सोडले घरटे पिलांनी अन् भरारी घेतली
माय जी आधार होती, ती बिचारी जाहली
जीवनी मागे न बघण्या शिकविले होते तिने
वाट बघताना पिलांची ती जिव्हारी स्त्रावली
ना कधी आईस पुसले ना पित्याचे ऐकले
"शिल्प माझे मी घडवले" ही फुशारी मारली
तीर्थक्षेत्री श्राध्द केले की मुलांना वाटते
माय मजला पोसल्याची मी उधारी फेडली
माय अडगळ वाटली, तिज धाडुनी वृध्दाश्रमी
मस्त संसारात अपुल्या, लाज सारी सोडली
मातृदेवोभव म्हणूनी दांभिकासम वागती
शुभ्र प्रतिमा दावण्याची ही हुशारी चांगली!
माय नसता जीवनाची काय वाताहात ही!
ऊन रखरख अन् हरवली भरदुपारी सावली
मुखवटा आहे खुशीचा ना मनःशांती तरी
वंचना अपुलीच करणे ही बिमारी वाढली
एकट्या वाल्यास जमले रामनामी रंगणे
मार्ग मोक्षाचा मिळाला वाटमारी सोडली
पाहता साक्षात मृत्त्यू, वाटले "निशिकांत"ला
हाय सुटलो! जीवनाची साठमारी संपली
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
सुंदर गज़ल.
सुंदर गज़ल.
तीर्थक्षेत्री श्राध्द केले की
तीर्थक्षेत्री श्राध्द केले की मुलांना वाटते
माय मजला पोसल्याची मी उधारी फेडली
पाहता साक्षात मृत्त्यू, वाटले "निशिकांत"ला
हाय सुटलो! जीवनाची साठमारी संपली
मस्तच!!