फ्रेंच फ्राईजच्या ग्राउंड फ्लोअरवर, हाफचड्ड्या आणि टी शर्टांचा सुकाळ होता. हे आपले फुल्ली ड्रेस्ड कलपकाकांचे मत. अर्थात शॅंटीआॅंटिला ते कायमच ओव्हरड्रेस्ड वाटायचे. सोसायटिची तर मीटिंग, त्याला कशाला प्यांट आणि शर्ट? कलपकाकांना तरी सगळ्या बायकांनी साड्या घालून यावे असे मनापासून वाटायचे. पण ते फक्त त्यांनाच. त्यामुळे आजही, फक्त कलपकाका फुल्ली ओव्हरड्रेस्ड होते. बाकि सगळे हाफ्प्यांटी आणि टीशर्ट, अगदी साळकाया माळकाया पण. सुट्टिच्या दिवशी केली ना मीटिंग. टिनाच्या आईचे ठाम मत होते, की मीटिंग ही सुट्टिच्या दिवशी असता कामाच नये. त्यामुळे तावरेकाकांनी मग ती एकदा मंगळवारी ठरवली. तर तेव्हा ती कामाच्या दिवशी कसली आल्ये मीटिंग म्हणून करवदली होती.
तशी टिनाच्या आईला मिटींग कधीही असली तरी काही फरक पडत नाही. ती नाहीतरी घरीच असते. तरी सोसायटितल्या बाकिच्या काम करणाऱ्या बायकांसारखी ती ही हाफ्प्यांटीला शरण गेलेली आहे. ही खरेतर नउवारीच्या पिढीतली बाई. त्यामुळे हाफ्प्यांटीत सुद्धा ती वर अंबाडा, कुंकू लावून आली होती, फक्त नउवारी काढून, जर हाफ्प्यांट घातली तर एखादी घरंदाज बाई कशी एकदम उकिरड्यावर येउन बसल्ये असे वाटेल, तसेच तिला बघून वाटत होते. तिला खरेतर नथ घालायलाही आवडले असते, पण ती नेमकी घाईत सापडली नाही, त्यामुळे चपलाहारावर सोसायटीला समाधान मानावे लागले होते. तावरेकाकांना ती टिशर्टच्या आत ब्लाउजसुद्धा घालते, अशी एक सूक्ष्म शंका होती. कारण बऱ्याचवेळा ब्लाउजची कड, टिशर्टमधून बाहेर निर्लज्जपणे डोकावत असायची. अशावेळी तिला मग खानकाका सोसायटिची दादा कोंडकी म्हणायचे. "तुम्हारे मराठी लोगोंकी कामेडी की कन्सेप्ट एकदम फनी हां" ते तावरेकाकांना हसत हसत सांगत होते. दादा कोंडकेंचा एक सिनेमा बघितल्यावर त्यांचे हे मत होते. तावरेकाकांनी कामेडिची कन्सेप्ट फनी नसेल तर काय ट्रेजेडिची कन्सेप्ट फनी हवी का? असा प्रश्न विचरण्याचा असुरी आनंद मनातल्या मनात गिळला होता. तो दोन कारणांनी. एक म्हणजे त्यांना खानकाकांची भिती वाटायची. त्यांची जवळपास खात्री होती, की खानकाकांचा फ्लॅट नीट तपासाला, तर चारपाच टेररिस्ट तरी सापडतील म्हणून. आणि दुसरे म्हणजे रामसे बंधूंनी नक्की ट्रॅजेडी आणि कामेडी या दोन्हीपैकी कुठल्या जाॅनरचे सिनेमे जन्माला घातले, ते त्यांना अजून कळत नव्हते. केवळ या गोंधळामुळे तावरेकाकांची दर्जेदार कामेडी करायची संधी हातची निघून गेली.
सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून तावरेकाकांना सोसायटी सेल्युलर ठेवण्यात प्रचंड इंटरेस्ट होता. कांग्रेसनी सांगितल्याप्रमाणे सोसायटी ही सेक्युलरच असावी हे त्यांचे पक्के मत होते. पण खानकाका सोडले, तर सोसायटी सेक्युलर ठेवण्याच्या कामात कुणीच हातभार लावला नव्हता. त्यामुळे त्यांची फार पंचाईत व्हायची. स्वच्छ सोसायटीचा फिरता चषक काही आपल्याला मिळणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण तंबाखूवाले सोसायटीत बरेच होते. तावरेकाकाही अधूनमधून खायचे. दिवसातून एकदाच बरका. हा दिवसातून एकदा, दिवसात कितीवेळा येतो, हे काही त्यांनी मोजले नव्हते. पण खानकाकांना ठाऊक होते. ते पिंकिच्या आईला लिफ्टमधे सांगत होते, की हा साला एक गाय दोन दिवसात संपवतो म्हणून. अर्थात ही खानकाकांचा जातीयवादी कामेडी, पिंकिच्या आईला लिफ्टमधे सांगितल्यामुळे, अजिबात कानात शिरलेली नव्हती. पण स्वच्छ सोसायटी नाही तर नाही, पण निदान सेक्युलर सोसायटीचा चषक तरी मिळावा अशी तावरेकाकांची इच्छा. पण ती ही अपूर्ण रहाणार होती.
कलपकाका, पूर्ण हिंदू. अगदी आरेसेस. त्यामुळे त्यांना खानकाकांचा मांसाहार चालायचा नाही. त्यातून ते गाय खातील असा त्यांना प्रचंड संशय होता. त्यामुळे ते खानकाका बाजार करून आले, की त्यांच्या आसपास घुटमळत असायचे. अर्थात, जर त्यांनी गोमांस आणलेच, तरी ते कलपकाकांना कुठे समजणार होते? तरी ते पिशवीत डोकावून बघत असायचे. यावर खानकाक, त्यांना तावरेकाकांकडे बोट दाखवून सांगायचे, "तो बघ तुझी मित्र गाय खातो" यावर पहिल्यांदा कलपकाका उडलेच होते. मग ती गाय म्हणजे गाय छाप हे कळाल्यावर त्यांचे आणि खानकाकांचे भांडण तासभर रंगले होते. तावरेकाका अर्थातच मधे पडले नाहीत. ते गायछाप चघळत लांब उभे होते. एकदा हे जातीयवादी दंगे आपण सेक्रेटरीच्या नात्यानी थांबवावे, असेही त्यांना वाटले. पण खानकाकांच्या फ्लॅटमधल्या लपून बसलेल्या टेररिष्टांची त्यांना भिती वाटली म्हणून ते गप्प बसले. तावरेकाकांचा हा सेक्युलर प्राब्लेम त्यांना फारच टेरराईज करत होता.
असो. तर सुट्टिच्या दिवशी, असे सगळे लोक्स, हे आपापल्या ठेवणितल्या हाफ्प्यांटी काढून खाली आले, ते लिफ्टच्या डेमोसाठी. लिफ्टवाल्याच्या एएमसीमधे ही तरतूद होती. आणि ती झाल्याशिवाय पुढच्यावर्षिचे पैसे त्याला देणार नाही, अशी भयानक अट जोशीकाकूंनी टाकली. त्यांना मागल्याच वर्षी आॅडिट नावाच्या राक्षसाला सामोरे जायला लागले होते. हे युद्ध त्यांनी अगदी रामासारखेच धर्मयुद्ध म्हणून खेळले होते. पण ती वेगळी श्टोरी आहे. तेव्हापासून मात्र त्यांनी स्वतःच्या ट्रेझरर या पदाला, मधला अर्धा र, आणि नंतरचा झ काढून, वाहून घेतलेले होते. त्यामुळे तो लिफ्टवाला जेव्हा चेक न्यायला आला, तेव्हा त्यांनी खरोखर भिंग लावून सगळे मुद्दे वाचून, हा एक मुद्दा राहून गेला असे शोधून काढले, आणि ते झाल्याशिवाय चेक देता येणार नाही असे स्वच्छ करारी भाषेत सांगितले. साधारण पंधरा दिवस तावरेकाकांचे याच्यात खर्ची पडले होते. लिफ्टवाला काही डेमो द्यायला तयार नव्हता. त्याच्या म्हणण्यानुसार त्यानी सोसायटिला एकदा डेमो दिला होता. नंतर ही प्रॅक्टिस करायचे काम सोसायटिचे होते. हे तावरेकाकांना पटले होते. कारण लिफ्टवाला ख्रिश्चन होता. त्यामुळे त्यांना हा मुद्दा एकदम सेक्युलर वाटला होता. पण जोशीकाकू अडून बसल्या. शेवटी त्यांनी लिफ्टवाल्या के जाॅन्सनला, स्वतःच्या घरात, स्वतःच्या खर्चानी, मेकडोनाल्ड नं १ चा एक अमूल्य पेग पाजून, हा प्रश्न अत्यंत सेक्युलर पद्धतिनी सोडवला, आणि जाॅन्सनला तयार केला. याचे पैसे सोसायटीकडून मिळावे, आणि ते हाॅटेलच्या पेग सिस्टिमच्या दराने मिळावे, त्यांनी स्वतः घेतलेल्या दीड पेगसकट, अशी त्यांची खूप इच्छा होती. पण रिझोल्यूशन नसल्यामुळे जोशीकाकूंनी स्वच्छ नकार दिला.
परिणामी सगळे सोसायटीकर हे ग्राउंडफ्लोअरवर हाफ्प्यांटीचा फॅशनशो करत उभे होते. यातसुद्धा मेरी हाफ्प्यांट तेरी हाफ्प्यांटसे अच्छे ब्रांडवाली कैसी. हा एक छुपा उद्योग होताच. रामटेकेंच्या परागने त्यासाठी कालच सेंट्रलची फेरी केलीच होती. आणि ती नवीन ब्रांडेड हाफ्प्यांट असल्याने तो हंथरुणात लोळण्याऐवजी खाली चक्क डेमोला हजर होता. तशी त्याला टीनासुद्धा असेल अशी एक भाबडी आशा होती. पण तिला मोबाईल इतका वेळ बाजूला ठेवायची कल्पना सहन झाली नाही. त्यामुळे ती आली नाही. आणि चक्क पिंकिची आईसुद्धा नव्हती. ती लिफ्टमधेच सापडेल, हा खानकाकांचा फनी कामेडी, लोकांना आवडला नाही, पण ते खरे असण्याची शक्यता मात्र दाट होती.
कलपकाकांना मात्र अजून हा लिफ्टवाला आला कसा नाही, याचीच काळजी लागून राहिलेली. सगळे खाली आलेले. अगदी वर्तमानपत्रवाला, दूधवाला, आणि धोबीपण होते. पण लिफ्टवाला काही आला नव्हता. ते तावरेकाकांना विचारणारच होते, तेवढ्यात वर्तमानपत्रवाला पुढे झाला, आणि त्यानी विचारले, "आले का सगळे? तर करू या सुरू डेमो" असे म्हणून त्यानी शास्त्रशुद्ध पद्धतिनी जमलेल्यांचा ताबा घेतला. आणि दूधवाल्याला सांगितले, "मेनस्विचपाशी जा रे दिल्या. मी सांगितले की बंद मार हा. आणि सांगितले की चालू. त्या अलपाईन कंट्रीसारखे नको. साला बंद करून गेला चहा प्यायला" शेवटचे वाक्य सोसायटीला उद्देशून होते. हे वाक्य तो बहुतेक नेहमीच म्हणत असेल. पण कलपकाकांना घाबरवायला ते पुरेसे होते. पहिल्या फेरीत समाविष्ट होउन, नंतर परत घरी चहा प्यायला जायची त्यांची ऐडिया बोंबलली. आणि आता ते लगेचच चहा प्यायला जायचा विचार करू लागले.
तर वर्तमानपत्रवाल्याने पहिली बॅच लिफ्टमधे कोंबली. आठजण पहिल्यांदाच आठजणांच्या लिफ्टमधे होते. नीट उभे रहायलायुद्धा जागा नव्हती. पण सगळे नीट शांतपणे, एकमेकांच्या पायावर पाय न देता उभे होते. वर्तमानपत्रवाल्याने शेवटचे दूधवाल्याकडे बघितले, आणि वर जायचे बटण दाबले. लिफ्ट कुरकुरत वर जायला लागली. पाचसहा फूट जाउन बंद पडली. लिफ्टमधला फॅन बंद पडला. दिवे गायब झाले. यावर 'पिटी' असे लिहिलेले बटण दाबून सराईतपणे वर्तमानपत्रवाला म्हणाला, "दिल्या अजून वर जाउंदे". मग त्याने बटण सोडून दिले. लोकांकडे बघून म्हणाला, "हे बटण बोलताना दाबायचे, नंतर सोडायचे बरका? नाहीतर पलीकडून तो काय बोलतोय हे कळणार नाही. लिफ्ट बंद पडली, की थांबायचे, घाबरायचे नाही. ती आपोआप जवळच्या मजल्यावर जाउन थांबेल. मग खाली उतरायचे. आणि मजला आणि लिफ्ट यामधे फूटभर अंतर असेल तरच उतरायचे, नाहीतर, हे अलार्मचे बटण दाबायचे. मग वाचमन येईल" तो काय करेल हा प्रश्न बऱ्याचजणांच्या मनात होता. पण शंका सगळ्या नंतर विचारायच्या याची प्रत्येकाला सवय होती. त्यामुळे सगळे गप्प बसले.
तो पर्यंत दिल्या उत्तर देत नाही हे वर्तमानपत्राच्या लक्षात आले होते. त्यानी परत ते बटण दाबून दिल्या लिफ्ट जरा अजून वर जाउंदे, असा आदेश दिला. मग बटण सोडले. तरी पलिकडून काहीच आवाज आला नाही. तरी वर्तमानपत्र अजूनही सराईतच होते. मग त्यानी परत एकदा बटण दाबून, दिल्या नावाच्या दूधवाल्याला हाळी दिली. तरी पलिकडून काही उत्तर येईना. मग मात्र लिफ्टमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पटकन हा उद्योग उरकून, सुट्टी शेजकारणी घालवायची ऐडिया धुळीस मिळणार होती. कलपकाकांना घाम फुटला होता. टीनाच्या आईचा अंबाडा, बरोबर त्यांच्या नाकाखाली होता. त्यांनी डोके हलवले, की त्यांना शिंक येईल असे वाटायचे. हात वर घेता येत नव्हते. तशी सोयच नव्हती. इतकी गर्दी होती. त्यात पुढे टीनाची आई. "कळले का? याचसाठी दिला नव्हता चेक" जोशीकाकूंनी बोलून घेतलेच. नक्की कशासाठी हे कुणालाच कळले नाही. सेकंदागणिक त्यांचा फणकारा वाढत होता.
आता वर्तमानपत्राचाही धीर सुटत होता. त्यानी लिफ्टमधल्या बायकांची पर्वा न करता एक सणसणीत शिवी हासडली, आणि "शिंचा गेला वाटते चहा प्यायला खरेच" असा एक वैताग मनाबाहेर काढला. पण तावरेकाका शांत होते. "जनरेटर होईल चालू आता. मग जाऊ वर" त्यांचा अंदाज की खरोखरच दिवे गेले, आणि लिफ्ट अडकली. नंतरचे त्यांना पाठ होते. जनरेटर चालू होईल. मग लिफ्ट बेसमेंटला जाईल, आणि मग परत सुरळीत चालू होईल. हे नेहमिचेच होते. त्यामुळे त्यांना तशी काळजी अजून वाटत नव्हती. त्यांना काळजी फक्त एकच होती. वर्तमानपत्र त्या बटणाशी असे खेळत होते, की ते आत्तापर्यंत मोडले असणार याची त्यांना खात्री होती. चेक द्यायच्या आधी हे नक्की तपासून घ्यायला हवे, हे त्यांनी मनोमन ठरवले.
मग जसा जोशीकाकुंचा परफ्युम त्यांच्या नाकात घुसला. तसे ते अस्वस्थ झाले. सांभाळे पर्यंत नाकातून शिंक आली. शिंकताना त्यांचे डोके मागे आणि पुढे दोन्हिकडे आपटले. पुढे जोशिकाकूंवर, आणि मागे लिफ्टच्या आरशावर. आरशावर आपटून परत पुढे आल्यावर परत तो वास आला. परत शिंक. ही चेन रिॲक्शन संपेचना. तरी एक दोन मिनिटांनंतर त्यांनी कसेबसे थोडे कंट्रोल केले. बर, हातरुमाल काढायला, हात हलवताही येत नव्हता. वर्तमानपत्र सोडले, ज्याचे बोट त्या बटणावरच होते, तर बाकी कुणालाही कुठलिही हालचाल करता येणे शक्य नव्हते. सगळे सावधानमधे उभे असल्यासारखे होते. विश्रामची सोयच नव्हती.
जोशीकाकूंना मात्र आपला चेक न देण्याचा निर्णय बरोबर होता, याची खात्री पटत चालली होती. आॅडिटला हे नक्की सांगायचे, हे त्यांनी पक्के ठरवून ठेवले होते. त्याच्याशिवाय आपले हे चातुर्य दुसऱ्या कुणाला कळणारच नाही, याची त्यांना खात्री होती. अर्थात त्यांचाही धीर सुटायला लागला होता. पराग ब्रांडच्या नादात, बाथरुमला न जाताच खाली आला होता. त्याची त्याला आता जाणिव झाली. हे प्रकरण लांबले, तर आपले काही खरे नाही, हे त्याला कळून चुकले. त्यात काही बरेवाईट झाले, तर ते टीनाच्या आईसमोर तरी नको, ही तो मनोमन देवाकडे प्रार्थना करत होता. त्याच्या पायांची चळवळ, या कारणामुळे वाढली. त्याच्यासमोर खानकाका उभे होते. त्यांना ती सहन होईना. "बच्चा चुपचाप खडा रहो" असे त्यांनी एकदा दरडावलेसुद्धा. पण हा बच्चा चुपचाप नाही तर कसा आहे? हे बाकिच्यांना काही कळेना.
वातावरण इतके तापले, की त्याचा कधीही स्फोट झाला असता. एकमेकांच्या इतक्या निकट, इतका वेळ उभे रहायचे ही शिक्षा आहे. साधे नाकसुद्धा खाजवता येत नव्हते. डोक्यात सुटलेली खाज, ही कलपकाकांना अस्वस्थ करत होती. जोशिकाकूंनी गॅसवर चहा ठेवला होता. गॅस बारीक होता. हा चावटपणा संपला, की घरी जाउन गरम गरम चहा मिळेल अशी त्यांची साधी अपेक्षा. आता त्याचे काय झाले असेल, ही त्यांना चिंता होती. टीनाच्या आईचा कुकर गॅसवर होता. टीनाला आजपर्यंत कुकरची एकही शिट्टी ऐकू आलेली नव्हती. तशी शिट्ट्यांना तिचा नकार नव्हता. उलट, तिच्याकडे शिट्ट्यांचा काउंटर होता. सद्ध्यातरी ती विनिताच्या पुढे होती. त्यामुळे शिट्टी तिला ऐकू येत नाही असे नव्हते. पण ती कुकरने मारली, तर तिला ऐकू याची नाही. त्यामुळे पाच शिट्ट्या झाल्यावर बंद कर, ही मोलाची इन्ट्रक्शन, तिच्या खात्रीने लक्षात रहाणार नाही, याची आईला काळजी होती.
इतक्यात त्या बटणातून एक आवाज आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. तो आवाज ऐकायचे नीट प्रयत्न व्हायला लागले. पण याचे त्या आवाजाला काहीच नव्हते. तो फक्त करकर आणि चरचर, या दोन भाषेतच बोलत राहिला. आता मात्र लिफ्टमधे आपापले टेंपर सांभाळणे सगळ्यांना अवघड झाले. आणि लिफ्टमधे एकदम गदारोळ उसळला. लोकांनी एकमेकांची पर्वा न करता, हातापायांची जोरदार हालचाल करायला सुरुवात केली. परागनी संधी साधून तोंड लिफ्टच्या भिंतीकडे केले, आणि दोन्ही हातांनी…… जे करायचे ते केले. आता हे लवकर संपूदे हा त्याची देवाकडे मनोमन प्रार्थना होती.
इतक्यात चमत्कार झाला, आणि लिफ्ट चालू होउन खाली आली. तिचे दार हळूच उघडले, तेव्हा आतमधले दृष्य साधारण असे होते….
खानकाका गुडघ्यावर बसलेले होते. म्हणजे पडले होते. त्यांना गुडघ्यावर पडायला जागा मिळाली, ती टीनाच्या आईने, अचानक लिफ्ट हलल्यामुळे ती टुणकन उडी मारली त्यामुळे. म्हणजे खरेतर खानकाका जवळपास तिला टेकूनच उभे होते. तिनी उडी मारल्यावर ते पडले, आणि गुडघ्यावर आपटले. टीनाच्या आईची उडी खाली आली ती खानकाकांच्या खांद्यावर उतरली. उडी मारताना तिचा अख्खा अंबाडा नाकात जाउन, तावरेकाकांचे डोके धाडकन आरशावर आपटले, आणि तो फुटला. तशी पिंकिची आई भानावर आली. आणि तिनी तावरेकाकांनी हे मुद्दाम केले असे वाटून त्यांच्या श्रिमुखात भडकावली. तावरेकाकांच्या पुढ्यात पडलेले खानकाका, आणि त्यांच्या खांद्यावर आरूढ झालेली टीनाची आई, असल्यामुळे अजून ते विश्राममधे येत शकत नव्हतेच. या धक्क्यामुळे कलपकाकांचा तोल गेला, आणि ते पिंकिच्या आईवर कलंडले. तिनी आधारासाठी जोशिकाकुंना पकडले, त्यामुळे त्या वर्तमानपत्रावर कलंडल्या. लिफ्टचे दार उघडल्यामुळे वर्तमानपत्र चक्क बाहेर फेकले गेले, आणि दिल्याच्या अंगावर कोसळले. थोडक्यात काय तर कुठलेही मानवी शरीर सरळ उभे नव्हते. तर भूकंपात एकमेकांवर कोसळलेल्या इमारतिंसारखे इकडे तिकडे कोलमडलेले होते. फक्त लिफ्ट बंद पडली म्हणून इतके सगळे कसे झाले, हे बाहेर असलेल्यांना अजून कळलेले नाही.
कळले ते इतकेच, की दिल्यानी स्विच बंद करताच, दिवे गेले. तेसुद्धा एकच फेज. त्यामुळे जनरेटर चालू झाला नाही. तो चालू करायला गेल्यावर त्यामधे डिझेल नव्हते असे कळले. मग जी काय धावपळ सुरू झाली, ती कुणी काही न करताच दिवे परत आल्यावर थांबली. आणि त्याचबरोबर लिफ्टपण खाली आली.
फ्रेंच फ्राईझ २ - डेमो
Submitted by मकरंद गोडबोले on 9 January, 2019 - 00:35
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा हा हा हा...... मजेशिर!!!!
हा हा हा हा...... मजेशिर!!!!
मजेशीर आहे.
मजेशीर आहे.