चिमुटभर पेर संवादात साखर... फार नाही !

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 March, 2019 - 01:11

जरा जखमेवरी ह्या घाल फुंकर... फार नाही !
तुझ्या-माझ्यात जे पडलेय अंतर... फार नाही

क्षणांचे तास झाले आणि तासांचीच वर्षे
तुझ्या विरहामधे झाले युगांतर ...फार नाही ?

अबोल्यावर कशाला फोडणी ही टोमण्यांची ?
चिमुटभर पेर संवादात साखर... फार नाही !

कुणावाचून कोणाचे कुठे अडतेय येथे ?
क्षणांमध्ये बदलतो काळ, अवसर फार नाही

तुझ्या चिंतेत ती गढली, अकाली पोक्त झाली
तिला बालीश म्हणणे हे तुझे वर...फार नाही ?

तुझ्या चांगुलपणाबद्दल नव्याने काय बोलू ?
मलाही दे जरासा वाटला तर...फार नाही !

कधी माहेर तर सासर, तुझी चालूच मरमर !
जगुन घे ना स्वतःसाठी घडीभर ... फार नाही !

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar

वाह, सुंदरच !

तुझ्या चांगुलपणाबद्दल नव्याने काय बोलू ?
मलाही दे जरासा वाटला तर...फार नाही !

एकदम भारी !

सुप्रिया -

फार सुंदर गझल
आहे आपली ,
आवडली !

( इथे माबोवर कविता आणि गझल यांना तुलनेने प्रतिसाद कमी दिला जातो .
असे का ? विशेषतः त्यासाठी वेगळे विभाग असतानाही . सदस्यांनी कृपया व्यक्त व्हावे )