नोबेल दोघांनाच मिळाल्याने इतर काही नाराज होते.
त्यात Best चा समावेश न झाल्याने Banting खूप नाराज झाले. पण त्यांनी आपल्या वाट्याच्या बक्षिसाची निम्मी रकम Best ना दिली. तसेच Macleod नी सुद्धा आपली निम्मी रकम Collip ना दिली.
माधव,
माधव,
नियमित प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! मूळ पेशींवर वाचन चालू आहे. त्यावर एकच लेख होईल, माला नाही ! अर्थात त्याला वेळ लागेल.
दत्तात्रय,
सातत्यपूर्ण प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. तुमचा हा प्रतिसादच एका आदर्श प्रतिसादाचा नमुना आहे.
…. ही लेखमाला चालू असतानाच एकीकडे तुमच्या सुंदर कवितांनी मनाला रिझवले हेही नमूद करतो.
आपणा सर्वांनाच उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !
तुमची लेखमाला खूपच छान होती
तुमची लेखमाला खूपच छान होती कुमार sir.
Google var तुकड्या तुकड्यात मिळणारी माहीत तुम्ही एकाच ठिकाणी दिली .
धन्यवाद आणि लेखन चालूच thevave
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
दत्तात्रय सरांच्या पूर्ण
दत्तात्रय सरांच्या पूर्ण पोस्ट ला अनुमोदन..
माहितीपूर्ण आणि रंजक लेखमाला होती ह्यात दुमत नसावे..
वैद्यकातील विविध विषयांवर आपले लेखन असेच सुरू राहावे ही सदिच्छा
राजेश , शशी व किल्ली,
राजेश , शशी व किल्ली,
नियमित प्रोत्साहनाबद्दल आभार !
@ डॉक्टर खूप धन्यवाद माझ्या
@ डॉक्टर खूप धन्यवाद माझ्या कविता आवडल्याचे आवर्जुन कळविल्याबद्दल...
@ किल्ली धन्यवाद ...
सर कृपया मागे मी
सर कृपया मागे मी सुचवल्याप्रमाणे चयापचय, प्राणी पेशी रचना व कार्य , क्रेब सायकल उर्जा निर्माण कार्य याविषयी लिहा. किंवा प्रत्येक महत्त्वाचे अवयव, त्यांची रचना, कार्य व होणारे आजार यावर आपल्या सोप्या पद्धतीने लिहाल तर फार छान होईल. पुलेशु. धन्यवाद.
शशिराम, धन्यवाद.
शशिराम, धन्यवाद.
यापूर्वी मी कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन, बिलिरुबिन, युरिआ, युरिक ऍसिड व गाऊट, ग्लुकोज , थायरॉईड… इ. अनेक विषयांवर इथेच स्वतंत्र लेख लिहिले आहेत. ते तुम्ही सवडीने बघू शकता.
..वाचकांकडून सुचविलेल्या पुढील विषयांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. त्यात तुमच्या विषयांची नोंद करेन.
आता माणूस खूपच सजक झाला आहे
आता माणूस खूपच सजक झाला आहे हेल्थ विषयी .
आहार काय घेतला पहिजे किती घेतला पहीज्र हे सुधा डॉक्टर च्या सल्ल्याने ठरवत आहे त्या मुले शरीराला पोषक असाच आहार मोजून घेतला जात आहे पण त्या मुळे शरीराची जी नैसर्गिक यंत्रणा आहे कोणत्या ही आहार मधून हवे ते घेवून बाकी बाहेर टाकणे ही यंत्रणा कामच नसल्या मुळे हळु हळु नष्टं तर होणार नाही ना .
तसेच अती स्वच्छता शरीराची प्रतिकार यंत्रणा भविष्य मध्ये नष्टं तर करणार नाही ना .
ह्या विषयावर जरा मार्ग दर्शन kara
चांगली लेखमाला होती.
चांगली लेखमाला होती. वाचकांच्या शंका धुडकावून न लावता प्रांजळपणे व सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद. पु. ले. शु.
राजेश व प्राचीन, धन्यवाद.
राजेश व प्राचीन, धन्यवाद.
@ राजेश,
तसेच अती स्वच्छता शरीराची प्रतिकार यंत्रणा भविष्य मध्ये नष्टं तर करणार नाही ना >>>
हा मुद्दा रोचक आहे. यासंदर्भात एक उदा. देतो. मधुमेह(प्रकार १) च्या संदर्भात काही वर्षांपूर्वी एक गृहीतक मांडले गेले होते. त्यानुसार असे आहे. जर अगदी बालपणी त्या बाळाची काळजी घेताना स्वच्छतेचा अति बाऊ केला तर मग त्याच्या प्रतिकारशक्तीला जन्तूंशी लढायची ताकद राहत नाही. त्यातूनच पुढे एखादा विषाणू संसर्ग तीव्र प्रकारे होतो आणि त्यातून पुढे स्वादुपिंडातील विशिष्ट पेशींचा नाश होऊन मधुमेह होतो.
दम्याचे बाबतीतही अशी शक्यता मांडली गेली आहे. हे सर्व पूर्ण सिद्ध झालेले नाही. पण दखल घेण्याजोगा मुद्दा आहे.
आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या
आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा !
२०१९ चे वैद्यकातील ‘नोबेल’
२०१९ चे वैद्यकातील ‘नोबेल’ Sir P. J. Ratcliffe, G. Semenza, आणि W. G. Kaelin या त्रयीला जाहीर झालेले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय शरीरातील पेशी आणि ऑक्सिजनचा पुरवठा यासंदर्भात आहे.
सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे या संशोधनाचा भविष्यात उपयोग काय होईल, ही असते. या संशोधनाचे संभाव्य उपयोग असे आहेत:
१. लाल पेशींचा सखोल अभ्यास होऊन रक्तन्यूनता असलेल्या रुग्णांना प्रगत उपचार शोधले जातील. विशेषतः हे दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराने बाधित रुग्णांना लागू आहे. या रुग्णांत Erythropoietin हे हॉर्मोन स्त्रवणे खूप कमी होते आणि त्यामुळे रुग्णास रक्तन्यूनता होते. ते हॉर्मोन वाढविणारे औषध आता शोधता येईल.
२. कर्करोगातील उपयोग: या पेशी प्रचंड वेगाने विभाजित होतात आणि त्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. त्यामुळे काही जनुके उद्दीपित होतात आणि परिणामी या पेशींचा फैलाव शरीरभर होतो. सध्याच्या केमोथेरपीने फक्त पुरेशा ऑक्सिजनयुक्त पेशीच मारल्या जातात. मग या जगलेल्या ऑक्सिजनन्यून पेशी पुढे फोफावतात. त्यातून आजार गंभीर होतो आणि रुग्णास मारक ठरतो. आता याही पेशींना मारणारी औषधे विकसित होतील.
३. करोनरी हृदयविकार आणि पायांच्या रक्तवाहिन्यांचे विकार : हे दोन्ही आजार मधुमेही रुग्णांत बऱ्यापैकी होतात. त्यांत मुळात शरीराच्या एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे तिथे ऑक्सिजनची कमतरता होते. त्यातून तिथल्या पेशी मरतात. नव्या संशोधनातून तिथला रक्तपुरवठा वाढविणारी नवी औषधे उदयास येतील.
४. अन्य हृदयविकार आणि काही फुफ्फुसरोगांतही ऑक्सिजन-बिघाड असतो. त्या अनुषंगाने इथेही उपयोग होईल.
चांगली माहिती ।
चांगली माहिती ।
या संशोधनात नेमकं काय केलं हे सोप्या शब्दात लिहिता येईल का डॉक्टर ?
जाई, धन्यवाद.
जाई, धन्यवाद.
थोडक्यात लिहितो.
सर्व पेशींना ऊर्जानिर्मितीसाठी योग्य तो ऑक्सिजन पुरवठा लागतो. विविध आजारांत तो काही कारणांनी कमी होतो. असे झाले तरी पेशी तिच्यातील ऊर्जानिर्मिती चालू ठेवण्याची शिकस्त करते. मात्र त्यासाठी पेशीला ठराविक ‘सिग्नल्स’ची गरज भासते. (जसे की, मला जर वाहन चालविताना पुरेशा अंतरावरून आधीच सिग्नलचा लाल दिवा दिसला, तर मी योग्य तऱ्हेने वेग कमी करतो).
ऑक्सिजन-पुरवठा कमी पडणार आहे हे पेशीने जाणण्याची जी यंत्रणा आहे (sensing), ती जनुकांच्या नियंत्रणात असते. त्याचा हा सखोल अभ्यास आहे. रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेशीही त्याचा संबंध आहे.
या संशोधनाची सुरवात ३० वर्षांपूर्वी ‘ऑक्सफर्ड’ मध्ये झाली होती. त्याचे फलित आज आपल्यासमोर आहे.
डॉक्टर, खूप छान माहिती.
डॉक्टर, खूप छान माहिती.
संशोधनाचे उपयोग लिहील्याबद्दल अनेक धन्यवाद.
पु ले शु
थँक्स डॉक्टर
थँक्स डॉक्टर
यंदाच्या नोबेल पुरस्कार
यंदाच्या नोबेल पुरस्कार घोषणांच्या क्रमांत वैद्यकीयला प्रथम स्थान मिळाले आहे याचा आनंद होतो. आताच काही वेळापूर्वी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला.
२०२० : वैद्यकीय नोबेल विजेते.
Harvey J. Alter,
Michael Houghton आणि
Charles M. Rice
विषय : हिपटायटीस- सी विषाणूचा शोध.
या शोधापूर्वी हिपटायटीसचे ए व बी हे विषाणू माहित होते. परंतु, रक्ताद्वारे पसरणाऱ्या अन्य यकृतदाहाचे निदान होत नसायचे. त्यांच्या या शोधामुळे या विषाणूच्या जातीचा शोध लागला आणि त्यावरील उपचारांना गती मिळाली.
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन ! >>> +७८६
हार्दिक अभिनंदन ! >>> +७८६
सध्याच्या करोना वातावरणाचा नोबेल समितीवर प्रभाव पडला असावा.
म्हणून व्हायरस साठी दिलेले दिसते.
2021 चे वैद्यकशास्त्रातील
2021 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
ते अमेरिकेच्या David J व Ardem P या दोघांना विभागून मिळाले आहे.
संशोधनाचा विषय:
स्पर्श आणि तापमानामुळे त्वचेतून मेंदूकडे जाणारे संदेश कसे निर्माण होतात याचा सखोल अभ्यास. रोचक भाग म्हणजे या संशोधनासाठी मिरचीतील एका तीव्र रसायनाचा वापर करण्यात आला.
उपयोग:
शरीराच्या विविध आजारांमध्ये जी वेदना जाणवते त्यासंबंधी अधिक अभ्यास करून नवे उपचार शोधता येतील.
Pages