तरी एकटी ती तिच्या आतुनी

Submitted by निशिकांत on 25 January, 2019 - 01:07

घराला न घरपण तिला सोडुनी
तरी एकटी ती तिच्या आतुनी

जणू जन्मली कष्ट उपसायला
तिला गावले शुन्य जगण्यातुनी

नकोशी तरी घेतला जन्म अन्
तिने फुंकले शिंग रडण्यातुनी

किती मार्गदर्शन पिलांना तिचे !
स्वतः चालली प्रश्नचिन्हातुनी

उधारी जगाची म्हणे माय! पण
तिने भोगले दु:ख नगदीतुनी

तिने सातच्या आत यावे घरी
मुलांना मिळे सूट नियमातुनी

पिले खुश बघोनी मृतात्मा म्हणे
कुणाचे न अडले तिच्यावाचुनी

कसा अप्सरांशी प्रभो न्याय हा?
भरे पोट रंभा रिझवण्यातुनी

नको खोल जाऊस "निशिकांत" तू
तुझ्या तूच पडशील नजरेतुनी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users