Submitted by रामकुमार on 24 March, 2019 - 09:28
समजावणे जनांचे कळते मला न काही
सरणात जाणत्यांचे कळते मला न काही !
दिवसाच भीत जातो, बघतो इथे-तिथे मी
निद्रिस्त श्वापदांचे कळते मला न काही !
बहुतेक 'मीच बहिरा' हा दोष सत्य आहे
हळुवार भावनांचे कळते मला न काही !
पाऊस, वादळाचे भाकीत काय सांगू ?
ग्रह-गोल, तारकांचे कळते मला न काही !
ऐकून हासतो मी मधु बोल बाहुल्यांचे
खोटे-खरे तयांचे कळते मला न काही !
बिंदूमध्येच सिंधू ? धारेत तीर्थ अथवा ?
हे गूढ आसवांचे कळते मला न काही !
न कळे मला 'कसा मी इतका बधीर झालो ?'
की दुःख वेदनांचे कळते मला न काही !
निघता हळूच खपली, वाहे अजून थोडे,
कवितेत अक्षरांचे कळते मला न काही !
- रामकुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा