नमस्कार,
मायबोलीकरांनी मिळून सामाजिक उपक्रम सुरु करुन ९ वर्षे झाली. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष. गेली ९ वर्षे मायबोलीकरांनी व मायबोलीकर नसलेल्या दात्यांनी देखील या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. मायबोलीकरांनी सढळ हातांनी दिलेल्या देणग्यांमुळे सामाजिक उपक्रमाद्वारे अनेक गरजू संस्थांना मदत करणे शक्य झाले.
कायम चांगल्या संस्था निवडणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या गरजा, देणग्यांचा मेळ बसविणे, सर्व देणगीदारांना पावत्या वेळेवर मिळणे ही सर्व स्वयंसेवकांची महत्वाची कामे यात केली जातात.
हा उपक्रम असाच किंबहुना यापेक्षा चांगल्या पद्धतीने राबवता यावा यासाठी, आम्ही यंदा दशकपूर्तीनिमित्त सर्व मायबोलीकरांना, देणगीदारांना उपक्रमाचे मूल्यमापन करण्याची विनंती करत आहोत.
आम्हांला खालील गोष्टींवर सर्व मायबोलीकरांचे, देणगीदारांचे अभिप्राय/स/सुचना हव्या आहेत.
१. सामाजिक उपक्रम वापरत असलेली पद्धत (स्वयंसेवकांना देणगी रक्कम कळविणे, त्यांनी संस्थेचे अकांउट डिटेल्स पाठविणे, देणगीदारांनी देणगी दिल्यावर स्वयंसेवकांना कळविणे, स्वयंसेवकांनी देणगीदारांना पावती पाठविणे) ही फार किचकट वाटते का? या प्रक्रियेत काही सुधारणा हव्या आहेत असे वाटते का?
२. निवडलेल्या संस्था, त्यांचे कार्य, भौगोलिक स्थान यात काही सुधारणा गरजेच्या आहेत का?
३. उपक्रमाच्या धाग्यावर दिली जाणारी संस्थांची माहिती पुरेशी असते का?
४. तुम्ही देणगी दिल्यापासून ते तुम्हाला पावती मिळेपर्यंत सर्व कामांचा समन्वय व्यवस्थित होतो का?
५. आढावा धाग्यावर दिली जाणारी माहिती, पावत्या, फोटो यामध्ये काही सुधारणा हवी आहे का?
६. वरील मुद्द्यांव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा अपेक्षित आहे?
यंदा संस्था निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने त्यादृष्टीने आलेल्या सूचनांचा पुढील वर्षी अंतर्भाव करण्याचा जरुर प्रयत्न राहील.
प्रत्येकच सूचनेचा आदर जरी असला तरी काही सूचना तात्काळ अंमलात आणणे शक्य असेलच असे नाही. शक्य असतील त्या सूचना जरुर अंमलात आणल्या जातील व काही सूचनांवर चर्चा करुन त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावरही नक्कीच स्वयंसेवकांमध्ये चर्चा होईल. एखादी सूचना तात्काळ अंमलात आणली गेली नाही तरी तो कृपया आपला अनादर समजू नये ही विनंती.
काही कामात कधीकधी संस्थांशी पाठपुरावा करून ते काम पुर्ण करण्यात दिरंगाई होते पण तरी ते पुर्ण होईल हे पाहिले जाते. बरेचदा याचे कारण संस्था स्वतःच्या व्यापात इतकी व्यस्त असते की त्यांना आम्हाला लगेच संपर्क करणे शक्य होत नाही. तसे झाल्यास कृपया माफ करावे.
सामाजिक उपक्रमाशी निगडित असलेल्या सर्व मायबोलीकरांनी, देणगीदारांनी, हितचिंतकांनी वरील सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्यास आम्हांला हा उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्यास मदत होईल.
आपला कृपाभिलाषी,
सामाजिक उपक्रम चमू
(लेखन - अतरंगी)
मी गेल्यावर्षी पहिल्यांदाच
मी गेल्यावर्षी पहिल्यांदाच या उपक्रमात देणगी सहभाग घेतला. मला १ ते ६ मधली प्रत्येक गोष्ट समाधानकारक वाटली.
उलट ज्या संस्थांबद्दल कधी कळलं नसतं, कधी त्यांच्यापर्यंत पोचता आलं नसतं, त्यांच्यापर्यंत पोचता आलं नसतपो, अशांना उपक्रमामुळे मदतीचा लहानसा हात पोचवता आला याबद्दल स्वयंसेवकांचे मनापासून आभार.
मायबोलीकरामंकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्या संस्थांच्या कामात आपल्या सहभागामुळे कितपत फरक पडला, याबद्दल स्वयंसेवक संस्था यांचं मनोगत जाणून घ्यायला आवडेल.
सध्या जी पद्धत चालू आहे ती
सध्या जी पद्धत चालू आहे ती योग्य वाटते, आणि स्वयंसेवकांचे काम तर एकदम चोख असते. निवडलेल्या संस्थाही जास्त माहीत नसलेल्या पण गरजू, जिथे आपल्या मदतीचा योग्य विनियोग होईल अशाच असतात.
खूप खूप धन्यवाद सामाजिक उपक्रम स्वयंसेवक टीम !!!!!!
ह्या देणगी देण्याबाबत आणि
ह्या देणगी देण्याबाबत आणि संस्थांबाबत कुठे माहिती मिळेल.... ?
सामाजिक उपक्रम चमूचं काम
सामाजिक उपक्रम चमूचं काम उत्तम आणि सातत्य राखून चालू आहे. सर्वकाही समाधानकारक. अख्ख्या teamचे खरोखर कौतुक.
आपण एखाद्या संस्थेला वस्तू रुपानेही सहकार्य करतो जसे की आपण मुलींच्या अंधशाळेला सॅनिटरी नॅपकिन देत होतो. तसंच सद्ध्या ज्या संस्थांना सहकार्य केले जातेय तिथल्याच कुणाला मोठा आजार असेल व त्याच्या उपचारांचा/उपचारांसाठी नेण्या आणण्याच्या खर्चाचा भार त्या संस्थेवर असेल तर त्यातही आपण जमा झालेल्या पैश्यांतून आपल्या परीने वाटा उचलू शकू.
भरत, प्राजक्ता, निरु आणि
भरत, प्राजक्ता, निरु आणि अश्विनी मनापासून धन्यवाद. तुमच्या सुचना नोट करुन ठेवल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर नंतर लिहीलच स्वयंसेवक चमूपैकी कोणीतरी.
@निरु, या ध्यासपंथी गृपच्या पाऊलखुणा जर बघितल्यात तर तुम्हाला आधीच्या वर्षीचे देणगी उपक्रम आणि आढावा वाचता येईल.
जमल्यास प्रतिसादात लिंक द्यायचा प्रयत्न करुच.
सध्या प्रवासात असल्याने फक्त तुमचे प्रतिसाद वाचले आहेत आणि त्यावर विचार सुरु आहे हे सांगायला हि पोस्ट करत आहे.
मी गेली काही वर्ष सहभागी
मी गेली काही वर्ष सहभागी होतेय आणि मी समाधानी आहे. स्वयंसेवक अगदी उत्तम रीतीने राबवतात आणि पूर्णत्वास नेतात, अत्यंत पारदर्शकता असते. कौतुक सर्व टीमचं. शुभेच्छा सर्वांना.
<<<<@निरु, या ध्यासपंथी
<<<<@निरु, या ध्यासपंथी गृपच्या पाऊलखुणा जर बघितल्यात तर तुम्हाला आधीच्या वर्षीचे देणगी उपक्रम आणि आढावा वाचता येईल.>>>>
कुठे...? कशा...?
कृपया लिंक द्या..
कुठे...? कशा...?
कुठे...? कशा...?
कृपया लिंक द्या..
Submitted by निरु on 9 February, 2019 - 15:51 >>>>>>>
वरच्या लेखाच्या खालीच त्याचा गृप / प्रकार दाखवणार्या शब्दखुणा आहेत. उदा. --
Groups audience:
ध्यासपंथी पाऊले
ध्यासपंथी पाऊले -- यावर क्लिक केले की सामाजिक उपक्रमांविषयीचे सर्व लेखन अनुक्रमणिका स्वरूपात दिसेल.
@ कारवी... मिळाले.. धन्स...
@ कारवी...
मिळाले.. धन्स...
आजकाल संस्थांना बर्याच
आजकाल संस्थांना बर्याच मदतीचा ओघ चालू असतो. अश्विनी म्हणते त्या प्रमाणे ज्यांना मदत मिळत नाही अशा एखाद्या पेशंटच्या खर्चाचा भार उचलणे किंवा एखाद्या गरीब होतकरू, हुषार विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे अशी कार्येही करता येतील.
जागू- प्राजक्ता आणि अश्विनी
जागू- प्राजक्ता आणि अश्विनी यांनी मांडलेल्या मुद्द्याबाबत...
सर्व संस्थांसोबत काम करताना अशा अनेक केसेस वाचनात येत असतात. अशा सर्व केसेसमध्ये एक मुद्दा येतो तो विश्वासार्हतेचा. कारण आजकाल सोशल मेडिया मधून असे अनेक फेक मेसेजेस पुढे ढकलले जातात. कधी कधी त्या रुग्णाची गरज संपली असेल तरी मेसेज फिरत राहतात. त्यामुळे आपण अशा केसेससाठी मदतीचे आवाहन करताना त्या केसेस परिचयातील असल्याशिवाय किंवा स्वतः जाऊन भेटून खात्री केल्याशिवाय मेसेज पुढे पाठवत नाही .
पुण्यातील रेड लाईट एरिया मध्ये काम करणार्या दोन महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि हॉस्टेलच्या फीसाठी पैसे उभे करणे, सोलापूरमधील स्त्रीच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी पैसे जमा करणे, नंतर एकदा माझ्याच परिचयातील ईलेक्ट्रीशीअनच्या पाच वर्षाच्या मुलाच्या हार्ट ट्रिटमेंट साठी पैसे जमा करणे, ही गेल्या तीन वर्षांतील पटकन आठवलेली उदाहरणे.
मदतीसाठी जी आवाहने येतात ती पडताळणीनंतर ईमेल, whatapp द्वारा जे देणगीदार आहेत त्यांना पाठवली जातात. सद्य स्थितीत आम्ही अशा प्रकारे प्रयत्न करत आहोत.
सामाजिक उपक्रमात आपण कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहारात भाग घेत नाही. उपक्रमातील संस्था असोत अथवा वरील प्रमाणे आलेली मदतीची आवाहने, आपण कायम पैसे थेट संस्थेच्या/ गरजूंच्या/ जिथे ट्रिटमेंट चालू आहे त्या हॉस्पिटलच्या खात्यात जाईल याची दक्षता घेतो.
त्यामुळे सामाजिक उपक्रमाचा स्वतःचा असा निधी नाही. सामाजिक उपक्रमातील पारदर्शकता जपण्याच्या उद्देशाने आपण स्वयंसेवकांच्या खात्यात पैसे घेणे किंवा सामाजिक उपक्रमाचे खाते उघडणे हे विचारपूर्वक टाळले आहे.
मायबोलीवर मदतीची हाक (https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/56) हा विभाग आहे. यापुढे आम्ही अशी मदतीची आवाहने तिथे वेगळा धागा उघडून त्याचीच लिंक सर्व देणगीदारांना पाठविण्याच्या विचारात आहोत.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार.
आपला कृपाभिलाषी,
सामाजिक उपक्रम चमू