चैतन्य म्हणजे चिंटु, ५वर्षाचा गोड मुलगा.तो,त्याचे आई-बाबा आणि आजोबा असं छोटस कुटुंब!
आई,बाबा दोघं नोकरी करायचे,त्यामुळं चिंटु दिवसभर आजोबांसोबत.रोज सकाळी चिंटुला शाळेत सोडण्यापासून आजोबांची ड्यूटी सुरू व्हायची ते संध्याकाळी आई बाबा परत आल्यावर संपायची.
रोज संध्याकाळी आजोबा चिंटुला घेऊन जवळच्या बागेत जात असत.आजोबा त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारायचे आणि चिंटु त्याच्या मित्रां बरोबर खेळत असे.अंधार पडेपर्यंत दोघं घरी परतायचे.तोपर्यंत आई बाबा परत आलेले असायचे.
एके दिवशी संध्याकाळी आजोबा आणि चिंटु नेहेमी प्रमाणे बागेत गेले होते,पण चिंटुचे मित्र कोणी आले नव्हते.तो एकटाच बाँलनं खेळत होता.अचानक बाँल बागेबाहेर गेला.तारेच्या कुंपणाखालुन बाँल काढायचा प्रयत्न करून चिंटु पार दमुन गेला.त्याची ही खटपट कोणीतरी लक्ष्य देऊन बघत होतं..एक कुत्र!खूप छोटं.ते पिल्लु तारेच्या बाहेर होतं.त्यानं हळुच चिंटुचा बाँल आत ढकलला.चिंटु जाम खुश झाला.गंम्मत म्हणुन त्यानं पुन्हा तो बाँल बाहेर ढकलला.तो त्या पिल्लानं आत ढकलला.चिंटुला आज एक नवीन मित्र मिळाला.चिंटुनं त्याचं नाव पण ठरवलं-- पिंटु!
घरी जाताना तो आजोबांना पिंटु बद्दलच सांगत होता.
घरी परतल्यावर त्यानं आई बाबांना पण सगळं सांगितलं.पुढचे काही दिवस असेच पिंटु बरोबर खेळण्यात आणि त्याच्या विषयी बोलण्यात गेले.
एके दिवशी मात्र चिंटुनं आजोबांजवळ हट्टच धरला पिंटुला घरी घेऊन येण्याचा.आपण तुझ्या आई बाबाना विचारू आणि मग काय ते ठरवु असं सांगून आजोबांनी वेळ मारून नेली.
रात्रि चिंटुनं आईकडं पिंटुचा विषय काढला.थोड़ा विचार करुन आई म्हणाली,"हे बघ चैतन्य,मी आणि बाबा दिवसभर घरी नसतो.तू शाळेतून आल्यानंतर तुझी सगळी कामं आजोबा करतात.ते सांगत नसले तरी दमुन जातात ते खूप.तुझं पिंटु पण छोटं आहे.त्याला घरी आणल्यावर जर कुठं शी शू करून ठेवली तर ते कोण स्वच्छ करणार?उगाचच आजोबंवर आणखी कुठली जबाबदारी नको.आपण एक काम करूया तुझं पिंटु थोडं मोठ्ठ झालं की आपल्या घरी आणु या."
चिंटुला आईचं बोलणं पटलं..त्यानं आईला विचारलं"पिंटु लौकर मोठा होण्यासाठी मी रोज त्याला काहीतरी खायला नेलं तर तू ओरडणार नाही ना मला?"
आई हसली आणि म्हणाली "नाही ओरडणार"
चिंटु खूप खुश झाला.
दिवस जात होते,चिंटु पिंटु रोज भरपूर खेळायचे.चिंटु पिंटुसाठी रोज छान छान खाऊ घेऊन जात होता,तो खाऊन पिंटु आता खरच मोठा दिसत होता.
एके दिवशी चिंटु आणि त्याची आई बाजारात भाजी आणायला गेलेले असतात.दुपारची वेळ होती .थोड़ी गर्दी होती.आईनं एका हातात भाजीची पिशवी धरलेली असते आणि दुसरा हात चिंटुनं धरलेला.पिशवीतच आईची पर्स होती.आई पिशवी खांद्यावर अडकवुन गर्दीतून वाट काढत जात आसताना पाठीमागून कोणीतरी पिशवीतली पर्स घेऊन पळायला लागतो.आई ओरडती जोरात. "चोर चोर!
कुणीतरी पकडा त्याला"
आजुबाजुची माणसं त्या चोराच्या मागं पळायला लागली.आई घाबरली होती.चिंटुला घेऊन भराभरा चालायला जमेना.तरी चोर पळाला त्या दिशेनं ती चालत सुटली.एव्हाना चिंटुच्या लक्षात आलं होतं की आपल्या आईची पर्स चोरीला गेली आहे आणि त्या चोराला आपण पकडलं पाहिजे.आता तोच आईचा हात धरूर,तिला खेचत पळायला लागला.तोपर्यंत समोरून काही लोक पळत आले.एकाच्या हातात चिंटुच्या आईची पर्स होती.तो माणूस आईच्या हातात पर्स देत म्हणाला,"ताई,तुमच्या पर्स मधल्या सगळ्या वस्तु आहेत का बघा."
आईनं थोडं घाबरतच पर्स तपासली आणि त्या माणसाला म्हणाली"मी तुमची खूप आभारी आहे,तुम्ही जर त्याच्या मागं पळत गेला नसता तर माझी पर्स काय मला परत मिळाली नसती".त्या माणसाला धाप लागली होती,तरी हातानं आईला थांबवत तो म्हणाला"मी तुमची पर्स परत आणली असली तरी त्या चोराला काही मी पकड़लं नाही.मी त्याच्या पर्यंत जायच्या आधीच त्याला आड़वं पाडुन तुमची पर्स कोणीतरी घेतली होती.तुम्हाला आभार मानायचे तर त्याचे माना."
आईला आश्चर्य वाटलं!
"कोण असेल बरं मला मदत करणारं"ती विचार करायला लागली तसा तो माणूस म्हणाला"यानं तुमची पर्स परत मिळवली".
आई बघते तर एक मोठ्ठ कुत्र होतं.चिंटु मात्र त्याला बघुन आनंदानं ओरडायला लागला"पिंटु!माझा पिंटु!"आईनं ऐकलं होतं पण आता ती त्याला बघत होती.परत एकदा आईनं त्या लोकांचे आभार मानले आणि ती दोघं घरी परत आली.
चिंटु एकदम उत्साहात होता,कधी एकदा आजोबांना सगळं सांगतो असं झालं होतं त्याला
.आजोबानी पण लक्ष्य देऊन सगळं ऐकलं.त्याना पण आनंद झाला.
आई म्हणाली"आज चिंटुच्या पिंटुमुळं माझी पर्स मला मिळाली.चिंटु,उद्या तू पिंटुसाठी भरपूर
खाऊ घेऊन जा."
दुसरे दिवशी चिंटु नेहमीप्रमाणे बागेत गेला.हातात एक पिशवी,त्यात पिंटुसाठी खाऊ.तो थोड़ा लवकरच गेला होता.कधी एकदा पिंटु येतो असं झालं होतं त्याला.बाकीच्या मुलांबरोबर खेळत होता तो पण लक्ष्य मात्र बाहेर होतं.त्यानं दोन तीनदा हाक मारली पिंटुला,पण तो नाही आला.
घरी परत जायची वेळ झाली.आजोबा उठले,चिंटुजवळ आले.पण त्याचं मन घरी जायला तयार होईना.अंधार पडायला लागला तसं त्याला रडू यायला लागलं.आजोबा कसतरी एकदाचं चिंटु घरी घेऊन आले.त्याचा अवतार बघून बाबांनी विचारल"काय झालं!कुठं पडलास काय?"बाबांचा आवाज वाढला तसा तो आणखीन जोरानं रडायला लागला.आई आली,तिनं चिंटुला जवळ घेत त्याच्या रडण्याचं कारण विचारलं.त्यानं एका दमात आईला सगळं सांगितलं.आणि तो परत रडायला लागला.आई म्हणाली,"चिंटु,मला सांग बरं तू कसा बोलावतोल तुझ्या पिंटुला?"चिंटुनं "पिंटु.....पिंटु ....."असं हाका मारल्या,आणि त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना ..समोर पिंटु उभा होता.चिंटुनं पटकन जाऊन त्याला मिठी मारली.आई,बाबा,आजोबा आनंदानं बघत होते."चिंटु,हे बघ मी तूला सांगितलं होतं ना पिंटु मोठा झाल्यावर आपण त्याला आपल्या घरी घेऊन येऊ म्हणून,मग आजपासून तो आपल्या बरोबर रहाणार."
चिंटुचा खुललेला चेहरा बघून आईचे डोळे आनंदानं भरून आले.
समाप्त
चिंटुचा पिंटु
Submitted by ashविन on 10 January, 2019 - 23:54
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिली आहे कथा
छान लिहिली आहे कथा
आवडले लिखाण
आवडले लिखाण
मस्त आहे गोष्ट
मस्त आहे गोष्ट
मस्त आवडली कथा
मस्त आवडली कथा
मला वाटलं कुत्रं पकडणारी गाडी
मला वाटलं कुत्रं पकडणारी गाडी घेऊन जाते का त्याला