नोबेल संशोधन (९) : HIV चा शोध

Submitted by हेमंतकुमार on 1 April, 2019 - 00:59

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ९
(भाग ८: https://www.maayboli.com/node/69416)
*******

या लेखमालेत कालानुक्रमे पुढे जात आपण २१व्या शतकात पोचलो आहोत. या लेखात २००८ च्या पुरस्काराची माहिती घेऊ. हा पुरस्कार २ वेगळ्या संशोधनांसाठी विभागून दिला गेला. ही दोन्ही संशोधने विषाणूंच्या शोधांसाठी झाली होती. ते विषाणू आहेत HIV आणि HPV. या लेखात आपण फक्त HIV या बहुचर्चित विषाणूच्या शोधाचा आढावा घेणार आहोत. या संदर्भातले नोबेल हे खालील दोघांत विभागून दिले गेले.

विजेते संशोधक : Françoise Barré-Sinoussi आणि Luc Montagnier
देश : दोघेही फ्रान्स
संशोधकांचा पेशा : विषाणूशास्त्र
संशोधन विषय : HIV चा शोध

या विषाणूचे पूर्ण नाव Human Immunodeficiency Virus ( HIV) असे आहे. त्याच्या संसर्गाने जो गंभीर आजार होतो त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात, हे प्राथमिक ज्ञान एव्हाना बहुतेकांना आहे. गेल्या ३७ वर्षांत या आजाराने सामाजिक आरोग्यविश्व अक्षरशः ढवळून काढले आहे. सुरवातीचे त्याचे भयंकर स्वरूप बघता त्याबद्दलची जनजागृती करणे आवश्यकच होते आणि ती अनेक माध्यमांतून करण्यात आलेली आहे. एड्सचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकविश्वाच्या जोडीने अनेक समाजसेवी संस्थाही मोलाचे योगदान देत आहेत. HIVचा शोध आणि एड्सची कारणमीमांसा हा वैद्यकीय संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. त्यासाठी दिले गेलेले नोबेल हे यथोचित आहे. या सगळ्याचा आढावा या लेखात घेत आहे.

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात संसर्गजन्य आजारांनी समाजात थैमान घातले होते. हे आजार विविध जिवाणू व विषाणूंमुळे होतात. त्यामुळे तत्कालीन संशोधनाचा भर त्या आजारांवरील उपचारांवर केंद्रित होता. त्यातून निर्माण झालेल्या जंतूविरोधक औषधांनी ते आजार बऱ्यापैकी नियंत्रणात आणले. १९७०चे दशक संपताना बरेच संसर्गजन्य आजार आटोक्यात आले होते. प्रगत देशांत तर असा समज झाला होता की असे आजार हे जवळपास दुर्मिळ झालेले आहेत आणि इथून पुढे आपण सूक्ष्मजंतूंची फारशी काळजी करण्याचे कारण नाही ! पण या समजाला एक फार मोठा धक्का लवकरच बसणार होता.

सन १९८१मध्ये अमेरिकेत काही रुग्णालयांत एका विशिष्ट प्रकारचे रुग्ण एकगठ्ठा आढळले. ते समलिंगी पुरुष होते आणि त्यापैकी बहुतेक जण इंजेक्शनद्वारा अमली पदार्थ नियमित घेत असत. त्यांना एका दुर्मिळ प्रकारच्या न्यूमोनियाने ग्रासले होते. एरवी हा आजार आपली प्रतिकारशक्ती प्रचंड ढासळली असताना होतो. त्यामुळे असे रुग्ण हे डॉक्टरांच्या कुतुहलाचे विषय ठरले. त्यानंतर काही काळाने काही समलिंगी पुरुषांना त्वचेचा एक दुर्मिळ कर्करोग (sarcoma) झालेला आढळला.

_kaposis_sarcoma.jpg

यथावकाश या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांचा आजार दीर्घकालीन असल्याचे दिसू लागले तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वेगाने ढासळत असे.त्यतून त्यांना अनेक जंतुसंसर्ग होत. त्यामुळे या आजाराची दखल आरोग्यसेवेतील सर्वोच्च केंद्राकडून घेतली गेली आणि या रुग्णांच्या देखभालीसाठी विशेष वैद्यकीय पथके स्थापन झाली. सुरवातीस या आजाराला "Gay-related Immune Deficiency" (GRID) असे नाव दिले गेले. अन्य एक नाव देखील पुढे आले आणि ते होते “4 H आजार”. त्यातील एक H हा होमोसेक्शुअलसाठी तर दुसरा H हेरोईन-व्यसनाचा निदर्शक होता.

आता संशोधकांचे प्रथम लक्ष्य होते ते म्हणजे या गूढ आजाराचे कारण शोधून काढणे. सुरवातीस काहींनी फंगस वा विशिष्ट रसायने ही या आजाराची कारणे असावीत असे मत मांडले. तर काहींनी हा ‘ऑटोइम्यून’ आजार असावा जो रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश करतो, असा तर्क केला.

मग १९८२मध्ये पॅरीसमधील एका रुग्णालयात यावर झटून काम सुरु झाले. त्यात Luc यांचा पुढाकार होता. हा आजार बहुधा एका विषाणूमुळे होत असावा असा काही संशोधकांचा अंदाज होता. मग Luc, Françoise आणि अन्य काही विषाणूतज्ञांचा चमू यासाठी कामास लागला. त्यांनी संबंधित रुग्णांच्या कसून तपासण्या चालू केल्या. या रुग्णांच्या ‘लिम्फ ग्रंथी’ वाढलेल्या होत्या. त्यांची सूक्ष्म तपासणी केल्यावर त्यात एक खास विषाणू आढळला आणि त्याला LAV असे नाव तात्पुरते दिले गेले (L= lymph). आता हा विषाणू आणि त्या रुग्णांचा खंगवणारा आजार यांचा कार्यकारणभाव लवकरच सिद्ध झाला. मग असेही लक्षात आले की हा आजार फक्त समलिंगी लोकांपुरता मर्यादित नाही. म्हणून सखोल विचारांती जुलै १९८२मध्ये त्याचे अधिकृत नाव ‘एड्स’ असे ठरवण्यात आले. नंतर संबंधित विषाणूवर अधिक संशोधन झाले आणि त्याची १-२ नामांतरे होत अखेर HIV या नावावर १९८६मध्ये शिक्कामोर्तब झाले.

हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. तो रक्तातील लिम्फोसाईट्स या पेशींवर हल्ला करतो. परिणामी आपल्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते. हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.

संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात एड्सच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले गेले. ज्या व्यक्तीस HIVचा संसर्ग झाला आहे तिच्याद्वारा विषाणूचे संक्रमण अन्य व्यक्तीत होऊ शकते. मात्र त्यासाठी बाधित व्यक्तीच्या शरीरातील खालीलपैकी कशाचा तरी थेट संपर्क दुसऱ्या व्यक्तीस व्हावा लागतो:

१. रक्त : यात दूषित रक्तसंक्रमण किंवा इंजेक्शनची सुई वा सिरींज शेअर करणे हे प्रकार येतात.
२. वीर्य आणि गुदद्वारातील अथवा योनीतील द्रव : हे सर्व असुरक्षित संभोगातून येते.

३. मुलास जन्म देताना किंवा स्तनदा मातेचे दूध तिच्या बाळास पाजतानाचा संपर्क.
४. चुंबनातून या विषाणूचा प्रसार होतो का हा औत्सुक्याचा विषय आहे. संबंधित दोन्ही व्यक्तींनी उघड्या तोंडाने चुंबन घेतल्यास आणि त्यातील एकाला संसर्ग झालेला असल्यास, आणि दोघांच्याही तोंडात जखमा असल्यास हा प्रसार होऊ शकतो. म्हणजे पहिल्याच्या रक्तातून लाळेत व पुढे दुसऱ्याच्या लाळेतून रक्तात असा तो प्रसार होईल. अशा प्रकारे रोगप्रसार झाल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत.).

मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.

वैद्यकाच्या इतिहासात एड्स प्रथम आढळल्याची अधिकृत नोंद १९८१मध्ये अमेरिकेत झाली आहे. पण, त्याचा पूर्वव्यापी (retrospective) शोध घेता असे वाटते की असा पहिला रुग्ण १९६६ मध्येच नॉर्वेत आढळला असावा.

आता थोडे प्रस्तुत संशोधकांबद्दल. Francoise या विदुषी फ्रान्सच्या रहिवासी. सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या. त्यामुळे त्यांना स्वस्तात आणि लवकरात लवकर पूर्ण होणारे शिक्षण घ्यावे लागले. पुढे अगदी अपघातानेच त्या पॅरीसमधील प्रतिष्ठित पाश्चर संस्थेत एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाल्या. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७५मध्ये स्वतःची पीएचडी पूर्ण केली आणि तनमन अर्पून विषाणूशास्त्रातील संशोधनास वाहून घेतले. हा पुरस्कार हे त्याचेच फलित.

Luc M हेदेखील फ्रान्सचे रहिवासी. त्यांनी विज्ञान व वैद्यकशास्त्र अशा दोन्ही शाखांतील शिक्षण घेतले आहे. या संशोधनादरम्यान ते पाश्चर संस्थेत ज्येष्ठ वैज्ञानिक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने अथक परिश्रम करून हा शोध लावण्यात यश मिळवले. पुढे १९९३मध्ये त्यांनी एड्सच्या संशोधन व प्रतिबंधासाठी जागतिक संस्था स्थापन केली आहे. या कार्याबद्दल ते अनेक मानसन्मानांचे मानकरी आहेत.

या बहुमूल्य मूलभूत संशोधनानंतर HIV व एड्सच्या संदर्भात वैद्यकात अफाट संशोधन झाले. संबंधित रोगनिदान रक्तचाचण्या विकसित झाल्या. त्या अधिकाधिक सोप्या होत गेल्या. त्यांचे निष्कर्ष त्वरीत मिळू लागले.

hiv_test.jpg

पुढच्या टप्प्यात रोगोपचारासाठी विविध विषाणूविरोधी औषधांचे शोध लागले. आजच्या घडीला अशी अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे. मात्र समाजमनात त्याकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दिसून येतो. त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे आणि ते आपण सर्वांनी मिळूनच करायचे आहे. भविष्यात नवनवीन प्रभावी औषधांनी HIVचे समूळ उच्चाटनही कदाचित होऊ शकेल. पण, त्याचबरोबर समाजमनातील ‘विषाणू’ही नष्ट व्हायला हवा.

‘HIV आणि एड्स’ हा खरोखर एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. त्याची सखोल माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. या विषाणूचा मूलभूत शोध आणि संबंधित संशोधकांचे योगदान एवढीच या लेखाची व्याप्ती आहे. २००८च्या या नोबेलविजेत्या द्वयीस अभिवादन करून हा लेख पुरा करतो.
*************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रक्तदाता जर पॉझिटिव्ह आहे पण विंडो पिरीयड मध्ये आहे >>

या वाक्यातच गडबड आहे ! विंडो पिरीयडचा अर्थच त्या व्यक्तीची टेस्ट निगेटिव्ह असते, जरी त्याच्यात विषाणूचा शिरकाव झालेला असला तरी.
या काळात ती रोगप्रसारक जरूर असते.

रक्तदान कार्यक्रम जोरात चालू आहे. व वेळेला रक्त भरणे जीवनावश्यक आहे. पण मग एड्स प्रसार या मार्गाने चालतच राहिल.

रक्त घेताना या गोष्टींच्या काही थोडक्यात चाचण्या असतात त्या रक्तावर करूनच रक्त द्यायला चालू करतात असे आठवते(पण चाचण्या अगदी पूर्ण लॅब अलायझा टेस्ट इतक्या खात्रीशीर नसतील.)
शिवाय रक्त पेशंट ला देतानाही चाचण्या करून देत असावे असं वाटतं.इथले डॉ लोक खुलासा करतील.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर असतं त्यांच्याकडे काहीतरी द्रव असतो.त्यात रक्ताचा थेंब टाकून तो बुडतो का नाही यावर हिमोग्लोबिन रक्त देण्यासाठी योग्य(>12) आहे का कळत असावं.hiv साठी चेक होतं का, किंवा घेऊन झाल्यावर साठवणी पूर्वी होतं का माहीत नाही.आयडीयली होत असलं पाहिजे.

धन्यवाद डॉक्टर.
प्लेटलेट डोनेट करताना कोणत्या तरी रॅपिड टेस्ट्स करतात त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?
त्या कितपत खात्रीशीर असू शकतात ते ही सांगू शकलात तर बरं होईल.

शशिराम व अनु,
HIV बाधित रक्तदाता पण विंडो पिरीयड मध्ये असलेला >>

या महत्वाच्या मुद्द्याचा आढावा:
हा धोका तसा असतोच. तो कमीतकमी करण्यासाठीचे उपाय असे:
१. HIV-निदानाच्या चाचण्या जेवढ्या प्रगत होत जातात, तेवढे निदान लवकर होते आणि हा ‘पिरीयड’ कमी होत जातो.

२. प्रगत देशातील रक्तपेढ्यांत यावर विशेष अभ्यास झालेला आहे. एखाद्या पेढीकडे वर्षातून जेवढ्या बाटल्या रक्त जमा होते त्याच्या +/- चाचण्यांचा अभ्यास केला जातो. त्यावरून ‘विंडो पिरीयडच्या धोक्याचा अंदाज’ काढला जातो. त्यासाठी संख्याशास्त्रीय सूत्रे वापरली जातात. मग हा धोका असा वर्तवला जातो : ५०,००० बाटल्यामागे १ किंवा एक लाख बाटल्यामागे १, इ. जितका हा धोका कमी तितका त्या रक्तपेढीचा दर्जा उच्च ठरतो.

३. अप्रगत देशांत काही पेढ्यांत दात्यांचे निकष काटेकोर न पाळता व्यवहार चालतात असे ऐकिवात आहे. ते अर्थातच अयोग्य आहे.

दक्षिणा,
एका एच आय व्ही संबंधित काम करणार्‍या संस्थांच्या कार्यक्रमात अशी माहिती मिळाली की आता अशा काही टेस्ट्स आहेत जिथे ही बाधा लगेच कळते. >>>>

आता या ‘लगेच’ शब्दाचा खुलासा:

HIVची बाधा लवकरात लवकर कळण्यासाठी सध्या ३ पातळीवरील चाचण्या आहेत:
१. Nucleic acid test (NAT) : याने संसर्गानंतर १० ते ३३ दिवसात बाधा कळू शकते. पण, जरी ही निगेटिव्ह आली तरी निर्धास्त होता येत नाही. काही दिवसांत पुन्हा करतात.
२. Antigen / antibody test : ही शिरेतून रक्त घेऊन प्रयोगशाळेत करतात. यातून १८ ते ४५ दिवसांत बाधा कळू शकते.

३. Antibody tests : रक्त घेऊन या जर प्रयोगशाळेत केल्या तर यातून २३ ते ९० दिवसांत बाधा कळू शकते.

• ‘झटपट’ किंवा घरी करण्याजोग्या चाचण्यांपेक्षा प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्या लवकर निदानासाठी कधीही योग्यच.

डॉक्टर, खूप छान माहिती मिळाली. तुम्हाला खूप प्रश्न विचारले गेले आहेत. आता मला फक्त अजून एकच प्रश्न विचारण्याची अनुमती द्यावी.
मागच्या महिन्यात इंग्लीश पेपरात बातमी वाचली की जगात एड्सचे दोन पेशंट आता पूर्ण बरे झाले आहेत. यातील तथ्य किती ते सांगणार का?

@ साद,
एड्स ‘बरा’ (cure) होणे >>>>>>

चांगला मुद्दा. ज्या दोन रुग्णांचा बातमीत उल्लेख होता त्यांची माहिती देतो. दोघांना खास टोपणनावे दिलीत.

१. ‘बर्लिन’ रुग्ण: याची लक्षणे नाहीशी झाल्याने २००६ पासून त्याची HIV-विरोधी औषधे बंद केलेली आहेत.
२. ‘लंडन’ रुग्ण: याची ती औषधे २०१७ पासून बंद आहेत.

वैद्यकीय परिषदांत त्या दोघांवर चर्चा झाल्या आहेत. आता हा आजार “बरा” झाला म्हणजे नेमके काय ते बघू. दोन मुद्दे असतात:
१. रुग्णाची सर्व संबंधित लक्षणे नाहीशी झाली, औषधे बंद केल्यावरही तब्बेत चांगली आहे. याला ‘functional’ बरे होणे असे म्हणतात.
२. रुग्णाचे शरीर आता संपूर्णपणे “विषाणूशून्य” झाले आहे. याला म्हणायचे ‘अंतिम बरे’ होणे.

...... पहिल्या मुद्द्यावर सर्व तज्ञांचे एकमत आहे. पण, दुसऱ्याबाबत मात्र मतभेद आहेत !

धन्यवाद, डॉ. कुमार
म्हणजे विषाणू मुक्त अवस्था ही युटोपिया आहे असे दिसते.

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

> ५. म्हणजेच या कालावधीची रेंज १० दिवस ते ३ महिने ही आहे. >

> होय ! विषाणूचा शरीरात प्रवेश ते रुग्णास लक्षणे दिसणे हा कालावधी तब्बल ८ - १० वर्षे असतो. >

या दोन वाक्यांमुळे मी गोंधळलेय. विषाणू शरीरात १० वर्ष सुप्तावस्थेत राहणार, मग कधीतरी त्याची लक्षण दिसू लागणार, मग ३ महिन्यांनी टेस्ट पॉझिटिव्ह येणार??
मगतर लग्नापूर्वी एड्स टेस्ट करून घेण्यात फारकाही अर्थ वाटत नाही.
===

> मात्र समाजमनात त्याकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दिसून येतो. त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे आणि ते आपण सर्वांनी मिळूनच करायचे आहे. भविष्यात नवनवीन प्रभावी औषधांनी HIVचे समूळ उच्चाटनही कदाचित होऊ शकेल. पण, त्याचबरोबर समाजमनातील ‘विषाणू’ही नष्ट व्हायला हवा. > मल्टिपल सेक्स पार्टनर असणाऱ्याकडे समाज नेहमी कपाळाला आठ्या घालूनच बघतो. जेलसी असावी....


अ‍ॅमी,

तुमचा गोंधळ दूर करतो. आधी लेखातील हा मजकूर बघा:

** हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.***

आता एक उदा. घेऊन सांगतो.
१. समजा आज एकाचा संपर्क HIV- दूषित रक्त /द्राव वगैरेशी आला.
२. म्हणजे त्याला संसर्ग झाला आहे.

३. यानंतर दीड महिन्याने आपण चाचणी केली व ती positive आली.
४. याचा अर्थ एवढाच की त्याचा संसर्ग (इन्फेक्शन) सिद्ध झाला.

५. आता तो विषाणू त्याच्या शरीरात अनेक वर्षे राहील, फोफावेल... मात्र, त्याला एड्स होईलच असे नाही. ते विषाणू किती फोफावतो यावर ठरेल.
६. म्हणजेच चाचणीचा निष्कर्ष आपल्याला एवढेच सांगतो की एखाद्यास बाधा झाली आहे की नाही.

बहुतेक रुग्णांच्या प्रतिकारक्षमतेवर विषाणू फोफावणे अवलंबून असावे. आश्र्चर्य असे की माझ्या पाहण्यात आले आहे की एड्स ने मेलेल्या पुरूषांच्या बायका अनेक वर्षे धडधाकट आहेत. याचे कारण काही लोकांनी सांगितले की बाईला पाळी येते तेव्हा विषाणू बाहेर पडतात.
एड्स आजार जेव्हा माहिती झाला तेव्हा अनैतिक संबंध ठेवणाऱ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी देवानेच याला निर्माण केले आहे असे माझे मत झाले होते. पण जेव्हा निर्दोष लोकांना रक्त, इंजेक्शन मुळे सुध्दा लागण होते हे समजल्यावर मत बदलले.

HIV/ एड्स बद्दल कोणतीही शंका राहू नये म्हणून त्याची मार्गक्रमणा सांगतो.

• शून्य दिवस : संसर्ग झाला.
• आठवडा २ ते ९ : विषाणूचे बीजारोपण, फोफावण्यास सुरवात

• पुढची ८ वर्षे : विषाणूचे फोफावणे पण रुग्णास लक्षणे नाहीत (latency)
• पुढे : विविध जन्तुसंसर्गाचे आजार दिसणे, इतर त्रास

• पुढे: विना उपचार राहिल्यास मृत्यू.

>> ता तो विषाणू त्याच्या शरीरात अनेक वर्षे राहील, फोफावेल... मात्र, त्याला एड्स होईलच असे नाही. ते विषाणू किती फोफावतो यावर ठरेल. >> म्हणजे डॉक्टर एखाद्याला बाधा झाली जरी तरी त्याला एड्स होइलच असे नाही. असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
किंवा बाधा झाली तरी एड्स होण्याचा कालावधी हा सर्वांच्याच बाबतील समान असेल असे नाही बरोबर ना?

Amy
मग ३ महिन्यांनी टेस्ट पॉझिटिव्ह येणार??
मगतर लग्नापूर्वी एड्स टेस्ट करून घेण्यात फारकाही अर्थ वाटत नाही.>>>>
डायबेटीस चे पेशनट्स रँडम शुगर चेक करतात तितकाच याचा उपयोग.

टेस्ट ची विश्वासार्हता वाढायला हवी असेल तर
टेस्ट करून मग 3 महिन्यासाठी दोघांना क्लोज मोनिटरिंग खाली ठेऊन, खरे तर खोलीत बंद ठेऊन, 3 महिन्यानंतर परत टेस्ट करायची ती नेगेटीव्ह आली तर संक्रमण झाले नाही आहे असे म्हणता येईल (ते पण छातीठोकपणे नाही)

दक्षिणा,
होय, पुन्हा हे बघा:

** हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.***

सिम्बा,

तसं नाही. मी समजत होते
संसर्ग झाला -> सुप्तावस्था १० वर्ष (या काळात टेस्ट निगेटिव येणार) -> मग लक्षण दिसणार -> आणि मग ३ महिन्यांनी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येणार.
∆ संसर्ग झालेला असूनही टेस्ट ऋण येण्याचा काळ १० वर्ष असा फार मोठा समजत होते मी. म्हणून लिहलं कि 'मगतर लग्नापूर्वी एड्स टेस्ट करून घेण्यात फारकाही अर्थ वाटत नाही.'

खरंतर तर असं आहे
संसर्ग झाला -> तीन महिन्यांनी टेस्ट पॉझिटिव्ह येणार -> १० वर्ष काही त्रास नाही -> एड्सची लक्षण दिसू लागतात.
∆ संसर्ग झाल्यानंतर टेस्ट ऋण येण्याचा काळ ३ महिने म्हणजे फारच कमी आहे.
===

तुम्ही म्हणताय तेदेखील बरोबर आहे. एकदा टेस्ट करून मग परत ३ महिन्यांनी टेस्ट करायला हवी. पण 'दोघांना क्लोज मोनिटरिंग खाली ठेऊन, खरे तर खोलीत बंद ठेऊन' हे मार्ग जवळपास अशक्य आहेत Lol
===

माबोवरच एक धागा वाचलेला

नवर्याला एड्स झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
मग बायको काही वर्ष एकटीच होती.
मग शेजारच्या मुलाशी तिचे सूत जुळले.
एड्सची टेस्ट करून घेतली जी ऋण आली आणि दोघांनी लग्न केले.
लग्नानंतर एक वर्षाने प्रेग्नन्ट असताना बायकोला एड्स डिटेक्ट झाला.
आधीच्या लग्नातून ५ वर्षाचा मुलगा होता.
आता काय परिस्थिती आहे माहित नाही.
तेव्हा जामोप्या आणि अश्विनीके यांनी धागाकर्तीला (दुसऱ्या नवऱ्याची बहीण) मदत केली होती.

अच्छा ! म्हणजे सध्या एच आय व्ही ची बाधा झाल्यावर जे औषधोपचार करतात ते ही विषाणूंची संख्या आटोक्यात रहावी म्हणूनच का?

तुम्ही खूप छान माहिती सांगताय डॉक्टर.

सर्व नवीन वाचकांचे आभार.

सरतेशेवटी ‘विवाहपूर्व HIV-चाचणी’ या प्रश्नाचा आढावा घेतो. काही देशांत अशा चाचणीची सक्ती आहे तर बऱ्याच देशांत ती स्वेच्छेने करावी असे मत आहे. सक्तीबाबतचे काही रोचक मुद्दे असे:

• सक्तीच्या चाचणीच्या पुरस्कर्त्यांचे मुद्दे असे:

१. जे लोक +ve येतात त्यांनी –ve शी लग्न न केल्याने रोग ‘ठराविक’ लोकांत मर्यादित राहतो.
२. लग्नापूर्वी ( एका अर्थाने कधीच) असुरक्षित संबंध ठेवू नयेत असा सामाजिक संदेश त्यातून जातो.
३. म्हणजेच एकूण समाजात रोगप्रसार रोखला जातो.

• याउलट सक्तीच्या चाचणीच्या विरोधकांचे मुद्दे असे:

१. चाचणीचे निष्कर्ष जाहीर झाल्याने ‘त्या’ व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते.
२. दोघांचीही चाचणी –ve आल्यास त्यांना ‘निरोगी’ असल्याचे खोटे समाधान मिळते. इथे ‘विंडो’ चा मुद्दा येतोच.

३. +ve लोकांचा सामाजिक कलंक ठळक होतो. त्यांना नोकरी मिळणे वगैरेतही त्रास होतो. पुन्हा असे लोक बेकायदा विवाह-दाखला मिळवणे असले उद्योग करू शकतात.

..... एकूण हा वादाचा मुद्दा झाला आहे.

Pages