रस्त्याच्या कडेला झाड उगवते त्याप्रमाणे समाजात मंडळे निर्माण होत असतात. काही जगतात तर काही पायी तुडविली जातात, काही पालनपोषण न केले की मरून जातात. परंतु घोडपदेव विभागातील गीता स्वाध्याय भजन मंडळाला आज ७५ वर्षे झाली.अजून सन्मानाने त्यांची नभात ध्वजा फडकावीत समाजात उमंग, आनंद तरंग पसरवित भजन कीर्तन प्रवचन यातून समाजाला सामाजिक प्रबोधन करीत धार्मिकतेचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उगम पावलेली गीता स्वाध्याय भजन मंडळ हि संस्था आजही आपल्या जोरावर मुंबई, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा राखून आहे. गिरगाव भागातील स्वामी स्वानंदमहाराज गिरी यांनी घोडपदेव प्रभागात चांगल्या विचारांचा पाया असलेली माणसे गोळा करून *गीता स्वाध्याय भजन मंडळ* नावाची वारकरी सांप्रदाय सेवा करणारी इमारत उभी केली, किंवा स्थापन केली. त्या *स्वामी स्वानंदमहाराज गिरी* यांची ६६ वी पुण्यतिथी सालाबाद प्रमाणे याही वर्षी केली जात आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक कीर्तनकारांनी गौरवलेल्या या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीबद्दल घोडपदेवच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे. जसे सज्जन आहेत तसे दुर्जन देखील आहेत. पण सज्जन माणसं व्हावी आणि या वसुंधरेला कधी आघात होऊ नये म्हणून समाजात संत शिकवण अत्यावश्यक आहे , या अनुषंगाने अशा संस्था धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यापैकी आपल्या गीता स्वाध्याय भजन मंडळाचे नांव अभिमानाने घ्यावे लागेल. समाजाला गीता स्वाध्याय भजन मंडळाने काय दिले ..? असा प्रश्न कोणी केला तर त्यावर एकच उत्तर असेल.जेथे कीर्तन सुरु असताना मागे स्वरांची आळवन करणारे कैवल्याचा आनंद देत असतात. कैवल्य म्हणजे काय याचा साक्षात्कार होत असतो.ज्याला रूप नाही, रंग नाही.निराकार निर्गुण जसे देवाचे वर्णन आपण करतो, त्याप्रमाणे या गीता स्वाध्याय भजन मंडळाचे करायला आवडेल.
*तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग I*
*सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥*
*गीता स्वाध्याय* भजन मंडळाने भगवंताचे नाम सतत मुखात राहावे म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळात संयमी शांत विचाराची मंडळी पाहत आलो आहे. त्यामुळे जर डोकं शांतच असेल निर्णय कधी चुकत नाहीत आणि भाषा गोड म्हणून माणसं तुटत नाहीत. बेंबीच्या देठातून त्यांना वाटतं माणसं जोडत राहावी. आपला सखा हा विठ्ठलच आहे असे समजून मीपणाचा भाव न जोपासलेल्या अनेक मंडळीनी या संस्थेत काम केले आहे करीत आले आहेत. नाम्मोल्लेख करणे इष्ट नाही. पण असे मनी भाव असले तर तेथे देव देखील येतो, म्हणतात. निस्वार्थ भावना जर पहायची झाली तर यांच्यामध्ये पाहावी. मंडळ आहे पण कोणी राजा नाही आणि रंक नाही. ना हवे कोणते पद, ना हवा त्यांच्या नावाचा डंका. ज्याला वाटेल त्यांनी सेवा करायची. पांडुरंगाचे भुकेले आहेत त्यांना फक्त पांडुरंगाचे सगुण रूप पाहून त्यांची नेत्र सुखावतात. जन्मोजन्मी पांडुरंगाचा दास व्हावे, उठताबसता पांडुरंगाचे नांव कंठात असावे, हीच त्यांची आस आहे. लोकांना त्यांचे एकच सांगणे आहे, ऐकावे कीर्तन, प्रवचन आणि मुखी गावे हरिचे त्या विठ्ठलाचे गुण...!
प्रत्येक क्षेत्र वेगळे आहे.सामाजिक, सांस्कृतिक. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी मंडळे अनेक पाहिली असतील पण धार्मिकक्षेत्रात समाजाची भक्तीभावना वृद्धिंगत व्हावी, या साठी प्रयत्न करणारी गीता स्वाध्याय भजन मंडळ संस्थेचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. पारदर्शी काचेला एका बाजूने पारा लावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्या आरश्यात समाजमनाला सदा सुख शांती समाधानाने पाहता यावे, अशी भावना त्यांनी मनी बाळगली आहे. अभंग वाचायला मिनिटे किंवा काही सेकंद लागत असतील पण त्यावर विश्लेषण करायला तास पुरत नाही. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली *गीता* हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत गीता स्वाध्याय भजन मंडळ समाजाला धार्मिकतेचे, परमार्थाचे मार्गदर्शन करीत आहे. देव तुमच्या अडचणी सोडवितो तेव्हा देवाच्या शक्तीवर तुमचा विश्वास असतो. पण देव जेव्हा आपल्या अडचणी सोडवीत नाही, तेव्हा देवाचा आपल्या शक्तीवर विश्वास असतो..... गीता स्वाध्यायचे पारायण असे आहे. त्यांचे समाजासाठी, वारकरी संप्रदायासाठी, धार्मिक प्रसारासाठी योगदान अभूतपूर्व आहे. आनंद वाटण्यात मजा असते. एकट्याची श्रद्धा हास्यास्पद दिसून येते, परंतु आनंद वाटताना सकारात्मक उर्जेने होतात तेव्हा गर्दी दिसून येते.गर्दीतील श्रद्धा मात्र धर्म वाढविते. आनंद, विश्वास वेड काहीही म्हणा त्याचे वितरण करण्याचे भाग्य गीता स्वाध्याय भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी आले आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनापसून हार्दिक अभिष्टचिंतन करीत आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा
*अशोक भेके*
चांगल्या उपक्रमाची माहिती
चांगल्या उपक्रमाची माहिती दिली आहे.. छान
सुंदर माहिती! आवडली!
सुंदर माहिती! आवडली!
धन्यवाद मित्रानो....!
धन्यवाद मित्रानो....!