पुस्तक परिचय - राम गणेश गडकरी यांच्या आठवणी

Submitted by प्राचीन on 13 March, 2019 - 04:58

राम गणेश गडकरीयांच्या आठवणी - प्र.सी.गडकरी
ठाण्यामधील गडकरी रंगायतनामध्ये नाटकाचे प्रयोग बघायला जाण्यापलीकडे माझा राम गणेश गडकरी यांच्याशी काहीही संबंध आला नव्हता. शाळेत गोविंदाग्रजांच्या कविता आणि विसरभोळा गोकूळ हे पात्र, यांच्या संदर्भात गडकरींची जरा अधिक ओळख होऊ लागली. तरी त्यांना महाराष्ट्राचे शेक्सपिअर म्हणतात, वगैरे गोष्टी फारशा लक्षात आल्या नव्हत्या. म.भा.दि.२०१९ च्या तीन कालविशेष योगायोगांचे जे मानकरी आहेत, त्यांत गडकरीची पुण्यशताब्दी हा विषय समोर आला. अर्थात नाटक एकच प्याला एवढीच त्यांच्या प्रतिभेची बाजू नव्हती, हे ठळकपणे लक्षात आले. कारुण्य, सौंदर्यदृष्टी, शब्दांवरील प्रेम आणि तितक्याच ताकदीने विनोदाची निर्मिती (जे फार अवघड असतं) करण्याची गडकरींची प्रतिभा मला – त्यांचं संपूर्ण वाड़्मय - नुसती नावं नजरेखालून जरी घातलं तरी – थक्क करून गेली!
त्यानिमित्ताने प्र.सी.गडकरी यांनी लिहिलेल्या गडकरींच्या अनौपचारिक, रंजक अशा आठवणी वाचनात आल्या. त्यांतील तपशीलांमुळे गडकर्‍यांचे एक स्वभावचित्र मनासमोर उभे राहिले, ते मांडण्याचा व त्याअनुषंगाने पुस्तकाची ओळख करूने देण्याचा हा प्रयत्न ..
गडकरी यांचा नवसारी येथे सन १८८५ मधील जन्म. त्यांचे शिक्षण काही काळ गुजराथी मध्ये झाल्याने गुजराथी भाषेवर त्यांचे प्रभुत्त्व होते. गुजराथी पुस्तक सरस्वतीचंद्र हे गडकरींच्या अत्यंत आवडीचे असून ते वाचता येण्यासाठी तरी गुजराथी शिकावी असे त्यांचे म्हणणे. ते ह्या पुस्तकाची अनेकानेक पारायणे करीत. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी गर्वहरण नावाचे नाटक लिहून लेखनास सुरुवात केली असावी, हे प्रस्तुत आठवणींवरून दिसून येते. घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे ते फर्ग्युसन कॉलेजातील शिक्षण अर्धवट सोडून किर्लोस्कर नाटक मंडळीत शिक्षक म्हणून रुजू झाले. तरीही पदवीधर होण्याच्या तीव्र इच्छेपोटी पुढे त्यांनी परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले. कार्यबाहुल्यामुळे भाषाविषयाव्यतिरिक्त गणित व इतिहास यांचा अभ्यास त्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी केला होता, हे विशेष!
गडकरींचे वैविध्यपूर्ण वाड़्मय पाहिले की, अत्यंत तीक्ष्ण बुद्धी व लालित्यपूर्ण प्रतिभा यांबरोबरच विनोदाची उत्तम जाण हा विशेष योग लक्षात येतो. वेगवेगळ्या घटनांमध्ये, माणसांच्या भेटींमध्ये व प्रवासात असताना त्यांची निरीक्षणशक्ती सतत कार्यरत असे; सोबतच्या वहीत तत्क्षणी वस्तुस्थिती व कल्पना शब्दबद्ध केल्या जात. अंत:करणग्राहित्व (आपल्या भाषेत एक्स रे सारखं) हा त्यांच्या प्रतिभेचा खास गुण असल्याने प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव इ. नाटकांतील प्रसिद्ध परस्परविरोधी झटा असलेल्या व्यक्तिरेखांचा जन्म अशाच चिंतनातून झाला असावा असे म्हणायला हरकत नाही !
गडकर्‍यांच्या बुद्धिमत्तेच्या आविष्काराचे लहान मुले वा विद्यार्थी यांना जसे आकर्षण असे, तद्वत गडकरींनाही त्यांचा सहवास प्रिय असे. आपल्या जीवनातील व्यतिरेक, विसंगती यांवर मार्मिकपणे विनोदाने बोट ठेवणारी त्यांची वृत्ती – टीका स्वीकारतानादेखील या खिलाडू भूमिकेपासून ढळत नसे. समाजाच्या मनोवृत्ती व आचारांमध्ये प्रत्येक दशकानंतर बदल होणे अपरिहार्य आहे, हे मनाशी पक्के ठरवले असल्याने, त्यांच्या साहित्यातील पुनर्विवाहासारख्या कल्पनांना तत्कालीन वर्तमानपत्रांमधून जो विरोध होत असे, त्याकडे ते अविचलपणे पाहू शकत.
लेखन,वाचन ,इ. साहित्योपासनेत खंड पडू नये, यासाठी काही वेळा त्यांना तर्‍हेवाईकपणे वागावे लागे. आपल्या समकालीन लेखककवींबद्दल गडकरी आदरभावाने वागत. परंतु कालिदासावर त्यांचे उत्कट प्रेम होते, तेही शाकुंतलावर विशेष ! महाभारतामधील कथाभागाला कालिदासाच्या प्रतिभाशक्तीमुळे जे अपूर्वत्व व मांगल्य लाभले आहे, त्यावर बोलताना गडकरी गुंगून जात.
एकच प्याला मधील ज्या सुधाकराची व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली, ती उभी करण्यापूर्वी कितीतरी दिवस संध्याकाळी दारूच्या गुत्त्यासमोर उभे राहून दारुड्यांच्या विचित्र वर्तनाचे निरीक्षण ते करीत असत. त्यांच्या ह्या सत्यनिष्ठ प्रतिभेपेक्षाही मला व्यक्तिश: ह्या प्रसंगी त्यांच्या दृढ, स्वच्छ चारित्र्याचे कौतुक वाटते. साहित्यसेवेपुढे कुठलेही ऐहिक आकर्षणास बळी न पडणे हे त्यांचे नैतिक धैर्य स्पृहणीय आहे.
एकदा कोल्हापूर येथे सरकारवाड्यात होऊ घातलेल्या विवाहानिमित्ताने एका वैदिक ब्राह्मणाने (संभाव्य आर्थिक लाभाच्या आशेने), गडकर्‍यांना एक कविता करून देण्याची विनंती केली. त्यास गडकरींनी मंगलाष्टकांच्या धरतीवर चार श्लोक रचून दिले. पुढे त्यातील काव्यगुण महाराजांच्या लक्षात आल्याने अधिक शोध करताच गडकरींचे नाव महाराजांपर्यंत पोहोचले. त्यायोगे गडक र्‍यांचा गौरव (शब्द व अर्थ दोन्ही साधनांनी) झाला.
नंतर काही दिवसांनी महाराजांनी गडकर्‍याना विशिष्ट वेळी भेटावयास बोलावले. मात्र राजसंन्यास नाटकाचा प्रवेश लिहिण्यात त्यांना याचे स्मरण राहिले नाही! त्यांची तल्लीनता व प्रतिभा यांनी त्यांना व्यावहारिक मोठेपणापुढे मिंधे होऊ दिले नाही ! बरं, विस्मरण हा काही त्यांचा स्वभावविशेष नव्हता. कारण त्यांनी एकदा पुण्यप्रभाव नाटकाची ४०-५० पानांची हस्तलिखिते कंपनीकडून गहाळ झाल्याने, वेळेच्या मर्यादेमुळे त्वरित सर्वच्या सर्व प्रवेश तोंडी सांगून लिहवून घेतला. नंतर काही दिवसांनी जेव्हा कंपनीस मूळ प्रवेशाचे चोपडे सापडले, तेव्हा नवल म्हणजे दोन्ही लिखाणांत काहीही फरक आढळला नाही !
अशा अनेक गंमतीशीर गोष्टी ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. हे ढवळे प्रकाशनाचे पुस्तक असून मी वाचलेली डिजिटल आवृत्ती आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
प्र सी, रा गं चे कोण?

भरत, पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे प्रभाकर सीताराम गडकरी हे जवळचे आप्त होते. विद्यार्थीदशेत गडकरींकडे राहत होते