यानंतरचे लेखः
२. इंद्रधनुष्यात किती रंग?
३. समज आणि गैरसमज
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट आहे.
हिटलरच्या नाझी छळछावण्यांमधील कैद्यांच्या पोशाखावर त्यांच्या वर्गवारीनुसार त्रिकोणी कापडी बिल्ले शिवलेले असत. कुठल्या कारणाने हा कैदी मुक्त स्वतंत्र जीवन जगायला नालायक ठरला हे बिल्ल्याच्या रंगावरून स्पष्ट होई. ज्यू लोकांचा नालायकपणा पिवळा तर राजकीय कैद्यांचा लाल, गुन्हेगारांचा हिरवा तर परकीयांचा निळा.*
सहज दुरूनसुद्धा लक्षात यावेत म्हणून समलैंगिक पुरुष कैद्यांचे गुलाबी बिल्ले इतरांपेक्षा थोडेसे मोठे असत. त्यांचा इतरांपेक्षा अधिक अनन्वित छळ होत असे - नाझी अधिकाऱ्यांकडून, आणि इतर कैद्यांकडूनही! पाशवी बलात्कार, गुदद्वारात झाडूच्या दांड्यासारख्या वस्तू खुपसणे, गुप्तांगावर उकळतं पाणी ओतणे, खच्चीकरण इथपासून ते त्यांना ‘बरं’ करण्यासाठी टेस्टॅस्टेरॉनची इंजेक्शन्स देणे, वैद्यकीय ‘प्रयोगां’साठी त्यांना गिनिपिग्ज म्हणून वापरणे अशा अनेक अतिविकृत पातळ्यांवर हा छळ चालत असे.
युद्ध संपल्यानंतर छळछावण्यांमधले बाकी कैदी मुक्त करण्यात आले, गुलाबी बिल्ले वगळून. कारण जर्मन कायद्यातील १७५व्या कलमानुसार समलैंगिकता हा अजूनही गुन्हाच होता.
जेत्या युरोपीय राष्ट्रांचा लैंगिक अल्पसंख्यांकांकडे पाहायचा दृष्टीकोन फारसा निराळा नव्हताच.
याच महायुद्धात जर्मनांचे सांकेतिक लिपीतले गुप्त संदेश 'वाचू' शकणारं यंत्र तयार करणार्या शास्त्रज्ञ अॅलन टुरिंगला नंतर समलैंगिक असल्याच्या 'गुन्ह्या'बद्दल दोषी ठरवून ब्रिटिश सरकारने शिक्षा म्हणून हॉर्मोन ट्रीटमेन्ट घ्यायला लावली. इतक्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाचे अखेरचे दिवस शारीरिक आणि मानसिक अत्यवस्थेत गेले आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला. **
असो. ही झाली फार फार वर्षांपूर्वीची सातासमुद्रापारची कथा.
आपलं काय?
इथल्या बातमीनुसार भारत, पाकीस्तान, नेपाळ, बांगलादेश, न्युझीलंड, नेदरलंड्स, अर्जेन्टिना, कॅनडा, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत पासपोर्टसारख्या सरकारी ओळखपत्रांवर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, मेन, आयडाहो, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या राज्यांत जन्मप्रमाणपत्रावर आता 'लिंग' या रकान्यात स्त्री आणि पुरुष यांव्यतिरिक्त लिंगनिरपेक्ष अशी तिसरी चौकट भरता येते.****
भारतीय दंडसंहितेत ब्रिटिशांनी १८६६मध्ये घातलेलं समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारं कलम ३७७ सप्टेंबर २०१८ मध्ये स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं.***
पण या झाल्या कायदेशीर बाबी.
आपलं काय?
आपण आता वैश्विक नागरिकत्व(ग्लोबल सिटिझनशिप) मिरवतो. हवी असलेली कोणतीही माहिती सहज काही खटके दाबून घरबसल्या मिळवू शकतो. आपल्याला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दल किती आस्था असते? त्यांचे किती प्रकार माहिती असतात? ते आपल्याला विचित्र किंवा 'अनैसर्गिक' वाटतात का? ते उपचारांनी 'बरे' होतील असं आपल्याला वाटतं का? 'आपल्या'कडे असलं काही नव्हतं अशा भ्रमात आपण जगतो का? त्यांच्या संपर्काने आपली मुलं 'बिघडतील' अशी भीती आपल्याला वाटते का? आपण त्यांची दखलच घ्यायचं टाळतो का? आपण त्यांच्यासमोर किंवा अपरोक्ष त्यांच्याबद्दल राग, त्रागा, वैताग, किंवा असंवेदनशील विनोद यापैकी काही करतो का?
१९७८ साली गिल्बर्ट बेकर यांनी तयार केलेला इंद्रधनुषी झेंडा आता लैंगिक अल्पसंख्यांकांचा मानबिंदू झालेला आहे. निसर्गाला, सृजनाला त्याच्या सगळ्या रंगांत साजरं करणारं आशावादी चिन्ह.
आपलं काय?
आपले आचारविचार अजून वास्तव नाकारणार्या गुलाबी त्रिकोणात कैद आहेत का?
(क्रमशः)
तळटीपः
१. लेखाच्या शेवटी विचारलेले प्रश्न माझ्यासकट आपल्या सर्वांनाच आहेत. ज्याच्याबद्दल आपल्याला नीटशी माहिती नसते ते सहसा आपल्याला विचित्र वाटतं. मला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दल कधी 'विचित्र' वाटलं नाही, पण मी कधी त्यांच्याबद्दल माहितीही करून घेतली नव्हती हे खरं आहे. माझ्या वर्तुळातल्या कितीतरी व्यक्तींना 'पुरुषी (दिसणार्या!) बायका' आणि 'बायकी (दिसणारे!) पुरुष' इतकेच प्रकार 'माहिती' असतात हे मी पाहिलं आहे.
नुकतीच माझ्या मुलाशी या संदर्भात चर्चा झाली, आणि माझे डोळे उघडले. त्यातून जे मला कळलं ते तुम्हालाही सांगावं, शक्य तर माहिती करून घ्यायला, विचार करायला उद्युक्त करावं, आणि आपला सर्वांचाच दृष्टीकोन थोडा व्यापक करता आला तर पहावा इतक्याचसाठी हा लेखमालेचा प्रपंच मांडत आहे.
२. मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे खाली दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.
३. यापुढच्या भागात लैंगिक अल्पसंख्यांकांच्या प्रकारांची माहिती करून घ्यावी असा मानस आहे.
मायबोलीकर सिम्बा यांनी याविषयी लिहिलेला एक लेख इथे सापडला - आपण त्याच लेखाचं बोट धरून जमल्यास आणखी सविस्तर चर्चा करू.
संदर्भः
* http://www.thepinktriangle.com/history/symbol.html
* http://time.com/5295476/gay-pride-pink-triangle-history/
** https://www.britannica.com/biography/Alan-Turing
*** https://timesofindia.indiatimes.com/india/what-is-section-377/articlesho...
**** https://www.cnn.com/2019/01/03/health/new-york-city-gender-neutral-birth...
चांगली सुरुवात स्वाती.
चांगली सुरुवात स्वाती.
या विषयाबद्दल अज्ञान तर असतेच आणि चर्चा करण्यासाठी ओपन माइंड पण नसते बर्याचदा. नविन पिढीला याबद्दल जास्त जाण आणि सहज अॅक्सेप्टन्स ही असतो हे मला लेकीशी बोलताना जाणवते.
>>विषयाबद्दल अज्ञान तर असतेच
>>विषयाबद्दल अज्ञान तर असतेच आणि चर्चा करण्यासाठी ओपन माइंड पण नसते बर्याचदा. नविन पिढीला याबद्दल जास्त जाण आणि सहज अॅक्सेप्टन्स ही असतो हे मला लेकीशी बोलताना जाणवते.>> सहमत.
नविन पिढीला याबद्दल जास्त जाण
नविन पिढीला याबद्दल जास्त जाण आणि सहज अॅक्सेप्टन्स ही असतो हे मला लेकीशी बोलताना जाणवते.>> +१
चांगली सुरुवात. आधी वाचला नसल्यास सिम्बांचा पण लेख वाचून घेते लगेहाथ.
मला हे प्रश्न हल्ली खूपदा
मला हे प्रश्न हल्ली खूपदा पडतात. इथे लिहिताना ते मला जरा बालिश वाटतायत पण तरी लिहितेच.
आपल्या तरुणपणी आपल्याला फक्त मुलग्यांना मुली आणि मुलींना मुलगे आवडणं हे दोनच लैंगिक कल माहित होते. आता गे, लेस्बियन आणि बरंच काही असं वेगवेगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हल्ली स्वतःला गे म्हणवून घेणं हे ‘कूल’ वाटतं का यंग जनरेशनला असंही माझ्या मनात येतं. माझ्या मुलीच्या कॉलेजात तिच्या दहा मित्रमैत्रिणींपैकी पाच ते सहाजणं गे, बाय, ट्रान्स अशा कॅटेगरीत येतात. आपला काळ आणि आत्ताचा काळ ह्यांची तुलना करता हा प्रश्न डोक्यात आल्याशिवाय रहात नाही.
खूपच परिणामकारक सुरुवात.
खूपच परिणामकारक सुरुवात. पहिले काही परिच्छेद वाचुनच पोटात गलबललं.
एलजीबीटीक्यू बद्दल ढोबळ माहिती आहे आणि पूर्वग्रहविरहित आणि संवेदनशीलता डोक्यात ठेवूनच वागायचा प्रयत्न करतो. पुढे मागे मुलाशी बोलताना या लेखमालेचा उपयोग होईल.
पुभाप्र.
छान सुरुवात!
छान सुरुवात!
नव्या जनरेशनमधे 'सहज स्विकार ' हे समुहानुसार बदलते. बदल होतोय पण धार्मिक पगडा असलेल्या भागात प्रमाण कमीच आहे.
>>हल्ली स्वतःला गे म्हणवून घेणं हे ‘कूल’ वाटतं का यंग जनरेशनला असंही माझ्या मनात येतं. माझ्या मुलीच्या कॉलेजात तिच्या दहा मित्रमैत्रिणींपैकी पाच ते सहाजणं गे, बाय, ट्रान्स अशा कॅटेगरीत येतात. >>
मुलांना कॉलेज अॅडमिशनचा विचार करताना कँपसवर आपल्याला कितपत स्विकारणे होईल आणि आधार मिळेल हे विचारात घ्यावे लागते. सहज स्विकार आणि चांगला आधार मिळतो अशी ख्याती असेल तिथे साहाजिकच अॅडमिशन घेतली जाते , उघडपणे व्यक्त होणेही होते, साहाजिकच अशा ठिकाणी टक्केवारी जास्त दिसते.
स्वाती२, बरोबर आहे पण माझा
स्वाती२, बरोबर आहे पण माझा मुद्दा तो नाही. मी माझा काळ आणि आत्ताचा काळ ह्याची कंपॅरिझन करतेय आणि हायस्कूलच्या वयात एकूणच हार्मोन्सचा गोंधळ, ते वय, इतके सगळे ऑप्शन्स दिसत असताना स्वतःला गे म्हणून वेगळं काढणं कूल समजलं जात असावं का असा प्रश्न मला गेली काही वर्ष पडलेला आहे.
पुढे मागे मुलाशी बोलताना या
पुढे मागे मुलाशी बोलताना या लेखमालेचा उपयोग होईल. >> भविष्यात तुम्हाला मिळू शकणारे थोडे तु.क. वाचतील मग
आमच्या बोलण्यात चुकून कुठे जर एखादा स्टिरिओटाइप आला तर माझी टीनेजर लेक( त्या पिवळ्या उलथण्याने फाटकन एखादी माशी मारावी तशी) आम्हाला " दॅट इज सोss हेटरोनॉर्मॅटिव" म्हणून फटकावते.
मला नाही वाटत असे गे म्हणून
मला नाही वाटत असे गे म्हणून वेगळं काढणं कूल समजले जात असावे. पूर्वी बोलायची सोयच नव्हती, मन मारुन, मान्यता असलेल्या साच्यात स्वतःला बसवायचा प्रयत्न केला जायचा. आता मनात गोंधळ असेल तर अनुभव घेवून सॉर्ट आउट करायचे झाले तरीही आधाराचे विविध स्त्रोत उपलब्ध आहेत, स्विकारही वाढलाय त्यामुळे उघडपणे व्यक्त होणे शक्य होतेय.
मलाही स्वाती२ यांच्यासारखंच
मलाही स्वाती२ यांच्यासारखंच वाटतंय - उघडपणे व्यक्त होतं आता तुलनेत सोपं होत चाललंय त्याचा हा परिणाम असावा. दुसरं म्हणजे पौगंडावस्थेत लैंगिकता 'एक्सप्लोअर' करायची, एक्सपरिमेन्टेशनची एक फेज येऊन जाते, अशा वेळी आपण समलैंगिक आहोत असं ठरवण्यात घाई होत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मला ती शक्यताच जास्त वाटतेय
मला ती शक्यताच जास्त वाटतेय म्हणजे तसं कारण असावं असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला आहे.
समलैगिक आहोत असे ठरवण्याची
समलैगिक आहोत असे ठरवण्याची घाई होत असण्यापेक्षा 'बाय' असल्यास त्या दृष्टीने पडताळून बघणे होत असावे का?
होय, तीही शक्यता आहे.
होय, तीही शक्यता आहे.
केवळ 'कूल' वाटण्यासाठी लैंगिक आकर्षण ही गोष्ट 'फेक' करणं मात्र अशक्य वाटतं.
फेक नव्हे, आजूबाजूच्या
फेक नव्हे, आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली येऊन आपणही असेच आहोत, असू असं वाटू लागणं म्हणतेय.
विचार करायला लावणारा लेख.
विचार करायला लावणारा लेख.
तिरस्कार नसला, जोक करावेसे वाटत नसले तरी सुप्त भीती मनात असू शकेल.अजून पडताळणी ची वेळ आली नाही.
चांगली सुरवात. पुढचे वाचायला
चांगली सुरवात. पुढचे वाचायला आवडेल.
माझ्या पिढीपेक्षा माझ्या मुलांची पिढी हे जास्त निकोपतेने स्वीकारू शकते कारण त्यांच्यावर स लै विकृती नाही तर प्रवृत्ती आहे हे संस्कार झालेत. मी जेव्हा शिकण्याच्या वयात होते तेव्हा स लै विकृती होती. त्यामुळे मनात भीती, थोडा तिरस्कार, औत्सुक्य इत्यादी होते. ही विकृती नसून प्रवृत्ती आहे हे संशोधन गेल्या 10-15 वर्षात इथे भारतात आले. आज माझ्या मनात भीती, तिरस्कार वगैरे काही नसले तरीही अमुक एक व्यक्ती स लै असण्यामागे तिचा नैसर्गिक कल किती असावा व तिच्या भोवतालच्या परिस्थितीचा परिणाम किती असावा हा विचार नक्कीच कुठेतरी रेंगाळत राहतो. म्हणजे ही विकृती नसून प्रवृत्ती आहे हे मी अजून पूर्णपणे मान्य केले नाहीय, करू शकेन का माहीत नाही.
हे वाचताना अचानक कॉलेजमधल्या एका मुलीची आठवण झाली. ती बाहेरून दिसायला मुलगी असली तरी तिच्या व्यक्तिमत्वात असे काहीतरी होते ज्यामुळे तिचे इतर मुलींशी सतत खटके उडत, ती सतत चिडचिडलेली असायची. एकदा तिला संतापाने फणफणत 'माझी टेस्ट करून घ्या डॉक्टरकडून, म्हणजे सिद्ध होईल मी मुलगी आहे म्हणून' म्हणत इतरांशी भांडताना स्वच्छ आठवतेय. आता कळतेय की कदाचित तिला तेव्हा स्वतःबद्दल माहिती नसेल, तीही स्वतःच्या लैगिकतेशी झगडत असेल. होप तिला पुढे जाऊन योग्य दिशा सापडली असेल.
आजच्या पौगंडावस्थेतील मुलांबद्दल सायोशी सहमत. मलाही बरेचदा असे वाटते की केवळ आपण वेगळे दिसावं म्हणून मुलांना असे वाटत असेल.
माझी टीनेजर लेक( त्या पिवळ्या
माझी टीनेजर लेक( त्या पिवळ्या उलथण्याने फाटकन एखादी माशी मारावी तशी) आम्हाला " दॅट इज सोss हेटरोनॉर्मॅटिव" म्हणून फटकावते.>>> अगदी अगदी झालं .
एल जी बी टी क्यु ए. आणि अन डिसायडेड प्लस ट्रान्स जेंडर असे प्रकार आहेत. एक अन डिसायडेड मुलगा आमच्या ओळखीत आहे त्याला ही किम्वा शी म्हणत नाही. दे म्हण तो. आमच्या कडे रेन बो सपोर्टिव वातावरण आहे. चार वर्शां मागे ले क अकरावीत होती तेव्हा रुईयाचा रोज डे
रेन बो डे म्हणून सेलिब्रेट केला होता. लैंगि कता हा इशू च नाही. तुमचे असेल तसे .
नेटफ्लिक्स वर हिटलर्स इविल सर्कल बघितलेत तर रोह्म नावाचा हिटलरचा आधिचा सहकारी होता. म्हणजे गुंडोम्का सरदार बाहुबलीच होता तेव्हाचा. तो व त्याचे सह कारी ह्यांच्या त बर्यापैकी सम लैंगिक होते. तर त्यांची गरज संपल्यावर हिटलरने एका रात्रीत सर्वांच्या हत्या करून संपवले व समलैंगिकता सहन करणार नाही असे ध्वनित केले होते. प्युअर ब्रीड रेस च्या भ्रामक कल्पनांनी रसरसलेल्या समाजात एल जी बीटी क्यू व्हेरि अंट स्टांप आउट केले जातात.
आपल्याकडे परवा सुरू झालेल्या कुंभ मेळ्यात किन्नर आखाडा गटा ने पण भाग घेतला होता. काँग्रेसची एक विभाग प्रमुख ट्रान्स आहे अश्या बाबी
एन्करेजिंग वाटता त.
छान सुरवात स्वाती,
छान सुरवात स्वाती,
.
फेब्रुवारी महिना हा प्राईड मन्थ म्हणून ओळखला जातो, त्या महिन्यातच हि लेखमाला शक्यतो पुरी होऊ दे .
all the best
विचार करायला लावणारा लेख.
विचार करायला लावणारा लेख. सुरवातीचे ते छळाचे वर्णन वाचून तर रडूच आले.
खरं सांगायचं तर मला अजून
खरं सांगायचं तर मला अजून त्यातले फरक समजत नाहीत. लहान असताना भीक मागणारे तृतीयपंथी हे खरे तृ नसतातच. आळशी आणि गुंड टाईपचे तरूणच तसे हावभाव करून भीक मागतात हे कानावर पडलेले. त्यामुळे तिरस्कार जास्त होता. भीती पण होती आणि आहेही. सध्या माहिती येऊन आदळतेय. त्यात लिंग बदलणा-यालाही तृतीयपंथी म्हटल्याने भयानक गोंधळ उडतो.
लिंग बदलणा-याला त्याने जे लिंग स्विकारले आहे ती ओळख द्यायला हवी (किंवा ती ओळख समाजाने स्विकारायला हवी). त्यांना ट्रान्सजेण्डर म्हटले जाते. इथूनच गोंधळाला सुरूवात आहे.
स्वाती छान लेख. पहिले ३
स्वाती छान लेख. पहिले ३ परिच्छेद वाचून पोटात कालवलं.
छान लेख आहे. या विषयावर खूप
छान लेख आहे. या विषयावर खूप वाचलं आहे आणि अजूनही वाचायच आहे. जेवढं जास्त लिहिलं जाईल आणि जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त माहीत होईल, तेवढं या लोकांचं आयुष्य आणि जगणं नॉर्मल म्हणून स्वीकारले जाईल.
नॅशनल जिओग्राफिक मॅगॅझिनचा
नॅशनल जिओग्राफिक मॅगॅझिनचा जानेवारी-२०१७ चा Gender Revolution अंक मिळवून नक्की नक्की वाचा.
अॅमेझॉन लिंक : https://www.amazon.com/national-geographic-january-2017/s?k=national+geo...
मला स्वतःला कधी या लोकांबद्दल
मला स्वतःला कधी या लोकांबद्दल घाण, किळस, भीती वाटली नाही.. मला समजायला लागलं तेव्हा पासून हळू हळू या विषयावर बोलणं सुरू झालं होतं आणि मूलतः थोडा accepting स्वभाव असल्याने अशा लोकांना नॉर्मल ट्रीट करायला पाहिजे किंवा काही डिस्कशन चालू असेल तर its not a big deal असेच मत होते
एक जवळची मैत्रीण अशी होती.. तिने स्वतः कधी मान्य केलं नव्हतं पण बऱ्यापैकी सगळ्यांना कल्पना होती आणि एकमेकांशी उघड बोलायच नाही अस न बोलताच ठरल्यासारखं होतं.. एकदा थोडं डायरेक्ट बोलणं पण झाल्याचं आठवत.. पण त्या वयात कोणाला सल्ले देण्याइतक माहिती पण नव्हतं.. चर्चाच झाली होती आणि एकूण घरातल्यांना असं सांगणे.. काही डिसीजन घेणे तिच्या कडून होणार नव्हतं . आणि जस मुव्हीज मध्ये अशा वादग्रस्त गोष्टींचा नॉर्मल शेवट होतो (दिल चाहता मध्ये डिंपल चा मृत्यू) तस तीच लग्न झालं आणि खुश तर वाटते.. खर काय कोणीच सांगू शकणार नाही..
बाकी रिसेन्ट बोलायचं तर आम्ही समलिंगी आहोत तर काही वेगळे आहोत इतरांपेक्षा कूल आहोत असं तेच लोक दाखवायचा प्रयत्न करतात..
विचित्र , रिविलींग कपडे घालणे .. विचित्र मेक अप .. ई.
म्हणजे नॉर्मल sexual orientation असणारे लोक काहीतरी विचित्र करून त्यांची sexuality prove करत नाहीत तसच त्यांनी पण नॉर्मल सिटीझन्स प्रमाणे राहावे.. आता हे generelization नाही.. नीट राहणारे लोक असतीलच.. मी सध्या एका गे सलेब्रिटीला इन्स्टाग्राम वर फॉलोव करता करता खूप गे celebrity चे पाहिले.. आणि ऑड वाटलं..
वास्तविक ह्याच लोकांनी आम्ही वेगळे आहोत हे सारख दाखवून दिलं तर लोकांना स्वीकारायला अवघड जात असेल .. नाहीतर सध्या हे स्वीकारणारे लोक जास्त भेटले आहेत।।
आनंदी,
आनंदी,
>>नॉर्मल sexual orientation असणारे लोक काहीतरी विचित्र करून त्यांची sexuality prove करत नाहीत तसच त्यांनी पण नॉर्मल सिटीझन्स प्रमाणे राहावे.. आता हे generelization नाही.. नीट राहणारे लोक असतीलच.. मी सध्या एका गे सलेब्रिटीला इन्स्टाग्राम वर फॉलोव करता करता खूप गे celebrity चे पाहिले.. आणि ऑड वाटलं..>>
आनंदी,
आपण जेव्हा हेटरो संबंधाबाबत नॉर्मल असे म्हणतो तेव्हाच नकळत होमोला अॅबनॉर्मल म्हणत असतो. खरे तर दोन्ही नैसर्गिक. एक घटक मॅजॉरिटी आणि एक मायनॉरिटी. यातल्या मायनॉरिटी घटकाला आजही जगाच्या अनेक भागात नैसर्गिक उर्मी लपवत, मुखवटा लावून , वावरावे लागते. जिथे कायद्याने मान्यता आहे तिथेही विशिष्ठ प्रकारचे कार्यक्षेत्र असेल तर त्याचा उल्लेख करता येत नाही, संबंध लपवुन ठेवावे लागतात. अशावेळी आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मग काही प्रमाणात सेंन्सेशनल असे काही केले जाते.
पुन्हा सांगते, स्विकाराचे प्रमाण आजही खूप खूप कमी आहे. आजही कित्येक भागात कनवर्जन थेरपीचा वापर होतो. आमच्या राज्यात आणि इतर अनेक राज्यात कन्वर्जन थेरपी फॉर मायनर्स वर बॅन नाहीये. म्हणजेच पालक या मुलांचे ओरीएंटेशन चेंज करायचा प्रयत्न करु शकतात. याबाबत अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Conversion_therapy
आजही पावलोपावली संघर्ष करावा लागतो, साधी शाळेत बाथरुम कुठली वापरायची इथे गाडे अडते. आपण वेगळे आहोत हे मुद्दाम अधोरेखीत करावे लागते ते प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, मी त्याकडे मदतीसाठी मारलेली हाक म्हणून बघते.
चांगला लेख.
चांगला लेख.
नॉर्मल म्हणजे mejority म्हणा
नॉर्मल म्हणजे mejority म्हणा हवं तर.. लिहिताना हिटरोला नॉर्मल म्हणण्याचा उद्देश्य अजिबात नव्हता..
म्हणजे आधी हे संबंध अगदी
म्हणजे आधी हे संबंध अगदी गुन्ह्यासारखे लेखले जायचे ते चुकीचेच पण मग आता आम्ही असे आहोत तर उगाच वेगळे राहणार किंवा आम्हीच कूल आहोत हे चुकीचं एवढंच म्हणायचं होत.. आता हे कूल अँड ऑल मोस्टली उच्छभृ वर्गात होत असावं..
लिंग बदलणा-याला त्याने जे
लिंग बदलणा-याला त्याने जे लिंग स्विकारले आहे ती ओळख द्यायला हवी (किंवा ती ओळख समाजाने स्विकारायला हवी). त्यांना ट्रान्सजेण्डर म्हटले जाते. इथूनच गोंधळाला सुरूवात आहे.
Submitted by मेरीच गिनो on 17 January, 2019 - 17:00
लिंग बदलणारे आणि वेगळा लैंगिक कल असणारे हे भिन्न आहेत. ट्रान्सजेंडरला ट्रान्सजेंडरच म्हंटले पाहिजे कारण तो जन्मतः पुरुष व नंतर स्त्री झाला / झाली आहे हे कधीच विसरता येत नाही / विसरले जाऊ नये. अदिश व डेल नावाच्या एका जोडगोळीने आपले आधीचे पुल्लिंग बदलून स्त्रीलिंग धारण केले व महिलांच्या मैत्री वर्तुळात प्रवेश मिळवून नंतर एका कॉलेज तरुणीवर बलात्कार केल्याची घटना १९९३ / १९९४ मध्ये वाचल्याची आठवते. पुरुषांना लेडीज हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही, या ट्रान्सजेन्डर्सना द्यावा का? त्यांच्यात शरीरात मूलतःच अधिक असलेल्या शारिरीक ताकदीचा उपयोग ते तरुणींना पीडण्याकरिता करु शकतात हे विचारात घ्यायला हवे.
किंवा मग -
ज्याप्रमाणे सध्या स्त्रिया व पुरुष यांच्या करिता वेगवेगळी हॉस्टेल्स, बाथरुम्स, बस, रेल्वेचा डबा इत्यादी आहेत त्याप्रमाणे या ट्रान्सजेन्डर्स, गे, लेस्बियन्स, बायसेक्शुअल्स या सर्वांकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत जन्मत:च महिला असलेल्यांच्या अत्यंत खासगी वर्तुळात कन्वर्टेड महिलांना प्रवेश देणे सुरक्षित नाही.
चांगली सुरवात झालीय. मला या
चांगली सुरवात झालीय. मला या विषयावर जुजबीच माहिती आहे. पुभाप्र.
Pages