वाड्मंयचौर्य

Submitted by शरद on 28 January, 2019 - 01:40

गज़लकार इलाही जमादार यांच्या गज़लांनी प्रेरित होऊन मी मराठी गज़ल चे पहिले धडे गिरवले. अर्थातच इलाही माझे अतिशय जवळचे मित्र बनले व अजूनही (जरी आम्ही वर्ष-दोन वर्षातून एखाद्याच वेळी भेटत असलो तरी) आहेत.

इलाही यांचे पहिले पुस्तक 'जखमा अशा सुगंधी' छापून झाल्यावर त्यांनी मला भेट दिले होते. त्यातली एक गज़ल मला खूप आवडायची. तिचा मथळा होता:

'आकाशाला 'भास' म्हणालो, चुकले काहो?
धरतीला 'इतिहास' म्हणालो, चुकले का हो?

विशेषत: त्यातला एक शे'र वाचून मला नेहमी वाटायचे की इतक्या उच्च पातळीचे शे'र मला रचता आले पाहिजेत. तो शे'र असा:

'चौदा वर्षे पतिविना राहिली उर्मिला,
'हाच खरा वनवास', म्हणालो, चुकले का हो?'

सतत डोक्यात राहिल्याने या गज़लचे विडंबन माझ्या हातून रचून झाले. ते मी इलाही यांना त्यांच्या खोलीवर जाऊन दाखवले. त्यांनाही ते आवडले. ते खालील प्रमाणे होते:

बायकोस मी 'ताप' म्हणालो, चुकले का हो?
अन पोराला 'बाप' म्हणालो, चुकले का हो?

म्हटले कोणी, 'सत्य बोलुनी न्याय मिळाला',
'शंभर टक्के थाप' म्हणालो, चुकले का हो?

एकच धंदा, टोप्या घालत फिरतो आहे,
'दिसेल त्याला काप' म्हणालो, चुकले का हो?

कष्ट कशाला? देव उपाशी ठेवत नाही,
'मिळेल आपोआप' म्हणालो, चुकले का हो?

टी.व्ही. वर संगीत 'पाहतो' असे देखणे,
'झकास असते पॉप' म्हणालो, चुकले का हो?

'चुकले का हो?', 'चुकले का हो?' म्हणणार्‍यांना,
'सॉरी म्हणने पाप' म्हणालो, चुकले का हो?

गोड बोलुनी गळा कापती, 'शरद' तयांना,
'अस्तनीतले साप' म्हणालो, चुकले का हो?
..................................................................

कधी ते नक्की आठवत नाही, २००० - २००१ साल असेल.एकदा बेळगाव वरून इलाही यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण आले. त्यांनी मला सोबत येण्याविषयी विचारले. गज़ल मधील काहीतरी शिकायला मिळेल या आशेने मी होकार दिला. तिथल्या मंडळींनी दोन दिवस आमचे छान आदरातिथ्य केले. काही मित्र झाले. दोन दिवस खूप गज़ला - कविता ऐकल्या, ऐकवल्या. मजा आली. एका मित्राने ही हजल कार्यक्रमात सादर करण्याची परवानगी मागितली. माझ्यासारख्या नवीन कवीला असे कुणी विचारणे हाच मोठा सन्मान होता. मी आनंदाने होकार दिला आणि तो प्रसंग विसरून गेलो.

फेब्रुवारी २००४ मध्ये अमरावती इथे भीमराव पांचाळे यांच्या गज़ल सागर प्रतिष्ठान द्वारे गज़ल सम्मेलन आयोजित केले होते. त्यात माझ्या त्या 'मित्राने' ती रचना 'आपली' म्हणून सादर केली. लगेच मी भीमरावांना सांगितले आणि कार्यक्रम संपल्यावर त्या 'मित्राला' विचारले. तो म्हणाला, 'मे तुला परवानगी विचारली होती, आणि तू दिली होतीस.' मी हतबुद्ध झालो. त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की, 'रचना सादर करण्याची परवानगी दिली होती. त्यावर स्वामित्व गाजवण्याची नव्हे.' नंतर मी त्याला सांगितली की कृपया परत असे करू नको. त्यांनंतर मी ते सर्व विसरून गेलो.

आता इतका ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे परवा एका कार्यक्रमात तीच रचना (थोडे शब्द इकडचे तिकडे करून) माझ्या समोर, त्या 'मित्राच्या' नावाने सादर झाली. संयोजकांना विचारले तर त्यांनी सांगितले की त्या 'मित्राच्या' छापलेल्या पुस्तकातून रचना घेतली आहे. संयोजकंची काहीच चूक नव्हती. माझा इतिहास त्यांना ठाऊक असण्याचे काहीच कारण नव्हते. मी हताश खालो. मित्र म्हणवणारे लोक असे का वागतात हेच मला कळत नाही.

गज़ल सम्राट सुरेश भट म्हणायचे, 'गज़ल आता लिहिली जाते, छापली जाते; त्यामुळे 'मक्ता' या शब्दाला काही अर्थ उरलेला नाही. उगाचच गज़लमध्ये एक शब्द वाया जातो. याचा चांगलाच प्रत्यय आला.

माझ्याच दोन ओळी इथे लिहाव्याशा वाटतातः

'शब्द फिरवतो इकडे तिकडे, तसाच ठेवुन गाभा,
प्रतिभा 'त्यांची', त्यावर 'माझा', हक्क मिरवतो आहे,
डंका माझा सर्व दिशांना रोज वाजतो आहे!!"

माझ्या मूळ रचनेत आता आणखी चार द्वीपदींची भर पडून ती आता आणखी समृद्ध झाली आहे. त्या खालेल प्रमाणे:

' चौदा वर्षे शाळेमध्ये वाया गेली,
'बसलो पण चुपचाप' म्हणालो, चुकले का हो?

आमदार मी, 'मला कायदा दाखवण्याची,
काय कुणाची टाप' म्हणालो, चुकले का हो?

गेंड्याची कातडी असे ह्या सांगाड्यावर,
'शिव्या मिळो वा शाप' म्हणालो, चुकले का हो?

नोटाबंदी झाली बुडला काळा धंदा
'उडला का थरकाप', म्हणालो, 'चुकले का हो?"

'प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते' अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. या सर्व प्रकरणाचा फायदा म्हणजे आणखी एक सुंदर द्वीपदी तयार झाली:

वाड्मंय चोरी करणार्‍यांचे धैर्य पाहुनी,
'येतो मज संताप' म्हणालो, चुकले का हो?

कवी शरद पाटील

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता असे कवी, गजलकार म्हणवून घेणारे इतके मुर्दाड झालेत. कितीही वेळा चोरी पकडा, त्यांना काही फरक पडत नाही Sad

मॅडम, मुद्दाम मी नाव टाकले नाही; कारण ती व्यक्ती आता हयात नाही. तरीसुद्धा पोस्ट टाकली, वॉट्स अ‍ॅप / फेसबुकवर टाकले; कारण मला कुणी पुढे विचारू नये. तसेच इतरांनी काळजी घ्यावी.

<<< त्यांनी सांगितले की त्या 'मित्राच्या' छापलेल्या पुस्तकातून रचना घेतली आहे >>>
पुढील वेळी स्वतः:चे पुस्तक आधी छापा.

वाङ्मयचौर्य होणं फार संतापजनक आहे.>> +1
तुमची गजल छान आहे.

'चौदा वर्षे पतिविना राहिली उर्मिला,
'हाच खरा वनवास', म्हणालो, चुकले का हो?>>> वाह!