यापूर्वीचे लेखः
१. गुलाबी त्रिकोणात कैद
२. इंद्रधनुष्यात किती रंग?
परवाच वाचनात आलेल्या २० जानेवारी २०१९च्या या बातमीनुसार अमेरिकन वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणार्या भावी डॉक्टर्सना आजच्या घडीलाही लैंगिक अल्पसंख्यांकांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल पुरेसं शिक्षण मिळत नाही.
आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे 'मी कोण' हे समजून घेण्याची घालमेल आणि आधार देण्याऐवजी दूर लोटणारी कौटुंबिक आणि सामाजिक परीस्थिती यांमुळे लैंगिक अल्पसंख्यांकांत मानसिक विकार, एड्ससारख्या शारीरिक आधीव्याधींचा प्रादुर्भाव, नोकरीव्यवसायांत भेदभाव, छळ (हरॅसमेन्ट), गरीबी अशा अनेक समस्या सामान्यांपेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक गंभीर असतात. असं असताना आजच्या काळातसुद्धा वैद्यकीय व्यावसायिकसुद्धा त्यांना मदत किंवा उपचार देऊ शकण्याइतके माहीतगार नसतील तर तुमच्याआमच्यात पुरेशा माहितीअभावी त्यांच्याबद्दल गैरसमज नांदल्यास नवल काय?
वारंवार कानांवर पडणार्या काही प्रचलित गैरसमजांबद्दल या भागात बोलू.
गैरसमज १: नैसर्गिकरीत्त्या सर्व प्राणिमात्रांत स्त्री आणि पुरुष हे दोनच प्रकार असतात. यापेक्षा काहीही निराळं असणं हे 'अनैसर्गिक' आहे.
याबद्दल आपण आधीच्या लेखात बोललो आहोत. लैंगिक अल्पसंख्यांकांचा कुठलाच प्रकार अनैसर्गिक नाही. ही सगळी नैसर्गिक व्हेरिएशन्स आहेत, हार्ड वायर्ड आहेत, अपरिवर्तनीय आहेत.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे किन्नर/हिजडे हाच एक प्रकार खरंतर बहुतेक वेळा नैसर्गिक वाढीत केल्या गेलेल्या मानवी ढवळाढवळीमुळे निर्माण होतो - आणि दुर्दैव असं की लैंगिक अल्पसंख्यांक म्हणताक्षणी बहुतेकांच्या डोळ्यांसमोर लोकल ट्रेनमध्ये टाळ्या पिटत भीक मागणारी व्यक्तीच येते!
ही नैसर्गिक व्हेरिएशन्स का आणि कशी होत असावीत याबाबत आत्तापर्यंतच्या संशोधनातून जे समजलं आहे त्याबद्दल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जेम्स ओ'कीफ, जे स्वत: एका होमोसेक्शुअल मुलाचे वडील आहेत, या टेडएक्स टॉकमध्ये बोलले आहेत. अतिशय माहितीपूर्ण आणि हृद्य भाषण आहे, अवश्य पहा.
या व्याख्यानातील माहितीचा गोषवारा असा सांगता येईलः
"वरवर विचार करता असं वाटतं की समलैंगिकता ही प्रजननक्षम नसल्यामुळे 'नॅचरल सेलेक्शन'च्या थिअरीनुसार केव्हाच विलुप्त (extinct) व्हायला हवी होती, पण ऐतिहासिक नोंदी लक्षात घेतल्या तर सर्व प्राणिमात्रांमध्ये आणि सर्व मानवी संस्कृतींमध्ये ती पूर्वापार चालत आली आहे असं दिसतं. त्याचं कारण ती प्राणिमात्रांच्या टिकावासाठी (survival) उलट आवश्यक आहे.
अनेक अभ्यासांच्या निष्कर्षानुसार समलिंगी व्यक्ती सहसा सरासरीहून अधिक बुद्धीमान असतात - विशेषत: भावनिकदृष्ट्या. (higher Intelligence Quotient and specially higher Emotional Intelligence Quotient). त्या सहसा अधिक सृजनशील असतात तसंच सहसंवेदना आणि सहकार (compassion and cooperation) यात सहसा त्या पुढे असतात आणि त्यांच्यात शत्रुत्वाची भावना (hostility) कमी प्रमाणात दिसून येते.
आपली गुणसूत्रं (genome) हे आपलं 'हार्डवेअर' असतं. कॉम्प्यूटर किंवा स्मार्ट डिव्हाइससारखे त्यात अनेक डीएनए प्रोग्रॅम्स डाउनलोड केलेले असतात. आई गर्भवती असताना तिच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार - म्हणजे त्या परिस्थितीत बाळाला शक्य तितक्या उत्तमप्रकारे जगता यावं आणि या बाळामुळे परिस्थितीत सकारात्मक भर पडावी या दोन्ही निकषांनुसार - बाळाच्या शरीरात त्यातले कुठले प्रोग्रॅम्स सक्रीय (activate) केले जातील हे ठरतं. याला 'एपिजेनेटिक्स' असं म्हणतात.
उदाहरणार्थ मधमाश्यांची कॉलनी तयार होतानाचं वातावरण पुरेसं अनुकूल नसेल तर अधिक सैनिक माश्यांची पैदास होते, आणि जर बाकी परिस्थिती अनुकूल असून अन्न मिळवता येण्याला प्राधान्यक्रम असेल तेव्हा कामकरी माश्यांची पैदास केली जाते. राणीमाशीच्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा तिच्या संततीत आपोआप तसे प्रोग्रॅम्स सक्रीय करते.
माणसातही काही कारणाने जर आई गर्भवती असताना तणावपूर्ण वातावरणात असेल, तर मूल समलैंगिक जन्माला येण्याची शक्यता वाढते. जणू निसर्ग तिला एक सहसंवेदनशील, प्रेमळ मित्र/मैत्रीण, सहकारी देऊ करतो.
तसंच मुलग्यांच्या बाबतीत त्यांच्या प्रत्येक मोठ्या भावागणिक ते समलैंगिक असण्याची शक्यता ३३%नी वाढते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची ही निसर्गाची एक युक्ती असते. आपण गर्भनिरोधकं शोधण्याच्या कितीतरी आधी निसर्गाला ही युक्ती सुचलेली होती."
गैरसमज २: मनुष्यप्राण्याला असलेल्या अतिरिक्त बुद्धीचे दुष्परिणाम आहेत हे सगळे! निसर्गात बाकी कुठेही असलं काही दिसत नाही.
येल सायंटिस्टमधील या लेखानुसार जवळपास ४५० प्रकारच्या प्राणिमात्रांत होमोसेक्शुअल वर्तणूक दिसून आलेली आहे.
या लेखानुसार होमोसेक्शुआलिटी दर्शवणार्या स्पीशीजची संख्या १५०० आहे.
हा नॅशनल जिओग्राफिकमध्ये आलेला लेखही या दाव्याला पुष्टी देतो.
मानवाव्यतिरिक्त इतर अनेक प्राण्यांत 'केवळ आनंदासाठी'सुद्धा शरीरसंबंध केले जातात आणि त्यात समलैंगिक संबंधांचाही समावेश असतो.
गैरसमज ३: 'आपल्या'कडे 'पूर्वी' असलं काही नव्हतं. ही सगळी पाश्चात्य खुळं आहेत.
ख्रिस्तपूर्व ६०० साली लिहिल्या गेलेल्या सुश्रुत संहितेत सर्वसामान्यांपेक्षा निराळं लैंगिक वर्तन/आवडीनिवडी असणार्यांचे तेव्हा माहीत असलेले कुंभिक, आसेक्य, इत्यादी प्रकार विशद केलेले आहेत.
कामसूत्रात समलिंगी संबंधांचं वर्णन आहे आणि असे संबंध भावनिक प्रेम आणि विश्वासावरच आधारित असतात असाही उल्लेख आहे.
मनु:स्मृतीत समलिंगी संबंधांनंतर शुद्ध कसं व्हावं याबद्दल सूचना आहेत आणि शिक्षाही सांगितल्या आहेत.
असेच उल्लेख अत्रिस्मृतीतदेखील आहेत.
खजुराहोसारख्या प्राचीन देवळांत समलिंगी, उभयलिंगी, तसंच गटाने केलेल्या शरीरसंबंधांची यासारखी चित्रं/शिल्पं आहेत.
महाभारतातील 'मुलगी म्हणून जन्माला आलेल्या पण मुलगा असलेल्या आणि मुलग्यासारखं वाढवलं गेलेल्या' शिखंडीची कथा आपण ऐकली आहे. पुढे एका यक्षाच्या साहाय्याने त्याने पुरुषाचं शरीर प्राप्त करून घेतलं असं वर्णन आहे, हे आपल्या ट्रान्सजेन्डर व्यक्तींच्या माहितीशी मिळतंजुळतं आहे.
महाभारतातच अर्जुनाने अज्ञातवासात बृहन्नडेचा (बृहत् + नरा/डा = 'मोठे शीश्न असलेली स्त्री' असा एक अर्थ वाचनात आला होता, पण आत्ता हाताशी संदर्भ नाही.) अवतार धारण केला होता. हे केवळ वेषांतर नव्हतं कारण आपली मुलगी या पिळदार पुरुषी दिसणार्या नृत्यशिक्षिकेच्या सुपूर्त करण्याआधी विराटाने दासींकरवी तिची शारीरिक 'चिकित्सा' करवून घेऊन आपली मुलगी सुरक्षित राहील याची खातरजमा करून घेतली होती असा उल्लेख आहे.
वरील उदाहरणांवरून लक्षात येईल की प्राचीन भारतात सर्वसामान्यांपेक्षा निराळी शारीरिक जडणघडण आणि/किंवा लैंगिक वर्तन हे समाजमान्य नसेलही, पण अस्तित्वात आणि ज्ञात होतं. तसंच त्यासाठी सांगितलेल्या शुद्धी / प्रायश्चित्तंही सामान्य होती.
अशा वर्तनाला 'गुन्हा' समजण्याची कल्पना आपल्याला दिली ब्रिटिशांनी! (आठवा कलम ३७७!)
या पार्श्वभूमीवर आता आपण ही पाश्चात्य खुळं आहेत असं म्हणणं म्हणजे किती विरोधाभास झाला!
गैरसमज ४: स्वतःला लैंगिक अल्पसंख्यांकांत गणणं हे एक फॅड आहे.
लैंगिक अल्पसंख्यांकांचे या चर्चेत आलेले प्रश्न आणि संघर्ष लक्षात घेतले तर 'फॅड' म्हणून यात सामील होणं किती अशक्य आणि आत्मघातकी असेल हे लक्षात येईल.
तरीही या अनुषंगाने एका ट्रान्सजेन्डर मुलाच्या वडिलांचा हा टेडएक्स टॉक पहावा असा आग्रह करेन. त्याचा थोडक्यात सारांश:
स्किप पार्डी आणि वेरॉनिका यांची उतारवयात झालेली मुलगी डेना हा ट्रान्सजेन्डर मुलगा असल्याचं त्याने बावीसाव्या वर्षी घरी सांगितलं. वडील जुन्या वळणाचे, कर्मठ कॅथलिक आणि लष्करातील निवृत्त अधिकारी! त्यांची काय प्रतिक्रिया असेल या कल्पनेने डेना घाबरलेला होता. पण आईवडिलांनी वस्तुस्थितीचा स्वीकार अगदी सहज केला. डेनाला घरी 'तो डेना' असं म्हणायला लागण्यापासून ट्रान्सजेन्डरीझमचा शक्य तितका अभ्यास करून त्याला सर्वार्थाने समजून घेण्यापर्यंत या दांपत्याने सर्वकाही केलं.
डेनाला लहानपणापासूनच आपण चुकीच्या शरीरात असल्याची जाणीव असावी असं आता त्यांना मागे वळून पाहताना लक्षात येतं, पाचवीत 'मोठेपणी कोण होणार' या प्रश्नाचं उतर त्याने 'मुलगा होणार' असं दिलं होतं! कायम बारीक केस कापणार्या आणि शर्टपॅन्ट घालणार्या सातवीतल्या डेनाला अजून स्वतःच्या लैंगिकतेबद्दल नीट समजलं नसलं तरी त्याच्या शाळेच्या विरुद्ध खेळणार्या बास्केटबॉल चमूच्या प्रशिक्षकांनी त्याला लॉकररूममध्ये नेऊन ती मुलगीच असल्याची खातरजमा करण्यात यावी अशी मागणी केली होती. हे सांगताना आजही वडिलांच्या डोळ्यांत पाणी येतं.
पण या सगळ्या काळातही ते डेना 'टॉमबॉय' आहे असंच समजत होते. ट्रान्सजेन्डर हा शब्दसुद्धा त्यांनी ऐकला नव्हता. त्यात हायस्कूलमध्ये डेनानेही इतर मुलींसारखं केस वाढवून, ड्रेसेस घालून 'नॉर्मल' व्हायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं, बाकी अनेक टॉमबॉयिश मुली मोठ्या झाल्या की 'वळणावर' येतात तशीच डेनाही आली असेल!
सतराव्या वर्षी टीव्हीवर ऑप्रा विन्फ्रीचा ट्रान्सजेन्डर लोकांबद्दलचा कार्यक्रम पाहताना तिला अचानक आपण कोण हा साक्षात्कार झाला! आणि तरीही आपल्या प्रेमळ आईवडिलांना हे सांगण्याइतका धीर गोळा करायला डेनाला पाच वर्षं लागली.
वडील म्हणतात, ट्रान्सजेन्डर व्यक्तीने अखेर त्यांचा जेन्डर स्वीकारला आणि व्यक्त केला तरी माणूस म्हणून त्यांच्यात काहीच बदल होत नाही. ही सर्व गुणदोषांसह तीच व्यक्ती असते. त्यांच्यात फक्त दोन बदल दिसतात. एक म्हणजे त्यांचं बाह्य रूप बदलतं, ज्याची आपल्याला आपल्याही नकळत लवकरच सवयही होते, आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ते सुखी झालेले दिसतात!
आपल्या ट्रान्सजेन्डर मुलामुलीला दूर लोटण्यासारखं दुसरं पाप नसेल, कारण प्रेमाची, आधाराची आवश्यकता त्यांना इतर मुलांपेक्षा कितीतरी पटींत जास्त असते. तुमचं मूल ट्र्रान्सजेन्डर असेल तर ते गोंधळलेलं आहे, त्याला बहुधा शाळेत चिडवलं जात असतं, त्रास देण्यात येत असतो, ते नैराश्यात असू शकतं, त्याला हे सगळं संपवायचे विचार सतत सुचत असू शकतात या सगळ्या शक्यता ध्यानात घ्या आणि त्याचा आधार व्हा!
गैरसमज ५ : आपण लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडतो असं एखाद्या व्यक्तीने जाहीर केलं आणि तिच्या वर्तुळातल्या व्यक्तींनी ते स्वीकारलं, तर पुढे 'आणि मग ते सुखाने नांदू लागले' असं लिहून गोष्ट संपेल.
इतकं सोपं असतं तर फार फार बरं झालं असतं, पण दुर्दैवाने अनेकदा तसं होत नाही. गणगोताकडून स्वीकारलं जाणं अत्यावश्यक असतंच आणि त्यामुळे अशा व्यक्तींना मोठाच मानसिक आधार मिळतो, पण खरा प्रवास त्यानंतर सुरू होतो. समाजात त्यांना आपली नव्याने सापडलेली ओळख मिरवताना अनंत अडचणी येतात. चरितार्थासाठी काम मिळवणं अवघड होतं (अमेरिकेत ट्रान्सजेन्डर व्यक्तींना लष्करी सेवेत घेण्यापासून प्रतिबंध करणारा कायदा गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला!), शिकण्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी धडधडीत किंवा छुपी छळवणूक आणि भेदभाव होतो. व्यक्तिगत आयुष्यात मनासारखा जोडीदार शोधणं/मिळणं अवघड असतं. डेटिंग साइट्स किंवा LGBTQI बार यांसारख्या ठिकाणी भेटणारे अनेक लैंगिक अल्पसंख्यांक तोवरच्या त्यांच्या तणावपूर्ण आयुष्यामुळे स्वतः आक्रमक किंवा छळवादी (predatory/abusive) झालेले असतात किंवा अन्य मनोविकारांनी पीडित असतात.
मुळात मनाजोगत्या सेक्शुअल जोडीदारांची कमतरता, असुरक्षित प्रकारे केलेले शरीरसंबंध, HIV आणि STD चिकीत्सा (ज्या खरंतर वार्षिक करून घ्यायला हव्यात) आणि प्रादुर्भाव झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यायचं आपली लैंगिकता लपवण्यासाठी टाळणं यामुळे अशा व्यक्तींच्यात HIVसारख्या व्याधींची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा जोडीदारांसोबत कोणतंही पाऊल उचलण्याआधी सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी लागते. इच्छा असूनही निरामय नाती निर्माण होणं अशावेळी कठीण होऊन बसतं.
प्रश्नच प्रश्न आहेत. त्यांच्या निराकरणाची पहिली पायरी समाज म्हणून आपल्या समजुतीच्या आणि जाणिवांच्या कक्षा रुंदावणं (awareness) आणि आपापल्या वर्तुळातील लैंगिक अल्पसंख्यांकांना खुल्या दिलाने स्वीकारणं (acceptance) हीच असू शकते.
या पहिल्या पायरीवर चढायला या लेखांनी थोडीतरी मदत केली असेल अशी मला आशा आहे.
मला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दलची प्राथमिक माहिती आणि हे लेख लिहिण्यासाठी प्रेरणा माझा मुलगा आदित्य याच्यामुळे मिळाली. तसंच संदर्भ शोधायला श्री. दिलीप नगरकर आणि मायबोलीकर मृण्मयी यांची मोलाची मदत झाली. मी त्यांची ऋणी आहे.
तळटीप:
मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे जागोजागी दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.
यू ट्यूबबर हे एक प्रवचन
यू ट्यूबबर हे एक प्रवचन पाहण्यात आलं. हे स्वामी तदात्मानंद संस्कृत भाषा आणि वाङ्मयात पारंगत आहेत, मी स्वत: त्यांच्या गीता आणि उपनिषदांच्या वर्गांत शिकायला जात असे.
तीन्ही लेख खूप माहीतीपूर्ण
तीन्ही लेख खूप माहीतीपूर्ण आहेत विशेषतः त्या टेड टॉक मधील उल्लेख की जर गर्भार स्त्री तणावाखाली असेल तर समलैंगिक मूल होण्याचे प्रमाण वाढते. जणू काही आईला एक सहवेदना, सहानुभूती वाटणारे मैत्र म्हणून ते बाळ असते - अशा प्रकारचा उल्लेख फार नवीन वाटला.
.
महाभारताच्या तुलनेत, शिवलीलामृत ही पोथी तर फार अलिकडची आहे. पण तशी बरीच जुनीही म्हणता यावी. तर सांगायचा मुद्दा हा की - शिवलीलामृतात, क्रॉसजेंडर पुरुषांचा उल्लेख आहे. अर्धनारीनटेश्वर हे शंकराच रुप आहे - हे तर माहीतच आहे.
थोडे कन्फ्युजन आहे .
थोडे कन्फ्युजन आहे .
ज्या पुरुषाला स्त्री विषयी आकर्षण वाटत नाही पण पुरुषा विषयी आकर्षण वाटत जो स्त्री शी संबंध ठेवण्यास सक्षम नसतो तो समलिंगी का?
मग अशा समलैंगिक व्यक्ती शी संबंध ठेवणाऱ्या पुरुषास काय संबोधलं जाते आणि तो तर hetrosexual असतो.
मग अशा जोड्या लग्न करून आयुष्भर राहतील?
You got it all wrong Rajesh?
You got it all wrong Rajesh?
समलिंगी दोघेही असतील तरच संबंध पॉसीबल होतील न? स्त्रीसंबंध किंवा पुरुषाशी, मूळ गाभा आकर्षण किंवा कल आहे, अन तो असतो मानसिक. जो स्त्रीशी संबंध ठेवण्यास सक्षम नाही तो पुरुष समलिंगी हे पूर्ण चुकीचं प्रतिपादन आहे.
राजेश१८८, शक्य झालं तर
राजेश१८८, शक्य झालं तर लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या लिंकमधला दुसरा लेख - इंद्रधनुष्यात रंग किती - वाचा.
भरत
भरत
वाचला तो भाग .
प्रश्नांचे उत्तर मिळाले
तो टेड टॉक परत ऐकला. खतरनाक
तो टेड टॉक परत ऐकला. खतरनाक छान आहे.
तेंव्हा माबोवर फारसे येत
तेंव्हा माबोवर फारसे येत नसल्याने अशी उत्तम लेखमाला आणि त्यावरची उद्बोधक चर्चा वाचण्यात आली नव्हती.
आज सहज तीनही भाग वाचले आणि फार आवडले.
आणि हा ग्रीक पुराणातला
आणि हा ग्रीक पुराणातला रेफेरंस
Ganymede in Greek Mythology
https://www.thecollector.com/ganymede-myth/
मी पूर्वी वाचलेला. पण रेफ जपून ठेवला होता. Ganymede उपग्रह विज्ञान कथातून आणि Astrology वाचलेला .म्हणून शोध घेतला तर हे नजरेत आले. painting आवडली म्हणून जपून ठेवला होता.
शिवलीलामृतातही गे पात्र आहे.
>>>>>>>>>>आणि हा ग्रीक पुराणातला रेफेरंस
शिवलीलामृतातही गे पात्र आहे.
हिंदू आणि अरेबिक पौराणिक
हिंदू आणि अरेबिक पौराणिक कथांमधेही अनेक आहेत differently oriented people.
Pages