तरही गझल. मतल्यातील सानी मिसरा गझलकार आदरणीय भूषण कटककर (बेफिकीर) यांचा.
काबिज केलेल्या शिखरांशी नाते जोडत नाही
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही
शॉवरखाली बसून गुणगुणणार्या श्रीमंतांना
पाण्याच्या टंचाईची झळ कधी जाणवत नाही
सखीविना निमिराशी नाते जोडू बघता कळले
तेल संपले तरी स्मृतींची ज्योत मालवत नाही
पाप्यांची जी पाप धूतसे तिला प्रदूषित केले
नवीन गंगा पुन्हा द्यावया देव धजावत नाही
सदनिकेतुनी मोरू परतुन झोपडीत का आला?
एकएकटे जगण्या इतकी अवघड कसरत नाही
वेगवेगळी व्रत-वैकल्ये आणि कहाण्या त्यांच्या
तर्कावरती एक त्यातले कधीच उतरत नाही
जनक्षोभ हे कारण असते मोडतोड करण्याला
काच स्वतःच्या खिडक्यांची का कुणीच फोडत नाही?
का सांगावे कौतुक पृथ्वीचे वरच्या तार्यांना?
तुटून पडतो, स्वतः धरेवर तारा उतरत नाही
तुझ्या मनी "निशिकांत" केवढे आक्रंदन दडलेले!
आनंदी मुखवट्यात जगतो, गाली झिरपत नाही
नाशिक येथे ०६.०२. २०१९ रोजी झालेल्या कव्य संमेलनात वाचलेली गझल.
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
का सांगावे कौतुक पृथ्वीचे
का सांगावे कौतुक पृथ्वीचे वरच्या तार्यांना?
तुटून पडतो, स्वतः धरेवर तारा उतरत नाही
सगळेच शेर सुंदर!